Home Blog Page 698

वंदे मातरम्‌‍ केवळ गीतच नव्हे तर स्वातंत्र्य युद्धकाळातील मंत्र : अभिजित जोग

मिलिन्द सबनीस लिखित ‌‘कहाणी वन्दे मातरम्‌‍‌’ची पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : इंग्रज राजवटीत भारत देशाविषयीच्या चुकीच्या आणि वाईट समजुती पसरविल्या गेल्या. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान राष्ट्रवाद दाखविण्यासाठी तसेच भारत भूमी आपली माता आहे, या भावनेतून बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम्‌‍ची रचना केली. वंदे मातरम्‌‍ हे केवळ गीतच नव्हे तर स्वातंत्र्य युद्धकाळातील मंत्र होता, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, ब्रॅण्डिंग तज्ज्ञ अभिजित जोग यांनी केले.

वंदे मातरम्‌‍ सार्थ शति (150व्या) वर्षानिमित्त वंदे मातरम्‌‍चे अभ्यासक, लेखक, चित्रकार मिलिन्द प्रभाकर सबनीस लिखित ‌‘कहाणी वन्दे मातरम्‌‍‌’ची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (दि. 9) आबासाहेब अत्रे दिन प्रशालेतील बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचनकक्षात आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन विद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते झाले. त्या वेळी अभिजीत जोग अध्यक्षपदावरून बोलत होते. चित्रकार चंद्रशेखर जोशी, अत्रे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण सुपे, कार्यक्रमाचे संयोजक संदर्भ ग्रंथपाल आणि माहिती तज्ज्ञ प्रसाद भडसावळे, शिल्पा सबनीस, प्रसाद कुलकर्णी, सुवासिनी जोशी, पियूष शहा, उत्तम साळवे उपस्थित होते. वंदे मातरम्‌‍ या गीताविषयीचे चित्ररूपी प्रदर्शन वाचनकक्षात भरविण्यात आले आहे.
ग्रंथ हे गुरूच नव्हे तर मित्रही असतात, असे सांगून जोग पुढे म्हणाले, वंद मातरम्‌‍ गीताच्या 150व्या वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वंदे मातरम्‌‍ या गीताचा इतिहास ‌‘कहाणी वन्दे मातरम्‌‍‌’ची या चित्रकथारूपी पुस्तकाद्वारे माहित होणार आहे. अतिशय सोप्या भाषेत चित्रांसहित निर्मित केलेले हे पुस्तक देशभरात पोहोचणार असून शाळेतील वाचनालये, ग्रंथालये यांचा ठेवा बनणार आहे. वाचनातून आनंद घ्या, ज्ञान वाढवा, ज्या योगे तुमचा व्यक्तीमत्त्व विकास होईल, असे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जोग म्हणाले.
मिलिन्द सबनीस म्हणाले, शाळेने विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे या विषयी आनंद आहे. पुस्तकाच्या निर्मितीविषयी बोलताना ते म्हणाले, भारताचा इतिहास घडविण्यात आणि बदलण्यात वंदे मातरम्‌‍ या गीताचा मोठा वाटा आहे. या गीताविषयीचा इतिहास चित्रकथारूपाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा याकरिता या पुस्तकाची निर्मिती केली आहे. हे पुस्तक भारतातील 12 भाषांमध्ये भाषांतरीत होऊन त्या-त्या प्रांतातील विद्यार्थ्यांनाही वंदे मातरम्‌‍ची महती समजणार आहे. चित्रकथारूपी पुस्तके वाचताना मुलांना गोष्टीचे अकलन लवकर होते. चित्रांपासून पुढे जात जात विद्यार्थ्यांनी गोष्टीतील आषयाकडे वळावे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविका प्रसाद भडसावळे म्हणाले, स्व. प्रभाताई अत्रे यांना वंदे मातरम्‌‍ या गीताविषयी जिव्हाळा होता. त्यांचा प्रथम स्मृतिदिन, वंदे मातरम्‌‍ गीताचे 150वे वर्ष आणि सध्या सुरू असलेला वाचन पंधरवडा याचे औचित्य साधून पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. सूत्रसंचालन आणि मान्यवरांचा परिचय केशव तळेकर यांनी करून दिला.

