गोवा, –
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) गोव्याचा 10 वा दीक्षांत समारंभ रविवार, 22 सप्टेंबर रोजी गोवा येथील कनकोलिम येथे संस्थेच्या संकुलात आयोजित करण्यात आला होता.
यंदाचा दीक्षांत समारंभ महत्त्वाचा होता, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी 2024 रोजी एनआयटी गोव्याच्या 114 एकरच्या कायमस्वरूपी संकुलाचे उद्घाटन झाल्यानंतर हा पहिलाच दीक्षांत समारंभ आहे.
पदवीदान समारंभात एकूण 207 विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. एकूण 166 विद्यार्थ्यांना बी.टेक. पदवी प्रदान करण्यात आली, तर 28 आणि 13 विद्यार्थ्यांना अनुक्रमे एम.टेक. आणि पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुकरणीय शैक्षणिक कामगिरीबद्दल दहा पदके देऊन गौरवण्यात आले.
उपस्थितांना संबोधित करताना, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते, ते म्हणाले की, एनआयटी गोव्याने अत्यंत कमी कालावधीत शैक्षणिक क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या समृद्ध वारशाला उत्कृष्टता, नवोन्मेष आणि सामाजिक प्रतिबद्धतेची जोड आहे जे विद्यार्थ्यांसाठी एक परिवर्तनकारी शैक्षणिक अनुभव सुनिश्चित करते आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमध्ये योगदान देते असे ते म्हणाले.
रचनात्मक माजी विद्यार्थी संबंधांना चालना देण्याप्रति एनआयटीची वचनबद्धता दर्शवत, संस्थेने बी.टेकच्या 2011-2015 तुकडीचे माजी विद्यार्थी मन्सूर रहिमत खान यांना समारंभाचे सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात बोलताना, Beatoven.ai चे सह-संस्थापक आणि सीईओ खान यांनी, ही संस्था पोंडा येथील तात्पुरत्या संकुलात असतानाचा एनआयटी चा अनुभव कथन केला. या रम्य संकुलात अभ्यास करायला मिळालेले तुम्ही सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात, असे ते म्हणाले.
संस्थेतून पदवी घेतल्यानंतर उद्योजक बनण्याचा प्रवास त्यांनी सामायिक केला. त्यांनी उद्योजकतेचे महत्त्व आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेला कसे पुनरुज्जीवित करते आणि देशाला आत्मनिर्भर बनवते यावर भर दिला.
“तुम्ही कॅम्पसमध्ये असताना बऱ्याच गोष्टी स्पर्धात्मक वाटतात. तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीशी स्वतःची तुलना करण्याचा तुमचा कल असतो. यापैकी काहीही महत्त्वाचे नाही हे तुम्ही सर्वांनी जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला केवळ एका बाबीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, ते म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व. तुमच्या वर्गात वैशिष्टयपूर्ण पार्श्वभूमी आणि विचार असलेले तुम्ही सर्व जण विलक्षण व्यक्ती आहात, तुमच्यासारखे दुसरे कुणी नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाची जडणघडण जीवनात आश्चर्यकारक गोष्टी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने झाली आहे,” असे त्यांनी पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सांगितले.
संस्थेचे संचालक प्रा.ओमप्रकाश आर.जैस्वाल यांनी शैक्षणिक, संशोधन, पेटंट, प्लेसमेंट आणि आउटरीच उपक्रम अधोरेखित करणारा संस्थेचा सर्वसमावेशक शैक्षणिक अहवाल सादर केला.
या पदवीदान समारंभाला प्रशासकीय मंडळ आणि सिनेट समितीचे सदस्य, पदवीधर विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह संस्थेचे प्राध्यापक आणि कर्मचारीही उपस्थित होते.
वर्ष 2023-24 मध्ये, एनआयटी गोव्याने एकूण 83% प्लेसमेंट दिली, यात बी. टेक पदवीधरांना सरासरी वार्षिक 8 लाख रुपये पगाराची ऑफर देण्यात आली तर सर्वोच्च पगाराची ऑफर वार्षिक 20 लाख रुपये होती. जवळपास 100% एम. टेक विद्यार्थ्यांना आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळाली.