- पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे गौरवोद्गार
पुणे, :तांत्रिक व अत्यंत धकाधकीच्या वीजक्षेत्रामध्ये काळानुरुप आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम असल्याचे महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवरून सिद्ध केले आहे असे गौरवोद्गार महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी काढले.
जागतिक महिला दिनानिमित्त महावितरणकडून रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या ‘प्रकाशदीप’ सभागृहात पुणे परिमंडलातील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रादेशिक संचालक खंदारे बोलत होते.व्यासपीठावर मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंते सर्वश्री युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) माधुरी राऊत (वित्त व लेखा) यांची उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सर्व संवर्गातील महिला अधिकारी, अभियंता, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक गौरव करण्यात आला.
मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले की, महावितरणमध्ये महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे व त्या अतिशय सक्षमपणे काम करीत आहेत. कौटुंबिक व नोकरीच्या जबाबदाऱ्या एकाचवेळी सांभाळताना योग्य ताळमेळ साधण्याचे कसब महिलांमध्ये अधिक आहे.
‘महिला दिना’निमित्त आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सूर्यघर योजना व नवीकरणीय ऊर्जा याबाबत सहायक अभियंता शुभांगी क्षीरसागर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यानंतर खास महिलांसाठी संगीत रजनीचा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता ऐश्वर्या वस्त्रद यांनी केले. कार्यक्रमाला महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.