पुणे, दि. ११ मार्च २०२५: महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत दत्तवाडी शाखा कार्यालयाच्या प्रांगणातील पडीक जागेत उभारलेल्या ‘प्रकाशदूत’ बागेचे उद्धाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले. या शाखा कार्यालयाच्या प्रांगणात सुमारे ८०० चौरसफूट जागा अडगळीने व्यापली होती. तेथे साफसफाई करून हिरव्या गवताचा गालिचा व सुमारे १५० झाडांची रोपटे लावून वनराई फुलवली आहे.
‘लाइनमन दिना’निमित्त पर्वती विभागाकडून दत्तवाडी शाखा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने छोटेखानी ऑक्सीजन रोपट्यांची लागवड केलेल्या ‘प्रकाशदूत’ बागेचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. रवींद्र बुंदेले व श्री. संजीव नेहेते, कार्यकारी अभियंता श्री. मनीषकुमार सूर्यवंशी व श्री. विजेंद्र मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते लाइनमन व लाइनवूमनचा प्रातिनिधिक गौरव करण्यात आला.
मुख्य अभियंता श्री. पवार यांनी अभियंता व जनमित्रांशी संवाद साधला. ‘महावितरणच्या सेवेचा केंद्रबिंदू हा वीजग्राहकच आहे. त्यांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्यासोबतच स्वतःच्या आणि ग्राहकांच्या वीजसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या’ असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला अतिरिक्त कार्यकारी अभियंते उमेश कवडे, उमेश करपे, राहुल यादव, सहायक अभियंता चेतन सोनार व महेश देशमुख आदींसह अभियंते, जनमित्र उपस्थित होते.