Home Blog Page 67

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

पुणे, दि. १: महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याबाबतचे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले , रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, आमदार उमा खापरे, सुनील शेळके, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, एमएसआरडीसीचे अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डने या बोगद्याची रुंदी जगात सर्वाधिक २२.३३ मीटर अशी जाहीर केली. तत्पूर्वी एमएसआरडीसीचे अधिकारी आणि नवयुगाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांना या बोगद्याच्या कामाबाबतची तांत्रिक माहिती दिली.

जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना

नागरिकांना १५ मे अखेर स्व-गणना करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

पुणे, दि. १ : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे; या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईनपद्धतीने ‘स्व-गणना’ पूर्ण केली आहे.

यावेळी जनगणनेच्या अनुषंगाने देशाच्या नियोजनासाठी लागणारी माहिती अचूक भरुया, जनकल्याणासाठी असलेली ही जनगणना पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिला टप्पा ‘स्व-गणना’ १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून त्यानंतर
१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष घरगणना केली जाणार आहे. यामध्ये प्रगणक गृहभेटी देणार असून जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करणार असून यावेळी प्रगणकास सहकार्य करावे.

याकरीता केंद्र शासनाने जनगणना २०२७ करिता https://se.census.gov.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी या संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपल्या कुटुंबाशी निगडित अचूक माहिती भरावी, माहिती भरल्यानंतर एकदा पुन्हा खात्री करूनच ऑनलाईन दाखल करावी, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

यावेळी पुणे शहर तहसीलदार स्मिता माने, पुणे छावणी परिषदेचे सहायक जनगणना अधिकारी शकील मुजावर आदी उपस्थित होते.

पुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

जनगणना २०२७ प्रक्रिया १ मे पासून सुरू; नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

▪️विशेष सन्मानचीन्ह प्राप्त पोलीसांचा केला गौरव

पुणे, दि. १ : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला आज, १ मे २०२६ पासून राज्यभर प्रारंभ होत असून नागरिकांनी या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगर विकास व परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी केले. पोलीस कवायत मैदान येथे त्यांनी महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्या प्रसंगी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

समारंभाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार भिमराव तापकीर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम,पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत पीएमआरडीएचे आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा उप निवडणूक अधिकारी मिनल कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक व ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त, तसेच संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘सामाजिक समता व समरसता वर्ष’ साजरे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांची भूमी असल्याचे नमूद करत त्यांनी शौर्य, त्याग, समता आणि प्रगती या मूल्यांवर राज्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सीमांवर कार्यरत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

जनगणना २०२७ संदर्भात त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना केली जाणार असून १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील असे सांगून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.

समाजाच्या प्रगतीत शेतकरी, कामगार, शिक्षक आणि युवक यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून सामाजिक समता, बंधुता आणि न्याय यांची जोपासना करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांचा सन्मान, बालकांचे संरक्षण आणि वंचित घटकांचा विकास हीच खरी प्रगती असल्याचे त्या म्हणाल्या. पर्यावरण संवर्धनासाठी पाणी, वृक्ष आणि मातीचे जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. शेवटी, स्वच्छ, सुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन करत त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

२०२५ चे विशेष सन्मानचीन्ह प्राप्त पोलीसांचा केला गौरव

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी पुढील पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह – २०२५ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
अपर पोलीस आयुक्त श्री. बसवराज तेली, सपोआ श्री. विशाल शामराव हिरे, पोलीस उप अधीक्षक श्री. चंद्रकांत महादेव कुटे, पोनि-पोउप अधीक्षक श्रीमती जयश्री रामचंद्र चिवडशेट्टी, पोलीस निरीक्षक श्रीमती. माधुरी चंद्रकांत भोसले, सपोनि श्री. प्रविण शिवहर स्वामी, सहा. पोउपनि श्री. कुलदिप दत्तात्रय संकपाळ, श्री. सचिन नाथाराम लोंखडे, पोउपनि श्री. जगदेवप्पा इरन्ना पाटील, श्री. दत्तात्रय चंद्रकांत पवार, मसहापोउपनि श्रीमती वजया शिवाजी खुटवड, सहापोउपनि श्री. प्रदिप मनोहर भावसार, श्री. राजेंद्र आक्काप्पा कोणकेरी, श्री. दिपक अर्जुन महाजन, श्री. विनोद श्यामराव भोकरे, श्री. सुहास मुरलीधर पवार, श्री. महेश जानकु बनकर, श्रीमती दिपाली सुदर्शन कहडणे, श्री. रुस्तम इसाक मुजावर, श्री. प्रविण ज्ञानदेव शिंदे, श्री. रघुनाथ यशवंत वाघमारे, श्री. रोहीदास हरि मुसळे, श्री. अनिल कृष्णा दांगट, श्री. सोमनाथ दिगंबर वाघचौडे, श्री. समाधान भरत बिवितकर, श्री. तुकाराम पंढरीनाथ भेगडे, श्री. सुनिल भानुदास जगताप, म.पो.हवा श्रीमती वैशाली योगेंद्र जाधव, श्रीमती शुभदा राजेश पोतनीस, पोहवा श्री. राहुल दत्तात्रय पवार, श्री. आश्रुबा चांगदेव मोराळे, श्री. सलीम इन्नुस तांबोळी, श्री. रामदास निवृत्ती गोणते, श्री. निलेश सोपान परवते, श्री. दयाराम दादाराव शेगर, श्री. शंकर बाबुराव कुंभार, श्री. सुजित महादेव पवार, श्री. अमोल परशुराम पिलाणे, श्री. सदोबा आप्पाराव भोजराव, श्री. रुपेश शिवाजी पवार, म.पो.हवा श्रीमती सलोनी परमेश्वर फुंदे, पोहवा श्री. सुनिल फकीरप्पा बनसोडे, श्री. महेश बबन भुजबळ, श्री. मनोज महादेव पाटील, श्री. संतोष पोपट शिंदे, इब्राहिम अरभावी, मपोशि श्रीमती यामिणी उमेशराव ठाकरे, श्रीमती प्रगती रामहरी ठोबरे, श्रीमती दिव्या प्रभाकर कुंभार

