पुणे : प्रा. सुरेन अकोलकर हे हरहुन्नरी कलाकार होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, मृदु व प्रेमळ होता. त्यांनी प्रत्येक सुहृदाशी असलेली मैत्री जपली आणि जोपासली. संगीत क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी ते उत्तम मार्गदर्शक होते. सिने संगीतावर मनापासून प्रेम करणाऱ्या सुशिक्षित कलाकारांनी स्थापन केलेल्या मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्राचे सुरेन आकोलकर आधारस्तंभ होते, अशा भावना अकोलकरांच्या सुहृदांनी व्यक्त केल्या.
सुप्रसिद्ध की-बोर्ड प्लेअर, संगीतकार आणि मेलडी मेकर्सचे सहसंस्थापक सुरेन अकोलकर यांना कलाकार, मित्र परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आणि अकोलकर मित्र परिवाराच्या वतीने पूना गेस्ट हाऊस येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अकोलकर यांच्या पत्नी मृणाल अकोलकर, कन्या अस्मिता अकोलकर-बोकील, मुलगा शार्दुल अकोलकर यांच्यासह संगीत क्षेत्रातील गायक-वादक आणि आप्तांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक किशोर सरपोतदार आणि समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले. इकबाल दरबार, विवेक परांजपे, विजय केळकर, अनिल घाटगे, अनुराधा भारती, मंजू मूर्ती आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मेलडी मेकर्सचे सहसंस्थापक प्रा. सुहासचंद्र कुलकर्णी यांनी सुरेश अकोलकरांच्या स्मृतींना उजाळा देताना मेलडी मेकर्सच्या स्थापनेची कहाणी सांगितली. सुरेन अकोलकर हे मेलडी मेकर्सचे हुकमी एक्का होते. त्यांची नजर व वृत्ती लोकांना जिंकून घेणारी होती. आम्ही चौघांनी एकमेकांचा हात धरून मेलडी मेकर्सला नावारुपाला आणले.
अशोककुमार सराफ म्हणाले, प्रा. सुरेन अकोलकर यांनी मळलेली वाट स्वीकारली नाही तर प्रवाहाविरुद्ध जाण्याची त्यांच्यात धमक होती. ते अतिशय गोष्टीवेल्हाळ होते. मेलडी मेकर्सला मोठे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सादरीकरणात नाविन्यता देण्याची त्यांची वृत्ती होती. ते उत्तम कलाकारासह विद्यार्थीप्रिय शिक्षकही होते.
मेलडी मेकर्सचे प्रसिद्ध मेंडोलिनवादक प्रमोदकुमार सराफ म्हणाले, कॉलेज काळापासून असलेली आमची मैत्री शेवटपर्यंत टिकून होती. कारण सुरेन अकोलकरांचा स्वभाव आनंदी व मनमोकळा होता. मेडली मेकर्सच्या जडणघडणीचा प्रवासही त्यांनी अनेक आठवणींद्वारे उलगडला. आम्हा सर्वांमध्ये कौटुंबिक स्नेह होता.
सुप्रसिद्ध निवेदक संदीप पंचवाटकर म्हणाले, प्रा. अकोलकर यांनी आपल्याला पहिला शो करण्याची संधी दिली. त्यांनी अनेक होतकरू कलाकारांनाही मंच उपलब्ध करून दिला.
1967 साली बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या मेलडी मेकर्सच्या शोमधील सुरेश अकोलकर यांनी वाजविलेली शहनाई धून तसेच ‘याद ना जाए’ या गीताची धून ऐकविण्यात आली.
सुभाष इनामदार, अनिल गोडे, श्याम पोरे, माधव गोखले, संदीप पंचवाटकर, आनंद म्हसवडे, प्रमोद दिवाकर, सुरेश हिवाळे, सिमा शिंदे, गितांजली जेधे यांनी अकोलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मेलडी मेकर्सच्या कार्यक्रमांचे अनेक वर्षे प्रभावीपणे निवेदन करणाऱ्या जयंत जोशी यांनी प्रा. सुरेन अकोलकर यांच्या आठवणी सांगत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.