कलासक्त आयोजित मैफलीत विदुषी मंजिरी आलेगावकर यांचे सुश्राव्य गायन

मोरेश्वर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ मैफलीचे आयोजन
पुणे : विदुषी मंजिरी कर्वे-आलेगावकर यांनी रंगवलेला राग श्री, हंसध्वनी, नंद यांसह तराणा आणि निर्गुणी भजनाने गायन मैफलीत रंग भरले. निमित्त होते ते कलासक्त सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित सुश्राव्य मैफलीचे.
मैफलीचे आयोजन पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. मंजिरी आलेगावकर यांनी मैफलीची सुरुवात राग श्रीमधील ‌‘गरिब नवाज तुम हो साईयाँ‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. याला जोडून गुरू आप्पा कानिटकर यांनी शिकविलेली आणि अंतुबुवा जोशी यांनी रचलेली ‌‘अर्धांगी गिरिजा गौरी‌’ ही द्रुत लयीतील बंदिश सादर केली. सुमधुर आवाज, त्यातील ठेहराव याने मैफलीत रंग भरले. विख्यात शास्त्रीय गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या आठवणींना उजाळा देत कुमारजी आपल्या मैफलीच्या यशाचे रहस्य सांगताना शब्दांवरील आघातांना महत्त्व देत, असे सांगून श्री रागातील कुमारजींनी अजरामर केलेला ‌‘तनारे ना नी तोम्‌‍ तन धीम्‌‍‌’ या तराणा अतिशय दमदारपणे सादर करून रसिकांना संमोहित केले.
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव राग नंद खुलवत नेताना मंजिरी आलेगावकर यांनी पंडित कुमार गंधर्व यांची ‌‘अजहून आए शाम‌’ ही रचना ऐकविली. ‌‘ढुंढू बारे सैंय्या तोहे सकल बन‌’ ही रचना सादर करताना आवाजातले माधुर्य आणि अलवार ताना घेऊन त्यांनी रसिकांची मने जिंकली.
कुमार गंधर्व यांचीच ‌‘अब तो आजा रे राजन‌’ ही रचनाही त्यांनी प्रभावीपणे सादर केली. यानंतर राग हंसध्वनी ऐकवताना मंजिरी आलेगावकर यांनी रामाश्रय झा रचित रूपक तालातील ‌‘सकल दु:ख हरन‌’ ही अतिशय भावपूर्ण रचना सादर केली. या बंदिशीच्या अर्थाला जुळणारी ‌‘नित सुमरन करे भोलानाथ असूर संहार‌’ ही स्वरचित बंदिश ऐकवून रसिकांना स्तिमित केले. यानंतर पंडित बबनराव हळदणकर यांनी रचलेला ‌‘त दे नानी तद रे तानी‌’ हा तराणा सादर केला.
पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेले संत कबिरांचे निर्गुणी भजन सादर करताना मंजिरी आलेगावकर यांनी त्या रचनेचा आशय उलगडून दाखविला. मनाला उद्देशून रचलेल्या ‌‘हीर ना समझ बुझ बन चरना‌’ या भजनाने त्यांनी मैफलीची सांगता केली. सुमारे दोन तास रंगलेली ही मैफल रसिकांना शास्त्रीय संगीताचा सुरेल आनंद देऊन गेली.
मंजिरी आलेगावकर यांना अरविंद परांजपे (तबला), सौरव दांडेकर (संवादिनी), डॉ. मृणाल वर्णेकर, गौतम हेगडे आणि प्राची जोगळेकर (सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.
सुरुवातीस प्रास्ताविकात श्रीरंग कुलकर्णी यांनी मैफलीच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. तर विनिता आपटे यांनी संस्थेच्या कार्याविषयी अवगत केले.
कलाकारांचा सत्कार श्रीरंग कुलकण, माधुरी वैद्य यांनी केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता आपटे यांनी केले.

कायरा, स्मित, ख्याती यांची आगेकूच

योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धाहवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे : कायरा रैना, स्मित थोकल, ख्याती कत्रे यांनी हवेली तालुका संघटनेच्या वतीने आयोजित योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्धीवर मात करून आगेकूच केली.
पीवायसी येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या दुसऱ्या फेरीत स्मितने त्रिनवा भरवर २१-७, २२-२० अशी मात केली. यानंतर जतीन सराफने अश्विन मित्तलला २१-४, २१-८ असे नमविले. स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या फेरीत ख्याती कत्रेने शर्वरी घाडगेला २१-४, २१-५ असे, तर शिप्रा कदमने अद्विका पवारला १५-२१, २१-१०, २१-१६ असे नमविले. कायरा रैनाने स्वरा मोरेला १२-२१, २१-१७, २१-१२ असे पराभूत करून आगेकूच केली.

निकाल : ११ वर्षांखालील मुले – अर्चित खान्देशे वि. वि. राघव तामसेकर २१-६, २१-५, गणेश कोसावी वि. वि. मल्हार तांबे २१-१०, २१-७, कार्तिक रोंगे वि. वि. आगम आचलिया २१-२३, २१-१८, २१-१९, अर्हम आचलिया वि. वि. जय शिंदे २१-१५, २१-३, ओजस जगताप वि. वि. विहान गंगाल २१-१३, २२-२०, कबीर देसाई वि. वि. साहिर तुरुंबेकर २१-१८, २१-१७, अद्वय केळकर वि. वि. ईशान बापट २२-२०, २१-१८, शौनक केळकर वि. वि. कियांश बभूजदी २१-६, २१-७.

११ वर्षांखालील मुली – आरोही मालवणकर वि. वि. तेजश्री शेंडे २५-२३, २१-१२, विहा गुरव वि. वि. आराध्या डोंगरे २१-१८, २१-१९, काश्वी सिंग वि. वि. अभिज्ञा पाटील २१-१५, २१-११, रुही शिंदे वि. वि. शायना बुदयाल २१-१०, २१-८ वनिशा राय वि. वि. मृन्मयी जोगळेकर २३-२१, २१-९, स्वरा कुलकर्णी वि. वि. स्वरा पांडे २१-१८, २१-१०.

