पुणे- थेट दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांमुळे पुण्यात सामान्य नागरिकांसह मंत्री देखील असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. कोथरूड येथील आशिष गार्डन चौकात सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील वाहनास अशाच एका मद्यधुंद चालकाच्या मोटारीची धडक बसली असून चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहे.
एका कार चालकाने दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवत चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यातील गाडीला भीषण धडक दिली. त्यामुळे खळबळ उडाली. मद्यधुंद चालकासह सोबत असलेल्या दोन महिलांवरही याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, काल रात्री माझा ताफ्यातील वाहनास मोठा अपघात झाला. दारूने तर्र झालेल्या दोन पोरांच्या गाडीने आमच्या एसपीओ वाहनास उडवलं. आता याला गृहमंत्री काय करणार ? गृहमंत्र्यांनी तिथे येऊन उभे राहिले पाहिजे का की, दादाची गाडी तिथे चालली आहे. पोलिसांनी आता दोषींवर कारवाई केली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी या वेळी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी गणेश मिरवणुकीचे उत्सवात सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, यंदाचा गणपती उत्सव उत्तम झाला. लोकांमध्ये मोठा उत्साह होता, खूप गर्दी देखील होती.बाप्पाला एकच प्रार्थना केली तुझा आज विसर्जन करत आहोत, कुठलेही अडचण येऊ देऊ नको. महायुतीचा सरकार पुन्हा एकदा राज्यात आले पाहिजे, हे मागणे मागितले आहे. बाप्पाचे आशीर्वाद आहेच, पण आमचे ही कर्तुत्व आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत त्यामुळे 170 वर आम्ही पोहचू, असा दावा देखील त्यांनी केला.
मराठा समाजाला आता समजू लागलेला आहे की, मनोज जरांगे आता तथ्य सोडून बोलत आहेत. तथ्य काय आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण प्रथम दिलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी घालवलेला आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिले. एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिले तरी मराठा समाजाचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर का? हे कळत आहे. वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून जरांगे त्यांची सहानभूती घालवत आहेत. खासदार शरद पवार यांच्या कारकिर्दीत मंडल आयोग आला असताना सुतार ओबीसीमध्ये टाकले, लोहार टाकला…मग मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकण्यास त्यांची का हरकत होती? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तेव्हा तुम्ही का टाकले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. 10 टक्के मराठा आरक्षण केंद्र सरकारनी दिले आहे. तरीसुद्धा सारखे राज्य, केंद्रावर बोट का दाखवतात? मनोज जारंगे एका मोठ्या शिखरावर गेले, तिथे त्यांनी सर्वांना समान न्याय देऊन वागवले तर ठीक असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.