पुणे-शिवाजीनगर मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी आज पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी मंत्री सचिन अहिर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष संजय मोरे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, श्रीकांत पाटील, आम आदमी पक्षाचे मुकुंद कीरदत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष उपाध्यक्ष अनिता ताई पवार आदि नेत्यांच्या उपस्थितीत बहीरट यांनी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करताच बहिरट यांनी गोखले नगर भागातून आपल्या झंजावाती प्रचार यात्रेला सुरुवातही केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष तसेच अन्य मित्र पक्षांचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार यात्रेला शिवाजीनगर भागातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे प्रचाराचा झंजावात पहिल्या दिवसापासूनच निर्माण होण्यास मदत झाली आहे. आज काढण्यात आलेली ही जीप यात्रा गोखले नगर, जनवाडी,जनता वसाहत, रामोशी वाडी, पीएमसी कॉलनी, पाच पांडव सोसायटी, वडारवाडी,दीप बंगला चौक,महाले नगर, गोलंदाज चौक, मंजाळकर चौक आदी भागातून काढण्यात आली. त्यावेळी मतदारांनीही उत्स्फूर्तपणे या जिप यात्रेचे आणि दत्ता बहिरट यांचे स्वागत केले. या भागातील गणेश मंडळे आणि अन्य सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही आवर्जून बहिरट यांचे स्वागत करताना त्यांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आनंद मंजाळकर, राजूभाऊ साने, प्रवीण डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश निकम, उदय महाले, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, राज दादा निकम, विनोद रणपिसे, अनिल पवार, राजाभाऊ भुतडा, अजित जाधव, विशाल जाधव, मेहबूब नदाफ आदी ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना दत्ता बहिरट म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत आपला निसटता पराभव झाला, त्याची चुटपुट काँग्रेस व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली होती, त्या निवडनुकीची कसर यावेळी भरून काढायचीच आणि शिवाजीनगर मध्ये परिवर्तन घडवायचेच असा निर्धार काँग्रेस व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मतदारसंघातील मतदारांनीही माझ्या उमेदवारीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. यंदा शिवाजीनगर मतदार संघावर काँग्रेसचा झेंडा फडकावून विकासाच्या बाबतीत मागे राहिलेल्या या मतदारसंघाला न्याय मिळवून देण्याचे कार्य आपण निश्चितपणे करू आणि लोकांना अभिमान वाटेल अशा कार्याची पावती त्यांना देऊ अशी ग्वाही बहिरट यांनी दिली आहे.