पुणे, दि. १७ : पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून निर्माण झालेले हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर,महापालिकेतील विरोधी पक्ष नेते निलेश निकम, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्करोगाचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात आणि त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही करावा लागतो. हीच बाब लक्षात घेत सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग ग्रीड’ तयार करण्यात येत असून या माध्यमातून राज्यातील रुग्णांना अधिक सक्षम आणि सुलभ उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि समन्वयित करण्यासाठी हे ग्रीड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.पुणे महानगरपालिका आणि आपुलकी फाउंडेशनच्या माध्यमातून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारण्यात आलेल्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कौतुक केले.स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, भारतातील पहिले पीपीपी मॉडेल वरील शासकीय दरात उपचार देणारे हे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी नागपूरमध्ये होते, त्यांची भेट घेऊन त्यांना अशा प्रकारचे हॉस्पिटल उभारत असल्याची माहिती दिली. त्यावेळेस त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना माहिती दिली की श्रीनाथ भिमाले हॉस्पिटल उभारत आहेत त्यांना सहकार्य करा. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव तात्काळ मंजूर झाला. त्यानंतर हॉस्पिटल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. पुणे महापालिकेने कोट्यावधी रुपयांची जमीन यासाठी उपलब्ध करून दिली आपुलकी हेल्थकेअर ने यासाठी तयारी दर्शवली आणि हे हॉस्पिटल आज नागरिकांच्या सेवेसाठी दाखल होत आहे याचा मला आनंद आहे.
कार्यक्रमास महानगपालिकेचे पदाधिकारी, आपुलकी फाउंडेशनचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रुग्णालयाची पाहणी करून विविध उपचार विभाग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे तसेच रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली.यावेळी महापालिका सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे व आपुलकी हेल्थकेअर लिमिटेडचे सुनील नहार, सचिन नहार व रवी जैन यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.पुणे व महाराष्ट्रभरातील नागरिकांना अत्याधुनिक- परवडणारी व जागतिक दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाणेर स्थित हे अत्याधुनिक, १५० खाटांचे कर्करोग आणि हृदयरोग रुग्णालय प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या रूग्णालयातील सर्व क्लिनिकल सेवा सीजीएचएस (शासकीय दरानुसार) दरांवर दिल्या जाणार आहेत. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रमुख आरोग्य सेवा योजनांची उपलब्धता असणार आहे. ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी समावेशकता आणि प्रवेश योग्यता सुनिश्चित होणार आहे.
“पुणे व महाराष्ट्रभरातील नागरिकांना अत्याधुनिक- परवडणारी व जागतिक दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाणेरमधील हे अत्याधुनिक, १५० खाटांचे कर्करोग प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. हे रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल. या रूग्णालयातील सर्व क्लिनिकल सेवा सीजीएचएस (शासकीय दरानुसार) दरांवर दिल्या जाणार आहेत. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रमुख आरोग्य सेवा योजनांची उपलब्धता असणार आहे. ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी समावेशकता आणि प्रवेश योग्यता सुनिश्चित होणार आहे.”-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपुलकी मेडिकल सेंटरविषयी – आपुलकी मेडिकल सेंटरची रचना अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे, ज्यामध्ये खालील प्रमुख क्षमता आहेत:या उपचार पध्दतीचे दर सी.जी. एच.एस. दरानुसार पुरविण्यात येणार आहे. या उपचार पध्दतीचा गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
लिनियर अॅक्सिलरेटर – ट्रूबीम, हायपरआर्क (भारतातील कोणत्याही पीपीपी प्रकल्पात अशा प्रकारची प्रथमच ही सेवा उपलब्ध करून दिली जाते आहे.)
डिजिटल पेट स्कॅनर
जीनोम सिक्वेन्सिंग सुविधा, संपूर्ण पॅथॉलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी सेवा
३ टेस्ला एमआरआय
१६० -स्लाइस सीटी स्कॅनर
तीन मॉड्यूलर ऑपरेटिंग थिएटर (२ मेजर + १ मायनर)
समर्पित २०-बेडेड आयसीयू/सीसीयू
८-बेडेड न्यूक्लियर मेडिसीन विभाग ( देशातील सर्वात मोठ्या विभागांपैकी एक)
२३-बेडेड किमोथेरपी वॉर्डचा व्यापक वापर
खाजगी, अर्ध-खाजगी आणि सामान्य वॉर्डचा समावेश
रूग्णांसाठी सर्व शासकीय वैद्यकीय योजना व अनुदान योजनांची उपलब्धता
खासगी विमा कंपन्यांच्या सेवेची उपलब्धता

