Home Blog Page 689

माण हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 23 :- पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी चोवीस तास परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी करण्यासाठी येत्या 26 सप्टेंबर रोजी भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज आढावा घेतला. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मेट्रो लाईन तीनच्या कामात येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात माहिती घेऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाल्यास, ड्रेनेजलाईन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मेट्रोचे काम व त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्ते, ड्रेनेजलाईनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

बाणेर रॅम्प व पाषाण रॅम्पची कामे गतीने होण्यासाठी पोलीस विभागाने मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीस गर्डर टाकणे व इतर कामांसाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी चोवीस तास काम करण्याची परवानगी द्यावी. याकाळात वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

युरोकिड्सतर्फे पुण्यात महत्त्वाकांक्षी विस्तार योजना

हार्वर्ड– प्रेरित हेयुरेका अभ्यासक्रमाचे अनावरण

पुणे  – युरोकिड्स या भारतातील आघाडीच्या प्रीस्कूल एक्सपर्ट कंपनीला त्यांच्या हेयुरेका – दृश्य वैचारिक अभ्यासक्रमाची आठवी आवृत्ती लाँच करताना आनंद होत आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रोजेक्ट झीरोपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत सर्वसमावेशक विकासाचे धोरण ठेवणारा हेयुरेका अभ्यासक्रम लहान विद्यार्थ्यांम्ये सर्जनशील विचार कौशल्य विकसित करेल.

युरोकिड्सच्या महत्त्वाकांक्षी विकास धोरणाचा एक भाग म्हणून प्रीस्कूल नेटवर्कने पुणे व महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्याचे ठरविले आहे. युरोकिड्सने पुढील पाच वर्षांत राज्यात ३२५ नवी केंद्रे सुरू करत महाराष्ट्रातील केंद्रांची संख्या ४०० वर नेली आहे. या विस्ताराद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचे ध्येय आहे. प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी या नात्याने युरोकिड्सला ते दर्जेदार असण्याची गरज माहीत आहे आणि म्हणूनच कंपनीद्वारे अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत ठेवला जातो.

हेयुरेका मुलांना ‘काय’ विचार करायचा, हे सांगण्याऐवजी त्यांना ‘कसा’ विचार करायचा, याची कौशल्ये आत्मसात करायला मदत करणार आहे. या अभ्यासक्रमात २० वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीच्या, हार्वर्ड प्रेरित थिंकिंग रूटिन्सचा समावेश असून, त्यामुळे लहान मनांमध्ये उत्सुकता, कल्पनाशक्ती आणि विचार कौशल्य विकसित होते. मुलं फक्त माहिती घेत नाहीयेत, तर ती सक्रियपणे त्याचा वापर करत आहेत व त्यांच्यामध्ये सखोल आकलन आणि सर्जनशीलता विकसित होत आहे, याची काळजी या अभ्यासक्रमाद्वारे घेतली जाते.

१८ महिन्यांचे कठोर संशोधन, प्राथमिक चाचणी व आवश्यक बदलांनंतर हेयुरेकाला ईपिक्स तत्त्वाची तोड देण्यात आली आहे. त्यामध्ये एरवी शिक्षण क्षेत्रात दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक, सर्जनशील आणि आध्यात्मिक अशा पाच महत्त्वाच्या विकास जागांचा समावेश करण्यात आला आहे. १३ वैशिष्ट्यपूर्ण प्रोग्रॅम या अभ्यासक्रमाचे प्रमुख स्तंभ असून (कोडक्वेस्ट, युरोकनेक्ट, युरोफिट, युरोआर्ट, एलेव्हेट आणि इतर बरंच काही), ते प्रत्येक मुलाला फक्त शैक्षणिक यशच नव्हे, तर आयुष्यभर पुरणारा वैयक्तिक विकास साधण्यासाठी मदत करेल.

या अभ्यासक्रमाच्या लाँचविषयी केव्हीएस सेशसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्री– के विभाग (युरोकिड्स), लाइटहाउस लर्निंग म्हणाले, ‘युरोकिड्समध्ये आम्ही अगदी दोन वर्षे वयाइतक्या लहान मुलांमधली उत्सुकता आणि विचार कौशल्य विकसित करत आयुष्यभराचा पाया घालत असतो. डॉ. अनिता मदन, प्रमुख- अभ्यासक्रम विकास विभाग यांनी हेयुरेका हा लहान मुलांसाठीच्या शिक्षण क्षेत्रातील अनोखा अभ्यासक्रम तयार केला आहे. आमचा सर्वसमावेशक दृष्टिकोन लहान मुलांना फक्त शाळेसाठीच नव्हे, तर आयुष्यभरासाठी तयार करतो व त्यांना सातत्याने बदलत असलेल्या जगासाठी आवश्यक कौशल्यांनी सक्षम असतो. हा अभ्यासक्रम विचारवंत, इनोव्हेटर्स आणि उद्याच्या लीडर्सना कशा प्रकारे आकार देतो, हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या नव्या अभ्यासक्रमाच्या मदतीने आम्ही पुणे व महाराष्ट्रातील आमचे अस्तित्व आणखी बळकट करण्याचे ध्येय ठेवले आहे.’

या अभ्यासक्रमाच्या लाँचविषयी युरोकिड्सच्या अभ्यासक्रम विभागाच्या प्रमुख डॉअनिता मदन म्हणाल्या, ‘हेयुरेका हा प्राथमिक शिक्षण क्षेत्रासाठी क्रांतिकारी दृष्टिकोन मांडणारा आहे. ईपिक्स फ्रेमवर्कच्या मदतीने आम्ही बुध्यांकावर (आयक्यू) लक्ष केंद्रित करत आहोत, तसेच भावनिक, शारीरिक, सर्जनशील आणि आध्यात्मिक पैलूंवर काम करत चौफेर विकास करत आहोत. मुलांनी केवळ प्रश्नांची उत्तरे देऊ नयेत, तर उत्तरांवरही प्रश्न उभे करावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची आमची इच्छा आहे. यामुळे उत्सुकता, वैचारिक विश्लेषण आणि भोवतालच्या जगासह सखोल नाते त्यांच्यात रुजवेल. शैक्षणिक तयारीबरोबरच हेयुरेका मुलांना नाती जोडण्यासाठी, अडचणी सोडविण्यासाठी आणि जगाशी अर्थपूर्ण पद्धतीने संवाद साधण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यासाठी चालना देणारी मानसिकता विकसित करत आहे.’

