पुणे, दि. १८ सप्टेंबर २०२४: गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान २४ ते ३६ तास महावितरणचे सर्व अभियंता व तांत्रिक कर्मचारी ‘ऑन ड्यूटी’ होते. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व वीजसुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा न येता गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाची निर्विघ्नपणे सांगता झाली.
आनंदपर्व असलेला गणेशोत्सव मागील वर्षीपेक्षा यंदा जल्लोषात साजरा झाला. या उत्सवात सुरळीत वीजपुरवठा व वीज सुरक्षेसाठी महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमधील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. मंगळवार (दि. १७) विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुकींना सुरवात झाली. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी मोठ्या मंडळांच्या व मिरवणुकीतील गणेशमूर्तींचे विसर्जन पूर्ण होईपर्यंत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ ‘ऑन ड्यूटी’ राहण्याचे तसेच प्रत्येक तासाला वीजपुरवठ्याची स्थिती व इतर माहिती अपडेट करण्याचे निर्देश दिले होते.
तसेच मुख्य अभियंता श्री. पवार स्वतः पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांच्यासह अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. सिंहाजीराव गायकवाड यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, ४३ उपविभाग व १७० शाखा कार्यालयप्रमुख अभियंते तसेच तांत्रिक नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रातील मिरवणूक मार्ग व विसर्जन घाटावर सज्ज होते. सुरळीत वीजपुरवठ्यासह प्रामुख्याने वीजसुरक्षेसाठी अविश्रांत कर्तव्य बजावत होते. पुणे शहरातील महत्त्वाच्या लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रस्त्यावर तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. या कक्षातून इतर सर्व सरकारी यंत्रणेशी समन्वय साधण्यात येत होता. शहरी व ग्रामीण भागात आज पहाटे २ ते ६ वाजेपर्यंत बहुतांश गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीची वीज पुरवठा व सुरक्षेच्या दृष्टीने निर्धोक सांगता झाली.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता पुणे परिमंडल- ‘गणेशोत्सवात महावितरणचे सर्व अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठा व सुरक्षेबाबत चोख कामगिरी बजावली. सोबतच सर्व मंडळांचे व भाविकांचे सहकार्य मिळाले. सर्वजण सतर्क व सजग राहिल्याने वीजसुरक्षेच्या बाबतीत गणेशोत्सवाची निर्विघ्नपणे सांगता झाली याचे समाधान आहे.’