Home Blog Page 618

भोसरीत महेश लांडगे समर्थकांचा ‘महाविजयचा संकल्प’

प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी, पुणे (दि. २९ ऑक्टोबर २०२४) भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समर्थकांनी विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार केला.
मंगळवारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आणि प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन घेउन पदयात्रेला सुरवात करण्यात आली. बापुजी बुआ चौक – लांडगे लिंबाजी तालिम मित्र मंडळ – भैरवनाथ मंदिर- मारुती मंदिर – पीएमटी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पाहार घालून अभिवादन – संत तुकाराम मंगल कार्यालय येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी-आरपीआय-मित्र पक्ष महायुतीच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघातून आमदार महेश लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना नेते इरफान सय्यद, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते.
ढोल-ताशांचा गजर अन्‌ ‘जय श्रीराम’चा नारा..!

ढोल-ताशा पथकांचा दणदणाट करीत ४० हजार समर्थकांचा जनसमुदाय पदयात्र सहभागी झाला होता. ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. प्रमुख चौकांत भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल-ताशांवर पीएमटी चौकात आमदार महेश लांडगे यांनी ठेका धरला. समर्थक-हितचिंतकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विशेष म्हणजे, महायुतीच्या घटकपक्षांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. अत्यंत नियोजनबद्ध काढलेल्या पदयात्रेची संत तुकाराम महाराज मंगल कार्यालय येथे सांगता करण्यात आली.


‘‘१० वर्षे विकासाची.. निरंतर विश्वासाची..’’ या ध्येयाने ही निवडून विकासाच्या मुद्यांवर आम्ही लढवत आहोत. पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी अविरतपणे काम करीत राहीन, असा शब्द देतो. भोसरी पंचक्रोशीतील सर्व सहकारी, मित्र परिवार आणि हितचिंतकांनी तसेच, महायुतीच्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद आणि साथ यामुळे विजयी शंखनाद झाला आहे.

काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे-शिवाजीनगर मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी आज पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी मंत्री सचिन अहिर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष संजय मोरे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, श्रीकांत पाटील, आम आदमी पक्षाचे मुकुंद कीरदत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष उपाध्यक्ष अनिता ताई पवार आदि नेत्यांच्या उपस्थितीत बहीरट यांनी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताच बहिरट यांनी गोखले नगर भागातून आपल्या झंजावाती प्रचार यात्रेला सुरुवातही केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष तसेच अन्य मित्र पक्षांचे  कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार यात्रेला शिवाजीनगर भागातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे प्रचाराचा झंजावात पहिल्या दिवसापासूनच निर्माण होण्यास मदत झाली आहे. आज काढण्यात आलेली ही जीप यात्रा गोखले नगर, जनवाडी,जनता वसाहत, रामोशी वाडी, पीएमसी कॉलनी, पाच पांडव सोसायटी, वडारवाडी,दीप बंगला चौक,महाले नगर, गोलंदाज चौक, मंजाळकर चौक आदी भागातून काढण्यात आली. त्यावेळी मतदारांनीही उत्स्फूर्तपणे या जिप यात्रेचे आणि दत्ता बहिरट यांचे स्वागत केले. या भागातील गणेश मंडळे आणि अन्य सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही आवर्जून बहिरट यांचे स्वागत करताना त्यांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आनंद मंजाळकर, राजूभाऊ साने, प्रवीण डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश निकम, उदय महाले, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, राज दादा निकम, विनोद रणपिसे, अनिल पवार, राजाभाऊ भुतडा, अजित जाधव, विशाल जाधव, मेहबूब नदाफ आदी ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना दत्ता बहिरट म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत आपला निसटता पराभव झाला, त्याची चुटपुट काँग्रेस व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली होती, त्या निवडनुकीची कसर यावेळी भरून काढायचीच आणि शिवाजीनगर मध्ये परिवर्तन घडवायचेच असा निर्धार काँग्रेस व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी  केला आहे. मतदारसंघातील मतदारांनीही  माझ्या उमेदवारीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. यंदा शिवाजीनगर मतदार संघावर काँग्रेसचा झेंडा फडकावून विकासाच्या बाबतीत मागे राहिलेल्या या मतदारसंघाला न्याय मिळवून देण्याचे कार्य आपण निश्चितपणे करू आणि लोकांना अभिमान वाटेल अशा कार्याची पावती त्यांना देऊ अशी ग्वाही बहिरट यांनी दिली आहे.

कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मोठया मताधिक्याने विजयी होणार – माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे

पुणे-लोकसभेला महाविकास आघाडीने एकजुटीने काम केले आहे. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आम्हाला मतांची मोठी आघाडी मिळाली आहे. भाजपाने या मतदारसंघात  सर्व ताकद लावून देखील मतदारांनी  त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे वाटोळे केले आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अशा अनेक  समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. भाजपाने मतदारसंघात  सामाजिक सलोखा उध्वस्त केला आहे. गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिक भाजपाला  घरचा  रस्ता दाखवणार असून आमचा विजय निश्चित करणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. भवानी मातेचे  दर्शन घेतल्यानंतर  ते माध्यमांशी बोलत होते.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी  श्री भवानी मातेची आरती करून आशीर्वाद घेत भवानी पेठ येथून रॅली काढून नवी जिल्हा परिषद इमारत येथे आपला उमेदवारी अर्ज  दाखल केला. बँड व ढोलताशाच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत, पक्षाचे झेंडे फडकवत हजारो नागरिक व कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभागी झाले होते.

रॅलीच्या प्रारंभी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे  यांनी सपत्नीक श्री भवानी मातेला साडीचोळी व पुष्पहार अर्पण करून देवीचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी श्री भवानी माता मंदिर संस्थांच्या वतीने रमेश बागवे व त्यांच्या पत्नीचा स्वागत व सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी पुणे लोकसभा मतदारसंघाचे  काँग्रेस पक्षाचे प्रभारी जगदीश ठाकुर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ नेते अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी नगरसेवक रफिक शेख, लता राजगुरू, पुणे कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष गौतम महाजन, शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नरुद्दीन अली सोमजी, करण मखवानी, मंजूर भाई शेख, माजी नगरसेवक अविनाश बागवे, संगीता तिवारी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा थोरात, मृणाल वाणी, भोलासिंग अरोरा, जुबेरबाबू शेख  मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, युवक आघाडीचे गोविंद जाधव सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणेशहर प्रमुख संजय मोरे, जावेद भाई खान, महिला अध्यक्ष पल्लवी जावळे, चंद्रशेखर जावळे, डॉक्टर अमोल देवळेकर आदि प्रमुख नेते सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बरोबरच श्री भवानी मातेच्या मंदिरापासून मोठ्या जल्लोषात रॅलीला सुरुवात झाली. एकच वादा रमेश दादा, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. तिन्ही पक्षाचे झेंडे, पंजा निशाणीचे कटआउट कार्यकर्त्यांनी हाती घेऊन उस्फूर्तपणे रॅलीत सहभागी झाले होते. सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीने  बागवे यांच्यावर पुष्पवष्टी करण्यात येत होती. ठिकठिकाणी महिलांकडून  बागवे यांचे औक्षण करण्यात येत होते. 

चौका-चौकात फटाक्यांच्या आतषबाजीने रॅलीचे स्वागत करण्यात येत होते.  नागरिकांकडून हात उंचावून  यंदा तुमचाच विजय होणार अशा घोषणा देण्यात येत होत्या. तर ज्येष्ठ नागरिक हात दाखवत आशीर्वाद देत होते.

मराठी रंगभूमी, पुणेचा वैभवशाली इतिहास उलगडणार स्मरणिकेतून

25 वर्षांनंतर मुंबईत संस्थेतर्फे संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन
पुणे : गंधर्वभूषण जयराम शिलेदार आणि गानतपस्विनी पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने 25 वर्षांनंतर मुंबईत संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले असून या निमित्ताने संस्थेचा वैभवशाली इतिहास रसिकांना स्मरणिकेच्या माध्यमातून नव्याने अनुभवता येणार आहे.
संपूर्ण जग संक्रमणावस्थेतून जात असताना, नावाजलेल्या नाट्यसंस्था बंद पडत असताना दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून केवळ संगीत नाटकेच सादर करायची या निश्चयाने गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांनी दि. 1 ऑक्टोबर 1949 रोजी मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेतर्फे आयोजित पहिला प्रयोग संगीत सौभद्र या नाटकाचा होता. सुरुवातीस ही संस्था बिऱ्हाडी स्वरूपाची होती. सगळे कलावंत आपापल्या कुटुंबासह कंपनीत राहत असत. जुन्या नाटकांबरोबरच दर दोन-तीन महिन्यांनी नवीन नाटक सादर केले जात असे. त्यानंतर आजतागायत मराठी रंगभूमी, पुणे ही संस्था सातत्याने कार्यरत असून मराठी संगीत नाटकाला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न करीत आहे.
दि. 8 नोव्हेंबर ते दि. 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संगीत नाट्य महोत्सव दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी (दि. 8) गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत मृच्छकटिक तर दुसऱ्या दिवशी (दि. 9) संगीत संशयकल्लोळ आणि तिसऱ्या दिवशी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र या नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. दररोज दुपारी 3 वाजता नाट्यप्रयोग सुरू होणार आहे. नाट्य महोत्सव गंधर्वभूषण जयराम शिलेदार, गानतपस्विनी पद्मश्री जयमालाबाई शिलेदार आणि स्वरकीर्ती कीर्ती शिलेदार यांना समर्पित करण्यात आला असून त्यांचा संगीतमय जीवनप्रवास लघु माहितीपटाच्या माध्यमातून दाखविला जाणार आहे. संगीत रंगभूमीवरील आजचे आघाडीचे कलाकार निनाद जाधव, चिन्मय जोगळेकर, अस्मिता चिंचाळकर, भक्ती पागे, श्रद्धा सबनीस या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून नाटकांचे दिग्दर्शन दीप्ती भोगले यांचे आहे, अशी माहिती संस्थेच्या ज्येष्ठ गायक अभिनेत्री वर्षा जोगळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
संपूर्ण आयुष्य नाट्यसंगीत व रंगभूमीची सेवा करत असलेल्या दीप्ती भोगले लिखित संगीत नादलुब्ध मी, संगीत चंद्रमाधवी आणि संगीत स्वरविभ्रम या नाटकांच्या संहितांचे प्रकाशनही या प्रसंगी होणार आहे.
मराठी संगीत रंगभूमीचे अभ्यासक, कलाकार तसेच नाट्य रसिकांसाठी माहितीपूर्ण ठरेल अशी स्मरणिका या निमित्ताने प्रकाशित करण्यात येत आहे. या स्मरणिकेचे वैशिष्ट्य सांगताना संस्थेच्या प्रमुख दीप्ती भोगले म्हणाल्या, मराठी रंगभूमी, पुणेची वैभवशाली वाटचाल, संस्थेने सादर केलेली सुप्रसिद्ध संगीत नाटके, त्याविषयी गो. रा. जोशी, रा. शं. वाळिंबे, शरद तळवलकर अशा समीक्षक, लेखक, अभिनेत्यांनी काढलेले गौरवोद्गार, दुर्मिळ छायाचित्रे, जुन्या काळात नाट्य प्रयोगांच्या केलेल्या जाहिराती तसेच संस्थेच्या वाटचालीच्या वेगवेगळ्या टप्प्यात केलेले समारंभ, उपक्रम, त्यांचा आढावा या स्मरणिकेतून उपलब्ध होणार असून जुन्या जाणत्या रसिकांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळणार आहे. जयमालाबाई शिलेदार आणि कीर्ती शिलेदार यांनी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविताना केलेली अध्यक्षीय भाषणे या स्मरणिकेत पुर्नप्रकाशित करण्यात येत आहेत. या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिभा मतकरी, सुभाष सराफ यांच्या हस्ते होणार आहे.
जुन्या नाटकांबरोबरच संस्थेने संगीत अभोगी, श्रीरंग प्रेमरंग, संगीत मंदोदरी, संगीत चंद्रमाधवी ही आधुनिक संगीत नाटकेही रंगभूमीवर आणली आहेत तसेच कीर्ती शिलेदार यांच्या संकल्पनेतून सखी मीरा हा एकपात्री संगीत नाट्यविष्कारही रसिकांसमोर आणला आहे.
मराठी रंगभूमी, पुणेने आयोजित केलेल्या संगीत नाट्यमहोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि संगीत नाटकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

सहस्त्र दीपोत्सवाने लखलखली श्रीमंत गायकवाड सरकार सदर श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान तर्फे आयोजन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय… यदुवंशभूषण सेनाखासखेल समशेर बहाद्दर बडोदा संस्थान संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार की जय… जय भवानी… जय शिवाजी…अशा जयघोषात श्रीमंत गायकवाड सरकार सदरेचा परिसर दणाणून निघाला. निमित्त होते वसुबारसच्या पवित्र दिनी श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान कार्यक्षेत्र अखंड भारत, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान दावडी, समस्त ग्रामस्थ दावडी निमगाव यांच्या वतीने सलग पाचव्या वर्षी शिवशके ३५१ रोजी सायंकाळी श्रीमंत गायकवाड सरकार सदर, गायकवाड किल्ला, दावडी येथे आयोजित गोमाता पूजन आणि सहस्त्र दिपोत्सव सोहळ्याचे.

यावेळी प्रतिष्ठानचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित सुरेशराव गायकवाड, सचिव प्रविण दत्ताजी गायकवाड, बाबासाहेब दिघे, विलासराव गायकवाड, गणेश गायकवाड, काळुराम गायकवाड, रवींद्र गायकवाड, मयूर कोहिनकर तसेच महाराष्ट्रातून आलेले गायकवाड स्वराज्य घराणे आणि महिला मंडळ उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात गायकवाड स्वराज्य घराण्यातील महिलांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, बडोदा संस्थान संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन तसेच गायकवाड सरकार तख्ताचे पूजन करुन करण्यात आली.

खेड तालुक्यातील दावडी गाव हे शिवकालात अतुलनीय पराक्रम गाजवलेल्या समस्त गायकवाड स्वराज्य घराण्याचे मूळ गाव‌. येथूनच गायकवाड स्वराज्य घराण्याचा विश्व विस्तार झाला. येथूनच गायकवाड यांनी शिवरायांनी संस्थापलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावत स्वराज्य विस्तारासाठी कूच करुन बडोदा गुजरात जिंकून स्वराज्याचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. पुढे गायकवाडांचे थोरले घर हे बडोदा नरेश म्हणून स्थिरावले. दावडीमध्ये गायकवाड यांचा ७१२ वर्षांपूर्वी पूर्वी बांधलेला भूईकोट किल्ला आहे. किल्यातील गायकवाड सरकार वाड्यामध्ये आजही गायकवाडांची गादी आहे. 

याच “श्रीमंत गायकवाड सरकार सदरेवर” वसुबारसेच्या पवित्र दिनी सहस्त्रदिप मानवंदना व गौमाता पूजन हा कार्यक्रम श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, ६ जून सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक तसेच स्वराज्य घराण्यांची वज्रमूठ निर्माण करुन १९ फेब्रुवारीला विश्वातील सर्वात मोठ्या शिवजयंती सोहळ्याचे प्रवर्तक अमित सुरेशराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून गेले ४ वर्षापासून सुरु झाला.

गायकवाड स्वराज्य घराण्याचा विश्व विस्तार येथून जरी झाला असेल तरी विश्वभर पसरलेल्या गायकवाड स्वराज्य घराणे हे स्वतःच्या उगमस्थाना पासून दुर होते. गायकवाड घराण्यातील सदस्यांना आपले मूळ गाव, सकल इतिहास ज्ञात नव्हता. श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे सचिव वंशवेलकार इतिहास संशोधक श्री प्रविणभय्या दत्ताजी गायकवाड (चांदखेड) यांनी स्वसंशोधनातून हा गौरवशाली इतिहास सप्रमाण गायकवाड स्वराज्य घराण्यापर्यंत पोहचवला.

गायकवाड म्हणाले शिवजयंती १९ फेब्रुवारीला २०१५ साली शिवजन्नोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात गायकवाड स्वराज्य घराण्याचा रथ सहभागी झाला आणि विश्वभरातील गायकवाड एकत्र येण्याची मुहूर्त मेढ रोवली गेली. तदनंतर २०२० साली आम्ही सदरेचा जिर्णोध्दार करुन पानिपत वीर श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांना मानवंदना देणारा कार्यक्रम १४ जानेवारी २०२० रोजी पानिपत शौर्य दिनी सदरेवर घेतला. त्याच वर्षी वसुबारसेला गोमाता पूजन आणि सहस्त्र दिपोत्सव सोहळ्याने दिवाळीमध्ये सदर उजाळून निघाली.

महायुतीतील सर्व बंड, एकापाठोपाठ होताहेत थंड-मुरलीधर मोहोळांची शिष्टाई अन त्याच त्याच चेहऱ्यांची पुन्हा पुन्हा भलाई

पुणे- कोथरूड मधील अमोल बालवडकर यांनी जाहीर आरोळी ठोकून सुरु केलेले बंड एका रात्रीत थंड झाल्यावर आज श्रीनाथ भिमाले यांची मी लढणार आणि मीच जिंकणार हि tagline देखील गळून पडली, त्यांनी माघार घेत मी पक्षासाठीच काम करणार हे धोरण स्वीकारले तर तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवे पण ३० वर्षे हिंदुत्ववादाला दिलेला कार्यकर्ता नकोय असे म्हणत कसब्यातील उमेदवारीला आव्हान देणारे धीरज घाटे यांचा जोश हि मावळला.’मुरली अण्णांनी थोपटता दंड … भले भले राठी महारथी पडले थंड’ असे म्हटले तर नवल वाटू नये अशी स्थिती पुण्यात दिसू लागली आहे.

पुण्यातील पर्वती मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीला आव्हान देत भिमाले यांनी मतदार संघात जोरात तयारी सुरु केली होती आणि पक्षनेते आपल्यालाच उमेदवारी देणार असाच दृढ निश्चय ठामपणे वारंवार जाहीर केला होता पण आयत्या वेळी पुन्हा ये माझ्या मागल्या झाले माधुरी यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने पक्षातील इच्छुक श्रीनाथ भिमाले हे नाराज झाले . तर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक हरलेले हेमंत रासने यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे हे देखील नाराज झाले होते. कोणताही नवा चेहरा न देता त्याच त्याच चेहऱ्यांना पुन्हा पुन्हा का उमेदवारी देता ? कार्यकर्त्यांना प्रश्न सतावू लागला आणि भाजपात बंडाचे वारे फिरू लागले पण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांना आता हे वारे थोपवावे लागत आहे. बालवडकर यांच्या नंतर आता त्यांना भिमाले आणि घाटे या दोघांचीही नाराजी दूर करण्यात यश आले. त्यामुळे हे दोन्ही नेते कसबातील भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास दाखल झाले. भिमाले यांना तर मिसाळ भेटल्या देखील नसल्याचे सांगण्यात आले पण त्यांच्यासाठी नेत्यांनी भिमालेंची समजूत काढली .

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ३० वर्ष हिंदुत्वाचे काम करुनही पक्ष उमेदवारीसाठी दखल घेत नसल्याची जाहीर नाराजी फेसबुकवर व्यक्त केली होती. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली होती. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी पुढाकार घेतला. याबाबत माेहाेळ म्हणाले, पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागा महायुती जिंकेल. भाजप जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असणारी संघटना असून केवळ संघटनाच नाही तर आमचा परिवार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची इच्छा हाच आदेश मानण्याचे संस्कार भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांत आहेत. याच दृष्टीने श्रीनाथ भिमाले यांची भेट घेऊन त्यांच्याशी राजकीय स्थितीवर चर्चा केली. त्यांचे संपूर्ण समाधान झाले असून ते आता निवडणुकीत सक्रीय असणार आहेत.

‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”

अहिल्यानगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय रणधुमाळी सुरु आहे. सर्वपक्षीयांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. त्यातच आता ‘निर्भय बनो’ कडून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सशर्त पाठिंबा देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते, ऍड असीम सरोदे (Adv Asim Sarode) यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत ‘निर्भय बनो’ चळवळीतून घेतलेल्या सभांना मोठा प्रतिसाद मिळून सत्ताधारी भाजप सरकारला (BJP Govt) चांगलाच फटका बसला.

त्यावेळी महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु यावेळी महाविकास आघाडीला बिनशर्त ऐवजी सशर्त पाठिंबा दिला जाईल. काही विकासात्मक बाबींचा जाहीरनामा आम्ही आघाडीकडे दिला आहे, अशी माहिती ऍड. असिम सरोदे यांनी अहिल्यानगरमध्ये बोलताना दिली.

ऍड. सरोदे म्हणाले, लोकसभेपूर्वी ‘निर्भय बनो’ चळवळीतून राज्यात ७५ सभा घेतल्या. त्यातून साडेतीन टक्के मतांचे परिवर्तन झाले. भाजप सरकारला याचा फटका बसून महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार निवडून आले. त्यामुळे आता विधानसभेलाही सभांची मागणी वाढली आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आली तर शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार या मूलभूत बाबींवरील खर्चाची तरतूद वाढवून सामान्यांना न्याय द्यावा, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे.

आघाडीचे सरकार आले तर त्यांनी लाडकी बहीण ऐवजी धाडसी बहीण योजना आणावी. यात सरकारने ५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज महिलांना देऊन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या योजनेसाठी सकारात्मकता दर्शवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठ उभारावे, असा प्रस्ताव आहे, अशी माहिती ऍड. सरोदे यांनी दिली.

सावित्रीबाई व ज्योतीबांच्या विचारांचा शंभराहून अधिक कवींनी केला जागर

पुणे: देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत आयोजित भिडेवाडा कवीसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या पुढाकारातून गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या सभागृहात रविवारी हे कवीसंमेलन झाले. जवळपास शंभराहून अधिक फुलेप्रेमी कवींनी आपल्या रचना सादर केल्या.

पुणे, नांदेड, सातारा, सांगली, नाशिक, सोलापूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, कोल्हापूर, बेळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यातील, तसेच तेलंगणा, कर्नाटक राज्यांतून आलेल्या कवींनी या राज्याच्या विविध भागातून आलेल्या कवींनी देशातील मुलींची पहिली शाळा (भिडेवाडा) यावर अतिशय सुंदर, वैविध्यपूर्ण, प्रबोधनपर रचना सादर केल्या.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, तो घराघरात पोहोचावा या उद्देशाने ‘भिडेवाडा काव्यजागर अभियान’ राबविण्यात येत आहे. या संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संमेलननात सहभागी सर्व कवयित्रींनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत रचना सादरीकरण केले.


साधना शेळके (पुणे), प्रतिभा कीर्तीकर्वे (पुणे), उमेश शिरगुप्पे (गोवा), मनोज भारशंकर (अबुधाबी), नंदा मघाडे (जळगाव), पूनम पाटील (जळगाव) या फुलेप्रेमी कवींना आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले. गुलटेकडी येथील विमलाबाई लुंकड शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशातील मुलींच्या पहिल्या शाळेवर प्रबोधनपर पोवाडा सादर केला. शिक्षिका वर्षा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विजय वडवेराव यांनी केले. सूत्रसंचालन सरिता कलढोणे, कांचन मून, तेजश्री पाटील आणि कविता काळे यांनी केले. आभार साधना शेळके यांनी मानले.

कोणताही वाद नाही,जिंकणार निर्विवाद :बापूसाहेब पठारे

वसुबारसच्या मुहूर्तावर बापूसाहेब पठारेंचा उमेदवारी अर्ज दाखल

​ पुणे:वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सोमवार,दि. २८ ऑक्टोबर रोजी रॅली काढत अर्ज दाखल केला.निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारावकर यांच्याकडे अर्ज दाखल केला.

यावेळी प्रकाश म्हस्के, भिमराव गलांडे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, राजेंद्र उमाप, किशोर विटकर, भयासाहेब जाधव, काँगेसचे माजी नगरसेवक सुनील मलके, संगीता देवकर, राजू ठोंबरे, रमेश सकट, विल्सन चंदेवळ, शिवसेनेचे सागर माळकर, आनंद गोयल, नितीन भुजबळ, शांताराम खलसे, राजेंद्र खांदवे, आशिष माने, शैलेश राजगुरू, आम आदमी पक्षाचे अमित म्हस्के, आरपीआयचे सचिन खरात यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पक्ष (सचिन खरात गट) व इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पक्ष (सचिन खरात गट) व इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.बापूसाहेब पठारे यांनी वसुबारसच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला.तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.

खराडी गाव ते येरवडा क्षेत्रीय कार्यालय या मार्गाने शक्तिप्रदर्शन करत महानिर्धार रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. २००९-२०१४ मध्ये ज्या पद्धतीने वडगावशेरी मतदारसंघात मूलभूत पायाभूत सुविधांची उभारणी करत एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यात यशस्वी ठरलो होतो, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातही शर्थीचे प्रयत्न करणार आहे. ​रोजगार,महिला सुरक्षा,शहर नियोजन,वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न यांसारख्या समस्यांवर प्राधान्याने तोडगा काढणार आहोत. त्याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी काम करणार असल्याचेही माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.

​​कोणताही वाद नाही,जिंकणार निर्विवाद :बापूसाहेब पठारे

यावेळी पत्रकारांशी बोलताना बापूसाहेब म्हणाले,’कार्यकर्ते आणि जनतेच्या जीवावर मी शंभर टक्के निवडणूक जिंकणार आहे.विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता विकास या मुद्द्यावर निवडणूक लढविणार आहे.​विरोधकांशी कोणताही वाद घालत बसणार नाही,पण ,जिंकणार हे निर्विवाद ​आहे.हा मतदार संघ चुकीच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न झाले.नियोजनशून्य विकास नको तर नियोजनबद्ध विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे.त्यामुळे माझा विजय पक्का आहे.दिवाळीपासूनच आमचे विजयाचे फटाके वाजणार आहेत.

महायुतीचा निषेध करत डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा ‘आरपीआय’च्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

रामदास आठवले यांच्याकडे राजीनामा सुपूर्त; महायुतीकडून ‘आरपीआय’ला सन्‍मानाची वागणूक मिळत नसल्‍याची खंत

पुणे: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्‍या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) पुण्यातून धक्‍का बसला आहे. पक्षाचे प्रमूख पदाधिकारी तथा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपल्‍या पक्ष सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे. डॉ. धेंडे यांनी रामदास आठवले यांच्यासह पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्‍याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. महायुतीमध्ये आरपीआयला सन्‍मानाची वागणूक मिळत नाही, अशी खंत त्‍यांनी आठवले यांना पाठविलेल्‍या पत्रात व्‍यक्‍त केली आहे. डॉ. धेंडे यांच्‍या या भूमिकेचा वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

डॉ. धेंडे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिलेल्‍या पत्रात ‘मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्‍हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्‍या आरपीआय पक्षामध्ये गेली २७ वर्ष कार्य करत आहे. आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासह राजकीय पदाचा उपयोग करून समाजाला न्याय देण्याच्‍या कामात पुढाकार घेतला आहे. पक्षाच्‍या धोरणानुसार विविध राजकीय भूमिकेला नेहमीच समर्थन दिलेले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून आरपीआयला महायुतीकडून सन्मानाची वागणूक दिली जात नाही. तशा भावना पदाधिकारी, कार्यकर्ते देखील बोलून दाखवत आहेत.’

नुकत्‍याचा पार पडलेल्‍या लोकसभा निवडणूकीतही एकही जागा महायुतीने आपल्या पक्षाला दिलेली नाही. तसेच या विधानसभेमध्ये पक्षाला स्वतंत्र निवडणूक चिन्ह असूनही आपले प्रतिनिधीत्व द्यायला महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष तयार नाहीत असे दिसत आहे. सर्व आंबेडकरी जनतेमध्ये या विषयावर तीव्र नाराजीचा सूर आहे. प्रसार माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. पुणे शहरामधील अनेक कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आहे. त्‍यानंतर मी पक्ष सदस्त्वाचा त्याग करत आहे. माझा राजीनामा मंजूर करावा, असे या पात्रात डॉ. धेंडे यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांना लिहिले आहे.

गेल्‍या दहा वर्षांपासून भाजपासह महायुतीला आरपीआयने राजकीय समर्थन दिले आहे. मात्र महायुतीकडून पक्षाला केवळ गृहित धरण्याचे काम केले जात आहे. सन्‍मानाची वागणूक दिली जात नाही. यामुळे आंबेडकरी अनुयायी दुखावले आहेत. नाराजी व्‍यक्‍त करत आहेत. त्‍यांचा लोकप्रतिनिधी या नात्‍याने मी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्‍याकडे पाठविला आहे.

– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

प्रचंड शक्तिप्रदर्शन करत मनिष आनंद यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : विधानसभा निवडणूकीत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असेलले उमेदवार, खडकी कॅंटॉन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनिष आनंद यांनी सोमवारी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.एकच आनंद.. मनिष आनंद च्या घोषणांनी संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडल्याचे पाहायला मिळाले.मनिष आनंद यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुळा रोड येथील त्यांच्या कार्यालयापासून भव्य रॅलीची सुरुवात झाली. यामध्ये मनिष आनंद यांचे शेकडो समर्थक सहभागी झाले होते.खडकी, बोपोडी,औंध रोड,मॉडेल कॉलनी मार्गे निघालेल्या या रॅलीचा समारोप घोले रोड येथे करण्यात आला. यानंतर मनिष आनंद यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी पत्रकारांशी बोलताना मनिष आनंद म्हणाले, काल सायंकाळी कॉँग्रेस पक्षाने छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आमच्या सहकाऱ्याला उमेदवारी जाहीर केली, आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी माघार नको ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ज्या प्रमाणे आम्ही ठरवले होते त्या प्रमाणेच त्या त्या भागानुसार प्रचाराला सुरुवात करणार आहोत, आम्ही केलेली कामे जनतेसमोर आहेत त्याच कामांच्या आधारे जनतेला मी आशीर्वाद मागणार आहे असे मनीष आनंद म्हणाले

महायुतीचे ऐक्याचे शक्तीप्रदर्शन आमदार शिरोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे – महायुतीतील सर्व पक्षांच्या ऐक्याचे शक्तीप्रदर्शन करत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज आज (सोमवारी) दाखल केला.

शिवाजीनगरचे ग्रामदैवत श्री रोकडोबाचे दर्शन आमदार शिरोळे यांनी घेतले आणि त्यानंतर घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पदयात्रेने जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. या पदयात्रेत महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहभागी झाले होते.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुती कटिबद्ध असून, मतदारांच्या विश्वासास पात्र ठरेल आणि महायुतीचे पुण्यातील सर्वच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघासाठी आमदार म्हणून सिद्धार्थ शिरोळे सतत पाच वर्षे कार्यरत राहिले. वाड्या-वस्त्यांवरही त्यांनी संपर्क ठेवला, असे मोहोळ यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिरोळे यांना शुभेच्छा दिल्या. पद यात्रे मध्ये महायुती तर्फे श्री दिपक मानकर, श्री दत्ता खाडे , श्री बाळासाहेब बोडके, श्री अभिषेक बोके, श्री संजय डोंगरे, श्री रमेश ठोसर, श्री युवराज शिंगाडे, श्री तम्मा विटकर उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांची उमेदवारी अर्ज दाखल

खा. अमोल कोल्हे, खा. वंदना चव्हाण यांची उपस्थिती

पुणे-
हडपसर विधानसभा महा विकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा हजारो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, खासदार वंदना चव्हाण व डॉ.अमोल कोल्हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना नेते वसंत मोरे, ऍड.जयदेव गायकवाड, बंडूतात्या गायकवाड, शहराध्यक्ष अंकुश काकडे, माजी नगरसेवक योगेश ससाणे, प्रविण तुपे, वंदना मोडक, सुनील जगताप, विशाल तांबे, रवींद्र माळवदकर, प्रशांत सुरसे, आदि सह कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वानवडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हडपसर मधील मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रशांत जगताप यांनी कन्यादान मंगल कार्यालय पासून पायी रॅली काढत विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रशांत जगताप यांच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला,
शरद पवार साहेबांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला असून हा समाजात चांगला मेसेज आहे हडपसर विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात येथील विकास कामे झाली नाही तसेच नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे हडपसर मध्ये परिवर्तन घडवणार जनता माझ्या पाठीशी उभा राहणार असा विश्वास उमेदवार प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशांत जगताप यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणावे असे आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांनी केला.

काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचा चांदिवलीतुन उमेदवारी अर्ज दाखल.

मुंबई:-
काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी आज चांदिवली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी १० वाजता साकीनाका मेट्रो स्टेशनपासून ९० फूटरोड, काजूपाडा पाईपलाईन मार्गे एलबीएस रोड अशी भव्य रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करत विद्याविहार येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नसीम खान यांनी नामांकन अर्ज दाखल केला.

नसीम खान यांच्या रॅलीत साकीनाका ते विद्याविहार निवडणूक कार्यालयापर्यंत सुमारे ८ ते १० हजार लोकांचा जनसागरच उसळला होता. जागोजागी महिलांनी त्यांची आरती ओवाळून निवडणुकीत विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिला. ठिकठिकाणी पुष्प वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, शिवसेना (उबाठा) गटाचे विजू शिंदे, सोमनाथ सांगळे, एस. अण्णामलाई, बालाजी सांगळे, सनी आचरेकर, प्रशांत नलगे, हिरालाल यादव, बालकृष्ण गटे, मयूर राठोड, उमाकांत भांगिरे, प्रशांत मोरे, चंदन सावंत, साईनाथ कटके राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे मुंबई सरचिटणीस बाबू बत्तेली, तालुका अध्यक्ष अबू स्वालेहा, रत्नाकर शेट्टी, व्यासदेव पवार, चेतन जाधव, फरमान राईन, शांताराम मोरे, आरिफ शेख, राजेंद्र ढवळे, महिला तालुका अध्यक्षा छाया मयेकर यांच्यासह समाजवादी पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांच्या मोठ्या गर्दीने शक्ती प्रदर्शन करीत सुनिल टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : मोठ्या संख्येने महील सहभागी झालेल्या मिरवणुकीने आणि दुचाकी रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघातून शक्ती प्रदर्शन करीत वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार सुनिल टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत महायुतीचे सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी धानोरी गाव येथील ग्राम दैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आमदार सुनिल टिंगरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित दुचाकी रॅलीला सुरवात झाली. धानोरी, विश्रांतवाडी, नागपूर चाळ मार्ग येरवडा येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी मतदार संघातील सर्व भागातील नागरिक आणि महिला उस्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. त्यात तरुण वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सेनेच्या नेहा शिंदे, सुनील जाधव, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे, भाजपचे माजी नगरसेवक सुनिता गलांडे, संदीप जराड, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका उषा कळमकर, मीनल सरोदे, चंद्रकांत टिंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार सुनील टिंगरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांची उपस्थिती लक्षवेधक होती. महायुती सरकारची महिलांसाठी लोकप्रिय असलेली लाडकी बहिण योजनेचा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील हजारो महिलांना लाभ मिळत आहे. त्यामुळे महिला वर्गाने आपली उपस्थिती दाखवत आभार व्यक्त केले.

गेल्या पाच वर्षात मतदार संघात दिड हजार कोटींची विकासकामे केली. त्या विकास कामांच्या जोरावर सर्व घटकाना समवेत घेऊन या निवडणुकीला सामोरे जाऊ. विरोधकांकडे मुद्देच नसल्याने ते चिखल फेक करीत असले तरी आमचा अजेंडा मतदार संघाचा विकास हाच राहील. त्याच जोरावर या निवडणुकित निश्चित पणे यश मिळवू.
– आमदार सुनिल टिंगरे
उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, वडगाव शेरी.