१३ वर्षांखालील मुले – आनंद खर्चे वि. वि. सिद्धराज पवार २१-१०, २१-८, अद्विक काळे वि. वि. शौनक वेंकटेश २१-११, २१-१३, दिविक गर्ग  वि. वि. वरद आठल्ये २१-११, २१-१६, प्रथमेश जगदाळे वि. वि. विहान गायकवाड २१-६, २१-४, शौर्य यादव वि. वि. अवयुक्त बेंगारी  २१-१६, १७-२१, २१-१६, अभिनव भोंडवे वि. वि. वरद निपसे २१-४, २१-१२, ईशान रॉय वि. वि. अमन वर्मा २१-३, २१-१४.

१५ वर्षांखालील मुली – शुभदा जाधव वि. वि. दर्शना माळी २१-१६, २१-१६, स्वराली थोरवे वि. वि. अदिती गिरी २१-११, २३-२१, द्विती शहा वि. वि. दिविना राका २१-११, २१-१२, प्रणवी मोहळकर वि. वि. अवनी शहा २१-७, २१-१०, शौर्या रोळे वि. वि. श्रीजा नानजकर २१-८, २१-१०, सिद्धी जगदाळे वि. वि. धानी झलवाडिया २१-१६, २१-१९

१९ वर्षांखालील मुले – उपांत्यपूर्व फेरी – प्रयाण महाशब्दे वि. वि. दिव्यांश यारागट्टी २१-१४, २१-१०, आर्यन शेख वि. वि. चैतन्य प्रभू २१-१६, २१-१७, अगस्त्य कुंदन तितर वि. वि. अरहान शेख २१-१८, २१-७, शिवांश नादगोंडे वि. वि. रेयांश पानसरे २१-८, २१-११.

शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस

पुणे, दि. ९: शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबत त्यांच्या उत्पन्नात वाढ व त्या उत्पादनाला संरक्षित भाव मिळवून देण्यासाठी कृषी विभागाशी निगडित सर्व संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, आगामी काळात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा मानस कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.

ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यावतीने ९ ते १२ जानेवारी कालावधीत आयोजित ‘ग्लोबल कृषी महोत्सव’ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, उपसंचालक श्रीधर काळे, उप विभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहर, प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त, अध्यक्ष सुजित खैरे, माजी आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असून त्यांना या क्षेत्रात सुरक्षितता उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राला झाला पाहिजे, त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. यादृष्टीने त्यांनी तांत्रिक शेती, विविध संशोधन, दर्जेदार बी-बियाणे, खत उत्पादन, आदी बाबींवर भर दिला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. शेती आणि बाजारपेठ परस्परपूरक बाबी असल्याने शेतीमाल ते बाजारपेठ अशी साखळी निर्माण करण्याची गरज आहे. परवानाधारक दुकानदार यांनी प्रामाणित खते, बी-बियाणे घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांनावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

राज्यात विविध पीकपद्धती घेतली जाते, पारंपरिक पीकपद्धती आणि आधुनिक पीकपद्धती यांच्यामधील फरक समजून घेतला पाहिजे. अनेक शेतकरी प्रयोगशील असून कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयोग करीत असतात. त्यांचे अनुकरण केले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतात नवनवीन तंत्रज्ञान वापरून अधिकाधिक उत्पादन घेतले पाहिजे, याकरीता राज्यशासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. शेतीशी संबंधित केंद्र शासनाशी निगडित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी चर्चा सुरु आहे, आगामी काळात केंद्र शासन आणि राज्य सरकार मिळून यामध्ये सकारात्मक मार्ग काढण्यात येईल.

कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळाव्यात याकरीता लवकरच उपयोजक (ॲप) विकसित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासोबतच त्यांच्या वेळेत बचत होईल तसेच पारदर्शक पद्धतीने त्यांच्या खात्यात लाभाचे हस्तांतरण होईल. पीक नुकसानीचे पंचनामे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यासोबतच पीकविम्याच्या अनुषंगाने अडचणी दूर करण्यात येईल. कृषी विद्यापीठाच्या जमिनी कृषी विज्ञान केंद्र तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्याचा विचार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, शेतीतील पिकाची शाश्वती, शेतमालाला हमीभाव मिळवून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन धोरण तयार करण्यात येईल.

जुन्नर परिसर हा शेतीसाठी प्रयोगशील परिसर आहे. या परिसरात उत्पादित हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे, याकरीता राज्य शासनाने प्रयत्न केले. या कृषी विज्ञान केंद्राद्वारे प्रत्यक्ष शेतीत विविध प्रकारच्या प्रयोगाची अंमलबजावणी या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून केली असून शेतीशी निगडित नवीन ज्ञान याठिकाणी प्राप्त होते आणि ते शेतकऱ्यासाठी मार्गदर्शक आहे.