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

0

पुणे– महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड यु एन आय ग्लोबल युनियनद्वारे श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या असंघटित कामगारांच्या परिषदेसाठी करण्यात आली आहे. ही परिषद 27, 28, आणि 29 तारखेला कोलंबो येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या परिषदेसाठी भारत, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान येथील विविध कामगार प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. परिषदेमध्ये आरोग्य विभागात कार्यरत असंघटित कामगारांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून, विविध देशांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या कायद्याविषयी सखोल माहिती देण्यात येईल.

सुनील शिंदे यांची परिषदेसाठी निवड ही त्यांच्या कामगार चळवळीतल्या योगदान आणि कामकाजातील प्रभावी नेतृत्वामुळे झाली आहे. या परिषदेमध्ये सुनील शिंदे विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडतील आणि असंघटित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण कसे केले जाऊ शकते, यावर चर्चा करणार आहेत.

या परिषदेमध्ये असंघटित कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध योजना, धोरणे आणि जागरूकता निर्माण करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल.

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई,

महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राज्यातील जनगणना 2027 च्या प्रारंभाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. भारत सरकार आगामी जनगणना 2027 साठी व्यापक तयारी करत आहे. ही भारताची 16 वी जनगणना असून, जनगणना कायदा 1948 च्या तरतुदींनुसार राबवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा  राष्ट्रीय उपक्रम आहे.

महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी राज्यातील जनगणनेमधील सर्व वैयक्तिक प्रतिसादकर्त्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी हे महत्त्वाचे कार्य आपली जबाबदारी मानून त्यामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे. “16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जेव्हा प्रगणक तुमच्या घरी भेट देतील, तेव्हा तुम्ही त्यांना संपूर्ण आणि अचूक माहिती द्यावी. तसेच, तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही याबाबत अद्ययावत माहिती घेण्यासाठी आणि आपली गणना करून घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे”, त्या म्हणाल्या. प्रभावी धोरण निर्मितीला पूरक ठरणारा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणारा विश्वसनीय डेटा निर्माण करण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे, असे डॉ. डांगे यांनी नमूद केले आणि प्रतिसादकर्त्यांना या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार, जनगणना 2027 मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर केला जाईल, ज्यामुळे माहितीचे संकलन आणि प्रसार यांची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि वेळेवर पूर्णत्व वाढण्याची अपेक्षा आहे. अचूकता आणि गती वाढण्याच्या दृष्टीने डिजिटल माध्यमांद्वारे आयोजित केली जाणारी ही देशातील पहिली जनगणना आहे. ती प्रत्यक्ष माहिती संकलनासाठी मोबाईल ॲप्लिकेशन्सचा वापर करणाऱ्या डिजिटल चौकटीकडे होणारे महत्त्वपूर्ण संक्रमण दर्शवते. यासाठी सर्वसमावेशक देखरेख, पर्यवेक्षण आणि माहिती व्यवस्थापनासाठी जनगणना देखरेख व व्यवस्थापन प्रणाली (सीएमएमएस) वेब पोर्टल सक्षम करण्यात आले आहे. ऑनलाइन स्व-गणना करण्याचा पर्याय देखील सुरू करण्यात आला असून यामुळे व्यक्तींना आपल्या कुटुंबासाठी जनगणनेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे भरणे, पूर्ण करणे आणि सादर करणे शक्य होईल.

महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याचा म्हणजेच घरांची यादी आणि गृहगणना (एच एल ओ) यांचा कालावधी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे:

स्व-गणना1 मे ते 15 मे, 2026
घरांची यादी प्रक्रिया16 मे ते 14 जून, 2026

स्व-गणना ऐच्छिक आहे आणि ती केली असो वा नसो, माहिती गोळा करण्यासाठी आणि नोंदवण्यासाठी प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान राज्यातील (महाराष्ट्र) प्रत्येक घराला भेट देतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र राज्यासाठी स्व-गणना (एस ई) पोर्टल 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान सक्रिय राहील. कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे 15-20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो. यशस्वीरित्या माहिती सादर केल्यावर एक स्व-गणना आयडी (एसई आयडी) तयार केला जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवला जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही. 