एनईपी २०२० शी सुसंगत असलेला हा अभ्यासक्रम पंचकोश किंवा मानवी अस्तित्वाचे पाच पैलू या प्राचीन भारतीय संकल्पनेवर आधारित समग्र विकासावर भर देणारा आहे. हेयुरेकामध्ये या तत्त्वांचे शैक्षणिक विचारसरणीत रुपांतर करण्यात आले आहे. युरोकिड्स आपले होमबडी अपमध्ये या अभ्यासक्रमाशी सुसंगत बदल करत असून, आकलनात्मक विकासाला पाठिंबा देणारा समृद्ध संवादी कंटेंट उपलब्ध करत समतोल स्क्रीन टाइम मिळवून दिला जाणार आहे.

२३ वर्षांचा अनुभव आणि ४०० शहरांतील १,६०० पेक्षा जास्त प्रीस्कूलचे नेटवर्क व आतापर्यंत ७,००,००० विद्यार्थ्यांचा विकास करत, युरोकिड्स लहान मुलांना भविष्यासाठी सज्ज करण्यात आघाडीवर आहे. हा अभ्यासक्रम युरोकिड्सची सर्वसमावेशक विकास झालेले लर्नर्स तयार करण्याची बांधिलकी अधोरेखित करणारा असून, त्यामुळे प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील कंपनीचे आघाडीचे स्थान अधोरेखित झाले आहे.

महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी ‘मिस, मिसेस,मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट – इंडिया आयकॉन २०२४’ फॅशन शो संपन्न

पिंपरी: बलात्कार करणाऱ्याला काठोरात कठोर शिक्षा करा.., गुन्हा होताना तो केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता तो गुन्हा थांबवण्यासाठी पुढाकार घ्या .., महिला सुरक्षेसाठी काटिबद्ध रहा .., असा संदेश देत महिलांवरील अत्याचारा बाबत भाष्य करणारा एक आगळा वेगळा फॅशन शो आज संपन्न झाला.

कशीश सोशल फाउंडेशन आणि कशीश प्रोडक्शनच्या वतीने विष्णुप्रिया 7 आर्ट, Ak’s जगदंबा ज्वेलर्स यांच्या सहकार्याने  मिस,मिसेस,मिस्टर, किड्स इंडिया ईलाईट – इंडिया आयकॉन २०२४’फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. हा फॅशन शो एल्प्रो मॉल सभागृह, चिंचवड येथे पार पडला. यामध्ये महिलांवर वारंवार होत असलेल्या अत्याचारा विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच विविधतेतून एकता असा संदेश देण्यात आला. यावेळी  प्रमुख पाहूणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ( पिंपरी – चिंचवड शाखा) अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, Ak’s जगदंबा ज्वेलर्सचे डॉ. अजयकुमार कारंडे, देव झुंबरे, गणेश गुरव,ब्रॅंड अॅबेसिडर सोना म्हात्रे, प्रश्विता बेहळे, आयोजक आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांसह सिनेमा,फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पॅडमॅन योगेश पवार म्हणाले, अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे की असे प्रकार घडण्या पासून थांबवणे. या फॅशन शो च्या माध्यमातून आम्ही नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती करण्याचे काम करत आहोत.आशा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला आसावा.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, आजची सामाजिक परिस्थिती बघितली तर गांभीर्याने सांगितलेली माहिती कितपत पटेल हे सांगता येत नाही, मात्र प्रबोधनात्मक किंवा मनोरंजक पद्धतीने सांगितले तर लोक स्वीकारतात असे अनेकदा दिसते. पॅडमॅन योगेश पवार यांनी फॅशन शो च्या माध्यमातून समाजातील अत्यंत ज्वलंत विषयाला हात घातला आहे, महिला अत्याचारांविरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची आज गरज आहे. पवार देशभर राबावत असलेले कार्य आदर्शवत आहे.  

महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात ‘महिला सुरक्षा’ या थीमवर एक फॅशन वॉक करण्यात आला. यामध्ये मॉडेल्सनी  आणि आयोजकांनी महिला सुरक्षे  विषयी संदेश फलक घेवून रॅम्प वॉक केला. तसेच यामध्ये स्पर्धकांनी विविधतेतून एकता संदेश देत भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करत त्या त्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन या फॅशन शोमध्ये घडले.अंजली रघुनाथ वाघ, अर्चना माघाडे, दीपाली मुंढरे, ह्यांनी मॉडेल्स ला शिकवायला योगेश पवार ला सहाय्य केले. संपूर्ण भारतातून  ३ वर्षे वयोगट ते ५५ वर्षे असे एकूण ७५ स्पर्धकांना ह्या कार्यक्रमामध्ये निवडण्यात आले होते


विजेते – कार्तिकी बत्ते ,जोहान,डॅनियल मुजावर,शरयू पाटील ,सारा ,जरीन इराणी ,दीपाक्षी,जितेश पवार…उपविजेते- खुशी मोहिते,शिवण्या काकडे,अद्वित राजवडे,जेनिसा,भुवी डेंगळे, पोर्णिमा अंबार्गे ,जिया देवारे,प्रियांका मानकर, टीना शहा,अर्जुन झुंबरे,सुजल अग्रवाल

‌‘सहेला रे – आ मिल गाएं..‌’ मैफलीचे आयोजन

ऋत्विक फाउंडेशनतर्फे शनिवारी

भीमसेन जोशी, गानरसरस्वती किशोरी आमोणकर यांना सांगीतिक मानवंदना

डॉ. राधिका जोशी, अभिषेक काळे यांचे होणार गायन

पुणे : भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे सांगीतिक मानवंदना दिली जाणार असून या निमित्त शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी ‌‘सहेला रे – आ मिल गाएं ..‌’ या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. मैफल सायंकाळी 6 वाजता ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, प्लॉट नं. 17, वेद भवन मागे, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली असून यात जयपूर-अत्रैली घराण्याच्या गायिका डॉ. राधिका जोशी आणि किराणा घराण्याचे गायक अभिषेक काळे यांचे गायन होणार आहे. डॉ. राधिका जोशी या पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या असून त्यांना पद्मविभूषण गिरीजादेवी यांचेही मार्गदर्शन लाभलेले आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच ठुमरी, दादरा, कजरी, होरी या गायन प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. अभिषेक काळे यांचे गायनातील प्राथमिक शिक्षण त्यांच्या आई स्वाती काळे यांच्याकडे झाले असून पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि पंडित शरद बापट यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत, गझल आणि बंदिशींच्या सादरीकरणातून भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना सांगीतिक मानवंदना दिली जाणार आहे. कलाकारांना रामकृष्ण करंबेळकर (तबला), मालू गांवकर (हार्मोनियम), प्रथमेश तारळकर (पखवाज), उद्धव कुंभार (साईड ऱ्हिदम) साथसंगत करणार आहेत. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे निवेदन आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या समन्वयक रश्मी पाठारे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