आमदार श्री. सोनवणे म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याची सेवा करणारे खाते म्हणून कृषी विभागाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, शेतकऱ्यांला कमी खर्चात अधिक उत्पन्न, शेतमालाला हमीभाव, अद्ययावत शेतकरी भवन, दूध अनुदान, पशुधनासाठी लसीचा पुरवठा, परिसरात बिबट्याची संख्या लक्षात घेता दिवसा वीज उपलब्ध करणे आदी प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांकरीता लोककल्याणकारी धोरण राबविण्याच्या श्री. सोनवणे यांनी सूचना केल्या.

श्री. मेहेर म्हणाले, शेतकऱ्यांना विकसित तंत्रज्ञानाचा लाभ मिळण्यासोबतच शेतकऱ्यांचे कमीतकमी खर्चात अधिकाअधिक गुणवत्तापूर्वक उत्पादनाच्यादृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहेत. या प्रयत्नासाठी कृषी विज्ञान केंद्र नेहमी प्रयत्नशील आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार या केंद्रात नैसर्गिक शेती प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना हवामानानुसार पीक पद्धती घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे, असेही श्री. मेहेर म्हणाले.

यावेळी डॉ. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते  ‘शिवनेरी हापूस आंबा’ लोगो आणि बॅसेलीस जैविक खते, जैवसंपृक्त पिके घडीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.

प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वी मंत्री श्री. कोकाटे यांनी परिसरात लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट देवून माहिती घेतली. प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

बदलत्या जीवन शैलीत तृणधान्याचे आहारात महत्वाचे स्थान, मार्केटिंग कडे लक्ष देण्याची गरज-पणन मंत्री ना.जयकुमार रावल

पणनमंत्री ना. जयकुमार रावल यांच्याहस्ते पुण्यात मिलेट महोत्सवाचे उद्घाटन

पुणे-तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वामुळे वर्तमान युगात त्याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून, बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करण्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर खूप महत्त्वाचा आहे, तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविण्यपूर्ण कल्पना तयार कराव्यात. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, ब्रॅडिंग आणि मार्केटिंगला मदत करुन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी पणन मंडळाची आहे, असे प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केले. गणेश कला क्रिडा मंडळ येथे आयोजित दुसऱ्या मिलेट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कृषी पणन मंडळाचे संचालक विकास रसाळ, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, सिंदखेडा बाजार समितीचे सभापती आणि मंडळाचे माजी संचालक नारायण पाटील उपस्थित होते.
मंत्री श्री. रावल म्हणाले, जगभरातील तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन मिळावे या भूमिकेतून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करावे अशी भूमिका मांडली. त्याला जवळपास ७१ देशांनी पाठिंबा दिला आणि त्यानंतर २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्यात आले. तृणधान्याचा वापर हा एक वर्षापुरता मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे. तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविण्यपूर्ण कल्पना तयार कराव्यात. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, ब्रॅडिंग आणि मार्केटिंगला मदत करुन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी पणन मंडळाची आहे, असेही ना.रावल म्हणाले. तृणधान्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोवण्यासाठी विविध माध्यमातून प्रचार, प्रसिध्दी करावी. तृणधान्य महोत्सव राज्यातील इतर जिल्ह्यातही घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पणन मंडळ हे उत्पादक ते ग्राहक यांना जोडणारा पूल म्हणून काम करेल असे सांगून आपल्या शेतकऱ्यांचा माल जगाच्या बाजारपेठेत पोहोचेल असा संकल्प सर्वांनी करुया असे ते म्हणाले.
हा तृणधान्य महोत्सव १२ जानेवारी पर्यंत सुरु असून महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट कंपन्या सहभागी झाल्या असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रास्ताविकात दिली.
सुरुवातीस पणनमंत्री श्री. रावल यांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी मिलेट जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीस श्री. रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

‘एचएमपीव्ही’ विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी जितेन्द्र डुडी

पुणे दि. ९: ‘एचएमपीव्ही’ हा विषाणू नवीन नाही. त्याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तथापि, सतर्कता बाळगावी, काळजी घ्यावी तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेन्द्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ‘एचएमपीव्ही’ विषाणूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातआढावा घेतला. बैठकीस ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामतीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यम्पल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तसेच सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

‘एचएमपीव्ही’ विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणांनी सज्ज रहावे असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, हा विषाणू २००१ पासून माहितीमध्ये आहे. तथापि, वैद्यकीय यंत्रणांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या विषाणूबाबत कसे उपचार करता येतील यासाठी अवगत ( ओरीएंटेशन ) करावे. सर्व आरोग्य संस्थेमध्ये किमान पुढील तीन महिने पुरेल इतका पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा. व्हेन्टींलेटर्स, ऑक्सिजन प्लँट तसेच अन्य साधनसामुग्री सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी. आवश्यक तेथे त्वरीत दुरुस्ती करुन घ्यावी. दैनंदिन आएलआय/सारी (एसएआरआय) सर्वेक्षण गुणवत्तापूर्ण व नियमित सुरु ठेवावे. दैनंदिन गृहभेटी मध्ये जनजागुती करावी. आवश्यकतेनुसार साबण व पाणी यांचा वापर करावा. सॅनेटायझरचा वापर करावा.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यम्पल्ले यांनी आरोग्य विभागाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पुणे जिल्ह्यात यंत्रणा दक्ष असल्याचे सांगितले.

डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांची फोग्सी अध्यक्षपदी नियुक्ती

पुणे : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या वंध्यत्व, एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया तज्ज्ञ तसेच रुबी हॉलक्लिनिकच्या हॉस्पिटलच्या विभाग प्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांची ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजिकल सोसाईटीज ऑफ इंडिया’ (FOGSI) च्या ६३ व्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या अखिल भारतीय स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र परिषदे मध्ये त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

आपल्या निवयक्तीविषयी डॉ. तांदुळवाडकर म्हणाल्या, “भारतातील २७७ सोसायट्यांमधील ४६,००० हून अधिक प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फोग्सी सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेचं नेतृत्व करणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. या अध्यक्षपदी असताना मी महिला आरोग्याच्याक्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यासाठी पाऊल उचलणार आहे. ‘सम्पूर्ण: स्वस्थ जन्म अभियान’, ‘Know Your Numbers’, आणि ‘दो तिके जिंदगी के’ यासारख्या उपक्रमांद्वारे महिला आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदलघडविण्याचा आमचा उद्देश आहे.”

मातृत्व आणि मृत्यू दर,असंसर्गजन्य रोग,गर्भाशयाचा कर्करोग,आरोग्य सेवांची उपलब्धता आणि प्रजनन आरोग्य जागरूकता अशा भारतातील महिलांच्या आरोग्यावर प्रभाव टाकणाऱ्या मुख्य समस्यांवर डॉ. तांदुळवाडकर यांच्या पुढाकाराने त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत, ज्यामुळेसंपूर्ण भारतातील महिलांना केवळ अत्यावश्यक आरोग्य सेवाच नाही तर त्यांना त्यांच्या स्वत:च्या आरोग्याचीजबाबदारी घेण्यास सक्षम केले जाईल.

मोक्क्यातील गुन्हेगाराची जेलमधून होताच सुटका दहशत पसरविणारा जल्लोष करत रॅली गुन्हेगार गुड्या गणेश कसबेसह ४० जणांवर गुन्हा दाखल – अद्याप अटक नाही

पहा व्हिडीओ-व्हायरल झाल्यावर, २ दिवसांनी गुन्हा दाखल

पुणे-मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा २ दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. रॅलीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर Viral होत आहे. परिसरातील नागरिकांना रॅलीमधील युवकांनी धमकावले होते असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे. आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. व्हिडिओ आणि घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी Laxmi नगर (शास्त्रीनगर) पोलीस चौकीमध्ये माहिती दिली पण कारवाई झाली नाही असे नागरिकांचे म्हणणे होते पण आज पोलीस शिपाई लहू एकनाथ गडमवाड येरवडा पोलीस स्टेशन यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. आणि 1)प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे राहणार भीम ज्योत सर्वे नंबर 12 लक्ष्मी नगर येरवडा पुणे, 2) दीपक मदने, 3) करण सोनवणे, 4)अनिकेत कसबे, 5) अंश पुंडे, 6) अजय कसबे, 7) सागर कसबे, 8) अभिजीत ढवळे, 9) राहुल रसाळ, 10) नन्या कांबळे, 11) रोशन पाटील, 12) तुषार पेठे आणि अन्य ३५ ते ४० जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .07/01/2025 रोजी रात्री १० वाजता चे सुमारास गुंजन चौक येरवडा पुणे 6 येथून हि रॅली गेल्याचे फिर्यादीने पहिले .फिर्यादी हे पर्णकुटी मार्शल ड्युटी हजर असताना व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग फिरत असताना येरवडा पोलीस स्टेशन कडील अभिलेखा वरील दिनांक 07/01/25 रोजी गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेला प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे, त्याच्या स्वागतासाठी त्याचे 11 साथीदार व इतर 35 ते 40 इसम यांनी त्यांच्याकडील 04 चार चाकी गाड्या व 20 ते 30 दुचाकी गाड्या वरून येऊन गैर कायद्याची मंडळीचा जमाव जमवून त्यांच्याकडील चार चाकी व दुचाकी वाहने बेदरकारपणे चालवून आरडा ओरडा करून व घोषणा देऊन येरवडा परिसरामध्ये दहशत निर्माण केली आहे म्हणून त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

जीएसटीच्या जाचातून छोटे, लघू, मध्यम व्यापारी व सर्वसामान्य करदात्यांची सुटका करा: सचिन पायलट

जाचक जीएसटीत बदल करण्याची वेळ, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात GST 2.0 आणा.

मुठभर श्रीमंतांवर भाजपा सरकारचा कर सवलतींचा वर्षाव तर मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांवर प्रचंड भार.

काँग्रेस सरकारच्या योजनांना विरोध करणाऱ्या भाजपाने त्याच योजना राबवल्या.

