- विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आमदार बापूसाहेब पठारे यांची महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील दालन क्र. ४० मध्ये वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांची बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार तसेच पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. श्री अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता पथ, नंदकिशोर जगताप मुख्य अभियंता पाणीपुरवठा, हांडे मुख्य अभियंता एमएसआयडीसी मुंबई,अमोल झेंडे पोलीस उपायुक्त वाहतूक व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान, आमदार पठारे यांनी वडगावशेरी मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत विकासकामे पूर्ण करण्याची मागणी केली. विशेषतः रस्ते, उड्डाणपूल, बीआरटी प्रकल्प, भुयारी मार्ग, नदीवरील पूल व नियोजित मार्ग यासंदर्भात त्यांनी आपल्या मागण्या स्पष्ट केल्या.
प्रामुख्याने, यात खराडी-शिवणे रस्त्याचे प्रलंबित कामे पूर्ण करणे, पुणे-नगर रस्त्यावरील हयात हॉटेल (विमाननगर) ते खराडी जकात नाका (खांदवे नगर) हा उड्डाणपूल (उन्नत मार्ग) लांबी कमी न करता हयात हॉटेल (विमाननगर) येथून पूर्ण करणे, पुणे-नगर महामार्ग व आळंदी रस्त्यावरील उर्वरित बीआरटी मार्ग काढणे, विमाननगर चौक व खराडी-हडपसर बायपास चौक येथे भुयारी मार्ग तयार करणे, विमाननगर, वडगावशेरी, मुंढवा, पिंगळे वस्ती व हडपसरला जोडणारा एचसीएमटीआर रस्त्यासाठी मुळा-मुठा नदीवरील पूल करणे, ५०९ चौक ते कलवड, धानोरी, लोहगाव रस्त्याला जोडणारा रस्ता विकसित करणे, धानोरी जकात नाका ते डी. वाय. पाटील कॉलेज (लोहगाव) व पुणे मनपा हद्दीपर्यंत रस्ता निर्माण करणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना कराव्यात. भूसंपादनाची प्रलंबित कामे मार्गी लावावी. तसेच खराडी जकात नाका (चूल मटण हॉटेल) येथून स. नं. १२३, १२४, १२५, १२०, ११९, ११८, ११७ मधून तालेरा यांच्या जमिनीच्या कडेने लोहगाव-वाघोली रस्त्याला जोडणारा नियोजित रस्ता विकसित करणे इ. मागण्यांचा समावेश होता.
मागण्यांच्या संदर्भाने, नार्वेकर यांनी आमदार बापूसाहेब पठारे व पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांशी अभ्यासपूर्ण चर्चा केली. यावेळी नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. येत्या २३ मार्च पूर्वी मतदारसंघातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पठारे म्हणाले, की “वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. रखडलेली विकासकामे त्वरित मार्गी लागली पाहिजेत. रस्ते व वाहतूक सुधारणा प्राधान्याने करण्यात आल्याच तरच वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल. वडगावशेरी मतदारसंघातील वाढती लोकसंख्येचा विचार दोन्ही प्रशासनाने करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने व पालिका प्रशासनाने मिळून याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व मागण्याची पूर्तता करावी.”