Home Blog Page 697

महावितरणच्या २४ तास ‘ऑन ड्यूटी’मुळे सुरळीत वीज पुरवठा अन् सुरक्षा निर्विघ्न

पुणे, दि. १८ सप्टेंबर २०२४: गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान २४ ते ३६ तास महावितरणचे सर्व अभियंता व तांत्रिक कर्मचारी ‘ऑन ड्यूटी’ होते. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व वीजसुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा न येता गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाची निर्विघ्नपणे सांगता झाली.

आनंदपर्व असलेला गणेशोत्सव मागील वर्षीपेक्षा यंदा जल्लोषात साजरा झाला. या उत्सवात सुरळीत वीजपुरवठा व वीज सुरक्षेसाठी महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमधील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. मंगळवार (दि. १७) विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुकींना सुरवात झाली. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी मोठ्या मंडळांच्या व मिरवणुकीतील गणेशमूर्तींचे विसर्जन पूर्ण होईपर्यंत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ ‘ऑन ड्यूटी’ राहण्याचे तसेच प्रत्येक तासाला वीजपुरवठ्याची स्थिती व इतर माहिती अपडेट करण्याचे निर्देश दिले होते.

तसेच मुख्य अभियंता श्री. पवार स्वतः पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांच्यासह अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. सिंहाजीराव गायकवाड यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, ४३ उपविभाग व १७० शाखा कार्यालयप्रमुख अभियंते तसेच तांत्रिक नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रातील मिरवणूक मार्ग व विसर्जन घाटावर सज्ज होते. सुरळीत वीजपुरवठ्यासह प्रामुख्याने वीजसुरक्षेसाठी अविश्रांत कर्तव्य बजावत होते. पुणे शहरातील महत्त्वाच्या लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रस्त्यावर तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. या कक्षातून इतर सर्व सरकारी यंत्रणेशी समन्वय साधण्यात येत होता. शहरी व ग्रामीण भागात आज पहाटे २ ते ६ वाजेपर्यंत बहुतांश गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीची वीज पुरवठा व सुरक्षेच्या दृष्टीने निर्धोक सांगता झाली.     

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता पुणे परिमंडल- ‘गणेशोत्सवात महावितरणचे सर्व अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठा व सुरक्षेबाबत चोख कामगिरी बजावली. सोबतच सर्व मंडळांचे व भाविकांचे सहकार्य मिळाले. सर्वजण सतर्क व सजग राहिल्याने वीजसुरक्षेच्या बाबतीत गणेशोत्सवाची निर्विघ्नपणे सांगता झाली याचे समाधान आहे.’

आदिशक्ती’ रथातून अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप

अखिल मंडई मंडळ गणेशोत्सवाचे १३१ वे वर्ष
पुणे : रौद्र रुपातील कालीमातेची १५ फूट उंचीची मूर्ती असलेल्या ‘आदिशक्ती’रथात विराजमान होऊन अखिल मंडई मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक थाटात पार पडली. आकर्षक विद्यूत रोषणाई असलेला भव्य  ‘आदिशक्ती रथ’ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. शारदा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यावेळी गर्दी केली होती. यंदा प्रथमच शारदा गणपतीची मूर्ती ६० अंशात फिरत असल्यामुळे दोन्ही बाजूने भाविकांना मूर्तीचे दर्शन घेता आले. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता निघाली. 
बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता  पांचाळेश्वर घाट येथे श्रीं चे विसर्जन झाले. सकाळी ५.१५ वाजता मिरवणूकीच्या मुख्य रथाचे आगमन बेलबाग चौकात झाले होते.
मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष आहे. रथाचा आकार १४ बाय १८ आणि उंची २७ फूट होता. मेट्रोच्या लकडीपूल येथील पूलामुळे रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. कलादिग्दर्शक विशाल ताजनेकर आणि सहकाऱ्यांनी रथ साकारला. 
मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन त्यामागे गंधर्व बँड तसेच शिवगर्जना आणि शिवमुद्रा वाद्य पथकाचे वादन मिरवणूकीत झाले.

