Home Blog Page 683

जीतो अपेक्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष विजय भंडारी यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२४’ प्रदान

  • जीतो अपेक्स इंटरनॅशनलला विजय भंडारींच्या रूपानेसर्वात तरुण अध्यक्ष लाभला हे पुण्यासाठी अभिमानास्पदप्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; विजय भंडारी यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२४’ प्रदान

पुणे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने जीतो अपेक्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष विजय भंडारी यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२४’ने सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी.चोरडिया यांच्या हस्ते श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ साधना सदन पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.प.पू. गुरुदेव श्री गौतम मुनिजी म.सा., प.पू. श्री चेतन मुनिजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुग्गड, आदेश खिंवसरा, जैन श्रावक संघ साधना सदनचे पदाधिकारी  आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले,”जैन समाजाच्या मोठ्यासंघटनेच्या जीतो अपेक्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी विजय भंडारी यांची निवड झाली असून, २०२४ ते २०२६ या कालावधीत ते काम पाहणार आहेत. जीतो अपेक्स श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष, जीतो पुणेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. जीतोचे भारत देशातील ७० शहरात आणि जगभरात २९ ठिकाणी चॅप्टर आहेत. ४८ हजार सभासद असलेल्या जीतो संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी विजय भंडारी सांभाळणार आहेत.”
“भंडारीयांनी पेपर इंडस्ट्रीमध्ये अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. याबरोबरच सामाजिक क्षेत्रात जीतो संघटनेबरोबर लायन्स क्लब, आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट, जैन युगल धर्म संघ, सावली वृद्धाश्रम आदी संस्थांच्या माध्यमातून ते काम करीत आहेत. लायन्स क्लब इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ चे प्रांतपाल म्हणून २०२३ ते २०२४ या कालावधीत त्यांनी काम केले आहे. लायन्स क्लब्जच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट प्रांतपालपदी नियुक्ती झालेले विजय भंडारी एकमेव लायन आहेत. विशेषतः पुण्यातून मेगा स्केलवरील सामाजिक कार्यक्रमाचे अनोख्या पद्धतीने आयोजन करीत अल्पावधीत जागतिक स्तरावर ठसा उमटविणाऱ्या त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला,” असे प्रा डॉ संजय बी चोरडिया यांनी सांगितले.
उद्योग व व्यापार क्षेत्रात जगभरात कार्यरत असलेल्या जैन समाजातील उद्योजक व व्यापारी, महिला व युवा पिढीच्या तसेच जैन संस्थांच्या विकासासाठी प्रामुख्याने काम करेन. तसेच जैन समाजाच्या सर्व पंथांचे गुरुसंत, साधु व साध्वी मसा यांच्या उत्तम आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करेन, असे उद्गार विजय भंडारी यांनी काढले. सूर्यदत्त संस्थेने मला सन्मानित केले, याचा आनंद वाटत असल्याचे भंडारी यांनी नमूद केले. सूत्रसंचालन आदेश खिंवसरा यांनी केले.

‘पूर्णवा हेरिटेज’ स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या संघाचे उल्लेखनीय यश

पिंपरी, पुणे (दि.२५ सप्टेंबर २०२४) एस. बी. पाटील पब्लिक स्कूल आणि चेन्नई येथील जॉय ऑफ गिव्हींग फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या “पूर्णवा हेरिटेज प्रश्नमंजुषा” स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या संघाने उल्लेखनीय यश मिळवले. महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १३ शाळांमधून १०४ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या अनुश्री काटमोरे, वैदेही वर्मा आणि हर्षित पाटील यांच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या लेखी, मौखिक स्पर्धेत एकूण सहा फेऱ्यांमध्ये इतिहास, पौराणिक कथा, नाणी, प्राचीन साहित्य, क्रीडा स्पर्धा, शिक्षण, खगोलशास्त्र ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश होता.
विजेत्या स्पर्धकांना डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या कार्यकारी संचालक डॉ. रोहिणी पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, उपक्रम प्रभारी स्वालेहा मुजावर, शिक्षिका प्रविणा मोरे, अंजली गुगळे, प्रशासन अधिकारी मनीष ढेकळे आदी उपस्थित होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी देखील विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

नागपूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपूर दि. २५ सप्टेंबर २०२४
नागपूर महानगरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडले असून शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार आहे हे निश्चित झाले आहे त्यामुळे राज्य भरात विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे महाराष्ट्र प्रदेश ओबीसीं सेलच्या सरचिटणीस कल्पनाताई मानकर, धनराज फुसे, राष्ट्रवादीचेच सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद ढेंगरे, यांच्या नेतृत्वात राजकुमार जी वानखेड़े योगेश धनराज फुसे, राजेश कुहीकर, राधेश्याम म्हात्रे, ज्योती ताई सोमकुंवर , संदीप वानखेड़े , लीला बारापात्रे, मंदा गनवीर ,राजू रामटेके , महेश भाई ,बिरजू धीमान , जावेद भाई शेख, असलम शेख, अज़हर शेख यांच्यासह नागपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात केवळ काँग्रेसच्या नेतृत्वातच प्रगतीशील, स्थिर व मजबूत सरकार मिळू शकते. राहुल गांधी यांचे देशाच्या विकासचे व्हीजनच देश एकसंध ठेवत देशाला खर्‍या अर्थाने जागतिक महासत्ता बनवू शकते, असे मनोगत प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या प्रवेशामुळे नागपूर महानगरात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत झाली आहे.

