Home Blog Page 61

पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा; आरोपीला जामीन नको, कठोर कारवाई – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांना फोन करून दिला धीर; शासन पूर्णपणे पाठीशी

‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत, शिक्षण व संरक्षण; भोंदूगिरीविरोधात कडक भूमिका

पालघर, दि.६ मे २०२६ : पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेत, त्यांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची मनःस्थिती जाणून घेतली आणि न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “या अत्यंत गरीब आणि दुर्बल कुटुंबाची एकच मागणी आहे – न्याय. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळता कामा नये. न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी पोलिसांशी समन्वय साधून प्रत्येक पाऊल उचलले जाईल.”

डॉ. गोऱ्हे यांनी पीडित मुलीच्या भविष्याचा मुद्दा विशेष महत्त्वाचा मानला. “मुलीला पुढे शिकायचे आहे आणि तिने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न व्यक्त केले आहे. तिच्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा राजकीय प्रभाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. “आरोपीला मदत करणारे, साक्षीदारांवर दबाव टाकणारे किंवा अन्य कोणताही अडथळा निर्माण करणारे व्यक्ती असतील, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे डॉ. गोऱ्हे यांनी बजावले.

डीएनए चाचणी, मजबूत पुरावा आणि साक्षीदार संरक्षणावर भर

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, डीएनए चाचणींसह सर्व वैज्ञानिक पुरावे गोळा करून खटला भक्कम बनवला जाईल. साक्षीदार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी निदर्शनास आणली. शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक ग्रामस्थ सतत पीडित कुटुंबासोबत राहतील, असेही त्यांनी आश्वासन दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर

भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी पीडित मुलगी, आई आणि बहिणीशी संवाद साधत त्यांना धीर दिला. “सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी तातडीने निर्देश दिले आहेत,” असा विश्वास कुटुंबीयांना दिला. तसेच शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडितेच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

पीडितेला सर्वांगीण मदत

प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार, पीडित मुलीला तातडीने ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत, पोलीस संरक्षण, वैद्यकीय उपचार आणि मानसिक समुपदेशन देण्यात येणार आहे. बालसंगोपन योजना, आदिवासी विकास विभागाची न्यूक्लिअस योजना आणि एकल महिलांसाठी उपलब्ध योजनांचा लाभही देण्यात येईल.

अंधश्रद्धेविरोधात जनजागृती

डॉ. गोऱ्हे यांनी अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात कडक भूमिका घेतली. “तंत्र-मंत्राच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह पॉक्सो कायद्यांतर्गत कठोर कलमे लावण्यात यावीत,” अशी विनंती त्यांनी केली.

राज्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष वेधत त्यांनी फास्टट्रॅक न्यायालयांची संख्या वाढवण्याची मागणी केली. अपेक्षित १३८ पैकी फक्त ४० न्यायालये कार्यरत असल्याने उर्वरित तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय बैठक

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, पोलिस उपअधीक्षक समीर महेर, पोलिस निरीक्षक अमर पाटील, उपविभागीय अधिकारी विशाल खत्री, जिल्हा महिला अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. तसेच, त्यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्याशीही दूरध्वनीवर सविस्तर चर्चा करून तपासाची गती, पुरावे संकलन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. आदिवासी भागात योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती शिबिरे आणि आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी शिवसेना माजी आमदार मनीषा निमकर, पालघर संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, अ‍ॅड. संगीता चव्हाण व महिला आघाडी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी, “पीडितेला न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत आरोपी सुटणार नाही,” असे ठाम आश्वासन यावेळी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात सेवानिवृत्तांचे पेन्शनसाठी धरणे आंदोलन

पुणे :  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (म.जी.प्रा.) मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून निवृत्ती वेतन मिळाले नसल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून आज पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. भीषण उन्हाळ्यात वयोवृद्ध कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत असल्याने तात्काळ पेन्शन तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

म.जी.प्रा. कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनाकडे निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच म.जी.प्रा. च्या मुकह्या अभियंता वैशाली आवटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष  एस. डी. देशपांडे, उपाध्यक्ष स. सी. आलेकर , कार्याध्यक्ष ए. जी. देशमुख, अरुण निर्भवणे,  गजानन गटलेवार,  ए. जी. देशमुख, सरचिटणीस संजय केळकर, डी . के. इनामदार,  प्रिया माळी, श्रीकांत राऊत  यांच्यासह शेकडो निवृत्त कर्मचारी , अभियंते उपस्थित होते. 

संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महालेखाकार कार्यालयाने लेखाशीर्ष गोठविल्यामुळे मार्च २०२६ पासून सेवानिवृत्ती वेतन देणे थांबवले आहे. तसेच वेतनासाठी वापरण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कोडची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी संपल्याने पुढील वेतन वितरण अशक्य झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिक संकटात सापडले असून त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. औषधोपचारांसाठीही पैसे उपलब्ध नसल्याने अनेकांची प्रकृती खालावत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेने नमूद केले की, २३ मार्च २०१७ रोजी शासनाने म.जी.प्रा. कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देऊन त्यांच्या वेतन व निवृत्ती वेतनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप पूर्णपणे झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर, शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित बाबी मार्गी लावाव्यात आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित पेन्शन अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

म.जी.प्रा. कर्मचारी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरुण निर्भवणे व सरचिटणीस गजानन गटलेवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

विरोधी पक्ष ही भाजपची “बी” टीम – चेतन पवार

पिंपरी, पुणे (दि. ६ मे २०२७) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्ष सक्षम भूमिका घेत नाही. या महापालिकेतील विरोधी पक्ष महाराष्ट्रात भाजप बरोबर सत्तेत सहभागी आहे. म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष ही भाजपची “बी” टीम असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष चेतन पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
बुधवारी (दि.६) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी उप जिल्हा प्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, उपशहर प्रमुख अमोल निकम, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, उपशहर प्रमुख राजाराम कुदळे, पार्थ गुरव, बाळासाहेब जम, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, उपजिल्हा संघटिका वैभवी घोडके, कल्पना शेटे, विभाग संघटिका बेबी सय्यद उपस्थित होते.
तत्पूर्वी शहर शिवसेनेच्या वतीने चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे नसरापूर आणि सहकारनगर पुणे येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच या घटनांची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. या घटनेबाबत भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील शिवसेनेने निषेध केला.
पत्रकार परिषदेत चेतन पवार यांनी सांगितले की, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन आणि संघर्ष करीत शिवसेना पक्षाची स्थापना केली. शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी नुकतीच माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड जिल्हा शहर अध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेल. आगामी काळात लवकरच पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघातील जुन्या, नव्या शिवसैनिकांना एकत्र घेऊन सर्वांशी योग्य समन्वय साधून नवीन शहर कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. यामध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कर्जबाजारी करणाऱ्या तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कारभाराची आणि नुकत्याच ५२ कोटी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराविषयी माहिती घेऊन न्यायालयात दाद मागण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिवसेनेला प्रतिनिधित्व नसले तरी दखील महापालिकेच्या कारभारावर व भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्यासाठी शिवसेनेचे प्रतिनिधी मंडळ नेमण्यात येईल. तसेच महिला सुरक्षा, पाणी, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, अतिक्रमण, कायदा, सुव्यवस्था याविषयी सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येतील आणि भाजपचा तसेच विरोधी पक्षांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते वेळोवेळी करतील असेही चेतन पवार यांनी सांगितले.

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग
(एपीटीएल) प्रणालींची स्थापना

मुंबई, दि.५ : देशातील अग्रगण्य कर्करोग उपचार व संशोधन केंद्र असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे निदान व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग प्रणाली (एपीटीएल) या तीन प्रगत यंत्रणांची यशस्वी स्थापना करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या नव्या प्रणालींमुळे नमुन्यांचे अचूक लेबलिंग आणि बारकोडिंग स्वयंचलित पद्धतीने होणार असून, मानवी त्रुटी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी, निदान प्रक्रियेत अचूकता वाढणार असून रुग्णांच्या सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होईल. तसेच, रुग्णालयातील क्लिनिकल वर्कफ्लो अधिक सुलभ आणि कार्यक्षम होणार आहे.

विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये निदानातील अचूकता आणि वेळेवर उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. एपीटीएल प्रणालीमुळे नमुने हाताळण्यातील गोंधळ, विलंब आणि चुकीची ओळख यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील. त्यामुळे डॉक्टरांना अधिक विश्वासार्ह अहवाल मिळून उपचार प्रक्रियेत गती येईल.

जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवांकडे आणखी एक पाऊल

या उपक्रमामुळे रुग्णालयातील प्रयोगशाळा व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत होऊन, जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांकडे आणखी एक पाऊल टाकले गेले आहे. सीएसआर च्या माध्यमातून अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांची उभारणी केल्याने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठी मदत होत आहे. या उपक्रमासाठी इंडियन ऑइल कंपनीने सहकार्य केले आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले.

निदान प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “टाटा मेमोरियल रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक एपीटीएल प्रणालीमुळे निदान प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि गती वाढणार आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची ही दिशा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. सीएसआर च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात होणारी ही गुंतवणूक भविष्यात अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी मोलाची ठरेल.”

दुचाकीवरून आईस्क्रीम विकणाऱ्याने केला १४ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग

पुणे : पुण्यातील नसरापूर आणि पर्वतीमधील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असताना आता मुळशी तालुक्यातून एक नवी धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील एका गावात दुचाकीवरून आईस्क्रीम विकणाऱ्या इसमाने १४ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारी २ च्या सुमारास पीडित मुलगी आपल्या लहान चुलत बहिणीसोबत आईस्क्रीम घेण्यासाठी आरोपी पिंटू शिवकुमार याच्याकडे गेली होती. आरोपीने (रा. सूस, ता. मुळशी, मूळ उत्तर प्रदेश) मुलीला जवळ घेऊन तिचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी दुचाकी घेऊन पळून गेला.

पीडित मुलीने घरी आल्यावर पालकांना सर्व प्रकार सांगितला. पालक आणि ग्रामस्थांनी तात्काळ आरोपीचा शोध घेत त्याला पकडले आणि पौड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. ही घटना समोर आल्याने परप्रांतीय फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील बालिका सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता

मुंबई दि. ६ : महाराष्ट्राच्या विकास प्रवासात विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या (जायका) या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता वैद्यकीय क्षेत्रातही सहकार्याची नवी दिशा निर्माण होणार आहे. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्यास उत्सुक असून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता घेण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यापूर्वी आसाम आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये यशस्वी प्रकल्प राबविल्यानंतर, जायका आता महाराष्ट्रातही ¬‘मेडिकल केअर सिस्टम’ मजबूत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. विशेषतः राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत समन्वय साधून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रस्तावित भागीदारीत खालील महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, सध्याच्या शासकीय वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिक निदान (डायग्नोस्टिक) यंत्रणा अधिक सक्षम करणे विशिष्ट आजारांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारणे. नवीन नर्सिंग आणि पॅरामेडिकल महाविद्यालयांची स्थापना करून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे. आरोग्य व्यवस्थापन प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सहाय्य, राज्य सरकारच्या वतीने या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, वैद्यकीय शिक्षण विभागाने आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची तयारी दर्शविली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय जळगांव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदूरबार व गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये १०० प्रवेश क्षमतेचे शासकीय बीएस्सी नर्सिंग विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व संलग्नित रूग्णालयांच्या पायाभूत सुविधांकरिता तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी, याकरिता ‘स्ट्रेन्थनिंग टर्शरी हेल्थ केअर डिलीव्हरी, मेडिकल एज्युकेशन सिस्टीम ॲण्ड नर्सिंग सिस्टीम इन महाराष्ट्र’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीकडून ३ हजार ७०८ कोटींचे वित्तीय सहाय्य उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पात वर्धा, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर या नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी तसेच मुंबईतील जीटी, सेंट जॉर्ज, धुळे, सोलापूर, अंबेजोगाई, अकोला, आयजीएमसी नागपूर, रत्नागिरी, पालघर, धाराशिव येथील नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. तर बारामती, सांगली (मिरज), कोल्हापूर येथील नर्सिंग महाविद्यालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय अहिल्यानगर, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, जालना, मुंबई, नाशिक, परभणी, सातारा, पालघर, रत्नागिरी, वर्धा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. तसेच भारत-जपान शैक्षणिक आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत रूग्णालय व्यवस्थापन व प्रशासन मानवसंसाधन विकास यांच्या क्षमता वृध्दीसाठी तरतूद करण्यात येणार आहे.

