Home Blog Page 626

“कोथरूड मध्ये राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात”

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितपवार,प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वात पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या सुचनेनुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघात सभासद नोंदणी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १० मार्च रोजी कर्वेनगर येथील रत्ना हॉटेल येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच मोठ्या उत्साहात अभियानाचे संपूर्ण नियोजन करून सदस्य नोंदणी अभियानाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील फादर बॉडीचे पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांकडून सभासद नोंदणीसाठी करावयाची पूर्वतयारी म्हणून आढावा घेत माहिती घेण्यात आली.


सदर प्रसंगी कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हर्षवर्धन दीपक मानकर, महिला अध्यक्ष तेजल दुधाने, कोथरूड निरीक्षक माणिकशेठ दुधाने, विद्यार्थी शहराध्यक्ष शुभम माताळे, वैद्यकीय मदत कक्ष शहराध्यक्ष विजय बाबर, शहर सरचिटणीस धनंजय पायगुडे, फादर बॉडी शहर उपाध्यक्ष आनंद बंडू तांबे, संतोष बराटे,कुमार बराटे,प्रशांत निम्हण,रजनी पाचंगे,संजय चव्हाण,संघटक सचिव ओमकार निम्हण, महिला शहर कार्याध्यक्ष संगीता बराटे,विधानसभा सरचिटणीस महिला दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष अपूर्वा तांबे,कांता खिलारे,विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर,युवक उपाध्यक्ष,सुरज गायकवाड,सागर चंदनशिवे कोथरूड विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत मोकर, कोथरूड सरचिटणीस नवनाथ खिलारे, सामाजिक न्याय अध्यक्ष अमित तुरुकमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तंबी द्यावी: नाना पटोले

  • मटनाच्या दुकानांना सर्टिफिकेट देण्याचा मंत्र्याचा नवा धंदा आहे का? त्यांना कोणी अधिकार दिला?

मुंबई – कोणते मटन कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे भरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या मंत्र्याला तंबी द्यावी, असे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कायदे करणे हे सरकारचे काम आहे पण एखादा मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. हलाल मटन विकत घ्यायचे की आणखी कोणते व ते कोणाकडून घ्यायचे हे मंत्र्यांनी सांगू नये, हे काम त्यांचे नाही. महाराष्ट्रात धार्मिक मुद्दे उपस्थित करून सामाजिक शांतता भंग करण्याचा उद्योग काही लोक करत आहेत, त्याची दखल सरकार व मुख्यमंत्री यांनी घ्यावी. मंत्रीपदाची जी शपथ घेतली त्याचे पालन करावे. धर्माधर्मा मध्ये वाद निर्माण करुन महाराष्ट्राला तोडू नका, असेही पटोले यांनी बजावले आहे.

भोंग्यांसंदर्भात कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजवणी करा.

भोंग्याच्या आवाजासंदर्भात मा. सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे तो कोणत्या एका धर्मासाठी नसून भोंग्याच्या आवाजासंदर्भात आहे, त्याचे पालन केले पाहिजे. एकाच धर्मासाठी ते लागू केले जात असेल व त्यातून नवे वाद उभे राहतील. सुप्रीम कोर्टाच्या आदेशनाचे पालन जे अधिकारी करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. भोंग्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या निवेदनात कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही, त्यामुळे गैरसमज पसरवू नका, असे आवाहनही पटोले यांनी केले.

सरकारमध्ये शिंदे विरुद्ध फडणवीस वाद…
एकनाथ शिंदे सरकारने घेतलेले निर्णय व सुरु केलेल्या योजना फडणवीस सरकार बंद करत आहेत. शिंदे यांच्या आमदारांना दिलेली सुरक्षा फडणवीस सरकारने काढून घेतली आहे पण त्याचवेळी भाजपाच्या बगलबच्च्यांना मात्र वाय प्लसची सुरक्षा दिलेली आहे. आनंदाचा शिधा, शिवभोजन योजनेलाही कात्री लावण्याचे काम केले जात असून बजेटमध्ये या योजनांसाठी निधीची तरतूद केल्याचे दिसत नाही. शिंदे विरुद्ध फडणवीस या वादातून राज्यातील जनतेचे मात्र नुकसान होत आहे असेही नाना पटोले म्हणाले.

