‘आमचे ऐकले नाही तर दुपारी 2 वाजता दाखवून देतो’
मुंबई-पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या धमकीच्या फोनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन थेट काँग्रेसचे नगरसेवक आकाश कावडे यांना करण्यात आला. फोनवरील व्यक्तीने स्वतःला बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगत, “साजिद पठाण यांनी आमचे ऐकले नाही, तर 2 जुलै रोजी दुपारी 2 वाजता काय होते ते दाखवून देतो,” अशी धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या संभाषणाचे कथित ऑडिओ रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्याची सत्यता तपासण्याचे काम पोलिस यंत्रणा करत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील कथित धमकीच्या फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यातील संभाषण अत्यंत धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. ऑडिओमध्ये धमकी देणारा व्यक्ती म्हणतो, “साजिद खान यांना ही लास्ट वॉर्निंग आहे. त्यांना सांग, शुभमचा कॉल आला होता. सेटलमेंटसाठी अजूनही तुझ्याकडे वेळ आहे. लाईनवर ये, नाहीतर मारून टाकेन. पैशांची व्यवस्था कर, नाहीतर मौत के लिए तयार हो जा. माझ्याबद्दल त्याला माहिती आहे. मी आधीही त्याला फोन केला आहे. आता फोन नाही येणार, आता डायरेक्ट गोळी येईल.”
विशेष म्हणजे, साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी येण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही त्यांना अशाच प्रकारची धमकी मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीद्वारे हा गंभीर मुद्दा उपस्थित करत, आमदारांना गुन्हेगारी टोळ्यांकडून धमक्या मिळत असल्याबद्दल सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही सभागृहात “बिश्नोई गँग फोन करून आमदारांना धमक्या देत आहे,” असा गंभीर दावा केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, धमकीचा कथित ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकारच्या धमक्या मिळत असल्याने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, व्हायरल झालेल्या ऑडिओची फॉरेन्सिक पडताळणीही केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