राज्यात जनगणना करण्यासाठी 2.64 लाख क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसह त्यांना सर्वंकष प्रशिक्षण देण्याचे काम सुरू 

घरांची यादीकरणाचे काम पार पाडण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रात प्रगणक आणि पर्यवेक्षकांसह सुमारे 2.64 लाख क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना (10% राखीव कर्मचाऱ्यासह) प्रशिक्षण देऊन त्यांना या कामासाठी तैनात करण्यात येत आहे. या कामासाठी, भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांच्या कार्यालयाने आखून दिलेली संरचित पाच-स्तरीय प्रशिक्षण प्रणाली लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रशिक्षकांना विषय तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी पुढे 9 ते 17 मार्च 2026 या कालावधीत पुण्यातील यशदा येथे महाराष्ट्रातील 141 प्रमुख प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. या प्रमुख प्रशिक्षकांनी त्यानंतर 6 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान जिल्हा आणि वैधानिक शहरी मुख्यालयांमधील 3,850 क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. अंतिम टप्प्यात, क्षेत्रीय प्रशिक्षकांकडून 23 एप्रिल ते 8 मे 2026 या कालावधीत एचएलओ (HLO) मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून क्षेत्रीय कार्ये पार पाडणार असलेल्या सुमारे 2.64 लाख प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे

भक्कम त्रिस्तरीय सुरक्षा प्रणालीमुळे जनगणनेच्या माहितीचे संकलन आणि त्याची साठवण करण्याचे काम सुरक्षितपणे होईल हे सुनिश्चित 

मजबूत डेटा सुरक्षा उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आला  असून त्यामध्ये मोबाईल उपकरणे, डेटा ट्रान्समिशन आणि बहु-घटक प्रमाणीकरणाद्वारे सर्व्हर-पातळीवर  संरक्षणासह त्रिस्तरीय सुरक्षा प्रणालीचा समावेश आहे. पासवर्ड आणि ओटीपी-आधारित प्रमाणीकरणाचा वापर करून केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांपुरताच प्रवेश मर्यादित असून सर्व डेटा एनक्रिप्टेड स्वरूपात संग्रहित केला जाईल. स्व-गणनेचा पर्याय निवडणाऱ्या नागरिकांना https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलचा वापर करून संवादांची सत्यता पडताळून पाहण्याची सूचना  करण्यात आली आहे.

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

  • बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी धेंडे यांच्या वतीने आयोजन

पुणे । प्रतिनिधी

सोनियाची उगवली सकाळ, जन्मास आले भीमराव..छाती ठोकू हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही..साऱ्या विश्वाला बुद्ध हवा..लाखात एकच खरा भीमराव कोहिनूर हिरा यासह भीमगीतांचा सुरेख कार्यक्रम येरवडा परिसरात रंगला.

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येरवडा परिसरातील समतानगर येथे आयोजित करण्यात आलेली ‘धम्म संध्या’ कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला. पुणे महापालिका प्रभाग क्रमांक दोन मधील समतानगर येथील लुंबिनी उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाला पूजनीय भिक्खू संघ, श्रामणेर तसेच वडगावशेरी मतदार संघातील विविध मान्यवर, सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी धेंडे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली यश फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते.

‘भीमगीतांची सुरेल संध्या’ या संकल्पनेतून साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात गौतम बुद्ध जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधत प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात आमदार बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी आमदार सुनील टिंगरे, नगरसेवक सुहास टिंगरे, नगरसेविका नंदिनी धेंडे, हर्षद जाधव, वृषाली रणधीर, किशोर भोंडे आदी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

बाट माझी बघतोय रिक्षावाला’, ‘ही पोळी साजूक तुपातली’, ‘ओ नाखवा मला बोटीन फिरवाल का’ या गाण्याची फेम पार्श्वगायिका रेश्मा सोनावणे यांनी ‘गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच ‘सुर नवा ध्यास नवा’ आणि ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमांमधून परिचित असलेले पार्श्वगायक रविंद्र खोमणे यांनीही आपल्या गायनाने वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे सादरीकरण चंद्रकांत चव्हाण यांनी केले.

या कार्यक्रमासाठी त्रिरत्न संघ, भदंत आनंद मंडळ, तक्षशिला महिला मंडळ, धम्म ज्योती संघटना, सुजाता महिला मंडळ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कृती समिती यांचे सहकार्य लाभले.

बाबासाहेब होते म्हणून सामाजिक चळवळी उभ्या राहत आहेत. त्यांचे कार्य भीम गीतातून पुढे आणले जात आहे हे महत्वाचे. बाबासाहेबांनी संविधान दिल्याने देश गुण्या गोविंदाने जगत आहे. या प्रभागात होणाऱ्या त्रिरत्न विहाराला आणखीन आवश्यक ती मदत करून हे विहार ऐतिहासिक बनवू.

  • बापूसाहेब पठारे, आमदार, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ.

गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो. प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्व जाती धर्मातील लोक राहतात. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या लोकांशी हितगुज सध्या येत हे महत्वाचे आहे. असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.

  • सुनील टिंगरे, माजी आमदार तथा अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस.

प्रभाग क्रमांक दोनला आंबेडकरी चळवळीचा मोठा वारसा आहे. ही चळवळ सामाजिक क्रांतीला जन्म घालते. सर्व जण सन्मानाने उभे आहेत त्याचे श्रेय बाबासाहेबांना जाते. त्यामुळे थोर पुरुषांचे

  • वृषाली रणधीर, प्राचार्या, वाडिया महाविद्यालय.

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि किशोर कुलकर्णी यांच्यात स्पर्धा

पुणे :
पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे यांच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मिळवत स्वाभिमान, एकता आणि विश्वासाचा ठसा उमटवला आहे. या निवडणुकीत तब्बल ९२.४६% इतके विक्रमी मतदान झाले असून, सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे.

हा विजय केवळ उमेदवारांचा नसून, तो सभासदांच्या अढळ विश्वासाचा, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा आणि एकतेच्या बळाचा आहे. परिवर्तन पॅनलने विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, पतसंस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प केला आहे.

निवडणुकीनंतर चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि किशोर कुलकर्णी यांची नावे पुढे आली असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, परिवर्तन पॅनलवर विश्वास दाखवून भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल सर्व मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

परिवर्तन पॅनलच्या वतीने सांगण्यात आले की, “सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि पतसंस्थेच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नव्या जोमाने आणि पारदर्शकतेने काम करत सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरू.

पुणे महापालिकेत झेंडावंदन,परेड , पुष्पांजली वाहून महाराष्ट्र दिन संपन्न.

पुणे-

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार दि. ०१ मे २०२६ रोजी महापौर, मंजुषा दीपक नागपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.महापौर, मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुणे महानगरपालिके च्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच ध्वजारोहणा पूर्वी राष्ट्रीयगीत (वंदे मातरम) म्हणण्यात आले. सकाळी ७.१० वाजता महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळेस राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणण्यात आले.
या प्रसंगी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर व अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, नगरसचिव योगिता भोसले आणि विविध विभागांचे खातेप्रमुख, उपायुक्त,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?

पुणे-

मराठी भाषा आणि हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत भाषिक अभिमानावर जोरदार भूमिका मांडली.भाषेचा अभिमान काय असतो, हे उदाहरणांसह स्पष्ट करत त्यांनी मराठी माणसांनी अधिक ठामपणे उभं राहण्याची गरज व्यक्त केली.

राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तिच्या प्राचीनतेमुळे मिळाला आहे, तर हिंदी ही तुलनेने नव्या काळातील भाषा आहे. “आपण कोणत्या वादात अडकलो आहोत? हिंदी लादण्याच्या,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाषिक अस्मितेबाबत बोलताना त्यांनी बंगालमधील एका व्हिडिओचा दाखला देत, स्थानिक लोक आपल्या भाषेबाबत किती ठाम असतात हे अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचं कौतुक करताना सांगितलं की, “वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमात सचिन प्रथम मराठीत बोलतो, ही अभिमानाची बाब आहे. तो भारतरत्न असला तरी आपल्या मुळांचा विसर पडू देत नाही.”

राज ठाकरे यांनी संत परंपरेचा उल्लेख करत महाराष्ट्र घडवण्यात तिचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. मात्र, आज आपण त्या परंपरेचा विसर पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “महत्त्वाच्या व्यक्तींना आपण सोयीस्करपणे विसरत आहोत,” असेही ते म्हणाले.

भाषिक व सामाजिक प्रश्नांवर बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांवरही टीका केली. “आज कोणताही विषय राजकारणाशिवाय मांडता येत नाही. महाराष्ट्राचं वाटोळं झालं, त्याला येथील राजकारणीच जबाबदार आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याबाहेरील उदाहरण देताना त्यांनी रविंद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांच्या साहित्याचा संदर्भ दिला. “महाराष्ट्रात काम करत असलेले बंगाली युवकही रविंद्रसंगीत विसरत नाहीत, पण आपल्याकडे लेखक आणि कवींनाही जातीतून पाहिलं जातं,” अशी टीका त्यांनी केली.

तसेच, राज्यात मराठी भाषेचा वापर सक्तीने व्हावा, यावरही त्यांनी भर दिला. “महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, असं सांगण्याची हिंमत कशी होते? इतर राज्यांमध्ये स्थानिक भाषेबाबत अशी परिस्थिती सहन केली जात नाही,” असे ते म्हणाले. मराठी भाषा टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत सर्व स्तरांवर वापरली गेली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