आयुष्मान खुराना विसर्जनानंतर अमृता फडणवीस यांच्या बीच क्लीनअप ड्राईव्हमध्ये सहभागी

0

पर्यावरणपूरक गणपती:

मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुराना यांनी आज मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्याची सफाई करण्यासाठी दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस यांच्यासोबत भाग घेतला. हे सफाई अभियान खूप महत्त्वाचं होतं कारण मुंबईचे समुद्रकिनारे सणानंतर अनेकदा प्रदूषित होतात, जे समुद्री जीवांसाठी धोकादायक ठरू शकतं.

आयुष्मान खुराना दिव्याज फाउंडेशनच्या ‘बच्चे बोले मोरया’ उपक्रमांतर्गत ‘सी शोर शाइन’ क्लीनअप ड्राईव्हमध्ये सहभागी झाला , जिथे गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आले. यावर्षी त्यांनी आपल्या मुलांसह पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची स्थापना केली होती, ज्यामुळं त्यांचा ‘ग्रीन गणपती’ कडेचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे.

समुद्रकिनारी क्लीनअप ड्राईव्हमध्ये बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला , “आपल्या पर्यावरणाची काळजी घेणं आणि भविष्यासाठी ते सुरक्षित ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. सण साजरे करताना आपल्या पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांचा विचार करणं गरजेचं आहे, आणि आपलं नियोजन अधिक चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपण हरित भविष्याकडे वाटचाल करू शकू. आज येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं आणि तरुणांना पाहून आनंद झाला – मला अभिमान आहे की आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याला पर्यावरणाचं महत्त्व कळतं आणि त्यांनी आज इथं येऊन चांगल्या कामात सहभाग घेतला आहे!”

अमृता फडणवीसांना आजपासून मॅडम नाही, माँ अमृता संबोधणार- मंगलप्रभात लोढा

मुंबई-अमृता फडणवीसांनी आता माँचे रुप घेतले आहे. मुलां-मुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यासाठी मी आजपासून त्यांना अमृता मॅडम नाही, माँ अमृता असं संबोधणार आहे, असे भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.मंगलप्रभात लोढा म्हणाले की, दिव्याज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांना मी विनंती करतो की समुद्रावरील कचरा साफ करता हे अत्यंत चांगले काम करता. आता राजकारणातील कचराही स्वच्छ करावा असे त्यांनी म्हटले आहे.

गणेश विसर्जनानंतर दरवर्षी अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्यावतीने समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाते. सकाळी 6.30 वाजता वर्सोवा किनारपट्टी स्वच्छ करण्याच्या मोहीमेला सुरुवात झाली. अमृता फडणवीसांच्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आणि अभिनेता आयुष्मान खुराणा उपस्थित होते.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला स्वच्छता पाहिजे कॉर्पोरेट असो किंवा पॉलिटिक्स असो सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे. राजकारण असो किंवा आपली मनं असो, कोणतेही सेक्टर असो कोणत्याही सेक्टरमध्ये काही ना काही घाण असते. त्यामुळे स्वच्छता करण्याची गरज आहे, म्हणून आपण म्हणतो योगा करा मेडिटेशन करा.अमृता फडणवीस म्हणाल्या की, आपल्याकडे नद्या, तलाव, समुद्र हे असलेले पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवले पाहिजेत. आपण त्यांची काळजी घेऊ तेव्हाच हे स्वच्छ राहतील. समुद्र आणि तलावात प्लॅस्टिक टाकून मोठे प्रॉब्लेम होतात. शहराचा आर्थिक विकास करायचा असेल तर आधी स्वच्छता राखली पाहिजे. आपण जसं आपलं घर सुंदर ठेवतो, तसाच आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण देवभक्त आहोत, देवाला स्वच्छता आणि सुंदरता आवडते.

दगडूशेठ विसर्जनानंतर मिरवणूक का रेंगाळली ….