येत्या २३ मार्चपर्यंत वडगावशेरी मतदारसंघाचा पाणी पुरवठा सुरळीत करून अहवाल सादर करा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश

  • विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आमदार बापूसाहेब पठारे यांची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील दालन क्र. ४० मध्ये वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांची बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार तसेच पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. श्री अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता पथ, नंदकिशोर जगताप मुख्य अभियंता पाणीपुरवठा, हांडे मुख्य अभियंता एमएसआयडीसी मुंबई,अमोल झेंडे पोलीस उपायुक्त वाहतूक व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान, आमदार पठारे यांनी वडगावशेरी मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत विकासकामे पूर्ण करण्याची मागणी केली. विशेषतः रस्ते, उड्डाणपूल, बीआरटी प्रकल्प, भुयारी मार्ग, नदीवरील पूल व नियोजित मार्ग यासंदर्भात त्यांनी आपल्या मागण्या स्पष्ट केल्या.

प्रामुख्याने, यात खराडी-शिवणे रस्त्याचे प्रलंबित कामे पूर्ण करणे, पुणे-नगर रस्त्यावरील हयात हॉटेल (विमाननगर) ते खराडी जकात नाका (खांदवे नगर) हा उड्डाणपूल (उन्नत मार्ग) लांबी कमी न करता हयात हॉटेल (विमाननगर) येथून पूर्ण करणे, पुणे-नगर महामार्ग व आळंदी रस्त्यावरील उर्वरित बीआरटी मार्ग काढणे, विमाननगर चौक व खराडी-हडपसर बायपास चौक येथे भुयारी मार्ग तयार करणे, विमाननगर, वडगावशेरी, मुंढवा, पिंगळे वस्ती व हडपसरला जोडणारा एचसीएमटीआर रस्त्यासाठी मुळा-मुठा नदीवरील पूल करणे, ५०९ चौक ते कलवड, धानोरी, लोहगाव रस्त्याला जोडणारा रस्ता विकसित करणे, धानोरी जकात नाका ते डी. वाय. पाटील कॉलेज (लोहगाव) व पुणे मनपा हद्दीपर्यंत रस्ता निर्माण करणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना कराव्यात. भूसंपादनाची प्रलंबित कामे मार्गी लावावी. तसेच खराडी जकात नाका (चूल मटण हॉटेल) येथून स. नं. १२३, १२४, १२५, १२०, ११९, ११८, ११७ मधून तालेरा यांच्या जमिनीच्या कडेने लोहगाव-वाघोली रस्त्याला जोडणारा नियोजित रस्ता विकसित करणे इ. मागण्यांचा समावेश होता.

मागण्यांच्या संदर्भाने, नार्वेकर यांनी आमदार बापूसाहेब पठारे व पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांशी अभ्यासपूर्ण चर्चा केली. यावेळी नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. येत्या २३ मार्च पूर्वी मतदारसंघातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पठारे म्हणाले, की “वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. रखडलेली विकासकामे त्वरित मार्गी लागली पाहिजेत. रस्ते व वाहतूक सुधारणा प्राधान्याने करण्यात आल्याच तरच वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल. वडगावशेरी मतदारसंघातील वाढती लोकसंख्येचा विचार दोन्ही प्रशासनाने करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने व पालिका प्रशासनाने मिळून याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व मागण्याची पूर्तता करावी.”

पुणे जिल्हा समग्र पर्यटन विकास आराखडा’ युद्धपातळीवर तयार करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ले, धार्मिकस्थळे, सांस्कृतिक, क्रीडा, नद्या, वन्यजीव, जैवविविधता, धरणे, कृषी, वन, जल पर्यटन, साहसी खेळ, पक्षी निरीक्षण, परिपयर्टन, ग्रासलँड सफारी आदीबाबींचा विचार करुन सर्वसमावेशक, पर्यावरणपूरक ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन विकास आराखडा’ युद्धपातळीवर तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित एकत्रित पर्यटन विकास आराखडाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप वनसंरक्षक तुषार चव्हाण, महादेव मोहिते, अमोल सातपुते, पर्यटन उपसंचालक शमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दानी आदी उपस्थित होते.

डूडी म्हणाले, पर्यटन विकास आराखड्यात संगणकीकृत पायाभूत सुविधेच्या माध्यमातून पर्यटकांना पर्यटनस्थळावरील प्रवेश शुल्क, निवासव्यवस्था, अल्पोहार, भोजनालय, पिण्याचे पाणी, थांब्याचे ठिकाण, शौचालय आदीसुविधांबाबत सर्व प्रकारची माहिती मिळाली पाहिजे. पर्यटनस्थळाला देश विदेशातील अधिकाधिक पर्यटक भेट देतील, येणाऱ्या पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध होतील, यादृष्टीने प्रत्येक बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे. देशातील इतर राज्यात करण्यात येणाऱ्या पर्यटन महोत्सवाचा अभ्यास करावा, याकरीता नामांकित वास्तुविशारद, पर्यटनक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले.

या बैठकीत जिल्ह्यातील पयर्टनस्थळे निश्चित करण्यात आली होती, त्यादृष्टीने इको टुरिझम, साहसी खेळ, स्थानिकांना रोजगार, स्थानिक लोकपंरपरा, साहित्य, कला, संगीत, नाट्य तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या बाबींवरही बाबींवर चर्चा करण्यात आली.

गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारु दुकान सुरु करण्यासाठी यापुढे,सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

  • महानगरपालिका क्षेत्रात एखाद्या वॉर्डमध्ये सुरू असलेले मद्यविक्री दुकान बंद करण्यासाठी झालेल्या मतदानापैकी 75 टक्के मतदान ज्या बाजूने होईल, त्यानुसार बियर किंवा दारुचे दुकान सुरु किंवा बंद ठेवण्याचा निर्णय घेणार- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती.
  • दारुबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची भूमिका; अवैध दारुविक्री रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्षवेधीवर विधानसभेत उत्तर

मुंबई :- राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. अजित पवार यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील वातावरण कलहमुक्त राहण्यास, तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्यास प्रतिबंध होणार असून कायदा-सुव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. महापालिका वार्डमध्ये मद्यविक्रीचे दुकान बंद करायचे असेल नियमानुसार आलेल्या प्रस्तावावर झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने निर्णय होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या या घोषणेचे समाजाच्या सर्व थरातून स्वागत होत आहे.

राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर आणि दारु दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा महेश लांडगे आणि अॅड. राहूल कूल आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चर्चेत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शासनाची भूमिका राज्यात दारुविक्री वाढावी अशी नसून दारुबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे. अनेक दशकांपासून राज्यात दारुविक्रीचे परवाने बंद आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दारुदुकानांना परवानगी नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारुदुकाने बंद करण्याचा कायदा आहे. त्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी दारुदुकान सुरु किंवा बंद करण्यासाठी महापालिका वार्डांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान हे ज्या बाजूने होईल, त्यानुसार निर्णय होईल. राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन न देता अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना स्पष्ट केले.

राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका नसून अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. दारुमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. यासंदर्भत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोखठोक आणि स्पष्ट उत्तराचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक सदस्यांनी कौतुक केले.

केळी पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करण्यात येणार-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे : आगामी पाच वर्षात जिल्ह्यात केळी पिकाखाली अधिकाधिक क्षेत्र आणण्यासह उत्पादकता वाढविणे, प्रक्रियाउद्योग, शीतसाखळी निर्मिती आणि बाजारपेठ जोडणी या सर्व बाबींचे नियोजन करत समूह (क्लस्टर) पद्धतीने विकास करण्यात येणार असून त्यासाठी कृषी विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, केळीची उत्पादकता प्रतिहेक्टरी ४२ वरून ६५ मे. टन पर्यंत वाढवण्यासाठी शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, निविष्ठांचा योग्य वापर, अधिकाधिक क्षेत्र सेंद्रिय, नैसर्गिक शेतीखाली आणणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, या पिकासाठीची सर्व टप्प्याची प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे या बाबींवर विशेष भर द्यावा लागेल. कृषी विद्यापीठे आणि प्रगतशील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडील तंत्रज्ञान अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, या क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निविष्ठा पुरवठा, ड्रोन सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आदी कामे करावी लागतील.

केळी पिकाखाली इंदापूर, बारामती आणि जुन्नर तालुक्यामध्ये १ हजार ६११ हेक्टर क्षेत्र असून ६७ हजार ६०० मे. टन उत्पादन होते. आगामी पाच वर्षात हे क्षेत्र ३ हजार हेक्टरवर आणि उत्पादन सुमारे २ लाख मे. टन वर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काचोळे यांनी सांगितले.

या उत्पादन वाढीसाठी तसेच वाढणाऱ्या उत्पादनावरील प्रक्रियेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनेतून अर्थसाहाय्य करणे, शीतसाखळी अंतर्गत साठवण गृहे उभारणी आणि बाजार जोडणीसाठी पणन मंडळ तसेच अन्य माध्यमांचा उपयोग करावा, असेही जिल्हाधिकारी डूडी म्हणाले.यावेळी स्ट्रॉबेरी, मिरची, आंबा, स्वीट कॉर्न व बेबी कॉर्न, सूर्यफूल आदी पिकांचे क्लस्टर करण्याच्यादृष्टीनेही चर्चा झाली.

खा.डॉ.मेधा कुलकर्णी महिला परिषदेसाठी मेक्सिकोला रवाना

प्रतिनिधी – IPU (International Parliamentary Union) च्या Global Women Conference मेक्सिको येथे आयोजित करण्यात आले असून या कॉन्फरन्ससाठी खा. डॉ. मेधा कुलकर्णी सहभागी होण्यासाठी रवाना झाल्या.
या तीन दिवसीय परिषदेसाठी राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी कुलकर्णी यांना नामदेर्देशित करण्यात आले असून या परिषदेत विविध देशातील महिला खासदारांचा समावेश असणार आहे. विविध देशांमधील महिला संसद सदस्य त्यांचे प्रश्न महिला विषयक कायदे महिलांची सुरक्षितता, सायबर गुन्हे आणि सुरक्षेच्या उपाययोजना, जेंडर इक्वॅलीटी, विविध देशात असलेली याविषयीची स्थिती, घेतलेले निर्णय केलेल्या उपाययोजना, राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी करीत असलेले प्रयत्न या सर्वांवर चर्चात्मक परिसंवाद होणार आहेत.
विविध देशाच्या महिला खासदार सहभागी होऊन प्रतिनिधित्व करणार आहेत. डॉ. मेधा कुलकर्णी या भारताचे प्रतिनिधित्व करतील.

सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा या शाळेवरील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई : सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा बुद्रुक, पुणे या शाळेने बेकायदेशीर स्थलांतर, बांधकाम केले असल्याने मान्यता रद्द करण्याबाबत किंवा कायम ठेवण्याबाबत निर्णय व कार्यवाही होण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य योगेश टिळेकर यांनी सिंहगड सिटी स्कूल कोंढवा बुद्रुक पुणे ही शाळा इमारतीचा विना भोगवटा प्रमाणपत्र वापर सुरू असल्याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, शाळेत २१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सीबीएसई बोर्डाची आहे, आणि त्याच्यामुळे ह्या शाळेची मान्यता रद्द करावी किंवा योग्य ती कार्यवाही करावी, याबाबत शिक्षण उपसंचालकांना पत्र देण्यात आलेले आहे. महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे. २१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचे फेर नियोजन करणे गरजेचे आहे. ही आपली सामाजिक बांधीलकी आहे. तथापि, अनधिकृत बांधकाम आणि शाळेवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

  • छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : शौर्य, धैर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी १०:३० वाजता विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या कार्यक्रमात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या अभिवादन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माणिकराव कोकाटे, विधान परिषद आमदार श्रीमती चित्रा वाघ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याला व त्यागाला वंदन करताना सर्व मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करत, त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. “संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अभूतपूर्व बलिदान दिले. त्यांचे शौर्य आणि निश्चय हा आजच्या तरुणांनी आदर्श मानावा,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि कार्य हे भारतीय इतिहासातील तेजस्वी पर्व आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी आदरांजली ठरेल. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा सन्मान राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असेही यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतरच्या काळातील मराठी सरदारांचे तळपते कर्त्तृत्व संशोधन, लेखनासाठी प्रवृत्त करणारे ठरले- माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील

  • प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे प्रतिपादन

पुणे – “छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर मराठी स्वराज्य बलाढ्य औरंगझेबाविरुद्ध किती पराक्रमाने लढले, या लढ्याचा इतिहास रोमहर्षक आहे. या लढ्याची सूत्रे स्वीकारली ती महापराक्रमी संताजी घोरपडे आणि त्यांच्या शूर सहकार्यांनी. सरदार संताजी घोरपडे या व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या तळपत्या पराक्रमाच्या गाथेने मला साद घातली. त्याची परिणती ‘शूर सरसेनापती संताजी’ या पुस्तकाच्या लेखनात झाली”, असे मनोगत प्रसिद्ध अभ्यासक, संशोधक आणि माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील (IPS) यांनी मंगळवारी व्यक्त केले. ११ मार्च १६८९ या दिवशी औरंगझेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली होती. मंगळवारी धर्मवीर शंभूराजांच्या स्मृती जागवणाऱ्या दिवसाचे औचित्य साधून डॉ. शेखर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शंभूराजांच्या हत्येनंतरच्या काळातील मराठा सरदार, औरंगजेब, त्यांच्या लढाया विशेतः संताजी घोरपडे याविषयी डॉ. शेखर पाटील यांचा विशेष अभ्यास आहे.

डॉ. शेखर पाटील म्हणाले, “१६८३ ते १६९४ पर्यंतच्या काळात मराठी सैन्य संताजींच्या नेतृत्वाखाली औरंगझेबाशी लढत राहिले, हा इतिहास आहे. छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर वेढ्यात असतानाही, मराठी स्वराज्याचे सर्व अर्थांनी रक्षण आणि बलाढ्य शत्रूशी दोन हात अशी कामगिरी करणारे संताजी घोरपडे हे व्यक्तिमत्व मला सदैव साद घालत राहिले. त्यातूनच या काळाविषयीच्या माझ्या संशोधनाला चालना मिळाली, आणि ‘शूर सरसेनापती संताजी’ या पुस्तकाचे लेखन घडले. आता लवकरच या पुस्तकावर आधारित रणधुरंधर संताजी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. उच्च दर्जाच्या सिनेमॅटोग्राफी साठी प्रसिद्ध असलेले व विविध राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेले दिग्दर्शक अमोल गोळे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत”, अशी माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी दिग्दर्शक अमोल गोळे, डॉ. अनिरुद्ध आंबेकर, करणसिंग बांदल, एकनाथ दुधे, आदित्य शेखर पाटील, निवृत्ती नवले तसेच घोरपडे घराण्याचे वंशज चंद्रहार घोरपडे व मानसिंग घोरपडे तसेच अन्य घोरपडे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी चित्रपटाच्या पहिला पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

डॉ. शेखर पाटील पुढे म्हणाले, “शिवरायांचे जन्मस्थान असणार्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी माझे लहानपण गेले. तेव्हापासून इतिहासाची गोडी लागली. अभ्यास सुरू झाला. अवघ्या २३ व्या वर्षी संभाजी महाराज छत्रपती झाले. त्यानंतरची ९ वर्षे त्यांनी औरंगझेबाशी अशा लढाया केल्या, की औरंगझेबाने विचार बदलून आधी निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही संपविण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण काळाचे संशोधन हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. सलग ५ वर्षे संशोधन, सुमारे ८ हजार किलोमीटरचा प्रवास, लढायांची माहिती. या काळाशी संबंधित प्रत्येक स्थळाला भेट देऊन, मी लेखन केले आहे. सर्व उपलब्ध कागदपत्रांचा मी अभ्यास केला आहे. सुमारे ८ वर्षे स्वराज्याचे सेनापती या नात्याने संताजी घोरपडे यांनी स्वराज्य जपले, राखले, आणि औरंगजेबाला हैराण केले. संताजींच्या महापराक्रमी कर्तृत्वाला आदरांजली म्हणून माझा लेखनप्रपंच आहे, त्या लेखनाचे चित्रपटरूपही लवकरच रसिकांसमोर येईल. या विशिष्ट काळातील इतिहास, आणि मराठी सरदारांचे महान कर्तृत्व सर्वांसमोर यावे, हाच उद्देश आहे”.

दिग्दर्शक अमोल गोळे म्हणाले, “ऐतिहासिक चित्रपट करताना वातावरणनिर्मिती, पेहराव, तत्कालीन वास्तू, वस्तू यांना सर्वाधिक महत्त्व असते, हे मी मंगल पांडे, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटांसाठी काम करताना शिकलो आहे. ‘रणधुरंदर संताजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करताना हा अनुभव उपयोगी ठरेल. सुमारे वर्षभराच्या काळात हा चित्रपट रसिकांसमोर येईल, असा आमचा प्रयत्न राहील”.