एअर इंडिया आता दररोज 100 विमानांच्या फेऱ्या कमी करणार

इंधनाच्या वाढत्या किमती आणि सुटे भाग (स्पेयर पार्ट्स) यांच्या कमतरतेमुळे निर्णय

नवी दिल्ली- एअर इंडिया आपल्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांमध्ये सुमारे 10% कपात करणार आहे. टाटा समूहाची ही एअरलाइन ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या हिवाळी वेळापत्रकानुसार दररोज सुमारे 100 उड्डाणे बंद करेल. सध्या एअरलाइन दररोज सुमारे 900 उड्डाणे चालवते.एअरलाइनने हे मोठे पाऊल जेट इंधन (ATF) च्या वाढत्या किमतींमुळे आणि आपल्या जुन्या ताफ्यासाठी सुट्या भागांच्या कमतरतेमुळे उचलले आहे.
एअर इंडियाकडे सध्या सुमारे 30 वाइड-बॉडी विमाने सुट्या भागांच्या आणि इंजिनच्या कमतरतेमुळे जमिनीवर थांबलेली (ग्राउंडेड) आहेत.
जरी एअरलाइनने बोइंग आणि एअरबसला नवीन विमानांसाठी मोठ्या ऑर्डर्स दिल्या असल्या तरी, त्यांच्या वितरणाला (डिलिव्हरीला) अजून वेळ लागेल.
तोपर्यंत कंपनी उपलब्ध विमानांसहच आपले वेळापत्रक व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
सूत्रांनुसार, एअरलाइनने भारताला उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियाशी जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमानांची वारंवारता (फ्रीक्वेन्सी) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सॅन फ्रान्सिस्को, शिकागो, लंडन आणि सिडनी: या शहरांसाठी साप्ताहिक उड्डाणांमध्ये कपात केली जाईल.
उदाहरणार्थ: जिथे सध्या दररोज सेवा आहे, तिथे आता आठवड्यातून फक्त चार किंवा पाच दिवसच विमाने उडू शकतील.
देशांतर्गत नेटवर्कमध्येही बदल होणार

देशांतर्गत मार्गांवरही एअर इंडिया आपली वारंवारता कमी करेल. कंपनीची योजना मेट्रो-टू-मेट्रो मार्गांवरच्या अशा विमानांची संख्या कमी करण्याची आहे जिथे सध्या अनेक दररोजच्या सेवा सुरू आहेत.

यामुळे एअरलाइनला आपली विमाने अधिक फायदेशीर मार्गांवर वापरण्यास किंवा त्यांना स्टँडबायवर ठेवण्यास मदत होईल, ज्यामुळे ऑन-टाइम परफॉर्मन्स (OTP) मध्ये सुधारणा होईल.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ऑपरेशनल खर्च आणि विमानांच्या उपलब्धतेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांत जेट इंधनाचे दर खूप वाढले आहेत, ज्यामुळे अनेक लांब पल्ल्याचे मार्ग सध्याच्या वारंवारतेवर तोट्याचे ठरत आहेत.
एअर इंडियाने सांगितले की, आम्ही बाजारातील मागणी आणि ऑपरेशनल अडचणींच्या आधारावर आमच्या उड्डाण वेळापत्रकाचा सतत आढावा घेतो जेणेकरून कार्यक्षमतेने काम करता येईल.
एव्हिएशन विश्लेषकांचे मत आहे की, ATF च्या किमती एअरलाइनच्या ऑपरेटिंग खर्चाच्या सुमारे 40% असतात. अशा परिस्थितीत, टाटा ग्रुपसाठी एअर इंडियाच्या परिवर्तनादरम्यान वाढ आणि नफा यांच्यात संतुलन राखणे हे एक मोठे आव्हान आहे.

ATF काय आहे आणि ते महत्त्वाचे का आहे?

एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF): हे विमानांमध्ये वापरले जाणारे विशेष इंधन आहे.
खर्च: कोणत्याही एअरलाइनच्या एकूण खर्चापैकी सुमारे 40% हिस्सा एकट्या इंधनावर खर्च होतो.
किमतींचा परिणाम: जेव्हाही तेलाचे दर वाढतात, तेव्हा एअरलाइन्सना एकतर भाडे वाढवावे लागते किंवा तोटा कमी करण्यासाठी उड्डाणे कमी करावी लागतात.

अनिल अंबानींना अटक का नाही ? सर्वोच्च न्यायालयात सवाल

नवी दिल्ली- ४०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे सूत्रधार असूनही अनिल अंबानी यांना अटक का केली नाही ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयात काल प्रशांत भूषण यांनी उपस्थित केला . अंबानी यांच्या कंपन्यांशी संबंधित ४०,००० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. याचिकाकर्ते वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयात विचारले की, जेव्हा सेबीने (SEBI) स्वतः अनिल अंबानी यांना या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार म्हटले आहे, तर मग त्यांना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही?

या प्रश्नावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, तपास यंत्रणांनी ‘X’ किंवा ‘Y’ व्यक्तीला आतापर्यंत अटक का केली नाही, याचे उत्तर देण्यास त्या बांधील नाहीत.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, तपासादरम्यान काही नवीन पुरावे मिळाल्यानंतर एजन्सींनी २ नवीन FIR नोंदवल्या आहेत. ते म्हणाले की, तपास सुरू आहे आणि ते वैयक्तिक अटकेच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत.
यापूर्वी प्रशांत भूषण यांनी असा युक्तिवाद केला होता की, ED ने या प्रकरणात काही लहान कर्मचाऱ्यांना अटक केली आहे, परंतु मुख्य आरोपी अनिल अंबानी यांच्यावर अद्याप तशी कारवाई झालेली नाही.
CJI सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. न्यायालयाने आता हे प्रकरण 8 मे पर्यंत पुढे ढकलले आहे. त्या दिवशी ईडी आणि सीबीआयने दाखल केलेल्या नवीन ‘स्टेटस रिपोर्ट’वर विचार केला जाईल.

पुढील कोणताही निर्देश जारी करण्यापूर्वी या तपास यंत्रणांचा सविस्तर अहवाल पाहण्याची न्यायालयाची इच्छा असल्याचे स्पष्ट केले.

