: मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने कृतज्ञता समारंभाचे आयोजन
पुणे : सर्व गणेश मंडळांनी आपापल्या स्तरावर घेतलेल्या मेहनतीमुळे अत्यंत उत्साहात आणि चांगल्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मानाचे गणपती, पुण्याचे प्रतिष्ठित गणपती आणि सर्व गणेशोत्सव मंडळे यांनी कोणतीही तक्रार पोलिसांबद्दल ठेवली नाही. पोलीस दल आणि जनता यांच्यामध्ये समन्वय घडवून पुढील काळात आम्ही कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मेहनतीने शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न करू यासाठी शहराचा विश्वास आणि प्रेम यापुढेही असेच लाभेल असा आम्हाला विश्वास आहे, अशी भावना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बाजीराव रस्त्यावरील नुमवि प्रशालेच्या सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीप गिल, ॲड.शिवराज कदम जहागीरदार, पराग ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित उपस्थित होते. उपरणे, श्रीफळ, तुळशीबाग गणपतीची प्रतिमा देऊन कृतज्ञता सन्मान करण्यात आला. अग्निशमन दलातील अधिकारी, जीव रक्षक, तसेच उत्सव यशस्वी करणाऱ्या हातांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
पुनीत बालन म्हणाले, ज्यांना गणपतीवर श्रद्धा होती त्यांनी उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला आणि ज्यांना आवडला नाही त्यांनी टीका केली. टीकाकारांना मी एवढेच सांगेल पुण्याच्या गणेशोत्सव हा वैभवशाली गणेशोत्सव आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आहे. त्यामुळे गणेशोत्सव कधीही हायजॅक होऊ शकत नाही. हा उत्सव जपण्याचे काम आम्ही गणेशोत्सव मंडळांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, एका गोष्टीची खंत वाटते, उत्सवातले दहा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे झाले परंतु एका ठिकाणी आपण चुकलो ते म्हणजे विसर्जन मिरवणूक. विसर्जन मिरवणूक देखील एक उत्सव म्हणून साजरा व्हायला पाहिजे ती जास्त वेळ रेंगाळायला नको. पोलीस आणि प्रशासनावर आपण किती ताण देणार याचे आत्मचिंतन करायला हवे. उत्सवात देखील भाविक हे बापांच्या दर्शनासाठी येतात ते आपल्यासाठी येत नाहीत त्यामुळे त्यांना किती वेळ ताटकळत ठेवायचे याचा देखील विचार मंडळाने आणि कार्यकर्त्यांनी करायला हवा. हा गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी ज्या लोकांनी सहकार्य केले ते खऱ्या अर्थाने उत्सवाचा कणा आहेत. त्यांचा सन्मान तुळशीबाग मंडळांने केला आहे. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप इंगळे यांनी आभार मानले.