घोरपडे घराण्याचे वंशज चंद्रहार घोरपडे म्हणाले, “संताजी घोरपडे हा घराण्याचा अभिमान आहे. संताजींचे वडील मालोजी घोरपडे हे छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती होते. या पितापुत्रांनी स्वराज्यासाठी जे योगदान दिले, त्याचे दर्शन यातून घडेल”, याचा विश्वास आहे.

“महिला शिक्षण आणि सशक्तीकरण हाच समाजप्रबोधनाचा खरा मार्ग” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

  • जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन; डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. गोऱ्हे यांनी महिला शिक्षण आणि सशक्तीकरणाचा महत्वाचा मुद्दा मांडला.

आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या महान महिलांनी समाजप्रबोधन आणि शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले. आजही महिला शिक्षण आणि त्यांचे सशक्तीकरण हाच समाजाच्या प्रगतीचा खरा मार्ग आहे.” त्यांनी उपस्थित सर्व महिलांना “भावी नगरसेविका होण्याची संधी आहे,” असे सांगून त्यांना सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाची संधी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या, विभाग प्रमुख, माजी नगरसेविका आणि अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने शिवसेना सातत्याने काम करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “घरगुती जबाबदाऱ्या सांभाळतानाच महिला आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्यांचा योग्य उपयोग करत आहेत. त्यामुळे त्यांची सामाजिक आणि आर्थिक प्रगती अधिक वेगाने होत आहे.” यावेळी उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाचे भरभरून स्वागत केले.

या कार्यक्रमात शिवसेना उपनेत्या कला ताई शिंदे, संपर्क प्रमुख वीणा भागवत, विभाग प्रमुख शीतल म्हात्रे बिट्रा आणि भक्ती ताई भोसले या मान्यवरांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन कुणाल सरमळकर आणि पल्लवी कुणाल सरमळकर यांनी केले होते.

वीजक्षेत्रातील आव्हाने स्विकारण्यास महिला सक्षम असल्याचे सिद्ध

  • पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे गौरवोद्गार

पुणे, :तांत्रिक व अत्यंत धकाधकीच्या वीजक्षेत्रामध्ये काळानुरुप आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम असल्याचे महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवरून सिद्ध केले आहे असे गौरवोद्गार महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी काढले.

जागतिक महिला दिनानिमित्त महावितरणकडून रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या ‘प्रकाशदीप’ सभागृहात पुणे परिमंडलातील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रादेशिक संचालक खंदारे बोलत होते.व्यासपीठावर मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंते सर्वश्री युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) माधुरी राऊत (वित्त व लेखा) यांची उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सर्व संवर्गातील महिला अधिकारी, अभियंता, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक गौरव करण्यात आला.

मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले की, महावितरणमध्ये महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे व त्या अतिशय सक्षमपणे काम करीत आहेत. कौटुंबिक व नोकरीच्या जबाबदाऱ्या एकाचवेळी सांभाळताना योग्य ताळमेळ साधण्याचे कसब महिलांमध्ये अधिक आहे.

‘महिला दिना’निमित्त आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सूर्यघर योजना व नवीकरणीय ऊर्जा याबाबत सहायक अभियंता शुभांगी क्षीरसागर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यानंतर खास महिलांसाठी संगीत रजनीचा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता ऐश्वर्या वस्त्रद यांनी केले. कार्यक्रमाला महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरणच्या वडगाव शाखा कार्यालयाचे नव्या जागेत स्थानांतरण

पुणे ; महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत वडगाव शाखा कार्यालयाचे वडगावमधील मध्यवस्तीत स्थानांतरण करण्यात आले. या कार्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले.

वडगाव धायरी उपविभागातील वडगाव शाखा कार्यालय पूर्वी अभिरूची मॉलसमोर भाडेपट्टी तत्त्वावर होते. आता हे कार्यालय वडगावमधील महावितरणच्या मालकीच्या जागेमध्ये कृष्णकुंज सोसायटी, सिंहगड कॉलेज रस्ता, महादेव मंदिराजवळ येथे स्थानांतरीत करण्यात आले आहे. वडगाव परिसरातील सुमारे ३२ हजार ग्राहकांना वीज व विविध ग्राहकसेवा देणाऱ्या या कार्यालयासाठी नवीन वास्तू उभारण्यात आली आहे.