या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक होईल .त्यामुळे राज्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.एकूणच, जायका आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील ही प्रस्तावित भागीदारी आरोग्य क्षेत्रातील विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुण्याच्या महापौरांचे पोलिस आयुक्तांना पत्र:सीसीटीव्ही दुरुस्ती, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पडताळणीची मागणी

पुणे दिनांक ६ :
पुणे शहरात अलीकडेच नसरापूर व पर्वती परिसरात घडलेल्या लहान बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या अत्यंत गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

महापौरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कार्यक्षम असणे अत्यावश्यक आहे. सध्या अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचे आढळून येत असून, त्यांची तात्काळ दुरुस्ती व पुनर्स्थापना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

तसेच, शहरातील सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची योग्य ती पोलीस पडताळणी (Verification) व पार्श्वभूमी तपासणी (Background Check) सक्तीने करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती योग्य पडताळणीशिवाय सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत राहू नये, यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

याचबरोबर, नागरिकांनीही आपल्या परिसरात सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापौरांनी नमूद केले आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींची माहिती, नवीन भाडेकरूंची नोंद, संशयास्पद हालचाली याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क ठेवण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

महापौरांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :

  • शहरातील सर्व सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घेऊन त्या तातडीने कार्यान्वित कराव्यात.
  • सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांची सक्तीने पडताळणी व नोंदणी प्रक्रिया राबवावी.
  • पार्श्वभूमी तपासणीशिवाय कोणालाही सुरक्षा कर्मचारी म्हणून नेमणूक देऊ नये.
  • नागरिकांमध्ये सुरक्षा विषयक जनजागृती मोहीम राबवावी.

पुणेकर नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, या विषयाकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रभावी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली आहे.

प्राचार्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागणारे तीन पोलीस बडतर्फ

पुणे: एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देऊन सात लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पीएसआय अजित बडे, रिल्स स्टार पोलिस कर्मचारी सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे या तिघांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. संबंधित तिन्ही पोलिस कर्मचारी हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाले आहे.

अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी या बडतर्फीचे आदेश दिले आहेत. या तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हे तिघेही अद्याप फरार आहेत. यापूर्वी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.प्राचार्यांकडून खंडणी उकळण्यासाठी या तिघांनी एका अल्पवयीन मुलीचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यांचे हे वर्तन अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले जात आहे. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत सोनाली हिंगे, अजित बडे आणि सुदाम तायडे हे खंडणी उकळणे व धमकी देणे या प्रकारात दोषी आढळले आहेत.

या तिघांनी केलेल्या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे. तिघे फरार असल्याने ते विभागीय चौकशीला हजर राहू शकले नाहीत. फरार कालावधीत ते साक्षीदारांना धमकावू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.पोलिसांवर जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी त्यांना पोलिस दलातून बडतर्फ करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे विभागीय चौकशी बाजूला ठेवून, मिळालेल्या अधिकारानुसार संविधानातील कलम 311(2) नुसार या तिघांना बडतर्फ करण्यात आले आहे.

सिंहगडावर सूर्यास्त पाहताना तो १५० फुट दरीत कोसळला अन रात्री …..