पिंपरी चिंचवड आय.टी.आय. येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. २५ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यमुना नगर, पिंपरी चिंचवड येथे २७ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिकाऊ उमेदवारी योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे. देशपातळीवरील आय. टी.आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी हा जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

या मेळाव्यास आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवार, एमसीव्हीसी बायफोकल उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी तसेच यापूर्वी उत्तीर्ण झालेले परंतु, शिकाऊ उमेदवारी न मिळालेले प्रशिक्षणार्थी व इतर १२ वी, पदविकाधारक, पदवीधारक व पदव्युत्तर अशा नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार डी. एन. गडदरे तसेच प्राचार्य एस. डी. साबळे यांनी केले आहे.
0000

पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी वाहतूकीत बदल

पुणे, दि. २५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याच्या दृष्टिने २६ सप्टेंबर रोजी तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट व पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचे आदेश पुणे शहर वाहतूक पोलीस उप आयुक्त कार्यालयाच्यावतीन जारी करण्यात आले आहेत.

पुणे शहरातील दांडेकर पूल ते निलायम ब्रीज (सिंहगड मार्गावर), सावरकर पुतळा ते निलायम ब्रीज, न्यू इंग्लिश स्कूल टिळक मार्ग ते विसावा मारुती, सणस पुतळा चौक ते पूरम चौक, स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार, नाथ पै चौक ते अलका चौक, अलका चौक ते भिडे जंक्शन व व्हीव्हीआयपी पार्किंग हे ड्रॉप पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत.

शहरातील भिडे पूल नदी पात्र (पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून), निलायम टॉकीज, पाटील प्लाझा, विमलाबाई गरवारे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, कटारिया हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, मिनर्व्हा पार्किंग मंडई, हरजीवन हॉस्पीटल सावरकर चौक, हमालवाडा पार्किंग व पीएमपीएल मैदान पूरम चौक या ठिकाणच्या जागा पार्किंगसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

समारंभाला येणाऱ्या बसेससाठी डी. पी. रोड कोथरूड व शिवनेरी मार्ग, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

खंडोजीबाबा चौक-टिळक चौक- सेनादत्त पोलीस चौकी- उजवीकडे वळण घेवून म्हात्रे पूल डावीकडे डी.पी. रोड, सावरकर चौकामधून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पुलावरून सरळ राजाराम पूल- उजवीकडे वळण घेवून डी. पी. रोड, सिंहगड मार्गावरून येणाऱ्या बसेस दांडेकर पूल-सावरकर पुतळा-मित्रमंडळ चौक- व्होल्गा चौक-सातारा रोड मार्केट यार्ड जक्शन वरून शिवनेरी रोड असे बसेस पार्किंग मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी ड्रॉप पॉईंटच्या ठिकाणी उतरावे व त्यांची वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहनही पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
0000

विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी स्टेट बँकेचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान

0
  • बिनोदकुमार मिश्रा यांचे प्रतिपादन; स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशनचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात

पुणे, ता. २५: “विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आगामी ५ वर्षे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामध्ये स्टेट बँकेसह बँकिंग क्षेत्राचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान राहील,” असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक (मनुष्यबळ विकास) बिनोदकुमार मिश्रा यांनी केले.

स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशन (मुंबई मेट्रो आणि महाराष्ट्र सर्कल्स) पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मिश्रा बोलत होते. असोसिएशनच्या कार्याची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफीत, तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन झाले. स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस विलास गंधे यांना ‘संस्थापक एल. एन. पाबळकर स्मृती सुवर्णपदक’ प्रदान करून सपत्नीक (वृषाली) सन्मानित करण्यात आले.

महालक्ष्मी लाॅन्समध्ये आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र सर्कलचे मुख्य सरव्यवस्थापक अरविंदकुमार सिंग, उपमहाव्यवस्थापक हरिशकुमार राजपाल, मुंबई मेट्रो सर्कलचे उपमहाव्यवस्थापक अमित जोग, पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक सतीशकुमार, कोल्हापूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक पंकजकुमार बर्नवाल, फेडरेशनचे अध्यक्ष जी. के. गांधी, सचिव डी. के. बसू, असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशपांडे, सचिव सुधीर पवार आदी उपस्थित होते.

बिनोदकुमार मिश्रा पुढे म्हणाले, “देशाच्या आर्थिक प्रगतीत स्टेट बॅंकेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आर्थिक उदारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ९९ साली बँकेचा नफा ८५ कोटींचा होता, तो कित्येक हजार पटींनी वाढला आहे. त्यात या सर्व निवृत्त सहकाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे परिश्रम, समर्पण आणि निष्ठा, यामुळेच बँकेने प्रगतीचे शिखर गाठले आहे. याची बँकेला जाणीव आहे.”

“निवृत्तीनंतर आरोग्य जपण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. निवृत्त सहकाऱ्यांच्या आरोग्यासाठी स्टेट बँक नेहमीच सकारात्मक दृष्टीने विचार करते. पेन्शन योजनेत सातत्याने सुधारणा होत आहेत. विमा योजनेचा अधिक फायदा घ्यावा. ई-फार्मसीचा पर्याय नेण्यावर, निवृत्त सहकार्यासाठी राज्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न व्हावेत,” असेही त्यांनी नमूद केले.

अरविंदकुमार सिंग म्हणाले, “बॅंकेचे निवृत्त सहकारी म्हणजे बँकेचे विस्तारित कुटुंब आहे. असोसिएशनचे कार्य भक्कम विश्वासाच्या पायावर उभे असून, निवृत्त सहकाऱ्यांना सर्वाधिक फायदे मिळवून देणारी बॅंक, असा लौकिक बँकेने मिळवला आहे. निवृत्त सहकाऱ्यांच्या सुविधांचा, मागण्यांचा, अडचणींचा बँकेने सदैव सकारात्मक विचार केला आहे आणि यापुढेही करीत राहील.”

सुधीर पवार यांनी असोसिएशनच्या वतीने काही मागण्यांचा उच्चार केला. निवृत्त सहकाऱ्यांना आरोग्य सुविधांसाठी दवाखाने, रुग्णालये सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. तसेच ई-फार्मसीचा पर्याय उपलब्ध नसल्याने दुर्गम भागांत अनेक समस्या आहेत.

‘बँकेमध्ये दीर्घकाळ सेवा बजावताना अनेक बुजुर्ग अधिकारी भेटले. त्यांच्याकडून अतिशय मोलाच्या गोष्टी शिकता आल्या. बँकेच्या आजच्या अभिमानास्पद वाटचालीत सर्व सहकाऱ्यांच्या योगदानाचा मोठा वाटा आहे,’ असे मनोगत गांधी यांनी मांडले.

पंकजकुमार बर्नवाल म्हणाले, ‘देशात बँकेच्या निवृत्त सहकाऱ्यांची संख्या तब्बल ३ लाखांच्या घरात आहे. पण ते असोसिएशनच्या माध्यमातून असे काम करत आहेत, की ते रिटायर्ड झाले आहेत, पण टायर्ड झालेले नाहीत, असे म्हणावेसे वाटते’.

विलास गंधे यांनी आपल्या मनोगतात पाबळकर यांच्या स्मृतीनिमित्त प्रदान केलेले सुवर्णपदक हा त्यांचाच आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली. डी. के. बसू, अमित जोग यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रदीप देशपांडे यांनी आभार मानले. वसुधा डोंगरे आणि सॅन्ड्रा पोरे यांनी सूत्रसंचालन केले.

येत्या ३ वर्षात भारत तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकुर

0


एमआयटीत डब्ल्यूपीयूत विकसीत भारत अभियान अंतर्गत युवा कनेक्ट कार्यक्रम

पुणे, २५ सप्टेंबर ः ” शिक्षण, आरोग्य, कौशल्य, क्रीडा आणि युवा या घटकांच्या माध्यमातूनच आपला देश विकसित भारत बनणार आहे. ज्या दिवशी भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल त्यावेळेस महाराष्ट्र सुध्दा १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. पुढील तीन वर्षात भारत तिसरी आर्थिक महासत्ता बनेल. असा विश्वास केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी व्यक्त केला.

भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा  मंत्रालयाच्यावतीने आयोजित विकसीत भारत अभियान अंतर्गत युवा कनेक्ट कार्यक्रम कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू च्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयू चे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस व कुलसचिव प्रा. गणेश पोकळे उपस्थित होते.
यावेळी राहुल विश्वनाथ कराड यांनी अनुराग ठाकुर यांचा विशेष सत्कार केला.
अनुराग ठाकुर म्हणाले,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुसार २०४७ मध्ये भारतातील युवक संपूर्ण जगावर राज्य करेल. विकसीत भारत एक नारा नाही तर संकल्प आहे. विकसीत भारतासाठी युवकांचे योगदान महत्वाचे आहे. भविष्यातील भारतासाठी केंद्र सरकारने १०० दिवसांमध्ये  १५ लाख कोटी पेक्षा अधिक प्रकल्पांना मंजूर दिली आहे.”
“देशात स्टार्टअप कार्यक्रमला सर्वाधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. देशातील शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये व त्यांना रोजगार मिळावा म्हणून स्वामीनाथन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी पीएम किसान सन्मान योजना आहे. चंद्रयान ने देशात क्रांती घडविली. विकसित भारतासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सर्वाेत्तम हवे. त्यासाठी यावर्षी ११ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. देशात रोज ९१ किमी रस्ते  बनविले जात आहेत. ७० वर्षात जेवढे एअरपोर्ट बनविण्यात आले नाही, त्यापेक्षा अधिक एअरपोर्ट बनविण्यात आले आहेत. “
सरकार  १ कोटी युवकांना देशातील ५०० टॉप कंपन्यामध्ये इंटर्नशिप देणार आहे. पब्लिक पेपर लिंक होऊ नये म्हणून नवा कडक कायदा, मेडिकल कॉलेज मधील सिटांची संख्या वाढविणे,  ४ कोटी १० लाख युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, महिला सबलीकरणावर भर, टुरिझम वर कार्य, महिलांना लखपती बनविण्याचे कार्य, ४ कोटी घरे बनविणे, १४ कोटी महिलांना गॅस कनेक्शन,   ५३ कोटी लोकांचे बँक अकांउन्ट उघडणे,  प्रत्येक घराघरात वीज . तसेच देशात स्टार्टअप कार्यक्रमला सर्वाधिक प्रोत्साहन देण्यात आले.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले, ” या देशात सर्वात मोठी युवा शक्ती आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी भारत विकासासाठी युवा शक्तीला जोडणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे युवकांसाठी भारतीय छात्र संसद, सोशल लिडरशीप डेव्हल्पमेंट प्रोग्राम व राईड यासारखे अनेक कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. ”
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
विकसीत महाराष्ट्र
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, विकसीत महाराष्ट्र बनविण्यासाठी अटल सेतूची निर्मिती, रोजगार आणि युवकांना अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. भारत जेव्हा ५ ट्रिलियन अर्थ व्यवस्था बनेल तेव्हा महाराष्ट्र १ ट्रिलियन अर्थ व्यवस्था म्हणून उद्यास येईल.”