2,983 कोटींचे कर्ज फक्त 26 कोटींमध्ये निकाली काढले गेले

मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीच्या एका अहवालाचा हवाला देत आश्चर्य व्यक्त केले होते. अहवालानुसार, अनिल अंबानी समूहातील काही कंपन्यांचे 2,983 कोटी रुपयांचे कर्ज दिवाळखोरी प्रक्रियेदरम्यान केवळ 26 कोटी रुपयांमध्ये निकाली काढण्यात आले होते.

न्यायालयाने हे देखील निदर्शनास आणले की, हे अधिग्रहण 8 गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (NBFCs) “प्रोजेक्ट हेल्प” द्वारे सुलभ केले होते.

IBC प्रक्रियेच्या गैरवापरावर CJI यांची चिंता

CJI सूर्यकांत यांनी दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC) प्रक्रियेच्या वाढत्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, अशा घटना वाढत आहेत जिथे दिवाळखोर कंपन्या त्यांच्या मालमत्ता त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना खूप कमी किमतीत विकतात. त्यांनी याला गंभीर मुद्दा संबोधत एजन्सींना जलद तपास करण्याचे निर्देश दिले.

₹584 कोटींचे कर्ज ₹85 कोटींमध्ये निकाली काढले

सुनावणीदरम्यान एका कर्जदाराच्या वकिलाने एक धक्कादायक उदाहरण सादर केले. त्यांनी सांगितले की, एक पूर्णपणे सक्षम कंपनी जी दरमहा 8.5 कोटी रुपयांचा टोल वसूल करत होती, तिने स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केला.

नंतर त्या कंपनीचे 584 कोटी रुपयांचे कर्ज फक्त 85 कोटी रुपयांमध्ये मिटवण्यात आले. अशा प्रकारे कंपनी कर्जमुक्त होऊन बाहेर पडली आणि कर्ज देणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोर्टाने सांगितले की, जर तपासाशी संबंधित असा कोणताही पुरावा असेल, तर एजन्सींनी त्याची दखल घ्यावी.

आजपासून कमर्शियल गॅस सिलिंडर 993 रुपयांनी महाग

ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन नियमही लागू; मे महिन्यात होणारे 4 मोठे बदल
कमर्शियल सिलिंडर आज म्हणजेच 1 मे पासून 993 रुपयांनी महाग झाला आहे. दिल्लीत तो 3071.50 रुपयांना मिळत आहे. न्यूज एजन्सी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. याशिवाय ‘ऑनलाइन गेमिंग नियम 2026’ लागू झाले आहेत.

मे महिन्यात होणारे 4 मोठे बदल

  1. कमर्शियल सिलिंडर 993 रुपयांपर्यंत महाग

बदल: तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडर ₹993 ने महाग केला आहे. दिल्लीत त्याची किंमत ₹3071.50 झाली आहे. आधी तो ₹2078.50 मध्ये मिळत होता.
परिणाम: कमर्शियल सिलिंडरच्या किमती वाढल्याने रेस्टॉरंट मालकांचा खर्च वाढेल. अशा परिस्थितीत ते चहा, नाश्ता आणि थाळी महाग करू शकतात. लग्नांची केटरिंगही महाग होऊ शकते.

  1. ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन नियम आजपासून लागू

बदल: देशात आज ‘ऑनलाइन गेमिंग नियम 2026’ लागू झाले आहेत. या अंतर्गत ‘ऑनलाइन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया’ (OGAI) ची स्थापना केली जाईल. ही संस्था ऑनलाइन गेम्सचे नियमन करणे, त्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणे आणि त्यांचे निरीक्षण करण्याचे काम करेल.

या अंतर्गत गेम्सना तीन श्रेणींमध्ये विभागले आहे. ऑनलाइन मनी गेम्स, ऑनलाइन सोशल गेम्स आणि ई-स्पोर्ट्स. मनी गेम्सवर बंदी आहे, तर इतर गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी नोंदणी आवश्यक असेल.

आता परदेशी गेमिंग कंपन्याही भारतीय कायद्यांपासून वाचू शकणार नाहीत. जर एखादी कंपनी भारतात सेवा देत असेल, तर तिचे मुख्यालय कुठेही असले तरी तिला भारतीय नियमांचे पालन करावेच लागेल.

वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी ऑनलाइन गेम्समध्ये वयोमर्यादा, पालकांचे नियंत्रण (पेरेंटल कंट्रोल) आणि वेळेची मर्यादा (टाइम लिमिट) यांसारखी वैशिष्ट्ये असतील. गेमिंगदरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरही लक्ष ठेवले जाईल.

परिणाम: कठोर नियम आणि वयोमर्यादा/पालकांचे नियंत्रण (पेरेंटल कंट्रोल) यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे गेमिंगचे व्यसन आणि फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल.

त्याचबरोबर परदेशी कंपन्यांवर नियंत्रण ठेवल्याने सट्टेबाजी थांबण्याची अपेक्षा आहे. यामुळे सरकारच्या महसुलात वाढ होईल आणि ई-स्पोर्ट्सला एक वैध खेळ म्हणून अधिक ओळख मिळेल.

  1. डिझेल आणि हवाई इंधनाची निर्यात स्वस्त होईल

बदल: केंद्र सरकारने 1 मे पासून पुढील 15 दिवसांसाठी डिझेल निर्यातीवर लागणारी विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (स्पेशल एडिशनल एक्साइज ड्यूटी) ₹23 प्रति लिटरपर्यंत कमी केली आहे. एप्रिलमध्ये ती ₹55.5 होती.

