पुणे : सतारीचे झंकार आणि व्हायोलीनची आर्तता, यांच्या स्वरसंगमाचा अनुभव गुरू-शिष्य परंपरेच्या माध्यमातून रसिकांनी घेतला. बुजुर्ग कलाकारांचे अनुभवसिद्ध वादन आणि युवा साधकांचे आश्वासक सादरीकरण याचे दर्शनही अनुभवले.
निमित्त होते, रंजनी आयोजित ‘परंपरा – संगीत साधनेचा अखंड प्रवास’ या शीर्षकांतर्गत आयोजित सतार – व्हायोलीनच्या सहवादन मैफिलीचे. एस. एम. जोशी सभागृहात आयोजित या अनोख्या मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मैफिलीला ज्येष्ठ सतारवादक आणि गुरू उस्ताद उस्मान खां, व्हायोलीन वादिका चारुशीला गोसावी तसेच प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री भाग्यश्री देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. उस्ताद उस्मान खां यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार त्यांच्या शिष्या जया जोग यांनी केला.
मैफलीचा प्रारंभ ज्येष्ठ सतारवादक आणि गुरू जया जोग यांच्या शिष्या प्रज्ञा मेने आणि ज्येष्ठ व्हायोलीनवादक आणि गुरू नीलिमा राडकर यांच्या शिष्या दीपा कुडतरकर यांच्या एकत्रित वादनाने झाला. राग बागेश्रीमध्ये आलाप, जोड, झाला या क्रमाने या दोन्ही शिष्यांनी उत्तम तयारीचे दर्शन घडवले. मध्यलय त्रिताल आणि द्रुत त्रितालातील त्यांच्या वादनाला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.
त्यानंतर गुरू जया जोग आणि त्यांच्या शिष्या प्रज्ञा मेने यांचे सहवादन रंगले. त्यांनी राग यमन मध्ये एकताल आणि त्रितालातील रचना सादर केल्या. गुरू जया जोग यांना यमनमधील ही रचना त्यांचे गुरू आणि प्रख्यात सतारवादक उस्ताद उस्मान खां यांच्याकडून मिळाली. त्या रचनेला जोडून जया जोग यांनी स्वतः त्रितालातील रचना सिद्ध केली. गुरू-शिष्य परंपरेचा हा प्रवाह अखंडित वाहता राहावा, ही भावना यामागे असल्याचे मनोगत जया जोग यांनी मांडले. मैफिलीचे शीर्षकही परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारे असल्याने या रचनेचे औचित्य आहे, असे त्या म्हणाल्या.
त्यानंतर गुरू डॉ. नीलिमा राडकर आणि त्यांच्या शिष्या दीपा कुडतरकर यांचे व्हायोलीन सहवादन झाले. त्यांनी राग दुर्गा सादर केला. झपताल आणि त्यानंतर त्रितालातील रचनांचे सादरीकरण करत त्यांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली.
मैफिलीची सांगता वैशिष्ट्यपूर्ण होती. गुरू जया जोग आणि गुरू डॉ. नीलिमा राडकर यांनी सतार आणि व्हायोलीनचे रंगतदार सहवादनाने मैफिलीचा कळसाध्याय गाठला. भैरवी धूनचे सादरीकरण करताना त्यांनी सादर केलेल्या रागमालेमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. मालकंस, मिया की तोडी, चंद्रकंस तसेच अहिरभैरव, बसंत, बैरागी अशा रागांचे दर्शन घडवणारी ही रागमाला वैशिष्ट्यपूर्ण होती. या सर्व कलाकारांना भावना टिकले तसेच अक्षय पाटणकर यांनी तबल्याची समर्पक साथ केली. रंजना काळे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. नीलिमा राडकर, जया जोग
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801