या  वास्तुचे उद्घाटन करताना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी अभियंता व कर्मचाऱ्यांशी संवाद साधलायावेळी श्री. पवार यांनी तत्पर ग्राहकसेवेसोबतच तक्रारी व समस्यांचे विनाविलंब निराकरण करण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमाला प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. रवींद्र बुंदेले, कार्यकारी अभियंता श्री. मनीषकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. अविनाश कलढोणे व श्री. राहुल यादव (स्थापत्य), श्री. विशाल लंके, वडगावचे शाखा अभियंता श्री. आतिश इंगळे व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

‘प्रकाशदूत’च्या वनराईने फुलले महावितरणचे दत्तवाडी कार्यालय

पुणे, दि. ११ मार्च २०२५: महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत दत्तवाडी शाखा कार्यालयाच्या प्रांगणातील पडीक जागेत उभारलेल्या ‘प्रकाशदूत’ बागेचे उद्धाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले. या शाखा कार्यालयाच्या प्रांगणात सुमारे ८०० चौरसफूट जागा अडगळीने व्यापली होती. तेथे साफसफाई करून हिरव्या गवताचा गालिचा व सुमारे १५० झाडांची रोपटे लावून वनराई फुलवली आहे.

‘लाइनमन दिना’निमित्त पर्वती विभागाकडून दत्तवाडी शाखा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने छोटेखानी ऑक्सीजन रोपट्यांची लागवड केलेल्या ‘प्रकाशदूत’ बागेचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. रवींद्र बुंदेले व श्री. संजीव नेहेते, कार्यकारी अभियंता श्री. मनीषकुमार सूर्यवंशी व श्री. विजेंद्र मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते लाइनमन व लाइनवूमनचा प्रातिनिधिक गौरव करण्यात आला.

मुख्य अभियंता श्री. पवार यांनी अभियंता व जनमित्रांशी संवाद साधला. ‘महावितरणच्या सेवेचा केंद्रबिंदू हा वीजग्राहकच आहे. त्यांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्यासोबतच स्वतःच्या आणि ग्राहकांच्या वीजसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या’ असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला अतिरिक्त कार्यकारी अभियंते उमेश कवडे, उमेश करपे, राहुल यादव, सहायक अभियंता चेतन सोनार व महेश देशमुख आदींसह अभियंते, जनमित्र उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना 

  • शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे भव्य रक्तदान मानवंदनेचे आयोजन ; १०० स्वराज्यघराण्यांचा आणि महाराष्ट्रातील शिवशंभू भक्तांचा सहभाग 

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या बलिदान दिनी रक्तदानातून मानवंदना देण्यात आली. मानवंदनेचे हे सलग १२ वे वर्ष आहे. यावेळी जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी होणाऱ्या तब्बल १०० स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, ढोलताशा पथकांनी, क्रिडा संघटनांनी, गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान मानवंदनेत सहभाग नोंदवला.

शुभारंभ लॅान्स, म्हात्रे पूल डीपीरोड येथे मानवंदनेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी रक्तदान मानवंदनेचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, मंगेश शिळीमकर, प्रवीणभय्या गायकवाड, रिंकल अमित गायकवाड तसेच स्वराज्यघराण्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

रक्तदान मानवंदनेची सुरुवात ईशान अमित गायकवाड, सचिन पायगुडे, महेंद्र भोईटे, अविनाश कडू, राजेश जोगदंड, सुनील जोगदंड, दादा भोसले, मंदार मते, बाजीराव निगडे,  ऋषीकेश पासलकर यांनी रक्तदान करुन केली. यावेळी रक्तदात्यांचा संकल्प पुर्ण झाला. हिंजवडी रक्तपेढीने रक्त संकलन केले.

अमित गायकवाड म्हणाले, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ११ मार्च हा दिवस “महामृत्युंजय रक्दान दिन” म्हणुन महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा अणि त्यादविशी संपुर्ण महाराष्ट्रात रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी. ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा थेंबनथेंब अर्पण केला स्वराज्याच रक्षण करण्यासाठी, भारतभूमीच रक्षण करण्यासाठी, भारताच्या गौरवशाली संस्कृतीच रक्षण करण्यासाठी त्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातुन मानवंदना देऊयात, रक्ताच पांग रक्ताने फेडूया, रक्ताचे रक्ताशी नाते जोडूयात ही जाणीव जपत आम्ही सलग १२ वर्षे रक्तदान मानवंदना आयोजित करीत आहोत आणि भविष्यात राज्यव्यापी मानवंदनचे आयोजन करण्यात येणार आहे.