ऋत्विक फाउंडेशनतर्फे शनिवारी
भीमसेन जोशी, गानरसरस्वती किशोरी आमोणकर यांना सांगीतिक मानवंदना
डॉ. राधिका जोशी, अभिषेक काळे यांचे होणार गायन
पुणे : भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे सांगीतिक मानवंदना दिली जाणार असून या निमित्त शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी ‘सहेला रे – आ मिल गाएं ..’ या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. मैफल सायंकाळी 6 वाजता ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, प्लॉट नं. 17, वेद भवन मागे, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली असून यात जयपूर-अत्रैली घराण्याच्या गायिका डॉ. राधिका जोशी आणि किराणा घराण्याचे गायक अभिषेक काळे यांचे गायन होणार आहे. डॉ. राधिका जोशी या पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या असून त्यांना पद्मविभूषण गिरीजादेवी यांचेही मार्गदर्शन लाभलेले आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच ठुमरी, दादरा, कजरी, होरी या गायन प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. अभिषेक काळे यांचे गायनातील प्राथमिक शिक्षण त्यांच्या आई स्वाती काळे यांच्याकडे झाले असून पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि पंडित शरद बापट यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत, गझल आणि बंदिशींच्या सादरीकरणातून भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना सांगीतिक मानवंदना दिली जाणार आहे. कलाकारांना रामकृष्ण करंबेळकर (तबला), मालू गांवकर (हार्मोनियम), प्रथमेश तारळकर (पखवाज), उद्धव कुंभार (साईड ऱ्हिदम) साथसंगत करणार आहेत. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे निवेदन आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्च्या समन्वयक रश्मी पाठारे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.