विरोधी पक्षाच्या खासदारांच्या,आमदारांच्या मतदार संघातील जनता ही सरकारला महत्त्वाची वाटत नाही का ? -खा.सुप्रिया सुळे

पुणे – पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात व कामे मंजूर करण्यात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. आज त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात व कामे मंजूर करण्यात पक्षपातीपणा होतो आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या वेळी त्या बोलताना म्हणाल्या की महाविकास आघाडीच्या एकाही खासदाराला,आमदाराला एका रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही. याउलट महाविकास आघाडीच्या खासदार,आमदारांवर मात्र निधीचा पाऊस पाडण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या खासदार,आमदारांच्या मतदार संघातील जनता ही सरकारला महत्त्वाची वाटत नाही का ? असा प्रश्न खा.सुळे यांनी विचारला आहे.

या आंदोलनात खासदार सुप्रियाताई सुळे,प्रशांत जगताप,आमदार अशोकबापू पवार, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे,भारती शेवाळे, स्वाती पोकळे, मृणाल वाणी, स्वाती ढमाले,महादेव कोंढरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी की,भाजपच्या राजकीय फायद्यासाठी – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – अवघ्या ३२ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ वर्षात वारंवार पुण्यात येतात भूमिपूजन, उदघाटन असे कार्यक्रम करतात, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी येतायत, तेव्हा असं वाटतं की, हा मेट्रो प्रकल्प पुणेकरांच्या सोयीसाठी आहे? की भारतीय जनता पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी? अशी टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केली.

मेट्रोच्या स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज विस्तारित मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या गुरुवारी होत आहे. या अगोदर ५ वेळा महामेट्रोच्या कार्यक्रमासाठी मोदी पुण्यात प्रत्तक्ष आले होते आणि एका टप्प्याचे उदघाटन त्यांनी कलकत्ता येथून आभासी पद्धतीने केले होते. मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनासाठी दिनांक २४ डिसेंबर २०१६ रोजी मोदी पुण्यात आले होते आणि त्या निमित्ताने त्यांनी कृषी महाविद्यालयाच्या मैदानात सभा घेतली होती. डिसेंबर २०१८ मध्ये हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनासाठी ते पुण्यात परत आले होते आणि बालेवाडी स्टेडियमवर त्यांनी सभा घेतली. दिनांक ६ मार्च २०२२ रोजी गरवारे ते वनाज मार्गाचे उदघाटन मोदी यांनी केले आणि कोथरूडमध्ये एमआयटी कॉलेजच्या ग्राउंडवर त्यांनी सभा घेतली.

१ ऑगस्ट २०२३ रोजी फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक या टप्प्याचे उदघाटन त्यांनी केले आणि शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर सभा घेतली. दिनांक ६ मार्च २०२४ रोजी कलकत्याहून त्यांनी आभासी पद्धतीने रुबी हॉल ते रामवाडी या टप्प्याचे उदघाटन आणि पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते निगडी या मार्गाची कोनशिला त्यांनी बसवली आणि आता ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या उदघाटनासाठी उद्या येत आहेत आणि स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सभाही घेणार आहेत. विधानसभा निवडणूका जवळ आल्याने राजकीय फायद्यासाठी सभा घेण्याचा खटाटोप चालला आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

मेट्रो चा पहिला टप्पा सुद्धा अजून पूर्ण झालेला नाही. तरीही मोदी महामेट्रोचा सातवा कार्यक्रम करीत आहेत. भाजप मोठी विकासकामे करीत असल्याचा देखावा निर्माण करून एक प्रकारे पुणेकरांची शुद्ध फसवणूक करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे उदघाटन मोदी यांनी केले. त्यानंणर पाच महिने उलटूनही टर्मिनल कार्यान्वित झाले नाही. त्या पाठोपाठ केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा उदघाटन केले, त्यालाही दोन महिने उलटून गेले. परिस्थिती जैसे थे आहे. ही स्टंटबाजी भाजप का करीत आहे? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

भाजपकडे विकासाची दृष्टी नाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यासाठी हे खटाटोप चालू आहेत. मेट्रोच्या ३२ किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी पंतप्रधानपदावरील व्यक्ती वारंवार पुण्यात येऊन कार्यक्रम करते, हेही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही, असे मोहन जोशी म्हणाले.

पुणेकरांनी अजून किती वर्ष त्रास सहन करायचा
मेट्रो प्रकल्प हा काँग्रेस पक्षाने आणला. प्रकल्पाकरिता आवश्यक त्या मंजुऱ्याही काँग्रेस सरकारने मिळवल्या २०१४ नंतर हा प्रकल्प वेगाने पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे प्रकल्पाला विलंब होत गेला. प्रकल्प ११हजार कोटींचा होता. विलंबामुळे खर्च वाढत गेला. मेट्रो आल्यास वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होईल, या आशाही मावळल्या. वाहतुकीच्या त्रासातून सुटका कधी होईल? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत, असेही मोहन जोशी यांनी सांगितले.

शौचास गेलेल्या मुलास बिबट्याने उचलून नेले:जुन्नरची घटना, ऊसाच्या शेतात आढळला मृतदेह

जुन्नर : मोकळ्या मैदानात शौचास गेलेल्या एका 9 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेऊन ठार मारल्याची भयंकर घटना जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी गावातील ओझर – लेण्याद्री रस्त्यालगत घडली आहे.

आज दिनांक २५-०९-२०२४ रोजी तेजेवाडी ( ता. जुन्नर )गावातील ओझर – लेण्याद्री रस्त्यालगत वीटभट्टी कामगार यांचा मुलगा चि. रुपेश तानाजी जाधव वय- ९ वर्ष हा पहाटे पाच वाजताच्या सुमारास घराच्या मागील बाजूस शौचास बसला असताना लगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्याच्यावर अचानक प्राण घातक हल्ला केला. त्यावेळेस समोरच असलेल्या मुलाच्या आजोबांनी आरडा- ओरडा करून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने आजोबांना न जुमानता मुलाला शेजारच्या उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले. त्यावेळेस गावातील नागरिकांना समजले असता गावकरी त्याठिकाणी येऊन वन विभागाला सदर घटनेची सर्व माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचून मुलाची शोधाशोध सुरु केली, एक ते दिड तासाच्या प्रयत्नानंतर मुलाची बॉडी शेजारच्या उसाच्या शेतात मृत अवस्थेत मिळाली. सदर शोधकार्य विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील शेरकर, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व त्यांचे अधिनस्त 30-35 वनकर्मचारी आणि रेस्कु टीम सदस्य यांनी गावातील आजी- माजी उपसरपंच व इतर जबाबदार नागरिक, तरुण यांच्या मदतीने राबविले. त्यानंतर मुलाची बॉडी शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथे पाठविण्यात आली. घटना स्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री अमोल सातपुते यांनी तात्काळ भेट दिली व पाहणी करून सरपंच व उपसरपंच व वनकर्मचारी यांच्याशी सदर घटने विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. सदर ठिकाणी नरभक्षक बिबट्याला पकडण्या करिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 10 पिंजरे लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. (लगतच्या शिरोली गावहद्दीत 2 पिंजरे यापूर्वीच कार्यरत होते.
काल रात्री लगतच्या परिसरातील विद्युत डीपी जळल्यामुळे व पावसामुळे तेथे विजपुरवठा खंडित होता. त्यामुळे घरामागे असलेल्या अंधारात ही दुर्दैवी घटना घडली.

बचावार्थ गोळी डोक्यात नाही,पायात मारतात, एन्काउंटर कसे म्हणता? कोर्टाने सुनावले..

0

4 अधिकाऱ्यांना 1 आरोपी आवरला नाही,

मुंबई:बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारले की, 4 अधिकाऱ्यांना 1 आरोपी आवरला नाही हे आम्ही कसे मान्य करावे? आरोपीला हातकडी लावली होती. त्यामुळे स्वसंरक्षणासारखी स्थिती असती तर आरोपीच्या पायावर गोळी चालवता आली असती.

कोर्ट म्हणाले – गोळी चालवणारा अधिकारी एपीआय दर्जाचा आहे, तर मग तो प्रत्युत्तरादाखल कोणती कारवाई करायची हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा करू शकत नाही. गोळी मारली पाहिजे हे त्याला माहिती असले पाहिजे.

कोर्ट म्हणाले – आरोपीने ट्रिगर दाबताच 4 जणांना त्याच्यावर सहजपणे नियंत्रण मिळवता आले असते. तो काही फार बलवान माणूस नव्हता. त्यामुळे पोलिसांचा युक्तिवाद मान्य करणे फार अवघड आहे. याला एन्काउंटर म्हणता येत नाही. पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होईल.

मृत अक्षय शिंदेचे वडील अण्णा मारुती शिंदे यांनी आपल्या मुलीच्या एन्काउंटरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. अक्षयच्या वडिलांनी या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे. अक्षय शिंदेचे एन्काउंटर विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेवर 2 चिमुकल्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्याचे सोमवारी सायंकाळी एन्काउंटर करण्यात आले. या घटनेमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी या प्रकरणी न्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षांनी हे एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर अक्षयच्या वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निवडणूक डोळ्यापुढे ठेवून एन्काउंटर

या याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीत अण्णा मारुती शिंदे यांच्या वकिलांनी अक्षय शिंदेची हत्या निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केल्याचा आरोप करत थेट राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एसआयटी चौकशी करण्याचीही मागणी केली. अण्णा शिंदेचे वकील अमित कटारनवरे म्हणाले, मुलाने रिमांड कॉपीत कोणताही त्रास नसल्याचे म्हटले होते. जामिन मिळून शकतो का? यावर त्याने जामीन मिळू शकतो असेही सांगितले. त्याने 500 रुपये मनी ऑर्डर करण्यास सांगितले होते.

माझ्या मुलामध्ये पिस्तूल हिसकावून घेण्याची हिंमत नव्हती. या प्रकरणातील मोठ्या माशांना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आला. महाराष्ट्रात लवकरच निवडणूक होणार असल्यामुळे कदाचित त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी त्याची हत्या करण्यात आली असावी.

‘देवाभाऊचा न्याय’ असे मेसेज फिरत आहेत

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर सोशल मीडियात देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय, असे मेसेज फिरत आहेत. हे असे असेल तर मग न्यायव्यवस्थेची गरजच काय? आरोपीच्या पत्नीने बोईसर येथे दिलेल्या तक्रारीनुसार, तिथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रॅन्चकडे सोपवण्यात आले होते. कोर्टाच्या परवानगीने या प्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलिस कस्टडी ठाणे गुन्हे शाखेला सोपवण्यात आली होती. त्यासाठी त्याला नेले जात होते. त्यावेळी आरोपी शांत बसला होता. त्यावेळी तो आक्रमक होईल अशी कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे नव्हती असे सरकारनेच कोर्टाला सांगितले आहे, अशी बाबही याचिकाकर्त्या पीडित कुटुंबीयांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

त्याच्या शरीरात थोडीही ताकद नव्हती

अक्षय शिंदेंच्या पालकांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, एन्काउंटर होण्यापूर्वी अक्षयने पालकांकडे 500 रुपये मागितले होते. जेणेकरून त्याला कँटिनमधून काही पदार्थ घेऊन खाता येतील. त्यावेळी त्याची परिस्थिती हलाखीची होती. तो पळून जाण्याच्या मानसिकतेत नव्हता किंवा त्याच्या शरीरात तेवढी ताकदही नव्हती की तो पिस्तुल खेचू शकेल.

तळागाळात कायद्याचे राज्य असावे
याचिकाकर्ते पुढे म्हणाले, तळागाळात कायद्याचे राज्य असले पाहिजे. पोलिस कुणाला दोषी ठरवायचे व कुणाला नाही हे ठरवत आहेत. ते अतिशय वाईट उदाहरण सादर करत आहेत. न्यायालये आणि आम्ही येथे का आहोत? पोलिस आणि गृहमंत्री असा न्याय करत आहेत. अशा कृत्यांमुळे पोलिसांना असे गुन्हे करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्याचा समाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चकमकीचे कौतुक करणारे पोस्टर कोर्टाच्या पटलावर सादर केले. त्यावर न्यायमूर्तींनी तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी वकिलांना असे दस्तावेज रेकॉर्डवर न ठेवता गुणवत्तेवर युक्तिवाद करण्याची तंबी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रश्न आणि राज्य सरकारची उत्तरे

राज्य सरकार – या घटनेची सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी 307 व अपघाती मृत्यू अहवाल (ADR) असे 2 एफआयआर दाखल करण्यात आलेत. या दोन्हीची सीआयडी चौकशी करत आहे.

न्यायमूर्ती – वेणेगावकर (राज्य सरकारचे वकील) आम्हाला टाइमलाइनबद्दल सांगा. टाइमलाइनबद्दल काहीही गोपनीय नाही.

न्यायमूर्ती – आरोपीला बोईसरहून बदलापूरला का हलवण्यात येत होते?

राज्य सरकार – कारण, गुन्हा तिकडे बदलापूरला घडला होता.

न्यायमूर्ती – त्यावेळी त्याच्यासोबत कोणते अधिकारी होते? गुन्हे शाखेचे होते की ठाणे पोलिस होते?

राज्य सरकार – होय.

न्यायमूर्ती – आरोपीला पोलिस कोठडी मंजूर होती काय?

राज्य सरकार – होय.

कोर्ट : अक्षय शिंदेला घेऊन जाणारा अधिकारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा होता?राज्य सरकार: होय.कोर्ट: घटना घडली ती जागा रिकामी होती की जवळपास वसाहती आणि घरे होती?

राज्य सरकार : उजव्या बाजूला डोंगर आणि डाव्या बाजूला एक छोटेसे शहर होते. घटनेची माहिती मिळताच अक्षय आणि जखमी पोलिस कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले.

कोर्ट : तुम्ही कोणते हॉस्पिटलमध्ये गेला? ते किती दूर होते?

राज्य सरकार : कळव्याजवळील शिवाजी हॉस्पिटल. हा प्रवास जवळपास 25 मिनिटांचा होता. हे जवळचे हॉस्पिटल होते.

न्यायालय : एवढ्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपीवर कारवाई होत असताना निष्काळजीपणा कसा? SOP काय आहे, त्याला हातकडी घातली होती का?

राज्य सरकार : घातली होती, त्याने पाणी मागितले होते.

कोर्ट : पिस्तुलावरील बोटांचे ठसे घेतले का?

राज्य सरकारः FSL द्वारे फिंगर प्रिंट्स घेण्यात आले.

कोर्ट : तुम्ही म्हणताय की आरोपीने 3 गोळ्या झाडल्या, पोलिस कर्मचाऱ्याला एक गोळी लागली, उरलेल्या 2 कुठे गेल्या? सहसा, स्वसंरक्षणार्थ आपण पायाला गोळी मारतो की हाताला?

राज्य सरकार : अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही, अशी मोकळी प्रतिक्रिया दिली.

कोर्ट : वाहनात 4 अधिकारी होते आणि त्यांना एक आरोपी आवरता आला नाही, असे कसे मानायचे?

राज्य सरकार: ही ऑन द स्पॉट प्रतिक्रिया होती.

न्यायालय : ते टाळता आले नसते का? पोलिसांची गाडी आहे. पायात गोळी मारणे हे स्वसंरक्षणार्थ केले जाते हे सामान्य माणसालाही माहीत आहे का? आरोपीवर गोळी झाडणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय?

राज्य सरकार: ते सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आहेत.

कोर्ट – गोळी चालवणारा अधिकारी एपीआय दर्जाचा आहे, तर मग तो प्रत्युत्तरादाखल कोणती कारवाई करायची हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा करू शकत नाही. गोळी मारली पाहिजे हे त्याला माहिती असले पाहिजे.

राज्य सरकार : निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी काही स्वतंत्र एजन्सींनी तपास केला पाहिजे. राज्य सीआयडी आणि एसीपी याचा तपास करत आहेत.

कोर्ट : तुम्ही पोलिस अधिकाऱ्याचे बोटांचे ठसे घेतले का? सर्व अधिकाऱ्यांचे बोटांचे ठसे घ्या, आम्ही या प्रकरणाकडे प्रत्येक अंगाने पाहत आहोत. फॉरेन्सिक टीमची वाट पाहण्याऐवजी तुम्ही स्वतःच बोटांचे ठसे घ्यायला हवे होते. सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे?

राज्य सरकार : आम्ही वाटेतच सरकारी आणि खासगी इमारतींचे फुटेज सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते.

कोर्ट : आम्हाला आणखी एक गोष्ट हवी आहे. फॉरेन्सिक टीमला हे शोधण्यासाठी विचारा की, आरोपीला दुरून किंवा पॉइंट ब्लँक रेंजवर गोळी घातली गेली. त्याला कुठे गोळी लागली? यात पोलिसांचा सहभाग असला तरी आम्हाला या प्रकरणाचा निष्पक्ष तपास हवा आहे. आम्हाला शंका नाही, पण आम्हाला सत्य हवे आहे. आरोपीच्या वडिलांनी एफआयआर दाखल केला आहे का?

राज्य सरकार : नाही.

न्यायालय : शस्त्रे व्यवस्थित जप्त केली आहेत का?