भारत-इस्रायल कामगार सहकार्य नवीन उंचीवर, इस्रायल भरती मोहिमेसाठी आयटीआय औंध, पुणे येथे मोठी गर्दी

पुणे- भारत आणि इस्रायल यांच्यातील धोरणात्मक कामगार भागीदारीने एक नवीन रोमांचक टप्पा गाठला आहे कारण हजारो कुशल भारतीय कामगार आयटीआय औंध, पुणे येथे दुसऱ्या फेरीच्या भरती मोहिमेसाठी जमले आहेत. ही मोहीम १७ सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत चालणार आहे, आंतरराष्ट्रीय कामगार सहकार्याच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

या महत्त्वाकांक्षी भरती मोहिमेचे निरीक्षण करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी १२ इस्रायली अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ भारतात आले. त्यांच्या उपस्थितीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे, ज्याचा उद्देश इस्रायलच्या वाढत्या कुशल बांधकाम कामगारांच्या मागणीची पूर्तता करणे आणि भारतीय प्रतिभेला अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय करिअर संधी देणे आहे.

सध्याची भरती फेरी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा येथे यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या पहिल्या मोहिमेच्या यशावर आधारित आहे. आतापर्यंत, सुमारे ४,८०० भारतीय कामगार इस्रायलमध्ये तैनात झाले आहेत, ज्यांना सुमारे रु. १.३२ लाख प्रति महिना आणि रु. १६,००० चा मासिक बोनस मिळत आहे. पहिल्या तुकडीतील आणखी १,५०० कामगार १८ सप्टेंबर २०२४ रोजी इस्रायलला रवाना झाले, ज्यामुळे इस्रायलमधील कुशल भारतीय व्यावसायिकांची एकूण संख्या ५,००० पेक्षा जास्त झाली आहे.

या सकारात्मक परिणामांनी प्रेरित होऊन, इस्रायली नियोक्त्यांनी त्यांच्या भरती लक्ष्यांचा विस्तार केला आहे, या फेरीत आणखी १०,००० उमेदवारांची मागणी केली आहे. चौकटी, लोखंड वाकवणे, प्लास्टरिंग आणि सिरेमिक टाइलिंग या चार महत्त्वाच्या कौशल्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे.

हा उपक्रम भारत आणि इस्रायल यांच्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सरकार-टू-सरकार (जी२जी) कराराचा फल आहे. महाराष्ट्र सरकारने या कार्यक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला आहे, आयटीआय औंध येथे आवश्यक पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक समर्थन प्रदान केले आहे. उपसंचालक आणि प्रभारी संयुक्त संचालक रमाकांत भावसार आणि त्यांची टीम संस्थेत भरती प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, भारताच्या कौशल्य कार्यक्रमांना जागतिक रोजगार मागण्यांशी संरेखित करण्याचे सुनिश्चित करत आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उमेदवार इस्रायलमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी चांगले तयार आहेत.

ही भरती मोहीम भारताच्या उच्च-गुणवत्तेच्या मानव संसाधनांचा जागतिक पुरवठादार बनण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या कामगारांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करते, विशेषत: श्रम-प्रधान उद्योगांमध्ये भारतीय कौशल्याचे मूल्य असलेल्या देशांमध्ये.

या उपक्रमाला गती मिळत असताना, आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेसाठी एक शक्तिशाली उदाहरण स्थापित करते आणि राष्ट्रांमधील सहकारी भागीदारीचे परस्पर फायदे दर्शवते. या कार्यक्रमाच्या यशामुळे भविष्यात अशा अनेक आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे जागतिक कुशल कामगार क्षेत्रात भारताची भूमिका अधिक मजबूत होईल

Adfactors 

एनआयटी गोव्याचा 10 वा दीक्षांत समारंभ संपन्न, 207 विद्यार्थ्यांना पदवी करण्यात आली प्रदान

0

गोवा, –

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) गोव्याचा 10 वा दीक्षांत समारंभ रविवार, 22 सप्टेंबर रोजी गोवा येथील कनकोलिम येथे संस्थेच्या संकुलात आयोजित करण्यात आला होता.

यंदाचा दीक्षांत समारंभ महत्त्वाचा होता, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी 2024 रोजी एनआयटी गोव्याच्या 114 एकरच्या  कायमस्वरूपी संकुलाचे उद्घाटन झाल्यानंतर हा पहिलाच दीक्षांत समारंभ आहे.

पदवीदान समारंभात एकूण 207 विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या.  एकूण 166 विद्यार्थ्यांना बी.टेक. पदवी प्रदान करण्यात आली, तर 28 आणि 13 विद्यार्थ्यांना अनुक्रमे एम.टेक. आणि पीएच.डी.  पदवी प्रदान करण्यात आली. अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना  त्यांच्या अनुकरणीय शैक्षणिक कामगिरीबद्दल दहा पदके देऊन गौरवण्यात आले.

उपस्थितांना संबोधित करताना, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते, ते म्हणाले की, एनआयटी गोव्याने अत्यंत कमी कालावधीत शैक्षणिक क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.  त्याच्या समृद्ध वारशाला उत्कृष्टता, नवोन्मेष  आणि सामाजिक प्रतिबद्धतेची जोड आहे जे  विद्यार्थ्यांसाठी एक परिवर्तनकारी शैक्षणिक अनुभव सुनिश्चित करते  आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमध्ये योगदान  देते असे ते म्हणाले.

रचनात्मक माजी विद्यार्थी संबंधांना चालना देण्याप्रति एनआयटीची वचनबद्धता दर्शवत, संस्थेने बी.टेकच्या   2011-2015 तुकडीचे माजी विद्यार्थी  मन्सूर रहिमत खान यांना समारंभाचे सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात बोलताना, Beatoven.ai चे सह-संस्थापक आणि सीईओ खान यांनी, ही संस्था पोंडा येथील तात्पुरत्या संकुलात असतानाचा एनआयटी चा अनुभव कथन केला.  या रम्य संकुलात  अभ्यास करायला मिळालेले तुम्ही सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात, असे ते म्हणाले.

संस्थेतून पदवी घेतल्यानंतर उद्योजक बनण्याचा प्रवास त्यांनी सामायिक केला. त्यांनी उद्योजकतेचे महत्त्व आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेला कसे पुनरुज्जीवित करते आणि देशाला आत्मनिर्भर बनवते यावर भर दिला.

“तुम्ही कॅम्पसमध्ये असताना बऱ्याच गोष्टी स्पर्धात्मक वाटतात. तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीशी स्वतःची तुलना करण्याचा तुमचा कल असतो. यापैकी काहीही महत्त्वाचे नाही हे तुम्ही सर्वांनी जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला केवळ  एका बाबीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, ते म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व. तुमच्या वर्गात वैशिष्टयपूर्ण पार्श्वभूमी आणि विचार असलेले तुम्ही सर्व जण विलक्षण  व्यक्ती आहात, तुमच्यासारखे दुसरे कुणी नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाची जडणघडण जीवनात आश्चर्यकारक गोष्टी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने झाली आहे,” असे त्यांनी पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सांगितले.

संस्थेचे संचालक प्रा.ओमप्रकाश आर.जैस्वाल यांनी शैक्षणिक, संशोधन, पेटंट, प्लेसमेंट आणि आउटरीच उपक्रम अधोरेखित करणारा संस्थेचा सर्वसमावेशक शैक्षणिक अहवाल सादर केला.

या पदवीदान समारंभाला प्रशासकीय मंडळ आणि सिनेट समितीचे सदस्य, पदवीधर विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह संस्थेचे प्राध्यापक आणि कर्मचारीही उपस्थित होते.

वर्ष 2023-24 मध्ये, एनआयटी गोव्याने एकूण 83% प्लेसमेंट दिली, यात बी. टेक  पदवीधरांना सरासरी वार्षिक 8 लाख रुपये पगाराची ऑफर देण्यात आली तर सर्वोच्च पगाराची  ऑफर वार्षिक 20 लाख रुपये होती.  जवळपास 100% एम. टेक विद्यार्थ्यांना आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळाली.

गडकरी म्हणाले-चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही:मात्र रामदास आठवले मंत्री होणार हे निश्चित-नंतर म्हणाले- गमतीने बोललो, राज्य कोणाचे आले तरी मंत्री ते पक्के

नागपूर -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. रविवारी नागपुरात एका कार्यक्रमात ते म्हणाले, ‘केंद्रात भाजप चौथ्यांदा सरकार स्थापन करेल याची शाश्वती नाही, पण आमचे मित्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले पुढच्या सरकारमध्ये नक्कीच मंत्री होतील.’गडकरी बोलत होते, तेव्हा व्यासपीठावर आठवलेही उपस्थित होते. मात्र, त्यांच्या वक्तव्यावर गडकरी हसले आणि म्हणाले की, मी फक्त विनोद करत होतो. आठवले संसदेत त्यांच्या विनोदी बोलण्यामुळे चर्चेत राहतात.

वास्तविक हा कार्यक्रम आठवले यांचा सत्कार करण्याचा होता. गडकरी यांनी त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी आठवले यांनी आपल्या भाषणात आतापर्यंत तीनवेळा केंद्रात मंत्रिपद मिळाले असून सरकार स्थापन झाल्यावर चौथ्यांदाही मंत्री होणार असल्याचे सांगितले होते. त्यावर गडकरी म्हणाले- आठवले हे हवामानतज्ज्ञ आहेत.गडकरी म्हणाले​​​​​​​ की, ​​​​​​​रामदास आठवले यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना चांगले आयुष्य आणि निरोगी आयुष्य मिळावे. मी तुम्हा सर्वांच्या वतीने ही प्रार्थना करतो. माझा विश्वास आहे की त्यांनी दीन-दलित आणि शोषित लोकांसाठी आपले जीवन अर्पण केले आहे.

मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची मागणीही आठवलेंनी रास्त मागणी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले- जरांगेंची मागणी रास्त आहे, पण राज्याला हा अधिकार नाही. त्यामुळे मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करता येईल का, याचा विचार व्हायला हवा.

विधानसभेसाठी 10 ते 12 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे, चंद्रपूरची जागा आमच्या पक्षाला द्यावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असेही आठवले म्हणाले. संविधानावर विश्वास नसलेल्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. कोणताही कायदा बदलणे किंवा त्यात सुधारणा करणे म्हणजे संविधान बदलणे असा होत नाही.

गडकरींची विधाने

20 सप्टेंबरला म्हणाले – राजा असा असावा की तो टीका सहन करू शकेल
20 सप्टेंबर रोजी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गडकरी म्हणाले – राजा (शासक) असा असावा की जे त्याच्या विरोधात बोलले गेले ते सहन करू शकेल. टीकेवर आत्मपरीक्षण करू शकेल. लोकशाहीची ही सर्वात मोठी कसोटी आहे.

15 सप्टेंबरला म्हणाले – आमच्याकडे न्यूटनचे बाप आहेत, फाईलवर वजन ठेवताच ती पुढे सरकते
15 सप्टेंबर रोजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP) येथे अभियंता दिनाच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते – ‘आपल्या देशात कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी पारदर्शकता हवी. कधी कधी परिस्थिती अशी असते की रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठीही साहेबांची ऑर्डर घ्यावी लागते.

14 सप्टेंबरला म्हणाले- विरोधी पक्षनेते म्हणाले होते पंतप्रधान बनू, पाठिंबा देऊ, मी ऑफर नाकारली
14 सप्टेंबरला गडकरी म्हणाले होते की, मला एक घटना आठवते. मी कोणाचेही नाव घेणार नाही… तुम्ही पंतप्रधान झालात तर आम्ही पाठिंबा देऊ, असे त्या व्यक्तीने म्हटले होते. मी त्याला विचारले की तू मला साथ का देणार आणि मी तुमचा आधार का घेऊ? पंतप्रधान बनणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय नाही.

मेट्रो मार्गाचे उद्घाटन करून :PM मोदी पुण्यातून फुंकणार विधानसभेचे रणशिंग-तयारीचा आढावा महालक्ष्मी लॉन्सला संपन्न

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 26 तारखेची सभा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयाची नांदी असा निर्धार महाबैठकीत व्यक्त करण्यात आला. 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे उद्घाटन त्याचबरोबर इतर कामांचे देखील लोकार्पण होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर आज भाजपा पुणे शहरच्या वतीने महा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

येत्या गुरुवारी, २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका क्रमांक एकवरील स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भूमिगत मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण तसेच स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे. त्यासोबतच विविध प्रकल्पांचे लोकार्पण यावेळी होते आहे. त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या (एस पी कॉलेज) मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तयारीसाठी रविवारी संध्याकाळी पुणे शहरातील पक्षाच्या सर्व आमदारांची, भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महाबैठक महालक्ष्मी लॉन्सला झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमांबद्दल सविस्तर नियोजन करून जबाबदारीचे वाटपही करण्यात आले. दीड हजाराहून अधिक प्रतिनिधी या महाबैठकीसाठी उपस्थित होते. पंतप्रधानांची पुण्यातील सभा ही कायमच उत्साहात, चैतन्यात आणि नव्या ऊर्जेमध्ये होत असते. यावेळीही त्याच पद्धतीने ही सभा घेण्यात येणार आहे. या बैठकीला पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,राज्यसभेतील खासदार मेधा कुलकर्णी,आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार योगेश टिळेकर,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे,युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे,माजी मंत्री दिलीप कांबळे, वर्षा डहाळे, पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे,शरद बुट्टे पाटील, शहराचे सर्व सरचिटणीस, सर्व मंडल अध्यक्ष, पक्षाचे सर्व माजी नगरसेवक यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. पुणे जिल्ह्यासाठी विविध प्रकल्प दिले आहेत. आपले नेते देशाचं नेतृत्व करताना सर्वाधिक काळ प्रवास करत असतात. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता पुण्यातील सभा ही न भुतो न भविष्यती सभा यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया प्रभावीपणे वापरला पाहिजे.‌ विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी; विरोधकांचे चुकीचं नॅरेटिव्ह खोडून काढलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशातील काही महानगरं अभ्यास केला पाहिजे. राजकोट, इंदौर सारख्या महापालिकेत भाजपा सातत्याने निर्विवाद वर्चस्व मिळत आहे. एक विधानसभा पदं पाहिली तर 900 संख्या होते. प्रत्येक कार्यकारीणी पाहिली तर सरासरी एक हजार संख्या आहे. अशा लोकांनी पाच लोकांना आणलं तर ही संख्या 40 हजार होईल. पुणे शहराने अशी आपली ताकद वाढवली पाहिजे.ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 130 विधानसभा मतदारसंघात ही अतिशय उत्तम मताधिक्य मिळाले. अजून थोडे प्रयत्न केले तर 160 संख्या पोहोचू शकतो. महाराष्ट्रात महायुतीची कुठेही पिछेहाट झालेली नाही. पश्चिम महाराष्ट्रात देखील 4 जागा महायुती विजयी झाली आहे. आगामी काळात महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही विजय मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, नियोजनाच्या बैठकीचे स्वरुप हे एवढं मोठं असेल, तर ही बैठक यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. सभा म्हणजे निवडणूक जिंकण्याचं साधन आहे. बिगर भाजपा शासित राज्यात आज आराजक सदृश्य परिस्थिती आहे. केंद्रात पुणे शहराला अतिशय महत्त्वाचे स्थान मिळत आहे. कालच नितीन गडकरी यांनीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय महत्वाचा आहे. मोदीजी येणार म्हटल्यावर पुणेकर मोठ्या उत्साहाने सभेला येतीलच. भाजपा कुठे कुठे पोहोचू शकतो, याचा सर्वांनी विचार करावे. मोदीजी व्यस्ततेतून पुण्याला वारंवार वेळ देतायत. लांबून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी वेळेत सभा स्थानी पोहोचावे, असं आवाहन केलं.

धीरज घाटे म्हणाले की, पुणे शहराची मोठी परंपरा असून, एखाद्या कार्यक्रमापूर्वी नियोजनाची बैठक झाली, की सर्व कार्यकर्ते अतिशय झोकून देऊन काम करुन; तो यशस्वी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दौऱ्यानिमित्त काही लाख कुटुंबांच्या घरापर्यंत पोहोचता मिळते. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने 100 घरापर्यंत जाऊन निमंत्रण द्यावे.पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही सभा होत असल्याने ही सभा न भुतो न भविष्यती यशस्वी होईल, अशी भावना व्यक्त केली. तसेच, लोकसभेचा अनुभव पाहता, माननीय मोदीजींची विधानसभा निवडणुकीच्या विजयाची नांदी ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पेट्रोल डिझेल इंधन चोरी करणार्‍या टोळीवर मोक्काची कारवाई:48 लाख 1 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे-
मुंढवा आणि लोणीकाळभोर पोलिसांनी टाकेल्या छाप्यात नुकताच यावेळी पोलिसांनी 48 लाख 1 हजार 800 रुपयांचे पेट्रोल, डिझेलसह मुददेमाल पकडला होता. याप्रकरणात प्रविण सिद्राम मडीखांबे या टोळीप्रमुखासह बारा जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिले आहेत. शुभम सुशील भगत (23, रा. बोरकरवस्ती, थेऊरफाटा, ता. हवेली), तृशांत राजेंद्र सुंभे (31, रा. बॅक ऑफ बडोदाजवळ, थेऊरु फाटा) रवी छोटेलाल केवट (25, रा. बोरकरवस्ती, माळीमळा, ता. हवेली), विशाल सुरेश गोसावी (30, रा. वाणीमळा, थेऊर फाटा), कृष्णा उर्फ किरण हरिभाऊ आंबेकर (31, रा. कदमावाक वस्ती), रोहितकुमार छेद्दुलाल (25, रा.बोरकरवस्ती, माळीमळा), अभिमान उर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (35, माळीमळा, लोणी काळभोर), पांडुरंग निळकंठ नकाते (42 रा. माळीमळा, लोणी काळभोर), आकाश सुखदेव घोडके (24, रा. हनुमाननगर, कोथरूड), तेजस तुकाराम वाघमारे (23, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड), टँकर चालक यांच्यासह फरार झालेला टोळीप्रमुख प्रविण सिद्राम मडीखांबे (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) अशी मोक्का कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

दि. 10 सप्टेंबर रोजी मुंढवा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, पोलिस कर्मचारी ढमढेरे आणि शिवाजी जाधव असे लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे कुंजीरवाडी, थेऊर फाट्याजवळ पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडजवळ टँकर घेऊन जाऊन त्यामधून पेट्रोल-डिझेल बॅरल मध्ये काढले जात आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना आयओसिएल व एचपीसीएल असे एकुण 3 इंधन टॅकर आढळून आले. त्या टॅकर मधून इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने डिझेल बॅरलमध्ये काढत असल्याचे देखील मिळून आले. या छाप्यात एकुण 1 हजार 620 लिटर डिझेल मिळून आले, यावेळी पोलिसांनी काही जणांना अटक केली. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी प्रस्ताव तयार करून, पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काला मंजुरी दिली.

न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधानांनी दिला अबकी बार-मोदी सरकारचा नारा:परप्रांतीयांना सांगितले- मी देशात फिरलो, मिळेल ते खाल्ले, जिथे जागा मिळेल तिथे झोपलो

मोदी म्हणाले- इतिहासातील सर्वात मोठ्या निवडणुका भारतात झाल्या-2024 हे वर्ष संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहे. एकीकडे जगातील अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे तर दुसरीकडे अनेक देशांमध्ये लोकशाहीचा जल्लोष सुरू आहे.भारत आणि अमेरिका लोकशाहीच्या उत्सवात एकत्र आहेत, अमेरिकेत निवडणुका होणार आहेत, भारतात निवडणुका झाल्या आहेत. भारतात झालेल्या या निवडणुका मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या निवडणुका होत्या.तुम्ही कल्पना करू शकता की, अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पट मतदार, संपूर्ण युरोपच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार… यापेक्षा जास्त लोकांनी भारतात मतदान केले. भारताच्या लोकशाहीचे प्रमाण पाहिल्यावर आणखीनच अभिमान वाटतो.


पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिकन दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करत आहेत. न्यूयॉर्कमधील नासॉ वेटरन्स कॉलेजियममध्ये पोहोचल्यानंतर हजारो लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्रगीत आणि नंतर भारताच्या राष्ट्रगीताने मोदींचे स्वागत करण्यात आले.

यानंतर मोदींनी भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित केले. ते म्हणाले, “आपला नमस्कार बहुराष्ट्रीय झाला, तो राष्ट्रीय ते जागतिक बनले आहे.” मोदी म्हणाले, “जेव्हा मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नव्हतो, तेव्हा अनेक प्रश्न घेऊन या पृथ्वीवर यायचो. जेव्हा मी कोणतेही पद भूषवत नव्हते, तेव्हा मी अमेरिकेतील 29 देशांना भेट दिली होती.”मोदींनी स्थलांतरितांना सांगितले, “यावेळी भारताच्या निवडणुकीत अभूतपूर्व असे काहीतरी घडले आहे. यानंतर मोदींनी लोकांच्या दिशेने हात उंचावून त्यांना 3 वेळा मोदी सरकारचा नारा दिला, आता वेळ आली आहे.पंतप्रधान मोदींनी AI ची नवी व्याख्या सांगितली. ते म्हणाले, “एक एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एक एआय म्हणजे अमेरिकन इंडियन.”

पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग असा होता की मी वर्षानुवर्षे संपूर्ण देशात फिरलो, भटकत राहिलो, जिथे मिळेल तिथे अन्न खाल्ले, जिथे जिथे झोपायला मिळेल तिथे झोपलो, समुद्रकिनाऱ्यापासून पर्वतापर्यंत वाळवंटापर्यंत जायचा विचार केला.”

ते म्हणाले, “माझ्या देशाच्या संस्कृतीचा आणि आव्हानांचा मला प्रत्यक्ष अनुभव होता. तोही एक काळ होता जेव्हा मी वेगळी दिशा ठरवली होती. नियतीने मला राजकारणात नेले. मी मुख्यमंत्री होईन, असे कधीच वाटले नव्हते.याआधी त्यांनी बायडेन आणि क्वाड समिटसोबतच्या बैठकीला हजेरी लावली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीत भारत आणि अमेरिका यांच्यात दोन महत्त्वाचे करार झाले आहेत. अमेरिकेचे स्पेस फोर्स भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे.यामध्ये बनवलेल्या सेमीकंडक्टर चिप्सचा वापर भारत आणि अमेरिकेच्या सशस्त्र दलांना होणार आहे. याशिवाय अमेरिकेने भारताला 31 MQ-B ड्रोन देण्याची घोषणा केली आहे. सीमेवर पाळत ठेवण्यासाठी याचा वापर केला जाईल.

मोदी म्हणाले- भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायची आहे

एका दशकात भारत दहाव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला. आता भारताने लवकरात लवकर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हावी, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. आज देशातील एका मोठ्या वर्गाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत.गेल्या 10 वर्षात करोडो लोकांना गॅस, पाणी, वीज कनेक्शन, करोडो शौचालये मिळाली आहेत.अशा करोडो लोकांना दर्जेदार जीवन हवे आहे. आता भारतातील जनतेला फक्त रस्ते नको आहेत, तर उत्तम एक्सप्रेसवे हवे आहेत.

बस नं. 1532 एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचे जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह ‌‘सखा‌’ला
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 59व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत म. ए. सो. गरवारे कॉलेजने सादर केलेल्या बस नं. 1532 एकांकिकेने बाजी मारत यंदाच्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला 5001 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेले जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह व 5001 रुपयांचे पारितोषिक मएसोचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड करिअर कोर्सेसे (आयएमसीसी) सादर केलेल्या सखा या एकांकिकेने पटकाविले.
स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि 3001 रुपयांचे रोख पारितोषिक विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामतीच्या ‌‘पाटी‌’ एकांकिकेने तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक आणि 2001 रुपयांचे पारितोषिक न्यू आर्टस्‌‍ ॲन्ड सायन्स कॉलेज अहमदनगरच्या ‌‘देखावा‌’ या एकांकिकेला जाहीर करण्यात आला.
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार (दि. 21) आणि रविवारी (दि. 22) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या नऊ संघाचे तीन सत्रात सादरीकरण झाले. स्पर्धेचा निकाल रविवारी (दि. 22) रात्री जाहीर करण्यात आला.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी स्पर्धेत प्रथम आलेल्या बस नं. 1532 या एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.
पुरुषोत्तम बेर्डे, शुभांगी गोखले, गिरीष परदेशी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
: स्पर्धेचा सविस्तर निकाल :
सांघिक प्रथम : बस नं. 1532 (म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय)
सांघिक द्वितीय : पाटी (विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
सांघिक तृतीय : देखावा (न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका : सखा (म. ए. सो.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर कोर्सेस)
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : ओम चव्हाण (सखा, आयएमसीसी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक : पवन पोटे (देखावा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर)
उत्तेजनार्थ विद्यार्थी लेखिका : सई काटकर आणि वेदिका कुलकर्णी (11,111, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, स्वायत्त)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : यश मेंगडे (बस. नं. 1532, गरवारे वाणिज्य महाविद्यालय)
उत्तेजनार्थ दिग्दर्शन : ऋषिकेश सकट (देखावा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर)
उत्तेजनार्थ दिग्दर्शन : सुबोधन जोशी (पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती)
सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य : सुजल बर्गे (भूमिका अरविंद, एकांकिका – पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय)
अभिनय नैपुण्य (अभिनेता) : यश पत्की (भूमिका – सदा मोरे, एकांकिका – बस नं. 1532, म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय)
अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) : श्रद्धा रंगारी (भूमिका – सुवर्णा, एकांकिका – पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय)
वाचिक अभिनय नैपुण्य : पवन पोटे (शंकर, एकांकिका – देखावा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
उत्तेजनार्थ (अंतिम फेरी) : अभिनय : ओम चव्हाण (सुदामा/फडतरे, एकांकिका – सखा, आयएमसीसी)
अनामिका मदने (ज्ञानेश्वरी, एकांकिका – बिजागरी, पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय)
तन्वी खाडिलकर (प्रिया, एकांकिका – पार्टनर, स. प. महाविद्यालय)
शुभ्रा जाधव (माय, एकांकिका – बिजागरी, पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय)
राखी गोरखा (आत्या, एकांकिका – देखावा, न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
समृद्धी कुलकर्णी (बारकी, एकांकिका – बस नं. 1532, गरवारे वाणिज्य महाविद्यालय)
व्योम कुलकर्णी (भूषण, एकांकिका – पार्टनर, स. प. महाविद्यालय)
वैष्णवी भिडे (आनंदीबाई, एकांकिका – तृष्णा चक्र, डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर)
प्रद्युम्न उमरीकर (सचिन, एकांकिका – 11,111, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, स्वायत्त)
पार्थ दीक्षित (माधव, एकांकिका – पार्टनर, स. प. महाविद्यालय)