त्याचबरोबर, एटीएफ (ATF) म्हणजेच, विमान इंधनावरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (Special Additional Excise Duty) कमी करून ₹33 प्रति लिटर करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये ते ₹42 होते. याव्यतिरिक्त, पेट्रोलियम मंत्रालयाने इंधनाची व्याख्या बदलून आता एटीएफमध्ये सिंथेटिक इंधनाच्या मिश्रणाला (Blending) परवानगी दिली आहे.

परिणाम: शुल्क कमी झाल्यामुळे रिलायन्स आणि नायरा (Nayara) सारख्या भारतीय रिफायनिंग कंपन्यांना परदेशी बाजारात इंधन विकणे स्वस्त पडेल, ज्यामुळे त्यांच्या नफ्यात सुधारणा होऊ शकते.

अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, घरगुती वापरासाठी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे सामान्य जनतेसाठी इंधनाच्या किमती स्थिर राहतील.

एटीएफमध्ये सिंथेटिक मिश्रणाला परवानगी मिळाल्याने विमान वाहतूक क्षेत्रात पर्यावरणपूरक आणि पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे उद्योगाच्या मानकांमध्ये स्पष्टता येईल.

  1. यूएई (UAE) आजपासून ओपेक (OPEC) आणि ओपेक प्लस (OPEC+) मधून वेगळे झाले

बदल: संयुक्त अरब अमिराती (UAE) 1 मे पासून OPEC आणि OPEC+ मधून बाहेर पडले आहे. ही जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक संघटना आहे, जी जागतिक बाजारात सुमारे 40-50% तेल पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि उत्पादन कोटा निश्चित करून किमती ठरवते.

परिणाम: ओपेकच्या निर्बंधांमधून बाहेर पडल्यानंतर UAE तेल उत्पादन वाढवू शकेल. यामुळे जागतिक बाजारात पुरवठा वाढेल आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. भारतासारख्या तेल आयातदार देशांना त्यांच्या तेल पुरवठ्याच्या स्रोतांमध्ये विविधता आणण्याची संधी मिळेल.

आईमाता मंदिरासमोर लिक्विड हिट केमिकल पीपलच्या गोदामातून क्लोरीन गळती:२२ नागरिक उपचारासाठी ससूनमध्ये

पुणे: मार्केट यार्डमधील गंगाधाम चौक ते बिबवेवाडी रस्त्यावरील एका रासायनिक कंपनीच्या गोदामाला मध्यरात्री क्लोरीन वायूच्या गळतीमुळे २२ नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. अग्निशामक दलाने तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला. सर्वांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिरासमोर लिक्विड हिट केमिकल पीपल या रासायनिक कंपनीचे गोदाम आहे. महापालिकेला क्लोरीन वायू पुरवठा करण्याचे काम कंपनीकडे होते.

परंतु सध्या पुरवठा बंद होता. त्या गोदामामध्ये क्लोरीन वायूची दोनशे लिटर क्षमतेची जुनी टाकी होती. त्यामधून मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणावर वायू गळती सुरू झाली. गळतीनंतर परिसरातील नागरिकांना डोळ्यांची चुरचुर, श्वसनाचा त्रास अशा तक्रारी जाणवू लागल्या. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षाविषयक ‘बीए सेट’ परिधान करून गळतीवर नियंत्रण मिळवले.

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपयुक्त असणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातच होणार असून, याबाबत कोणीही शंका बागळू नये. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या माध्यमातून लहान मुलांना आणि युवकांना वाचनाची गोडी लावण्यासाठी त्यांना उत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना पार पाडण्याची आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.

पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेचे उत्साहात उद्घाटन झाले. ही जत्रा ४ मेपर्यंत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे विनामूल्य सुरू आहे. यावेळी पाटील बोलत होते. उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत (दूरदृष्य प्रणालीद्वारे), महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार हेमंत रासने, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे, बालसाहित्यिक राजीव तांबे, अरूण गीते, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या उपस्थितीत मराठी शब्दकोषाचे प्रकाशन; तसेच मराठी शब्दकोष ॲपचा शुभारंभ करण्यात आला.

पाटील म्हणाले की, तरुण, लहान मुले वाचत नाही असे सरसकट म्हणणे, आता उचित ठरणार नाही. गेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला १५ लाख नागरिकांनी भेट दिली. यातील ५ लाखांपेक्षा अधिक उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि लहान मुले होते. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकांची आहे त्यासाठी त्यांना दर्जेदार बालसाहित्य उपलब्ध करून द्यावे लागेल लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यातून वाचन चळवळ पुढे जावे, यासाठीच पुणे बाल पुस्तक जत्रेचा अभिनव प्रयोग राज्यात गेल्या दोन वर्षापासून होत आहे. या जत्रेत सर्व पुणेकरांनी कुटुंबासह सहभागी होऊन, मराठी भाषा आणि साहित्य-संस्कृती वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

नागपुरे म्हणाल्या की, नवीन पिढी वाचनाशी जोडली जावी, हे थोर महापुरुषांनी सांगितलेले स्वप्न पुणे बाल पुस्तक जत्रेतून काम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडली आहे. पुणे बाल पुस्तक जत्रा ही विकसित भारत संकल्पाची पायरी आहे. मुळणीनचांगल्या पुस्तकांना आपला मित्र करा. शिक्षक आणि पालकांनी मुलांना अधिकाधिक नाविण्यपूर्ण पुस्तके देण्यासाठी प्रयत्न करावे.या जत्रेत महानगरपालिका उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे, याचा आनंद आहे.

तांबे म्हणाले की, पुणे बाल पुस्तक जत्रा ही लहान मुलांसाठी केलेली आजची पेरणी आहे. या माध्यमातून पुढील दहा वर्षांसाठी नवे वाचक घडणार आहेत, ही फार मोठी बाब आहे. सोमण म्हणाले की, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे बाल पुस्तक जत्रेत सहभागी झाली आहे. येत्या काळात मुलांसाठी आम्ही बाल विभाग सुरू करीत आहोत. त्याचे मार्गदर्शक राजीव तांबे राहणार आहे, अशी माहिती सोमण यांनी दिली. वाडेकर आणि निकम यांनी मुलांनी वाचनाकडे वळायला हवे, असे सांगत जत्रेला शुभेच्छा दिल्या. पांडे यांनी प्रास्ताविक करीत, पुणे बाल पुस्तक जत्रेची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केली. महाजन यांनी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले आहे. या विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असल्यास, आपल्याला पुस्तकांची, कलेची आणि साहित्य संस्कृतीची जोड द्यावी लागणार आहे. पुढील चार दिवस जत्रा सुरू राहणार असून, त्यात लहान मुलांसाठी १०० पुस्तकांची दालने आहेत. खेळण्यासाठी जुने पारंपरिक खेळ आहेत. दिवसभर विविध कार्यशाळा आहे. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना घेऊन जत्रेला भेट द्यावी.—-राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
…….
मुलांना वाचनाकडे वळवण्याचे विधायक काम:
मुलांना पुस्तकांकडे वळवण्याचे विधायक काम आवश्यक असून, ते काम पुणे पुस्तक बाल जत्रेच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल आयोजकांचे आभार मानायला हवे.पुस्तकांची चळवळ राज्यभर पसरवण्यासाठी अशा जत्रा विभागीय स्तरावर व्हायला हव्यात. वाचनाची आवड लागण्याचे काम बालवयात व्हायला हवे. त्यामुळे मराठी साहित्य रुजण्यासाठी खूप मदत होते आणि मराठीची चळवळ अधिक सक्षम होण्यासाठी हातभार लागतो. मराठीच्या वैश्विक प्रचार – प्रसारासाठी मराठी भाषा विभाग सक्षम आहे. राज्य सरकारने लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मराठी भाषा वैश्विक केंद्र पुढील दोन महिन्यात निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होण्याची दाट शक्यता असून, तशा पद्धतीने चर्चा सुरू आहेत या संमेलनालाही पुणेकर मोठा प्रतिसाद देतील, यात शंका नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात अडथळा ठरत असलेल्या जलवाहिनीच्या स्थलांतरासाठी तांत्रिक बदल करण्यात आले असून, त्यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव महापालिकेकडून स्थायी समितीसमोर मांडण्यात होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

सदर पुलाच्या कामादरम्यान रेल्वे रुळाखालील जुन्या १००० मिमी व्यासाच्या जलवाहिनीमुळे अडथळा निर्माण होत आहे. या जलवाहिनीमधून येरवडा, कल्याणीनगर, गांधी नगर, जेल रोड आदी भागांना पाणीपुरवठा केला जात असल्याने पर्यायी व्यवस्था उभारणे आवश्यक ठरले. त्यानुसार ‘जॅक अँड पुश’ पद्धतीने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

मात्र, प्रत्यक्ष कामादरम्यान कठीण खडकाचा सामना करावा लागल्याने कामाची गती मंदावली. त्यामुळे ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीचा अवलंब करण्यात आला. पुढील टप्प्यात काम करत असताना १९०५ च्या सुमारास बांधण्यात आलेल्या जुन्या आरसीसी डक्टचा अडथळा निर्माण झाला. रेल्वे प्रशासनाने हा डक्ट तोडण्यास परवानगी नाकारल्याने काम पूर्णपणे ठप्प झाले होते.

या पार्श्वभूमीवर आता विद्यमान आरसीसी डक्टमधूनच नवीन ८०० मिमी व्यासाची एम.एस. जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी डक्टमधील जुनी ६०० मिमी जलवाहिनी काढून टाकण्यात येणार आहे. या बदलास रेल्वे विभागानेही तत्त्वतः अनुकूलता दर्शविली असून लवकरच लेखी परवानगी मिळणार आहे.

मूळ निविदेमध्ये या अतिरिक्त कामांचा समावेश नसल्याने तेच काम सध्या सुरू असलेल्या ठेकेदार मे. आर.बी. कृष्णानी यांच्याकडूनच ०.१ टक्के कमी दराने करून घेण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी सुमारे २ कोटी ७ लाख रुपयांपर्यंत (जीएसटीसह) खर्च अपेक्षित आहे.

हा खर्च ‘साधू वासवानी पूल ते बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडा’ या अर्थशीर्षकातून करण्यात येणार आहे. पुलाच्या कामात होणारा विलंब टाळण्यासाठी तसेच रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे