पद्मा फाउंडेशनतर्फे महापौर, महापालिका आयुक्तांना निवेदन
पुणे: विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सत्कारासाठी दिल्या जाणाऱ्या पुष्पगुच्छांऐवजी झाडांचे रोप देण्याची प्रथा सुरू करावी, अशी मागणी पद्मा फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे यांनी महापौर मंजुषा नागपूरे, तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन दिले. प्रसंगी विरोधी पक्षनेते ऍड. निलेश निकम, युवा उद्योजक निखिल तांबट व श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे काळूभाऊ चव्हाण उपस्थित होते.
शशिकांत कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या विविध कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छ देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर रूढ झाली आहे. मात्र, हे पुष्पगुच्छ बहुधा प्लास्टिकमध्ये पॅक केलेले असतात आणि काही वेळातच टाकून दिले जातात. त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून, प्लास्टिक कचऱ्याची समस्या अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर, पुष्पगुच्छांच्या ऐवजी झाडांचे रोप देण्याची पद्धत अवलंबल्यास पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल. ‘स्वच्छ, सुंदर व हरित पुणे’ या संकल्पनेलाही बळकटी मिळेल.”
महापालिकेच्या वतीने आयोजित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये ही संकल्पना राबविण्याचा पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. गरजू नागरिकांना आणि स्थानिकांना रोपांचे वितरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करता येईल का, याबाबतही विचार करावा. पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

