अहिल्यानगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय रणधुमाळी सुरु आहे. सर्वपक्षीयांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. त्यातच आता ‘निर्भय बनो’ कडून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सशर्त पाठिंबा देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते, ऍड असीम सरोदे (Adv Asim Sarode) यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत ‘निर्भय बनो’ चळवळीतून घेतलेल्या सभांना मोठा प्रतिसाद मिळून सत्ताधारी भाजप सरकारला (BJP Govt) चांगलाच फटका बसला.
त्यावेळी महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु यावेळी महाविकास आघाडीला बिनशर्त ऐवजी सशर्त पाठिंबा दिला जाईल. काही विकासात्मक बाबींचा जाहीरनामा आम्ही आघाडीकडे दिला आहे, अशी माहिती ऍड. असिम सरोदे यांनी अहिल्यानगरमध्ये बोलताना दिली.
ऍड. सरोदे म्हणाले, लोकसभेपूर्वी ‘निर्भय बनो’ चळवळीतून राज्यात ७५ सभा घेतल्या. त्यातून साडेतीन टक्के मतांचे परिवर्तन झाले. भाजप सरकारला याचा फटका बसून महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार निवडून आले. त्यामुळे आता विधानसभेलाही सभांची मागणी वाढली आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आली तर शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार या मूलभूत बाबींवरील खर्चाची तरतूद वाढवून सामान्यांना न्याय द्यावा, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे.
आघाडीचे सरकार आले तर त्यांनी लाडकी बहीण ऐवजी धाडसी बहीण योजना आणावी. यात सरकारने ५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज महिलांना देऊन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या योजनेसाठी सकारात्मकता दर्शवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठ उभारावे, असा प्रस्ताव आहे, अशी माहिती ऍड. सरोदे यांनी दिली.