▪️ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव
पुणे, दि. १७ : शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
कृषी विभागाच्यावतीने कृषी महाविद्यालय येथे आयोजित दुसऱ्या ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा-२०२६’च्या समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर , हेमंत रासने,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल १ हजार २९० अर्ज प्राप्त झाले असून विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील चार संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी १२ उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत.
या स्पर्धेतून केवळ कल्पना मांडल्या जात नाहीत, तर त्या प्रत्यक्ष उत्पादनात उतरून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतात. यंदाच्या स्पर्धेतील १८ निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत व मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.
प्रदर्शनात शेतीतील तंत्रज्ञानाचा प्रभावी वापराबाबत उपयुक्त नवकल्पना आहेत. उपग्रह नकाशांकन आणि मृदा परीक्षणाच्या आधारे जमिनीचे अचूक विश्लेषण करणारे नमुने, शेताच्या रचनेनुसार ओलावा व्यवस्थापन करून आवश्यक तेवढाच पाणीपुरवठा करणारी यंत्रणा, तसेच तण आणि पीक ओळखून स्वतंत्र फवारणी करणारे तंत्रज्ञान अशा विविध संकल्पनांचे मुख्यमंत्री यांनी विशेष कौतुक केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असून भविष्यात त्याची अचूकता आणखी वाढेल. पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मानवरहित यंत्रे आणि उपग्रह नकाशांकनाच्या माध्यमातून अचूक अहवाल तयार करणारे तंत्रही उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, बदलते हवामान, पाण्याची कमतरता, खतांची टंचाई, मजुरांची कमतरता आणि बाजारभावातील चढ-उतार या विविध आव्हानांना सामोरे जाताना कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले नऊ विभागांतील विजेते आणि उपविजेते
- मृदा आरोग्य व व्यवस्थापन
विजेता : किसान साथी
उपविजेता : नॅनो वीटा - स्मार्ट जल व्यवस्थापन व स्वयंचलन
विजेता : आयओएच अभियंता समूह
उपविजेता : फार मोअर - कृषी यांत्रिकीकरण (कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव तंत्रज्ञान)
विजेता : एग्रीटेक नेक्सस
उपविजेता : टीम व्हीएनएमकेव्ही - कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी
विजेता : विन विन बाईट्स
उपविजेता : सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स - अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन
विजेता : प्रोटो फीड्स
उपविजेता : इको एक्सट्रॅक्ट - पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन
विजेता : स्मार्ट बायो डिलिव्हरी
उपविजेता : कृषी नेत्र - हवामान अनुकूल व डिजिटल शेती
विजेता : डीप अँग बॉट
उपविजेता : मॉडर्न व्हिलेज फ्यूचर इनोव्हेशन्स - भूस्थानिक व भौगोलिक माहिती प्रणाली आधारित पीक सर्वेक्षण व्यवस्था
विजेता : क्रॉप जेन एआय
उपविजेता : ग्रीन माइंड्स - स्मार्ट कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
विजेता : ई-पिक ऑडिट एआय
उपविजेता : कृषी प्रबंध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रदर्शनाची पाहणी;नवकल्पनांचे कौतुक
पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. प्रत्येक स्टॉलवर थांबून त्यांनी संशोधकांशी आणि युवा उद्योजकांशी थेट संवाद साधत त्यांच्या संकल्पना समजून घेतल्या आणि त्यांच्या संशोधनाचे कौतुक करीत प्रोत्साहनही दिले.
कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना, स्मार्ट सिंचन प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, स्वयंचलित उपकरणे तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध संशोधनात्मक प्रकल्पांविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. प्रकल्प सादर करणाऱ्या तरुणांच्या कल्पकतेचे त्यांनी कौतुक करत कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठे परिवर्तन घडवून आणण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी त्यांनी विविध उपकरणांची कार्यपद्धती समजून घेत संशोधकांना प्रोत्साहनपर प्रश्न विचारले. अनेक स्टॉलवरील संशोधन प्रत्यक्ष पाहून त्यांनी अशा उपक्रमांमधून राज्यातील युवकांना नवसंशोधनासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे अधोरेखित केले.