मुंबई, दि. ९ जानेवारी २०२५
भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कर दशहतवादाचा सामना लघु, छोटे, मध्यम व्यापारी यांना करावा लागत आहे. जीएसटी स्लॅबची रचना अत्यंत किचकट असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच देशातील नोकरदार, मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मुठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव केला जात आहे, हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने येत्या अर्थसंकल्पात जीएसटीमध्ये बदल करत जीएसटी २.० आणावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सचिन पायलट म्हणाले की, १ फेब्रुवारी २०२५ रोजी भाजपा सरकार केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात जनतेच्या हिताकडे लक्ष देऊन जीएसटी या अत्यंत किचकट, दहशत निर्माण करणाऱ्या कर रचनेत बदल केला पाहिजे. २०२१-२२ या वर्षात एकूण जीएसटीपैकी जवळपास दोन तृतीयांश किंवा ६४% लोकसंख्येच्या तळातील ५०% लोकांकडून आले तर फक्त ३% GST वरच्या १०% मधून आला. हा गरिबांवरचा कर आहे जो सतत वाढत जातो. आरोग्य विमा सारख्या अत्यावश्यक सेवांवर जीएसटी दर हा लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी १८% आहे. पॉपकॉर्नवर सुद्धा तीन प्रकारचा जीएसटी लावला जात आहे.
मोदी सरकार दरवर्षी रेकॉर्डब्रेक कलेक्शनचा दावा करते पण जेव्हा श्रीमंतांचा विचार केला जातो, तेव्हा २०१९ मध्ये कॉर्पोरेट करात २ लाख कोटी रुपयांची कपात केली. पंतप्रधान मोदी अरबपतींसाठी मोठी कर कपात देतात आणि गरीब आणि मध्यमवर्गांवर मात्र करांचा भार टाकतात. जीएसटीची विक्रमी वसुली होत असून देशातील सर्वात जास्त जीएसटी मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून जमा होतो. या घटकावरचा जीएसटीचा भार कमी करण्याची वेळ आली आहे त्यादृष्टीने सरकारने निर्णय घ्यावा व आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात GST 2.0 आणावा.

जीएसटीचा प्रस्ताव सर्वात प्रथम डॉ. मनमोहनसिंग यांनी आणला होता, त्याला भाजपाने तीव्र विरोध केला होता, आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोध केला होता. आधार कार्ड, डीबीटी, किरकोळ क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक या सर्वांना भाजपा व मोदींनी विरोध केला होता पण सत्तेत येताच काँग्रेसच्याच या योजना भाजपाने राबवल्या. जीएसटी लागू करण्यासाठी मध्यरात्री १२ वाजता मोठा गाजावाजा करून काहीतरी विक्रमी करत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. गुंतवणूकीला काँग्रेसचा विरोध नाही पण ती मनमानी पद्धतीने केली जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे.

भाजपा सरकार अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण करत आहे पण वास्तविकता वेगळी आहे. जीडीपीमध्ये मोठी घसरण होत आहे. भारताला १० टक्के जीडीपीचे लक्ष्य ठेवून वाटचाल करावी लागेल पण भाजपा सरकार कोणतेच खरे आकडे जाहीर करत नाही. भाजपा सरकारमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. सरकारला योग्य वाटतील तेच आकडे जाहीर केले जात आहेत. उलट काँग्रेस सरकार असताना जी वस्तुस्थिती आहे ती मांडली जात होती. दरडोई उत्पन्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. रोजगार निर्मिती होत नाही देशात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, तसेच महागाईसुद्धा वाढलेली आहे, असेही पायलट म्हणाले.

इंडिया आघाडी मजबूतच आहे..
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन पायलट म्हणाले की, लोकशाही, संविधान व देश हित लक्षात घेऊन काँग्रेससह अनेक पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे, ही आघाडी आजही मजबूत आहे. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असते त्यानुसार काही निर्णय घ्यावे लागतात याचा अर्थ इंडिया आघाडी कमजोर झाली, असे म्हणता येणार नाही असेही पायलट यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला CWC सदस्य व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार अमिन पटेल, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते भरतसिंह, झिशान सय्यद आदी उपस्थित होते.

पुण्यातील वाढती गुन्हेगारी अन मस्साजोग: धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांनी घेतली रोखठोक भूमिका

पुणे- सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा. शहराच्या पोलीस प्रमुखाचे हे अपयश आहे.पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य करत थेट .. तुम्हाला जमत नसेल तर सांगा .. आमच्याकडे आणखी चांगले अधिकारी आहेत असा थेट पोलीस आयुक्तांना इशारा देत या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी संवाद करू असेही म्हटले आहे .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे अधिकाऱ्यांची बैठक घेत पुण्यातील विकासकामांचा आढावा घेतला आहे. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील मुद्यांवर भाष्य केले आहे. याचसोबत त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी देखील काही प्रश्न विचारण्यात आले. यावर देखील त्यांनी उत्तर दिले आहेत.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहेत. अशात अनेक राजकीय नेत्यांसह समाजिक कार्यकर्त्यांनी या हत्येतील आरोपींचा धनंजय मुंडे यांच्याशी कथित संबंध असल्याचा आरोप करत, मुंडे यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “पक्ष वगैरे न बघता दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई करणार आहे.”या हत्या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्याच्यबरोबर मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, या प्रकरणात कोणी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. मी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितले आहे की, पक्ष वगैरे न बघता यामध्ये वरिष्ठ पातळीवर काम करणारे कोणी दोषी असतील तर त्यांची गय करण्याचे कारण नाही. ही निर्घून पद्धतीने झालेली हत्या आहे. अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही.”बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या केंद्रस्थानी सापडले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप केला जात आहे.
अजित पवार यांना विचारण्यात आले की, सुरेश धस यांनी बडी मुन्नी म्हणून काही आरोप केले आहेत. त्यावर बोलताना संतापून अजित पवार हे म्हणाले की, ते त्यांना विचारा…हे असल्या फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावे घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा…कोण आहे ते…सुरेश धस यांच्यावर अजित पवार हे संतापलेले दिसले. राष्ट्रवादीमध्ये एक बडी मुन्नी आहे आणि तिने समोर यावे, असे सुरेश धस यांनी म्हटले होते.

वर्दळीच्या ठिकाणी तरुणाने कोयत्याने केले सपासप वार-पुण्यातील खुनाचा VIDEO व्हायरल

पुणे- येरवडा परिसरात मंगळवारी एका 28 वर्षीय तरुणीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या झाली होती. आता या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात सदर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडल्याचे दिसून येत असून, तिथे बघ्यांची तोबा गर्दी असल्याचेही दिसत आहे. दुर्दैव म्हणजे या गर्दीपैकी कुणीही तिच्या मदतीला धावून गेले नाही.आरोपी आपल्या हातातील कोयता खाली टाकतो आणि त्यानंतर नागरिक त्याला मारण्यासाठी धावून जातात.असे व्हिडीओत दिसते आहे.

कृष्णा सत्यनारायण कनोजिया (30) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तर शुभदा शंकर कोदारे असे मृत तरुणीचे नाव आहे. हे दोघेही येरवडा परिसरातील एका नामांकित कंपनीत नोकरीस होते. कृष्णाने आर्थिक व्यवहारातून शुभदाची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मयत शुभदाने वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून कृष्णाकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. पण हे पैसे ती वेळेवर परत करू शकली नाही. त्यामुळे कृष्णाने मंगळवारी तिच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे व्हिडिओत?

या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात आरोपी कनोजिया हातात कोयता घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. तर मृत शुभदा कोदारे जखमी अवस्थेत खाली पडल्याचे दिसून येत आहे. याशिवाय घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी असल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे. आरोपी जखमी शुभदाच्या आसपास मोबाईल घेऊन फिरतोय. शुभदा गंभीर जखमी असतानाही मोबाईलवरून झाल्या प्रकाराची माहिती कुणालाही तरी देत असते. पण आरोपी तिच्याजवळील फोन हिसकावून घेताना व्हिडिओत दिसतो.उल्लेखनीय बाब म्हणजे घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. पण कुणीही आरोपी कृष्णाला अडवताना दिसून येत आहे. शेवटी आरोपी आपल्या हातातील कोयता खाली टाकतो आणि त्यानंतर नागरिक त्याला मारण्यासाठी धावून जातात. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

वाल्मीक कराडवर ED ची कारवाई का नाही?पोलिसांना चुकीचे काम करायला लावणारे वाईट- सुप्रिया सुळे केंद्राला विचारणार जाब

मुंबई-वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्याच्यावर ईडी आणि पीएमएलए नुसार कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु आठ महिने झाल्यानंतरही त्याच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे. अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली, तर मग वाल्मीक कराडवर कारवाई का झाली नाही? असाही सवाल केला. वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

वाल्मिक कराडच्या नावाने 2022 मध्ये नोटीस काढली होती. तसेच आठ महिन्यांपूर्वी अवधा कंपनीकडून एफआयआर झाला असताना वाल्मिक कराडवर कारवाई का नाही? अशीच खंडणीची प्रकरणे होणार असतील, तर महाराष्ट्रात कोण गुंतवणूक करेल, असेही त्या म्हणाल्या. आम्ही राज्यकर्ते असल्यामुळे आम्हाला न्याय देऊ नका, पण कंपनीने वाल्मीक कराडवर खंडणीची केस दाखल केलेली असल्यामुळे कंपनीला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

6 महिन्यांपूर्वी कराडाविरोधात तक्रार दाखल झाली होती. मग त्याच्यावर ईडीची कारवाई का झाली नाही? अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांना एक कायदा आणि वाल्मीक कराडला वेगळा कायदा का? याचे उत्तर सरकारने द्यावे. हा विषय मी आणि बजरंग सोनवणे 30 तारखेला संसदेच्या अधिवेशनात मांडणार असून याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनाही याबाबत विचारणा करणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजनेच्या परळीचे तालुकाध्यक्ष वाल्मीक कराड आहेत. ही योजना लोकसभा निवडणुकीनंतर आली. वाल्मीक कराडवर लोकसभेच्या आधीच खंडणीचा गुन्हा दाखल होता. खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या माणसाला महिलांसाठीच्या लाडकी बहीण योजनेच्या कमिटीचा अध्यक्ष करता, हे असंवेदनशील आणि धक्कादायक आहे.

