देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
मुंबई- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला असतानाच, दुसरीकडे महायुतीचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी फडणवीसांची जोरदार पाठराखण केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वसमावेशक भूमिकेचे असतानाही केवळ ते ‘ब्राह्मण’ असल्यामुळेच त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला आहे.
मंत्री गणेश नाईक यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली. देवेंद्र फडणवीस हे समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा याच भूमिकेचे आहेत. मात्र, ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेला, ज्याला राजकारण समजते त्याला हा सर्व प्रकार सहज लक्षात येईल, अशा शब्दांत नाईकांनी विरोधकांना सुनावले आहे. याचवेळी आजच्या बदलत्या राजकारणावर बोलताना त्यांनी, सध्याच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. तुम्ही केवळ स्वच्छ विचारसरणीचे आहात म्हणून लोक तुम्हाला निवडून देतील, याची आज शाश्वती राहिलेली नाही, अशी खंतही व्यक्त केली.

दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा मुंबईला गेलो, तेव्हा हैदराबादचा जीआर काढून त्याची अंमलबजावणी केली गेली, त्यावेळी आम्ही सरकारचे कौतुकही केले. काही प्रमाणपत्रे वाटली, पण त्यानंतर पुढे काय? असा सवाल जरांगे यांनी केला. सातारा संस्थानचा जीआर एका महिन्यात काढू म्हणेन आठ महिने उलटून गेले, तरीही तो निघालेला नाही. राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन अद्याप हवेतच आहे, ज्यांचे कुणबी रेकॉर्ड सापडले त्यांना व्हॅलिडीटी दिली जात नाही आणि शिंदे समिती आता रेकॉर्ड शोधत नाही, असा पाढाच त्यांनी वाचला.
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, माझे फडणवीसांबद्दल वैयक्तिक वाईट मत नाही. पण माझ्या समाजाचे वाटोळे होणार असेल तर मी तुमच्यापैकी कोणालाच मोजणार नाही. मला मित्र नकोत की मंत्र्यांशी संबंध नकोत, मला फक्त माझ्या समाजाची लेकरं मोठी करायची आहेत. फडणवीस म्हणतात की मंत्र्यांना किंमत नसते, मुख्यमंत्रीच सर्वकाही असतो; मग आमची प्रमाणपत्रे अचानक देणे का बंद झाले? हे सर्व नेमके काय चालले आहे? मराठ्यांनीच तुम्हाला मुख्यमंत्री केले होते हे लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल की तेच हुशार आहेत, तर शेतकरी आणि मराठा समाजही तितकाच हुशार आहे. फडणवीस तुम्ही काय, तुमच्या 50 पिढ्या जरी आल्या तरी मी मराठ्यांना धक्का लागू देणार नाही, असा इशारा देत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. सरकारने येत्या 30 मे पूर्वी सर्वांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, अन्यथा 30 मे पासून आपण पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे

