पिंपरी, पुणे (दि.२५ सप्टेंबर २०२४) एस. बी. पाटील पब्लिक स्कूल आणि चेन्नई येथील जॉय ऑफ गिव्हींग फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या “पूर्णवा हेरिटेज प्रश्नमंजुषा” स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या संघाने उल्लेखनीय यश मिळवले. महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १३ शाळांमधून १०४ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या अनुश्री काटमोरे, वैदेही वर्मा आणि हर्षित पाटील यांच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या लेखी, मौखिक स्पर्धेत एकूण सहा फेऱ्यांमध्ये इतिहास, पौराणिक कथा, नाणी, प्राचीन साहित्य, क्रीडा स्पर्धा, शिक्षण, खगोलशास्त्र ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश होता.
विजेत्या स्पर्धकांना डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या कार्यकारी संचालक डॉ. रोहिणी पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, उपक्रम प्रभारी स्वालेहा मुजावर, शिक्षिका प्रविणा मोरे, अंजली गुगळे, प्रशासन अधिकारी मनीष ढेकळे आदी उपस्थित होते.