पोलीस व आपत्ती व्यवस्थापनाने
रात्री वाचविले युवकाचे प्राण

पुणे-काल सिंहगड फिरण्यासाठी आलेले पर्यटक योगेश मोहन शितोळे वय 35 राहणार शिरूर हे सकाळी सिंहगड फिरण्यासाठी आले होते दुपारी साधारण साडेचार पाच वाजता ते सूर्यास्त पाहण्यासाठी पश्चिम दिशेला हवा पॉईंट या ठिकाणी दरिपाशी सूर्यास्ताचे फोटो घेण्यासाठी गेले होते पण काही वेळानंतर गवतावरतून त्यांचा पाय घसरून ते जवळपास खोल दीडशे फूट दरीमध्ये घसरत जाऊन पडले पडल्यानंतर काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली व संध्याकाळी सात साडेसातला ज्यावेळेस त्यांना शुद्ध आली त्यावेळेस त्यांनी तात्काळ 112 ला कॉल करून दरीमध्ये पडल्याची माहिती दिली.
त्यानंतर हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी अनिकेत काळे यांनी संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती हवी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला दिले तात्काळ त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू टीम व हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी सिंहगडावरती दाखल होऊन साधारण 150 ते 170 फूट खोलदरीमध्ये जाऊन त्यांना सुरक्षितरीत्या दरीमधून वर आणले व खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले व याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.
सहभागी झालेली रेस्क्यू टीम
तानाजी भोसले
संतोष भगत
गणेश सपकाळ
संजय चोरघे
नाना जरंडे
कृष्णा मरगळे
उत्तम पिसाळ
वैभव भोसले
पोलीस
अनिकेत काळे
प्रवीन तेलवाडे
#sinhgad #pune #पुणे

पुरंदर विमानतळासाठी प्रति एकर 1 कोटी 61 लाख 1 हजार 915 रुपये इतका मोबदला..6500 कुटुंबांना नोकरीचीही संधी!

पुणे: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ , बाधितांना जमिनीचा मोबदला देण्यास 7 मे पासून सुरुवात होणार असल्याची घोषणा पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे.या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असून येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना डुडी म्हणाले, पुरंदरमधील सात गावांतील सुमारे 1216 हेक्टर आणि अतिरिक्त 242 एकर जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऐतिहासिक दर जाहीर करण्यात आला असून, व्याजासहित प्रति एकर 1 कोटी 61 लाख 1 हजार 915 रुपये इतका मोबदला दिला जाईल.
विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या(Farmer)जमिनींत फळबागा आहेत, त्यांना दुप्पट दर मिळणार आहे. तसेच विहीर आणि बोरवेलसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. सरासरी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जवळपास 2 कोटी रुपये जमा होतील आणि या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही.जमीन संपादनाची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि सासवड उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत सात विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. 10 जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून, ज्या शेतकऱ्यांचा संमती करार पूर्ण होईल, त्यांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे तात्काळ पैसे जमा केले जातील. जे शेतकरी सहमती देणार नाहीत, त्यांच्या बाबतीत कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले
जमिनीच्या दराबाबत कोणताही संभ्रम मनात न बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.केवळ आर्थिक मोबदलाच नव्हे, तर बाधितांच्या भविष्याचा विचार करून प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या जाणाऱ्या जमिनीतील 6500 कुटुंबांतील प्रत्येकी एका सदस्याला नोकरी दिली जाणार आहे.तसेच, मोठ्या प्रमाणात हाती येणाऱ्या पैशांचा विनियोग कसा करावा, यासाठी गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. अशी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला आहे.

कायदा तोडणाऱ्या मागण्या : राज ठाकरेंना समजवावे, अन्यथा गुन्हा दाखल करावा


पुणे: नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला जरूर जास्तीतजास्त शिक्षा व्हावी पण शिक्षा देण्याबाबत बेकायदेशीर मागन्या नेत्यांनी तरी करू नये. असे केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा,किंवा बोलावून समज द्यावी अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी पोलिसांकडे केली आहे.
अत्याचार प्रकरणातील ६५ वर्षीय नराधमाला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावरील पोस्टमधून मांडली आहे. या भूमिकेला विरोध करत ठाकरे यांची मागणी बेकादेशीर असून आरोपीला कायद्यानुसारच कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका मांडत ॲड. सरोदे यांनी बेकादेशीर मागण्या करणाऱ्या ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अत्याचार प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसार निश्चित फाशीची शिक्षा होईल. पण ती होण्याआधी त्याचा चौरंग करा, त्याला हालहाल करून संपवा, अशा बेकायदेशीर मागण्या करणारे अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पोलिसांनी बोलावून घेऊन समज दिली पाहिजे किंवा अशा लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्या घटनेपुरता कायदा बाजूला ठेवून वागावं आणि नंतर पुन्हा लोकशाहीने वागावं, असे सोयीनुसार करता येत नाही, असे मत ॲड. सरोदे यांनी मांडले.

लक्ष्मीनगर मध्ये 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या वृत्ताने संतप्त खळबळ

पुणे : पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पर्वती पायथा परिसरात नागरिक संतप्त झाले आहेत.या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. संतप्त नागरिकांनी आरोपींना ताब्यात द्या अशी मागणी केलीय. पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यात ५० वर्षीय व्यक्तीकडून ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. सुदैवाने परिसरातील नागरिकांना हे लक्षात येताच मुलीची सुखरुप सुटका केली गेली आणि पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. काही नागरिकांनी हे सामूहिक अत्याचाराचं प्रकरण असल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. यावेळी नागरिकांनी आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली आहे.

मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्याचा प्रकार समोर येताच संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्वती पायथ्यापासून नवी पेठेपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर नागरिक उतरले आहेत. आरोपींना आमच्या ताब्यात द्यावं असं म्हणत नागरिक आक्रमक झाले आहेत.

वरिष्ठ पोलीस घटनेची माहिती घेत आहेत. घटनास्थळी पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा हे दाखल झाले आहेत. जमाव संतप्त झाला असून त्यांना शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात झाला आहे. संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येतेय.

कात्रजमध्ये दोन भिंतींच्या अरुंद जागेत अडकला ७ वर्षांचा चिमुकला; जवानांच्या तत्परतेने वाचवले प्राण.


पुणे :कात्रज परिसरातील जांभुळवाडी येथे आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एक थरारक घटना घडली. खेळत असताना सात वर्षांचा एक लहान मुलगा दोन भिंतींच्या अरुंद जागेमध्ये अडकला. मुलगा अडकल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची वर्दी मिळताच पीएमआरडीए. महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने बचावकार्य आव्हानात्मक होते. मात्र, जवानांनी प्रसंगावधान राखत घन, बोल्ट कटर आणि हायड्रॉलिक ब्रेकर यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून भिंतीचा काही भाग सावधपणे फोडला.

काही वेळ चाललेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर मुलाची सुखरूप सुटका करण्यात जवानांना यश आले. या वेळी उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकत जवानांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले.

सुदैवाने या घटनेत मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जलद प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

लोकल ते ग्लोबल बाजारपेठेसाठी महिलांना कौशल्य आणि प्रशिक्षणाची संधी

मुंबई ६ मे २०२६: महालक्ष्मी सरस २०२६ उमेद अभियान २ मे रोजी सुरू झालं असून १४ मेपर्यंत सुरू असणार आहे. महालक्ष्मी सरस हा मेळावा स्थानिक स्वयंरोजगार आणि महिला बचतगटांसाठी मोठी संधी आहे. राज्यातील महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ खुली करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला महालक्ष्मी सरस मेळावा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

या मेळाव्यात विविध जिल्ह्यांतील महिला बचतगटांनी तयार केलेली हस्तकला, खाद्यपदार्थ, पारंपरिक दागिने, वस्त्र, घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची मोठी संधी मिळत आहे. मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे “स्थानिक ते जागतिक” या संकल्पनेला चालना देणं, तसंच महिला उद्योजकतेला बळकटी देणं हे आहे. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून रोजगारनिर्मितीस हातभार लागत आहे. या मेळाव्यात महिलांना केवळ रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जात नाही तर त्यांना व्यवसाय वाढीसाठी प्रशिक्षणही दिलं जात आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे.

आज मेळाव्याच्या चौथ्या दिवशी येथे आलेल्या महिला उद्योजकांना खास प्रशिक्षण देण्यात आलं. यात महिला करत असलेल्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करायचं, त्यांचा सेल कसा वाढेल याबाबत बिजनेस सेशन घेण्यात आलं. या सेशनमध्ये ३०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या सेशनमध्ये त्यांना प्रोडक्ट डिझाइन, मायक्रो ब्रँड बिल्डिंग, ब्रँड पॅकेजिंग, वस्तूची गुणवत्ता कशी जपायची यासह अनेक गोष्टींचं प्रशिक्षण देण्यात आलं. हे प्रशिक्षण प्रोग्राम डायरेक्टर इंडिया एक्सपोझिशन मार्ट लिमिटेडचे प्रमुख हरबिंदर सिंह यांनी दिलं.

उद्या, ६ मे रोजी महालक्ष्मी सरसमधील महिला उद्योजिकांना आणखी एका विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योग वाढीसाठी AI आणि सोशल मीडिया तंत्रज्ञानाचा वापर , प्रोडक्ट कॅटलॉग, एआयचा वापर कसा करावा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम, फेसबुक यावर जाहिराती, व्हॉट्सअप बिजनेस अशा विविध गोष्टींवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचं प्रशिक्षणाचं लाइव्ह सेशन तज्ज्ञाद्वारे देण्यात येणार आहे.

महालक्ष्मी सरस हा केवळ एक व्यवसायिकांना विक्री किंवा खरेदीदरांसाठी खरेदीची संधी नसून महिला सक्षमीकरणाचाही एक प्रभावी उपक्रम ठरतो आहे. अधिकाधिक नागरिकांनी महालक्ष्मी सरस या मेळाव्याला भेट देऊन स्थानिक उत्पादनांना, त्यांच्या व्यवसायाला, ग्रामीण भागातील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन आयोजकांकडून केलं जात आहे.

हजार रुपये किलो दराने मडक्यातील लोणचं ४ दिवसांत ४० किलो विक्री

महालक्ष्मी सरस मध्ये अहिल्यानगरच्या मंगला वाकचौरे यांची कमाल

मुंबई६ मे २०२६ : उमेद अभियानाच्या माध्यमातून आयोजित महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये राज्यभरातून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या व्यवसाय, हस्तकला आणि खाद्यपदार्थांद्वारे वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मेळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गावच्या मंगला संजीव वाकचौरे (वय ४० वर्षे) यांनी मडक्यातील पारंपरिक लोणच्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

२ मेपासून सुरू झालेल्या या मेळ्यात अवघ्या चार दिवसांत मंगला वाकचौरे यांनी ४० किलो लोणचं प्रति किलो १,००० रुपयांच्या दराने विक्री केली आहे. साडेचारशेहून अधिक स्टॉल्समधून त्यांच्या लोणच्यांचा स्टॉल हा सर्वाधिक महागड्या आणि तितकाच लोकप्रिय स्टॉल म्हणून ओळखला जात आहे.

मंगला वाकचौरे या गेली १० ते १५ वर्षे घरगुती पद्धतीने लोणचं बनवत होत्या, तर सुमारे अडीच वर्षांपासून त्यांनी याला व्यवसायाचे स्वरूप दिले. उमेद अभियानात सहभागी झाल्यानंतर त्यांना व्यवसाय वाढवण्याची दिशा मिळाली. या माध्यमातून त्यांना स्वतःचा ब्रँड तयार करणे, उत्पादनाची गुणवत्ता राखणे आणि बाजारपेठ कशी वाढवायची याचे प्रशिक्षण मिळाले.

त्यांच्या लोणच्यांची खासियत म्हणजे ते पूर्णपणे घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने मडक्यात तयार केले जाते. कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर केला जात नाही. केमिकलमुक्त (रसायनमुक्त) आंबे, घाण्यावर काढलेलं तेल आणि घरच्या घरी तयार केलेले मसाले यांचा वापर करून लोणचं तयार केलं जातं. कैरी व्यवस्थित वाळवूनच लोणचं तयार केलं जातं, त्यामुळे त्याची चव आणि टिकाऊपणा कायम राहतो.

त्यांच्या या मडक्यातील लोणच्यांना महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये मोठी मागणी मिळत असून, ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. सध्या त्यांच्या सोबत ४ महिला आणि २ पुरुष काम करत असून, या व्यवसायातून त्यांना रोजगाराची संधी मिळाली आहे.

आज मंगला वाकचौरे यांच्या लोणच्यांची मागणी केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित नसून, त्यांचे उत्पादन बेंगळुरूपर्यंत पोहोचले आहे. त्यांना दररोज ५० ते १०० किलोपर्यंत लोणच्यांच्या ऑर्डर्स मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

महालक्ष्मी सरस २०२६ मधील त्यांच्या या यशस्वी विक्रीमुळे पारंपरिक, घरगुती पद्धतीने बनवलेल्या उत्पादनांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मंगला वाकचौरे यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.