सर्वोत्कृष्ट आयोजित संघ : भगीरथ करंडक : पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर (एकांकिका अय)

मंडळांच्या मेहनतीमुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा-पोलिस आयुक्त अमितेश कुमार


: मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने कृतज्ञता समारंभाचे आयोजन
पुणे : सर्व गणेश मंडळांनी आपापल्या स्तरावर घेतलेल्या मेहनतीमुळे अत्यंत उत्साहात आणि चांगल्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मानाचे गणपती, पुण्याचे प्रतिष्ठित गणपती आणि सर्व गणेशोत्सव मंडळे यांनी कोणतीही तक्रार पोलिसांबद्दल ठेवली नाही. पोलीस दल आणि जनता यांच्यामध्ये समन्वय घडवून पुढील काळात आम्ही कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यासाठी  कटिबद्ध आहोत. मेहनतीने शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न करू यासाठी शहराचा विश्वास आणि प्रेम यापुढेही असेच लाभेल असा आम्हाला विश्वास आहे, अशी भावना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली.

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बाजीराव रस्त्यावरील नुमवि प्रशालेच्या सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीप गिल, ॲड.शिवराज कदम जहागीरदार, पराग ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित उपस्थित होते. उपरणे, श्रीफळ, तुळशीबाग गणपतीची प्रतिमा देऊन कृतज्ञता सन्मान करण्यात आला. अग्निशमन दलातील अधिकारी, जीव रक्षक, तसेच उत्सव यशस्वी करणाऱ्या हातांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

पुनीत बालन म्हणाले, ज्यांना गणपतीवर श्रद्धा होती त्यांनी उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला आणि ज्यांना आवडला नाही त्यांनी टीका केली. टीकाकारांना मी एवढेच सांगेल पुण्याच्या गणेशोत्सव हा वैभवशाली गणेशोत्सव आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आहे. त्यामुळे गणेशोत्सव कधीही हायजॅक होऊ शकत नाही. हा उत्सव जपण्याचे काम आम्ही गणेशोत्सव मंडळांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, एका गोष्टीची खंत वाटते, उत्सवातले दहा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे झाले परंतु एका ठिकाणी आपण चुकलो ते म्हणजे विसर्जन मिरवणूक. विसर्जन मिरवणूक देखील एक उत्सव म्हणून साजरा व्हायला पाहिजे ती जास्त वेळ रेंगाळायला नको. पोलीस आणि प्रशासनावर आपण किती ताण देणार याचे आत्मचिंतन करायला हवे. उत्सवात देखील भाविक हे बापांच्या दर्शनासाठी येतात ते आपल्यासाठी येत नाहीत त्यामुळे त्यांना किती वेळ ताटकळत ठेवायचे याचा देखील विचार मंडळाने आणि कार्यकर्त्यांनी करायला हवा. हा गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी ज्या लोकांनी सहकार्य केले ते खऱ्या अर्थाने उत्सवाचा कणा आहेत. त्यांचा सन्मान तुळशीबाग मंडळांने केला आहे. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप इंगळे यांनी आभार मानले.

डॉ. प्रभा अत्रे यांना गायन, नृत्याविष्काराद्वारे अभिवादन


‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष‌’ दोन दिवसीय महोत्सवाची सांगता

पुणे : स्वरयोगिनी, पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी रचनलेल्या विविध बंदिशींचे सादरीकरण तसेच त्यांच्या बंदिशींवर आधारित कुचिपुडी नृत्याविष्काराद्वारे डॉ. प्रभा अत्रे यांना सांगीतिक अभिवादन करण्यात आले.

डॉ. प्रभा अत्रे शिष्य परिवारातर्फे स्वरयोगिनी, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या साहित्य, कला आणि संगीत या क्षेत्रांमधील कार्यावर आधारित ‌‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष‌’ या दोन दिवसीय महोत्सवाचे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 22) स्वर-नृत्य-प्रभाअंतर्गत डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर आधारित संगीत-नृत्याचा अनोखा कार्यक्रम झाला. यात डॉ. मनिषा रवी प्रकाश, पियू मुखर्जी यांचे गायन तर नृत्यगुरू वैजयंती काशी आणि सहकाऱ्यांनी कुचिपुडी नृत्य सादर केले.
गायक कलाकारांना पांडुरंग मुखडे (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
महोत्सवाचे आयोजन डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. आणि कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी केले होते.

डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या व डॉ. उषा अत्रे-वाघ यांच्या कन्या डॉ. मनिषा रवी प्रकाश यांनी सादर केलेल्या ‌‘अभिमानाने मीरा वदते हरी चरणाशी माझे नाते‌’ प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ही प्रार्थना डॉ. प्रभा अत्रे व त्यांच्या भगिती डॉ. उषा अत्रे-वाघ यांनी एकत्रितपणे नागपूर आकाशवाणीवर सादर केलेले एकमेव गीत असल्याची आठवण या वेळी सांगण्यात आली.
या नंतर पश्चिम बंगालमधील सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका पियू मुखर्जी यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या रचना सादर केल्या. बिलासखानी तोडीमधील ‌‘मैं तोरी शरण आयी जगतजननी‌’, ‌‘जग माता तू भवानी चामुंडे महाकाली‌’ या बंदिशी बडाख्याल, मध्यलय आणि द्रुत एकतालात सादर केल्या. ‌‘सुनो मोरी अरज, कैसे धरू धीरज‌’ ही देसरागातील मध्यलय रुपकमधील बंदिश प्रभावीपणे सादर केली. तसेच ‌‘तानी दे रे ना तदाने तान दीम्‌‍‌’ हा तराणा सादर करून त्यांनी रसिकांना मोहित केले. मैफलीची सांगता ‌‘आए नही मोरे शाम‌’ या मिश्र भैरवीतील ठुमरीने केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बेंगळुरू येथील नृत्यगुरू वैजयंती काशी आणि त्यांच्या शिष्यांचे बहारदार कुचिपुडी नृत्य सादरीकरण झाले. सादरीकरणाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित नृत्याविष्कारात ‌‘माता भवानी काली‌’ ही त्रिशक्तीची रूपे दर्शविणारी प्रस्तुती केली. या नंतर मर्यादापुरुषोत्तम श्री राम आणि नटखट श्री कृष्णाचे वर्णन करणाऱ्या ‌‘कोई राम कहे, कोई शाम कहे‌’ या रचनेवर वैजयंती काशी यांनी एकल नृत्य सादर केले. ‌‘सगुण स्वरूप नंदलाल‌’ या रचनेवरील नृत्याविष्कारात भक्तीचे अनोखे दर्शन घडविले. डॉ. प्रभा अत्रे यांच्या विविध रचनांवर सादर झालेला विलोभनीय नृत्याविष्कार रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करणारा पोवाडा शाहीर हेमंत मावळे यांनी रचला होता. या पोवाड्याचे दृकश्राव्य माध्यमातील चित्रिकरण या प्रसंगी दाखविण्यात आले.
कलाकारांचा सत्कार निलिमा छापेकर, वीणा शुक्ला, रघुवीर कुलकर्णी, अशोक वळसंगकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

सरन्यायाधीश चंद्रचूड-मुख्यमंत्री शिंदे एकाच मंचावर:23 सप्टेंबरला मुंबई हायकोर्टाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम

0


मुंबई-23 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन प्रस्तावीत इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचातर येणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीआधी सरन्यायाधी धनंजय चंद्रचूड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वातातरण तापण्याची शक्यता आहे.

24 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याच्या एक दिवस आधी मुंबईत हा कार्यक्रम होत असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यावेळी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळची ऐतिहासिक इमारत जागावापरासाठी कमी पडत होती. त्यामुळे हायकोर्टाला नवीन इमारत देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन जागेसाठी 2019 पासून हायकोर्टाच्या बार असोसिएशनचा लढा सुरू होता. अखेर या लढ्याल यश आले असून 23 सप्टेंबर रोजी नवीन प्रस्तावित इमारतीचे उद्घाटन होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी राज्य सरकारने गोरेगावचा पर्याय दिला होता. मात्र शेवटी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे ही इमारत उभारण्याचे निश्चित झाले आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. आर. गवई, न्या. ए. एक. ओका, न्या. दीपांकर दत्ता, न्या. उज्ज्वल भूयान, न्या. प्रसन्न वरले, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे.

विरोधक पुण्याची बदनामी करतात म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना आप ने म्हटले, फक्त ५ प्रश्न तुमच्यासाठी .. द्या उत्तरे

पुणे- शहराच्या मध्यवर्ती भागात जमीन खचल्याने महापालिकेचा ट्रक थेट भूगर्भात गेल्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आणि यावर बोलायला नको तरी माध्यमांच्या आग्रहावर सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या माजी महापौरांनी … विरोधक पुण्याची बदनामी करतात अशी प्रतिक्रिया दिली . आता या प्रतिक्रियेला ट्रोल आम आदमी पार्टी करु लागली आहे आम आदमी पार्टीने भाजप ला घेरण्याची तयारी केली असल्याने यावर मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री काय भूमिका घेणार हा उत्सुकतेचा विषय आहेच . आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे मोहोळ यांच्यासाठी आमचे फक्त ५ प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे त्यांनी द्यावे असे आवाहन आम्ही करतो आहे.

मुकुंद किर्दत म्हणाले,’काल सिटी पोस्ट जवळ एक ट्रक खड्ड्यामध्ये गेल्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी भाजप सरकारवर टीका केली. यावर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी विरोधक पुणे शहराला बदनाम करीत आहेत अशी टीका केली.

आता आम आदमी पार्टी मुरलीधर मोहोळ यांनी पाच प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे जाहीर आवाहन देत आहे .ते प्रश्न पुढील प्रमाणे …

१) पुण्यातल्या खड्ड्यावरून स्वतः राष्ट्रपतींनीच नाराजी व्यक्त केलेली आहे, मग राष्ट्रपती सुद्धा पुण्याची बदनामी करीत आहेत असे म्हणणार का?

२) पुणे शहर खड्ड्यांचे शहर, पुणे शहर वाहतूक कोंडी चे शहर ,पुणे शहर हे वाढत्या प्रदूषणाचे शहर, पुणे शहर हे कोयता गँगचे, गुंडगिरीचे शहर हे कर्तृत्व कुणाचे आहे?

३) खड्डे आणि वाहतूक कोंडी हा विषय तर स्मार्ट सिटी ची चर्चा सुरू झाली त्याच्याही आधीपासूनच आहे. मागील महिन्यात आपण स्वतः १० दिवसात सर्व खड्डे बुजवले जातील अशी घोषणा केली होती, ते खड्डे बुजले का?

४) रस्त्यावर खड्डे पडल्यास काही वर्षे त्याची जबाबदारी ही त्यात कंत्राटदारावर असेल असं कंत्राट देताना लिहून घेतलेले असते. मग कंत्राटदारांना कामाच्या दोष उत्तरदायित्व कलमा मधून सूट कोण देते?

५) शहरात नगरसेवक वा राजकारण्यांचा हस्तक्षेप पुण्यामध्ये नसताना प्रशासनही वेगळे काहीच करत नाही हा अनुभव गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये आलाच आहे. आता प्रशासनावर कुणाचे नियंत्रण आहे? ट्रिपल इंजिन सरकार पुण्यात काय करते?