पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय… यदुवंशभूषण सेनाखासखेल समशेर बहाद्दर बडोदा संस्थान संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार की जय… जय भवानी… जय शिवाजी…अशा जयघोषात श्रीमंत गायकवाड सरकार सदरेचा परिसर दणाणून निघाला. निमित्त होते वसुबारसच्या पवित्र दिनी श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान कार्यक्षेत्र अखंड भारत, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान दावडी, समस्त ग्रामस्थ दावडी निमगाव यांच्या वतीने सलग पाचव्या वर्षी शिवशके ३५१ रोजी सायंकाळी श्रीमंत गायकवाड सरकार सदर, गायकवाड किल्ला, दावडी येथे आयोजित गोमाता पूजन आणि सहस्त्र दिपोत्सव सोहळ्याचे.
यावेळी प्रतिष्ठानचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित सुरेशराव गायकवाड, सचिव प्रविण दत्ताजी गायकवाड, बाबासाहेब दिघे, विलासराव गायकवाड, गणेश गायकवाड, काळुराम गायकवाड, रवींद्र गायकवाड, मयूर कोहिनकर तसेच महाराष्ट्रातून आलेले गायकवाड स्वराज्य घराणे आणि महिला मंडळ उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात गायकवाड स्वराज्य घराण्यातील महिलांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, बडोदा संस्थान संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन तसेच गायकवाड सरकार तख्ताचे पूजन करुन करण्यात आली.
खेड तालुक्यातील दावडी गाव हे शिवकालात अतुलनीय पराक्रम गाजवलेल्या समस्त गायकवाड स्वराज्य घराण्याचे मूळ गाव. येथूनच गायकवाड स्वराज्य घराण्याचा विश्व विस्तार झाला. येथूनच गायकवाड यांनी शिवरायांनी संस्थापलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावत स्वराज्य विस्तारासाठी कूच करुन बडोदा गुजरात जिंकून स्वराज्याचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. पुढे गायकवाडांचे थोरले घर हे बडोदा नरेश म्हणून स्थिरावले. दावडीमध्ये गायकवाड यांचा ७१२ वर्षांपूर्वी पूर्वी बांधलेला भूईकोट किल्ला आहे. किल्यातील गायकवाड सरकार वाड्यामध्ये आजही गायकवाडांची गादी आहे.
याच “श्रीमंत गायकवाड सरकार सदरेवर” वसुबारसेच्या पवित्र दिनी सहस्त्रदिप मानवंदना व गौमाता पूजन हा कार्यक्रम श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, ६ जून सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक तसेच स्वराज्य घराण्यांची वज्रमूठ निर्माण करुन १९ फेब्रुवारीला विश्वातील सर्वात मोठ्या शिवजयंती सोहळ्याचे प्रवर्तक अमित सुरेशराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून गेले ४ वर्षापासून सुरु झाला.
गायकवाड स्वराज्य घराण्याचा विश्व विस्तार येथून जरी झाला असेल तरी विश्वभर पसरलेल्या गायकवाड स्वराज्य घराणे हे स्वतःच्या उगमस्थाना पासून दुर होते. गायकवाड घराण्यातील सदस्यांना आपले मूळ गाव, सकल इतिहास ज्ञात नव्हता. श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे सचिव वंशवेलकार इतिहास संशोधक श्री प्रविणभय्या दत्ताजी गायकवाड (चांदखेड) यांनी स्वसंशोधनातून हा गौरवशाली इतिहास सप्रमाण गायकवाड स्वराज्य घराण्यापर्यंत पोहचवला.
गायकवाड म्हणाले शिवजयंती १९ फेब्रुवारीला २०१५ साली शिवजन्नोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात गायकवाड स्वराज्य घराण्याचा रथ सहभागी झाला आणि विश्वभरातील गायकवाड एकत्र येण्याची मुहूर्त मेढ रोवली गेली. तदनंतर २०२० साली आम्ही सदरेचा जिर्णोध्दार करुन पानिपत वीर श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांना मानवंदना देणारा कार्यक्रम १४ जानेवारी २०२० रोजी पानिपत शौर्य दिनी सदरेवर घेतला. त्याच वर्षी वसुबारसेला गोमाता पूजन आणि सहस्त्र दिपोत्सव सोहळ्याने दिवाळीमध्ये सदर उजाळून निघाली.