अशोक चव्हाण यांनी नैतिकतेने राजीनामा दिला होता. अशी देशात किती तरी उदाहरणे देशात झालेली आहे. एक काळा असा होता, की एखादा रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचे. त्यामुळे नैतिकतेच्या आणि लोकांच्या भावनांचा आदर ठेवून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येला आज 30 दिवस पूर्ण झालेत. संतोष देशमुख यांच्या मुलीचे अश्रू बघून अस्वस्थ वाटते. माणुसकी राहिली की नाही? सरकारमध्ये काही संवदेनशीलता राहिली का नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. भाजप आणि त्यांच्या काही मित्रपक्षात आजही संवेदनशील नेतृत्व आहे. सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांनी हे प्रकरण लावून धरले आहे, हा आशेचा किरण आहे, असेही त्या म्हणाल्या.

ठाकरेंना सोडून भाजपात आलेल्या नगरसेवकांनी भाजपांतर्गत धुसफुसिला दिले खणखणीत उत्तर

धनवडे म्हणाले, जरी शिवसैनिक होतो तरी मी स्वर्गीय गिरीश बापटांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता

आमचा काल पुण्यात ४ हजार भाजपा कार्यकर्त्यांच्या,प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार हेच मोठे स्वागत

पुणे-

दिल्लीत गांधींना नाही तर उद्धव ठाकरेंचा केजरीवालांना पाठींबा

दिल्ली-दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवर ‘I.N.D.I.A.’ आघाडी एकत्र नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या आधी देखील उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील केजरीवाल यांच्या विरोधातील भूमिकेला विरोध दर्शवला होता. तसेच दैनिक सामनाच्या माध्यमातून देखील काँग्रेसचे कान टोचण्यात आले होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 जागांसाठी एकाच टप्प्यात पाच फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या वेळी दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीमध्ये एकही जागा मिळाली नव्हती. तर केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले होते. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या संदर्भातील माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्लीच्या निवडणुकीत सपा देखील आम आदमी पक्षाचा प्रचार करणार आहे. त्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने देखील असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीत एकही खाते उघडू न शकणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत देखील याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस आणि आपमध्ये युती झाली असती तर बरे झाले असते, पण कदाचित तसे होताना दिसत नाही. दिल्लीत काय चालले आहे. ते महाराष्ट्रात बसून सांगणे कठीण आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटले आहे. या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘दिल्लीची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. काँग्रेसही निवडणूक लढवत आहे. मला वाटते कदाचित तिथे केजरीवाल जिंकतील. महाराष्ट्रात तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. कराड दक्षिणमधून ते निवडणूक रिंगणात उतरले होते. या जागेवरून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला होता.

स्थानिक स्वराज्य संस्थांवरील ‘प्रशासकीय राज’ हटवा-डॉ.हुलगेश चलवादी 

पुणे:-देशाच्या लोकशाहीचा मुलगाभा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (स्थास्वसं) खोळंबल्या आहेत. गेल्या दोन ते चार वर्षांपासून राज्यातील अनेक महानगर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका न झाल्याने येथे ‘पंचायती राज’ ऐवजी ‘प्रशासन राज’ सुरू आहे.स्थानिक जनक्षोभ त्यामुळे वाढत असून प्रशासकीय राज हटवण्याचे आवाहन करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहिर करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज, गुरूवारी (ता.९) केली आहे.

वस्ती, गल्लीबोळासह महानगराच्या विकासाचा मुख्य आराखडा अंमलात आणण्याची जबाबदारी ‘स्थास्वसं’वर असते. ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या विचारानूसार बहुजनांसह सर्वजनांना सुखी करण्यासाठी त्यांच्या स्थानिक समस्यांची सोडवणूक तात्काळ होण्याची गरज असते.पंरतु,निवडणूका रखडल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जनतेकडून हिरावून घेतला असल्याचे चित्र उभे झाले असल्याची खंत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.

प्रशासनाला लोकप्रतिनिधींची जोड मिळाल्यावरच विकासाला वेग मिळता.सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही. नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य खऱ्या अर्थाने लोकभावना प्रशासनापर्यंत पोहचवत असतात. अशात लोकप्रतिनिधीच नसल्याने लोकभावना, त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहचत नाहीत. नागरिकांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

विविध कारणांमुळे आणि कायदेशीर अडचणींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब होत आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, अशा निवडणुका सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ पुढे ढकलता येऊ शकत नसल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी आहे. ओबीसी आरक्षण अंमलबजावणीसंदर्भात सध्या अनेक अडचणी आहेत. राज्य सरकारने त्यामुळे न्यायालयात योग्य बाजू मांडून निवडणुकीचा मार्ग सुकर करावा,अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे.