पुणे- कोथरूड मधील अमोल बालवडकर यांनी जाहीर आरोळी ठोकून सुरु केलेले बंड एका रात्रीत थंड झाल्यावर आज श्रीनाथ भिमाले यांची मी लढणार आणि मीच जिंकणार हि tagline देखील गळून पडली, त्यांनी माघार घेत मी पक्षासाठीच काम करणार हे धोरण स्वीकारले तर तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवे पण ३० वर्षे हिंदुत्ववादाला दिलेला कार्यकर्ता नकोय असे म्हणत कसब्यातील उमेदवारीला आव्हान देणारे धीरज घाटे यांचा जोश हि मावळला.’मुरली अण्णांनी थोपटता दंड … भले भले राठी महारथी पडले थंड’ असे म्हटले तर नवल वाटू नये अशी स्थिती पुण्यात दिसू लागली आहे.
पुण्यातील पर्वती मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीला आव्हान देत भिमाले यांनी मतदार संघात जोरात तयारी सुरु केली होती आणि पक्षनेते आपल्यालाच उमेदवारी देणार असाच दृढ निश्चय ठामपणे वारंवार जाहीर केला होता पण आयत्या वेळी पुन्हा ये माझ्या मागल्या झाले माधुरी यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने पक्षातील इच्छुक श्रीनाथ भिमाले हे नाराज झाले . तर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक हरलेले हेमंत रासने यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे हे देखील नाराज झाले होते. कोणताही नवा चेहरा न देता त्याच त्याच चेहऱ्यांना पुन्हा पुन्हा का उमेदवारी देता ? कार्यकर्त्यांना प्रश्न सतावू लागला आणि भाजपात बंडाचे वारे फिरू लागले पण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांना आता हे वारे थोपवावे लागत आहे. बालवडकर यांच्या नंतर आता त्यांना भिमाले आणि घाटे या दोघांचीही नाराजी दूर करण्यात यश आले. त्यामुळे हे दोन्ही नेते कसबातील भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास दाखल झाले. भिमाले यांना तर मिसाळ भेटल्या देखील नसल्याचे सांगण्यात आले पण त्यांच्यासाठी नेत्यांनी भिमालेंची समजूत काढली .
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ३० वर्ष हिंदुत्वाचे काम करुनही पक्ष उमेदवारीसाठी दखल घेत नसल्याची जाहीर नाराजी फेसबुकवर व्यक्त केली होती. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली होती. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी पुढाकार घेतला. याबाबत माेहाेळ म्हणाले, पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागा महायुती जिंकेल. भाजप जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असणारी संघटना असून केवळ संघटनाच नाही तर आमचा परिवार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची इच्छा हाच आदेश मानण्याचे संस्कार भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांत आहेत. याच दृष्टीने श्रीनाथ भिमाले यांची भेट घेऊन त्यांच्याशी राजकीय स्थितीवर चर्चा केली. त्यांचे संपूर्ण समाधान झाले असून ते आता निवडणुकीत सक्रीय असणार आहेत.