पुणे- मेडिक्लेम असताना ५० हजाराचे डीपोझीट घेतले अन अवघ्या १३ तासात एकतीस वर्षे वयाचा तरुण रुग्ण दगावला. अशा अवस्थेत त्याचा मृतदेह मेडिक्लेम कंपनीकडून बिलाचे अप्रुव्हल आल्याशिवाय देणार अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याचा आरोप करत नगरसेवक सुहास टिंगरे यांनी या रुग्णालयात जाऊन रुग्णालयाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला , धरणे धरली आणि येथे मोबाईलद्वारे आपले रुग्णालय कर्मचाऱ्यांशी होत असलेले बोलणे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असता त्यांना रेकॉर्डिंगसाठी प्रतिबंध करण्यात आला.
या संदर्भात नगरसेवक टिंगरे यांनी म्हटले आहे कि,’ काल माझा सहकारी स्व. निलेश चंद्रभान चत्तर (वय 31, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे) याचे दुःखद निधन झाले. अवघ्या महिनाभरापूर्वी त्याच्या वडिलांचेही निधन झाले होते. घरातील एकुलता एक मुलगा असलेल्या निलेशच्या जाण्याने कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.अशा दुःखाच्या प्रसंगी माणुसकी दाखवण्याऐवजी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा हॉस्पिटलच्या प्रशासनाने अत्यंत असंवेदनशील व संतापजनक वर्तन केले.

निलेशला काल सकाळी 10 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि रात्री 11:05 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. केवळ 13 तासांत तब्बल ₹3 लाख 25 हजारांचे बिल आकारण्यात आले, विशेष म्हणजे कोणतीही मोठी सर्जरी करण्यात आलेली नव्हती. विमा (Insurance) असतानाही ₹50 हजार डिपॉझिट घेण्यात आले.इतकेच नव्हे तर, “इन्शुरन्स अप्रूव्हल आल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही” अशी भूमिका घेत हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह रोखून ठेवला. दुःखात असलेल्या कुटुंबीयांना सकाळपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. एका धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या हॉस्पिटलकडून अशी अमानुष वागणूक अत्यंत निषेधार्ह आहे.हा प्रकार म्हणजे अक्षरशः “मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणे” आहे.पुण्यातील काही नामांकित हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या या आर्थिक लुटीविरोधात आता आक्रमक भूमिका घेण्याची वेळ आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी लवकरच कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.