राज्य सरकार : होय, ते एफएसएलकडे पाठवले आहेत.

अक्षयचे वडील : घटनेच्या एक दिवस आधी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्हाला मृतदेह दफन करायचा आहे, पण त्यासाठी जागा मिळत नाही.

कोर्ट : पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून असे दिसते की, गोळी पॉईंट ब्लँक रेंजमधून चालवण्यात आली होती. आरोपींना काही शस्त्र दिले होते का? त्याने पिस्तूल हिसकावून घेतले असे म्हणत आहात?

राज्य सरकार : शस्त्रे दिली नाहीत. त्याने पिस्तूल हिसकावले नव्हते, ते हाणामारीत पडले होते.

कोर्ट : आरोपीला तुरुंगातून बाहेर काढल्यापासून ते रुग्णालयात मृत घोषित करेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जतन करावे, अशी आमची इच्छा आहे.

अजित दरेकर पुणे लोकसभेच्या मुख्य समन्वयकपदी

पुणे:   अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त केलेल्या राज्यातील लोकसभा निरिक्षकांसोबत कामकाजा करीता महाराष्ट्राचे प्रभारी  रमेश चेन्निथलाजी यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून राज्यातील लोकसभा क्षेत्राकरीता मुख्य समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

     त्याच अनुषंगाने पुणे लोकसेभेच्या मुख्य समन्वयक पदी माजी नगरसेवक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

     पुणे लोकसभा मतदार संघात आठ विधानसभा मतदार संघाची क्षेत्र येतात. आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पुणे लोकसभासाठी माजी खासदार  जगदीश ठाकुर यांची नेमणुक केली आहे.

     या नेमणुकीनंतर श्री. अजित दरेकरांनी महाविकास आघाडीच्या आठही विधानसभेचे उमेदवार निवडणुन आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू असा विश्वास व्‍यक्त केला.

आर्किटेक्ट स्वप्न साकार करणारा सूत्रधार – राजलक्ष्मी अय्यर

स. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

पिंपरी, पुणे (दि. २५ सप्टेंबर २०२४) – आर्किटेक्ट हा लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारा सूत्रधार असतो. वास्तूशास्त्राचे शिक्षण घेताना नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञानातील कौशल्य आत्मसात करा. इतरांशी स्पर्धा करू नका. अभ्यासाचा मनावर ताण येणार नाही याची काळजी घ्या. सकारात्मक विचार करा. पालक, शिक्षक, वर्गमित्र यांच्याशी संवाद साधा. निसर्ग ही एक साखळी असून आपण या साखळीतील एक भाग आहोत हे लक्षात ठेवा. चांगले कार्य करत राहिल्यास तुमच्या आयुष्यात चांगले दिवस, चांगले कार्य हातून घडेल. त्यासाठी उत्तम मार्गदर्शक, अनुभवी गुरूंची आवश्यकता असते. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली काम करा‌. तुम्ही नक्की यशस्वी वास्तूविशारद व्हाल, असे मार्गदर्शन डीप्रूट्स डिझाईन आणि लिव्हिंग प्रॉडक्ट्स प्रा. लि. च्या संस्थापक प्रिन्सिपल आर्किटेक्ट राजलक्ष्मी अय्यर यांनी विद्यार्थ्यांना केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईनच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि कार्यशाळा सोमवारी (२३ सप्टेंबर) निगडी प्राधिकरणातील महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभारी प्राचार्या शिल्पा पाटील, प्रा. शिरीष मोरे, लक्ष्मण तोरगळे, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
शिल्पा पाटील यांनी महाविद्यालयाने आजवर केलेल्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात, वास्तूकलेची माहिती व्हावी यासाठी भारतातील विविध ठिकाणी भेटी दिल्या जातात. यासाठी पीसीईटी संचालक मंडळाचे नेहमी सहकार्य, मार्गदर्शन लाभते असे सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

व्दितीय वर्षाचे विद्यार्थी फाल्गुनी पटेल आणि आदित्य काळे यांनी सुत्रसंचालन केले. आभार आर्किटेक्ट नीलिमा भिडे यांनी मानले.

४०० हून अधिक महिलांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव:पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होणार थाटामाटात


महिलांसाठी भाग्यलक्ष्मी स्पर्धा धार्मिक, सामाजिक उपक्रमांबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
डॉ. मनिषा सोनवणे, सौ. सुषमा खटावकर, कु. मधुरा धामणगावकर यांचा तेजस्विनी पुरस्काराने होणार गौरव

पुणे : पुण्याची गौरवशाली ओळख असलेल्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाला शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी सुरुवात होत असून धार्मिक, सामाजिक उपक्रमांबरोबरच महिलांसाठी भाग्यलक्ष्मी स्पर्धेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित महिला महोत्सव शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. पुणे नवरात्रौ महोत्सवाअंतर्गत साजरा होणारा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा दिमाखदार रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.


