पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे व सचिन दत्तु नढे (रा. काळेवाडी,पुणे) यांनी काळेवाडी परिसरात राहुल बार अॅण्ड खुशबु हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर हॉटेलमध्ये बसलेले असता स्वत:जवळील रिवॉलव्हरने हवेत व लाकडी टेबलवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत हॉटेलचे मॅनेजर तुषार लक्ष्मीचंद भोजवाणी (वय-२४,रा.काळेवाडी,पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५२,३५१ (२) (३), भारतीय हत्यार कायदा कलम ३० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास राहुल बारमध्ये आरोपी सचिन नढे व विनोद नढे हे दोघे आले होते. त्यावेळी त्यांनी दहशत माजविण्यासाठी त्यांच्याकडील लोखंडी रिव्हॉलवरने हवेत, लाकडी टेबलवर गोळीबार केला. हॉटेलमधील इतर व्यक्तींच्या जिवीतास व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणण्याची कृती त्यांनी केल्याने त्यांच्यावर याप्रकरणी आर्म्स अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सचिन नढे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे सहा गंभीर गुन्हे पिंपरी, सांगवी, वाकड पोलिस ठाण्यात दाखल आहेत. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर करत आहेत.