पुणे: पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आज(बुधवारी) दुसऱ्या दिवशी ही सुरू आहेत. काल(मंगळवारी) संध्याकाळी पुण्यातील मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन रात्री सव्वाआठ वाजता पार पडले.तेव्हाच आता मिरवणूकीची लवकर सांगता होईल असे सांगण्यात येत असतानाही रात्री उशिरा विसर्जन मिरवणूक सुरूच होती.दगडूशेठने विसर्जनाच्याच दिवशी रात्री सव्वाआठ वाजता विसर्जन पूर्ण करून ऐतिहासिक कामगिरी बजावली पण त्यानंतर ज्यांची प्रतीक्षा होती, जे यायला हवे होते ती मंडळे मात्र जागेवरून हलली नाहीत . भाऊसाहेब रंगारी,मंडई, बाबू गेणू, या महत्त्वाच्या गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणूका मध्यरात्र उलटून गेल्यावर देखील सुरूच होईनात आणि तिथेच मिरवणूक लांबण्याची चिन्हे स्पष्ट झाली .काल रात्री ८ वाजता येणारा भाऊ रंगारी गणपती ने नंतर रात्री ९ वाजता लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होणार असे जाहीर केले पण प्रत्यक्षात हा गणपती पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीत बेलबाग चौकात सहभागी झाला, पावणेसात वाजता तो गोखले हॉल चौकात होता .श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे काळ रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान विसर्जन झाले. मात्र त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांमध्ये नंबर आधी कोणाचा यावरुन वाद झाला त्यामुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळली. या मंडळांची मिरवणूक सुरू होत नसल्याने पाठीमागे असलेली मंडळेही रखडली.दगडूशेठ नंतर तब्बल १२ तासांनी झाले भाऊ रंगारी गणाधीशाचे विसर्जन झाले.

पोलिसांनी काल रात्री दिलेल्या माहितीनुसार ही विसर्जन मिरवणूक दुपारी १२ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.भाऊ रंगारी गणपती अलका चौकात दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून मिरवणूक लवकर पूर्ण होण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आग्रह केला जात आहे. .

. मानाचा पहिला – कसबा गणपती
10:30 – मिरवणुकीची सुरुवात
11:10 – बेलबाग चौकात
3:35 – अलका चौक
4:32 – नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा दुसरा – तांबडी जोगेश्वरी
10:40 – मिरवणुकीला सुरुवात
12:00 -बेलबाग चौक
4:12 – अलका चौक
5:10 – नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा तिसरा – गुरुजी तालीम
11:10 – मिरवणुकीला सुरुवात
1:12 – बेलबाग चौक
5:16 – अलका चौक
6:43 – नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा चौथा – तुळशीबाग
11:50 – मिरवणुकीला सुरुवात
2:20 – बेलबाग चौक
6:17 – अलका चौक
7:12 – पाताळेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा पाचवा – केसरीवाडा
12:25 – मिरवणुकीला सुरुवात
3:23 – बेलबाग चौक
6:27 – अलका चौक
7:38 – पाताळेश्वर घाटावर विसर्जन

गर्दीच्या महासागरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजाचे सव्वाआठ वाजता विसर्जन..(व्हिडीओ)

‘दगडूशेठ’ च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात

पुणे- पुण्याच्या गणेशोत्सवात मानाचा तुरा समजला जाणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजाचे आज रात्री सव्वा आठ वाजता विसर्जन झाले . गेल्या वर्षापासून या मंडळाने विसर्जन मिरवणुकीत वेळ पाळण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आजच्या विसर्जनाच्या वेळेने इतिहासात नोंद केली. गेल्या वर्षाहून २ तास अगोदर यावेळी विसर्जन झाले . तत्पूर्वी दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन हे दुसऱ्या दिवशी पहाटे किंवा सकाळी होत असत .आज ठरलेल्या वेळी ४ वाजता या गणपतीची मिरवणूक सुरु होऊन मिरवणूक लक्ष्मी रस्त्याला साडेचार वाजता आली .

\ लाखो एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री उमांगमलज रथात विराजमान होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची वैभवशाली सांगता मिरवणूक बेलबाग चौकातून निघाली आणि तो क्षण अनुभवण्याकरीता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. सलग दुस-या वर्षी दुपारी ४ वाजता दगडूशेठ चे गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी झाले. संपूर्ण रथावर लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यांच्या रंगीबेरंगी रोषणाईने मिरवणुकीच्या वैभवात आणखी भर घातली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी आयोजित सांगता मिरवणुकीला मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास बेलबाग चौकातून प्रारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी यांसह हजारो कार्यकर्ते पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. बेलबाग चौकात आरती करुन मिरवणुकीला प्रारंभ झाला. स्वरुपवर्धिनी ढोल ताशा ध्वज पथक आणि झांज पथकातील वादकांनी गणरायाला पारंपरिक पद्धतीने दिलेली मानवंदना हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

मिरवणुकीच्या अग्रभागी रुग्णसेवा रथ होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक विषयांतर्गत आरोग्य विषयक जनजागृती रथावरुन करण्यात आली. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. तसेच केरळमधील चेंदा वाद्याचे वादन कलाकारांनी केले. पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.

लक्ष्मी रस्त्यावरुन बाप्पाची मिरवणूक जात असताना ठिकठिकाणी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने गणरायाला नमन करण्यात आले. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास टिळक चौकात रथाचे आगमन होताच हा क्षण डोळयात साठविण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोषात रात्री ८. ४५ वाजता पांचाळेश्वर घाट येथे हौदात मूर्तीचे विसर्जन करुन गणरायाला निरोप देण्यात आला.

*श्री उमांगमलज रथ पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी
यंदा उत्सवात साकारलेली प्रतिकृती जटोली शिवमंदिराच्या विषयानुरुप सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली. श्री उमांगमलज रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती होती. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरु होते. कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखविण्यात आला. नागाच्या फण्यावर हा तोललेला होता, बाजूला २१ छोटे कळस लावण्यात आले. तर, रथावर २३ नंदींचे चेहरे बसविण्यात आले. रथावर तब्बल १८ क्रिस्टलचे झुंबर लावण्यात आले होते.

याशिवाय रथावर ८ खांब साकारण्यात आले. प्रत्येक खांबावर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात आले. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होते, तेथे मोराची डिझाईन देखील साकारण्यात आली. त्यामुळे हा अतिशय विलोभलीय रथ व मिरवणूक सोहळा पाहण्यासोबतच अनेकांनी ते नेत्रदिपक क्षण आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये टिपले.

पुण्यातील मनाच्या गणपतींचे विसर्जन

मानाच्या पहिल्या गणपतीचे 4:32 वाजता विसर्जन झाले

मानाच्या दुसऱ्या गणपतीचे 5:10 वाजता विसर्जन झाले

मानाच्या तिसऱ्या गणपतीचे 6:44 वाजता विसर्जन झाले.

मानाच्या चौथ्या गणपतीचे 7:15 वाजता विसर्जन झाले

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत’राधा हि बावरी’ ने केले ढोल वादन

पुणे- १०/ ११ वर्षापूर्वी छोट्या पडद्यावरची लोकप्रिय जोडी ठरलेली ‘राधा हि बावरी’ ची आठवण आज मिरवणुकीत अनेकांनी काढली त्याला निमित्त हि होते . या मिरवणुकीत मराठी अभिनेत्री श्रुती मराठे आणि सौरभ गोखले ढोल वादन करताना लोकांना दिसले आणि विस्मरणात गेलेली हीच मालिका अनेकांना आठवली . अर्थात या दोहोंनी नंतर अनेक चित्रपट वेब सेरीज मध्येही काम केलेय .पण महिलांना राधा लवकर आठवली .दरवर्षीप्रमाणे आज या कलाकारांच्यात सिद्धार्थ जाधव देखील ढोलवादन करताना दिसला .

बूढ़ी के बाल आणि मंत्री चंद्रकांतदादा

गणेश विसर्जन मिरवणूक म्हटली कि लहान मुलांना आकर्षण असतेच , यात्रे प्रमाणे या मिरवणुकीत देखील वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रेते असतात , आणि बूढ़ी के बाल विक्रेत्याच्या भोवती घुत्माल्णारे पोरे मंत्री असलेल्या चंद्रकांत दादांना दिसली आणि त्यांच्यातला साधा माणूस पुढे सरसावला चक्क चंद्रकांत दादांनी बूढ़ी के बाल विकत घेतले… एकामागे एक करत बरेच घेत गेले आणि तसे ते वाटत हि गेले .. स्वतासाठी १ ठेवून घेऊन ..

राजकीय जीवनात काम करणारा कार्यकर्ता यशस्वी झाला की त्याच्या डोक्यात सत्तेची नशा चढते असे म्हणतात. पण सत्तेची ही नशा डोक्यात न जाऊ देता; साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा जीवनमंत्र मानून सार्वजनिक काम करणाऱ्या व्यक्ती या दैवदुर्लभ असतात. अन् हीच माणसे समाजाची श्रीमंती असतात.‌राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे असेच व्यक्तिमत्त्व या मिरवणुकीत दिसले त्यात संदीप खर्डेकर सोबत … मग काय विचारता …

दादा नेहमीच आपल्या साधेपणाबाबत चर्चेत असतात. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचा हा साधेपणा संपूर्ण पुणेकरांना पुन्हा अनुभवायला मिळाला.आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सर्व पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री इतके एकरुप झाले की, उपस्थित सर्वच आवाक झाले.कारण, विसर्जनाला जाणाऱ्या मानाच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर; त्यांनी सर्वात आधी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाश्ता उपलब्ध करुन दिला. त्यानंतर मिरवणुकीचा मनमुराद आनंद लुटला. कधी ढोल पथकांच्या ठेक्यावर ताल धरला. तर कधी ध्वज पथकात सहभागी होऊन सलामी दिली. एवढंच कशाला लहान मुलांच्या आवडीचे शुगर कॅन खरेदी करुन लहान मुलांना वाटप केलं. यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत अनेक लहान मुले महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यात ही त्यांनी आनंद मानला.

खरंतर चकाकते ते सगळेच सोने नसते. जे आहे, जसे आहे ते झळाळून व्यक्तिमत्त्व उन्नत करण्याचे काम साधेपणा करीत असतो. साधेपणाची जीवनशैली अंगीकारली; तर केवळ व्यक्तिमत्त्वाचीच नव्हे; तर जगण्याचीही उंची वाढते . आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या मिरवणुकीतील या दर्शनाने साधेपणाने अनेकांना भुरळ पाडली नाही तरच नवल …..

  • अभिषेक लोणकर

अजितदादा मिरवणुकीत दंग..अन वडगावशेरीत घड्याळाला सुरुंग

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज पुण्यातील गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कधी नव्हे तेवढे दंग झालेले दिसले तर त्याच दुपारी त्यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील गटाला मोठा हादरा बसला. वडगावशेरी मतदार संघा चे माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्यासह माजी नगरसेवक महेंद्र पठारे,महादेव पठारे आणि भैय्यासाहेब जाधव या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे .

यामुळे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना मोठे आव्हान पेलावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बापूसाहेब पठारे यांनी महापलिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष अशा पदावर काम करत आमदारकी गाठली होती , या मतदार संघात त्यांचे बरे वर्चस्व आहे तर भैय्या जाधव हे माजी न्यायमूर्ती आणि प्रामाणिक माजी नगरसेवक म्हणून लोकांना परिचित आहेत . राजकारणाशिवाय समाज कारण एवढेच माहित असलेले भैय्या साहेब जाधव पठारे यांच्या समवेत शरद पवार गटात गेले आहेत .यामुळे वडगाव शेरी आणि हडपसर हे अजितदादांचे दोन बाले किल्ले आता ढासळयला वेळ लागणार नाही असे बोलले जाते .

केजरीवाल यांनी लेफ्टनंट गव्हर्नरना CM पदाचा राजीनामा सोपवला, आतिशी म्हणाल्या, हा माझ्यासाठी ,जनतेसाठी दुःखाचा क्षण

आतिशी म्हणाल्या- माझे अभिनंदन करू नका, मला हार घालू नका-माझे अभिनंदन करू नका, मला पुष्पहार घालू नका, माझे आवडते मुख्यमंत्री राजीनामा देत आहेत, हा माझ्यासाठी आणि दिल्लीच्या जनतेसाठी दुःखाचा क्षण आहे.

नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी संध्याकाळी 4.45 वाजता लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. आतिशी यांच्यासह सर्व मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित होते. दिल्ली सरकारने 26 आणि 27 सप्टेंबरला विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे.यापूर्वी आतिशी मार्लेना यांना दिल्लीचे मुख्यमंत्री करण्याची घोषणा करण्यात आली होती. केजरीवाल यांनी मंगळवारी आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला आमदारांनी सहमती दर्शवली.

आतिशी यांच्या नावाची घोषणा करताना दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय म्हणाले – आम्ही कठीण परिस्थितीत हा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावर चिखलफेक झाली. जनतेने त्यांना निवडून दिल्याशिवाय ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाहीत.

दुपारी 1 वाजता आतिशी मीडियाशी बोलताना म्हणाल्या, ‘मी माझे गुरू अरविंद केजरीवाल जी यांचे आभार मानतो, ज्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी दिली. माझे अभिनंदन करू नका, मला पुष्पहार घालू नका, आमचे आवडते मुख्यमंत्री राजीनामा देतील हा माझ्यासाठी आणि दिल्लीच्या जनतेसाठी दुःखाचा क्षण आहे.

दरम्यान, ‘आप’च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल म्हणाल्या, ‘ज्याचे कुटुंब दहशतवादी अफझल गुरूसाठी लढले, तिला आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री केले आहे. देव दिल्लीचे रक्षण करो. दिल्लीसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखाचा आहे.”

13 सप्टेंबरला मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते, ‘मी प्रामाणिक की बेईमान हे आता जनतेने ठरवावे. जनतेने हा डाग धुवून विधानसभा निवडणुकीत विजय केले, तर मी पुन्हा खुर्चीवर बसेन.”

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील १४ पोरांची सशस्त्र टोळी पोलिसांनी पकडली

पुणे-शनिनगर चौकातील महादेव मंदीराचे मागील बाजुचे पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकून भारती विद्यापीठ पोलिसांनी १४ पोरांची सशस्त्र टोळी पकडली जवळच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकायला निघालेली हि टोळी पोलिसांनी वेळीच पकडली ज्यात २ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे आणि १२ मुले १८ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत.

याप्रकरणी पोलीस अंमलदार,निलेश खैरमोडे, यांनी स्वतः भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद ७५०/२०२४, भा.न्या. सं. कलम ३१० (४), ३१० (५), गहाराष्ट्र पो. अधि. कलम ३७(१) (३) १३५ व आर्म अॅक्ट कलम ४ सह २५ अन्वये नोंदविली आहे. पकडलेल्या टोळीतील पोरांची नावे …
१)प्रथमेश ऊर्फे देवीदास कुडले, वय २३ वर्षे, रा. मातृछाया बिल्डींग, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, पुणे २) प्रकाश पाराजी काटे, वय २४ वर्षे, रा.रुम नंबर ३, जाधव चाळ, जुन्या पोलीस चौकीसमोर, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, पुणे ३). करण संदीप चिकणे, वय २० वर्षे, रा. राहुल कॉलनी, सरस्वती क्लास समोर, सातववाडी गोधळेनगर, हडपसर, पुणे ४) अजहर रमजान सय्यद, वय २३ वर्षे, रा. चगनशहा दर्गाजवळ, काशेवाडी भवानी पेठ, पुणे ५)सुशांत सुधाकर धोत्रे, वय १९ वर्षे, रा. भोईटे चाळ, संतोषी माता मंदीराजवळ, संतोषनगर, कात्रज, पुणे ६) आयान नियाज शेख, वय १९ वर्षे, रा. ३९० न्यु मोदीखाना कैम्प, पुणे ७) रिहान रमजान सय्यद, वय २० वर्षे, रा. चमनशहा दर्गाजवळ, काशेवाडी भवानी पेठ, पुणे ८) अरजान शाहीद शेख, वय १९ वर्षे, रा.. १००९ न्यु नाना पेठ, निशाद टेलर्स जवळ, पुणे ९) फरहान रमजान सय्यद, वय २० वर्षे, रा. काशेवाडी भवानी पेठ, चमनशहा दर्गाजवळ, पुणे १०) विनय सतिश येनपुरे, वय १९ वर्षे, जन्म दिनांक ०४/०७/२००५, रा. केशव कॉम्पलेक्स, सारस सोसायटी, धनकवडी, पुणे ११) दुर्गेश हनुमंत सिध्दापुर, वय १८ वर्षे, रा. गंगानगर, फुरसुंगी हडपसर, पुणे १२) अंकीत राजु हकाळे, वय २१ वर्षे, रा. लेन नंबर २, गणेश दत्त मंदीराजवळ, संतोषनगर कात्रज, पुणे (अटक) आणि दोन विधीसंघर्षीत बालक
दि.१५/०९/२०२४ रोजी रात्री २३ / ४५ वा.चे सुमा. शनिनगर चौकातील महादेव मंदीराचे मागील बाजुचे पत्र्याचे शेड मध्ये
यातील या सर्वांनी संगनमत करून, गा. राह पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे पुणे शहरपोलीस पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्रात शस्त्रे, सोटे, तलवारी, शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगण्यास बंदी आदेश असताना, त्यांनी सदर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करून, आपले कब्जात बेकायदेशीररित्या व अनधिकृतपणे मिरची पावडर, रस्सी, लोखंडी कोयता इत्यादी घातक शस्त्रे तसेच दोन दुचाकी गाड्या असा एकुण २,५२,१५०/- रू किचा ऐवज बेकायदेशीररित्या आपले जवळ बाळगुन, हत्याराची व साथीदारांची जमवाजमव करून, दरोडा टकाण्याची पूर्ण तयारी करून, सदर भागात दहशत निर्माण करून, जवळील पेट्रोल पंपावर स्वतः चे आर्थिक फायद्यासाठी दरोडा टाकण्याचे तयारीत असताना मिळुन आले. असे फिर्यादीत म्हटले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे मो.नं ९५०३७५८२८४ अधिक तपास करत आहेत .

 धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश अशक्य; मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध

पुणे- धनगर समाजाला (Nashik) अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही असे प्रयत्न केले जातील. असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. अशा अज्ञानी, अविचारी व संधीसाधू मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. तर सध्या धनगर समाजाला NT प्रवर्गातील आरक्षण लागू आहे. मात्र मध्यप्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यात धनगड समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आरक्षण आहे. मात्र इंग्रजीत उच्चार करताना D चा उच्चार R असा करण्यात आला आहे. त्यामुळे धनगर आणि धनगड एकच असल्याचा युक्तिवाद करीत धनगर समाजाने ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. ती उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळली आहे.

याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोळी, कोष्टी, गोवारी व धनगर॒ या जातींच्या याचिका वेळोवेळी फेटाळल्या आहेत. तरीही धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देण्याबाबत आश्चासन देणे (Nashik) म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. याबाबत तात्काळ शासननिर्णय काढावा आदिवासी समाज त्याला अवमान याचिकेद्वारे आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती आदिवासी सेवक पुरस्कार्थी रवींद्र तळपे यांनी दिली आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यात राज्याचे महाधिवक्ता, विधी व न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल. आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे सचिव तसेच समन्वय समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग घेऊन अन्य मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही व्हावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

असे निर्देश देणे म्हणजे हास्यास्पद आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयातील धनगर आरक्षणाबाबतच्या घडामोडी व लागलेले निकाल हे मुख्यमंत्री व शासकीय यंत्रणेला माहिती आहे तरीही फक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर मतदारांना आश्वासने देण्याचा प्रकार सुरू आहे. यापूर्वीच कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब मनमानीपणे करण्याचा प्रयत्न झालेला आहे.

तो आदिवासींनी वेळोवेळी हाणून पाडला आहे. आता धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करणारा (Nashik) कोणताही बेकायदेशीर व घटनाबाह्य शासननिर्णय आदिवासी विकास विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाने काढल्यास 24 तासांच्या आत त्याला कायद्याच्या व घटनेच्या चौकटीत आदिवासींकडून आव्हान दिले जाईल असेही रवींद्र तळपे यांनी स्पष्ट केले.

संदीप शिंदे यांचे निधन


पिंपरी, पुणे (दि. १७ सप्टेंबर २०२४) चिखली (ऐश्वर्या हमारा, म्हाडा सोसायटी) येथील रहिवाशी युवा उद्योजक संदीप दगडू शिंदे पाटील (वय ४९ वर्षे) यांचे मंगळवारी (दि. १७) निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, एक बहिण, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. अहमदनगर जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन दगडू शिंदे पाटील यांचे ते चिरंजीव होत. त्यांचा अंत्यविधी मूळ गाव आढळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे दुपारी करण्यात आला. यावेळी शेती, उद्योग, व्यापार शिक्षण, राजकीय क्षेत्रातील शोकाकुल नागरिक उपस्थित होते.

मानाच्या गणपतींचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूजन करून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ

सर्वांना सुख, शांती मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे-उपमुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

पुणे, दि. १७: सर्वांना सुख, शांती, आनंद मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गणरायाच्या चरणी घातले. शहरातील विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…!’ असा घोष करून भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

श्री. पवार यांनी महात्मा फुले मंडई परिसरात पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या पाच गणपतीचे पूजन करुन दर्शन घेतले. त्यानंतर या मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीस सुरु करण्यात आली.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रवींद्र धंगेकर,दीपक मानकर ,संदीप खर्डेकर , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी श्री. पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाला भेटी देऊन श्री गणेशाची आरती करुन दर्शन घेतले.

श्री. पवार म्हणाले, देशासह राज्यात मोठ्या उत्सवात भक्तीमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले आणि त्याचे स्वागत झाले. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची एक मोठी परंपरा असून मोठा नावलौकिक आहे. गणेशोत्सवात सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी होतात, याला साजेसे काम पुणेकरांनी करावं, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, हे पाहता आजच दुपारी ४ वाजेपर्यंत श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याच्या निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने घेतला आहे, यामुळे नागरिक आणि प्रशासनावरील ताण कमी होतो, असे नवनवीन पायंडे पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून पाडण्यात येत असतात, ही चांगली बाब आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असते. सण, उत्सवाच्या काळात प्रशासनाच्यावतीने करण्यात नियमांचे पालन करुन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.

यावेळी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराचे अध्यक्ष माणिक चव्हाण, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह विविध मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.तत्पूर्वी महात्मा फुले मंडई परिसरातील लोकमान्य टिळक आणि उप पंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास श्री. पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

मद्यधुंद चालकाच्या मोटारीची थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला धडक; कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल

पुणे- थेट दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांमुळे पुण्यात सामान्य नागरिकांसह मंत्री देखील असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. कोथरूड येथील आशिष गार्डन चौकात सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील वाहनास अशाच एका मद्यधुंद चालकाच्या मोटारीची धडक बसली असून चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहे.

एका कार चालकाने दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवत चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यातील गाडीला भीषण धडक दिली. त्यामुळे खळबळ उडाली. मद्यधुंद चालकासह सोबत असलेल्या दोन महिलांवरही याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, काल रात्री माझा ताफ्यातील वाहनास मोठा अपघात झाला. दारूने तर्र झालेल्या दोन पोरांच्या गाडीने आमच्या एसपीओ वाहनास उडवलं. आता याला गृहमंत्री काय करणार ? गृहमंत्र्यांनी तिथे येऊन उभे राहिले पाहिजे का की, दादाची गाडी तिथे चालली आहे. पोलिसांनी आता दोषींवर कारवाई केली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी या वेळी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी गणेश मिरवणुकीचे उत्सवात सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, यंदाचा गणपती उत्सव उत्तम झाला. लोकांमध्ये मोठा उत्साह होता, खूप गर्दी देखील होती.बाप्पाला एकच प्रार्थना केली तुझा आज विसर्जन करत आहोत, कुठलेही अडचण येऊ देऊ नको. महायुतीचा सरकार पुन्हा एकदा राज्यात आले पाहिजे, हे मागणे मागितले आहे. बाप्पाचे आशीर्वाद आहेच, पण आमचे ही कर्तुत्व आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत त्यामुळे 170 वर आम्ही पोहचू, असा दावा देखील त्यांनी केला.

मराठा समाजाला आता समजू लागलेला आहे की, मनोज जरांगे आता तथ्य सोडून बोलत आहेत. तथ्य काय आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण प्रथम दिलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी घालवलेला आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिले. एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिले तरी मराठा समाजाचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर का? हे कळत आहे. वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून जरांगे त्यांची सहानभूती घालवत आहेत. खासदार शरद पवार यांच्या कारकिर्दीत मंडल आयोग आला असताना सुतार ओबीसीमध्ये टाकले, लोहार टाकला…मग मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकण्यास त्यांची का हरकत होती? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तेव्हा तुम्ही का टाकले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. 10 टक्के मराठा आरक्षण केंद्र सरकारनी दिले आहे. तरीसुद्धा सारखे राज्य, केंद्रावर बोट का दाखवतात? मनोज जारंगे एका मोठ्या शिखरावर गेले, तिथे त्यांनी सर्वांना समान न्याय देऊन वागवले तर ठीक असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.