यंदा महिला महोत्सवाचे उद्घाटन अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद या उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदा सोहम संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मनिषा अभिजित सोनवणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून तर आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मा. सौ. सुषमा खटावकर, क्रीडापटू मा. मधुरा धामणगावकर यांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून खडतर परिस्थितीत आपले मुलांना चांगली शिकवणूक, विचार देऊन आदर्शवत नागरिक घडविणाऱ्या सुमारे चारशेहून अधिक महिलांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिलांना भरघोस बक्षिसांची मेजवानी असणार आहे.
शनिवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता म्युझिकल तंबोला (हाऊजी) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कन्यापूजन सोहळा संपन्न होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक कन्येस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
सोमवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता श्री विष्णू सहस्रनाम आणि श्री सुक्त पठणाचे आयोजन श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, शिवदर्शन येथे करण्यात आले आहे.
बुधवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सहभागी प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
गुरुवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नामवंत परिक्षक स्पर्धेचे मूल्यांकन करणार आहेत.
शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता महाआरती होणार असून प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
होम मिनिस्टर, मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा आणि महाआरतीच्या दिवशी लकी-ड्रॉ देखील काढला जाणार असून स्पर्धेतील विजेत्या महिलांना रोख बक्षिसांसह एलइडी टिव्ही, ओव्हन, मिक्सर, गॅस शेगडी, वॉशिंग मशीन व इतर गृहपयोगी वस्तू बक्षिसरूपाने दिल्या जाणार आहेत.
या सर्व स्पर्धांसाठी व कन्यापूजन, महाआरतीसाठी येणाऱ्या महिलांना नावनोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी मा. आबा बागुल जनसंपर्क कार्यालय, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे – 9 येथे केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 7972771937/9850903535
महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतून अध्यक्ष मा. आबा बागुल यांनी पुणे नवरात्रौ महोत्सवाअंतर्गत महिला महोत्सव भरविण्यास सुरवात केली आणि त्याची धुरा जयश्री बागुल यांच्याकडे सोपविली. गेल्या 24 वर्षांपासून त्या या महिला महोत्सवाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. दरवर्षी हजारो महिला या महोत्सवात सहभागी होतात.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत मंदिरात होमहवन, महाप्रसाद, कुंकुमार्चन व आरती तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महोत्सवाचा तसेच जागृत देवस्थान असलेल्या लक्ष्मीमातेच्या दर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सुरेन अकोलकरांनी सुहृदांशी जपले मैत्र

पुणे : प्रा. सुरेन अकोलकर हे हरहुन्नरी कलाकार होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, मृदु व प्रेमळ होता. त्यांनी प्रत्येक सुहृदाशी असलेली मैत्री जपली आणि जोपासली. संगीत क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी ते उत्तम मार्गदर्शक होते. सिने संगीतावर मनापासून प्रेम करणाऱ्या सुशिक्षित कलाकारांनी स्थापन केलेल्या मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्राचे सुरेन आकोलकर आधारस्तंभ होते, अशा भावना अकोलकरांच्या सुहृदांनी व्यक्त केल्या.
सुप्रसिद्ध की-बोर्ड प्लेअर, संगीतकार आणि मेलडी मेकर्सचे सहसंस्थापक सुरेन अकोलकर यांना कलाकार, मित्र परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आणि अकोलकर मित्र परिवाराच्या वतीने पूना गेस्ट हाऊस येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अकोलकर यांच्या पत्नी मृणाल अकोलकर, कन्या अस्मिता अकोलकर-बोकील, मुलगा शार्दुल अकोलकर यांच्यासह संगीत क्षेत्रातील गायक-वादक आणि आप्तांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक किशोर सरपोतदार आणि समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले. इकबाल दरबार, विवेक परांजपे, विजय केळकर, अनिल घाटगे, अनुराधा भारती, मंजू मूर्ती आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मेलडी मेकर्सचे सहसंस्थापक प्रा. सुहासचंद्र कुलकर्णी यांनी सुरेश अकोलकरांच्या स्मृतींना उजाळा देताना मेलडी मेकर्सच्या स्थापनेची कहाणी सांगितली. सुरेन अकोलकर हे मेलडी मेकर्सचे हुकमी एक्का होते. त्यांची नजर व वृत्ती लोकांना जिंकून घेणारी होती. आम्ही चौघांनी एकमेकांचा हात धरून मेलडी मेकर्सला नावारुपाला आणले.
अशोककुमार सराफ म्हणाले, प्रा. सुरेन अकोलकर यांनी मळलेली वाट स्वीकारली नाही तर प्रवाहाविरुद्ध जाण्याची त्यांच्यात धमक होती. ते अतिशय गोष्टीवेल्हाळ होते. मेलडी मेकर्सला मोठे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सादरीकरणात नाविन्यता देण्याची त्यांची वृत्ती होती. ते उत्तम कलाकारासह विद्यार्थीप्रिय शिक्षकही होते.
मेलडी मेकर्सचे प्रसिद्ध मेंडोलिनवादक प्रमोदकुमार सराफ म्हणाले, कॉलेज काळापासून असलेली आमची मैत्री शेवटपर्यंत टिकून होती. कारण सुरेन अकोलकरांचा स्वभाव आनंदी व मनमोकळा होता. मेडली मेकर्सच्या जडणघडणीचा प्रवासही त्यांनी अनेक आठवणींद्वारे उलगडला. आम्हा सर्वांमध्ये कौटुंबिक स्नेह होता.
सुप्रसिद्ध निवेदक संदीप पंचवाटकर म्हणाले, प्रा. अकोलकर यांनी आपल्याला पहिला शो करण्याची संधी दिली. त्यांनी अनेक होतकरू कलाकारांनाही मंच उपलब्ध करून दिला.
1967 साली बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या मेलडी मेकर्सच्या शोमधील सुरेश अकोलकर यांनी वाजविलेली शहनाई धून तसेच ‌‘याद ना जाए‌’ या गीताची धून ऐकविण्यात आली.
सुभाष इनामदार, अनिल गोडे, श्याम पोरे, माधव गोखले, संदीप पंचवाटकर, आनंद म्हसवडे, प्रमोद दिवाकर, सुरेश हिवाळे, सिमा शिंदे, गितांजली जेधे यांनी अकोलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मेलडी मेकर्सच्या कार्यक्रमांचे अनेक वर्षे प्रभावीपणे निवेदन करणाऱ्या जयंत जोशी यांनी प्रा. सुरेन अकोलकर यांच्या आठवणी सांगत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.