पुणे- हडपसर मतदार संघावर ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिल्या प्राधान्य क्रमांकाने दावा असल्याचे नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केल्याने हडपसर मध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे मानले जाते आहे. या मतदार संघात अजितदादा गटाचे चेतन तुपे विद्यमान आमदार असताना त्यांना शिंदे गटाच्या नाना भानगिरे यांच्यासाठी हा मतदार संघ सोडवा लागेल असे बोलले जाते.यातच एकनाथ शिंदे VS अजितदादा असे येथे उमेदवारीसाठी चित्र असताना दुसरीकडे महादेव बाबरांच्या साठी ठाकरेंच्या शिवसेनेने शड्डू ठोकलेले दिसत आहेत आणि शरद पवार गटाचे प्रशांत जगताप तर कधीच बाशिंग बांधून फिरू लागलेले आहेत म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोत येथे उमेदवारी साठी चुरस निर्माण झाल्याचे दिसते आहे.मात्र शिंदे गटाच्या नाना भानगिरे यांचे पारडे उमेदवारीसाठी येथून जड असल्याचे मानले जाते.
येत्या काही दिवसातच विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेला विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, जागावाटप याबाबत बैठकाही सुरु आहेत.
पुण्यातही विधानसभेला जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचे आघाडी नेत्यांच्या बोलण्यातून दिसू लागले आहे. पुण्यात शरद पवार गटाने शहरातील आठही जागा लढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीत तीन मतदारसंघ मागितल्याचे सांगितले आहे.
वडगाव शेरी शिवसेनेचाच विधानसभा मतदारसंघ आहे, त्याशिवाय हडपसर व कोथरूड असे तीन मतदारसंघ आम्ही महाविकास आघाडीत शिवसेनेने (उद्धव ठाकरे) मागितले आहेत अशी माहिती पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली. राज्यात आम्हाला बीड, माजलगाव, अमरावतीही पाहिजे आहे, मात्र आघाडीचे वरिष्ठ नेते याबाबत अंतीम निर्णय घेतील असंही त्या म्हणाल्या आहेत
मी शिवसेनेची पदाधिकारी आहे. पुणे माझाच जिल्हा आहे. वडगाव शेरीत मी रहायलाच आहे. माझे तिथे घर आहे. माझी स्वत:ची तिथे ६३ हजार मते आहेत, याचा अर्थ मी माझ्यासाठी म्हणून तो मतदारसंघ मागते आहे असा नाही. मला पक्षाने जिल्ह्यातील मतदारसंघांचा अहवाल मागितला होता. तो मी दिला. त्यात हडपसर, कोथरूड बरोबरच वडगाव शेरीची मागणी केली आहे असे अंधारे यांनी सांगितले. कोथरूड हा ठाकरेंच्या शिवसेनेलाच दिला जाईल यात कोणाला शंका वाटत नाही असे चित्र आहे पण वडगाव शेरीत आताच शरद पवार गटात माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि त्यांचे पुत्र तसेच भैयासाहेब जाधव यांनी प्रवेश केला आहे.त्यामुळे शरद पवार गट येथून दावा करेल तर शिवसेनेच्या संजय भोसले यांच्या साठी किंवा खुद्द सुषमा अंधारे यांच्या साठी ठाकरे गट येथून दावा करेल असे दिसते आहे. एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारी साठी आघाडीतून सध्या फक्त कोथरूड वर समाधान सहजगत्या मिळेल असे दिसते आहे तर हडपसर आणि वडगाव शेरी साठी मात्र चर्चेच्या फेऱ्या वर फेऱ्या झडत राहतील असे सांगितले जाते.