पुणे-
मुंढवा आणि लोणीकाळभोर पोलिसांनी टाकेल्या छाप्यात नुकताच यावेळी पोलिसांनी 48 लाख 1 हजार 800 रुपयांचे पेट्रोल, डिझेलसह मुददेमाल पकडला होता. याप्रकरणात प्रविण सिद्राम मडीखांबे या टोळीप्रमुखासह बारा जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिले आहेत. शुभम सुशील भगत (23, रा. बोरकरवस्ती, थेऊरफाटा, ता. हवेली), तृशांत राजेंद्र सुंभे (31, रा. बॅक ऑफ बडोदाजवळ, थेऊरु फाटा) रवी छोटेलाल केवट (25, रा. बोरकरवस्ती, माळीमळा, ता. हवेली), विशाल सुरेश गोसावी (30, रा. वाणीमळा, थेऊर फाटा), कृष्णा उर्फ किरण हरिभाऊ आंबेकर (31, रा. कदमावाक वस्ती), रोहितकुमार छेद्दुलाल (25, रा.बोरकरवस्ती, माळीमळा), अभिमान उर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (35, माळीमळा, लोणी काळभोर), पांडुरंग निळकंठ नकाते (42 रा. माळीमळा, लोणी काळभोर), आकाश सुखदेव घोडके (24, रा. हनुमाननगर, कोथरूड), तेजस तुकाराम वाघमारे (23, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड), टँकर चालक यांच्यासह फरार झालेला टोळीप्रमुख प्रविण सिद्राम मडीखांबे (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) अशी मोक्का कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
दि. 10 सप्टेंबर रोजी मुंढवा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, पोलिस कर्मचारी ढमढेरे आणि शिवाजी जाधव असे लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे कुंजीरवाडी, थेऊर फाट्याजवळ पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडजवळ टँकर घेऊन जाऊन त्यामधून पेट्रोल-डिझेल बॅरल मध्ये काढले जात आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना आयओसिएल व एचपीसीएल असे एकुण 3 इंधन टॅकर आढळून आले. त्या टॅकर मधून इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने डिझेल बॅरलमध्ये काढत असल्याचे देखील मिळून आले. या छाप्यात एकुण 1 हजार 620 लिटर डिझेल मिळून आले, यावेळी पोलिसांनी काही जणांना अटक केली. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी प्रस्ताव तयार करून, पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काला मंजुरी दिली.