Home Blog Page 60

पालकांनो सावधान .. या शाळांत प्रवेश घ्याल तर होईल नुकसान -महापालिकेचा इशारा

पुणेआपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी शाळा प्रवेशाची धावपळ सुरू असतानाच पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत शाळांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शहरातील 13 शाळांकडे कोणतीही अधिकृत मान्यता नसल्याचे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर तुम्ही या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत असाल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.

पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहराच्या विविध भागांतील शाळांची तपासणी केल्यानंतर ही यादी प्रसिद्ध केली आहे. नियमानुसार, प्रत्येक शाळेला सरकारची आणि स्थानिक प्रशासनाची रितसर मान्यता असणे अनिवार्य असते.मात्र, या 13 शाळांनी आवश्यक परवानग्या न घेताच आपले कामकाज सुरू ठेवल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने या शाळांना अनधिकृत ठरवून पालकांना अशा शाळांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. या शाळांना शासनमान्य निकाल किंवा प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे अशा शाळेतून मिळालेली गुणपत्रिका पुढील शिक्षणासाठी ग्राह्य धरली जात नाही. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये आणि पालकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता नक्की तपासा, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

या यादीमध्ये प्रामुख्याने कोंढवा, हडपसर, उंड्री, बिबवेवाडी आणि येरवडा यांसारख्या विकसित भागांतील शाळांचा समावेश आहे. अनेक प्रसिद्ध वाटणाऱ्या शाळांचाही यात समावेश असल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणीला पालक स्वतः जबाबदार राहतील.

पुण्यातील 13 अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे आहे

न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल बिबवेवाडी पोलीस स्टेशन जवळ चिंतामणी नगर, पुणे
महात्मा गांधी प्रशाला प्लॉट न. 52, लेन न. 2B संजय पार्क, येरवडा, पुणे
टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ऍण्ड मक्तब, NIBM रोड कोंढवा खु पुणे
सेंट व्ह्यू इन्टरनॅशनल स्कूल कोंढवा बु पुणे
इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महमंदवाडी रोड हडपसर पुणे
आकांक्षा अ‍ॅकॅडमी स्कूल अजिंक्य डी. वाय. पाटील रोड लोहगाव पुणे
एलोरा मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशन फौंडेशन आर्यन पब्लिक स्कूल मानाजी नगर नन्हे, पुणे
लेगसी हाय स्कूल अश्रफ नगर कोंढवा बु पुणे
शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल अश्रफ नगर कोंढवा बु पुणे
ऑर्चीड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री ता. हवेली पुणे
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कौसरबाग कोंढवा पुणे
ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेगाव बु पुणे
आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री पुणे

साई रिसॉर्ट प्रकरणात पुराव्याअभावी परबांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी- जिल्ह्यातील दापोली (मुरुड) येथील बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणात उबाठा नेते अनिल परब यांना खेड न्यायालयाने दिलासा दिला आहे. ६ मे रोजी खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी परब यांच्यासह सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला.

बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. सुधीर बुटाला यांनी न्यायालयात मांडले की, “जमीन आणि त्यावरील बांधकाम हे स्वतंत्र घटक असून त्यासाठीचे कायदेही भिन्न आहेत.’ न्यायालयाने हा तांत्रिक युक्तिवाद स्वीकारला. या प्रकरणात भारतीय दंड विधानातील कलम ४२० (फसवणूक), १२०-ब (गुन्हेगारी कट) आणि सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप होते.

मात्र, हे गुन्हे सिद्ध होतील असा एकही ठोस पुरावा न्यायालयासमोर आला नाही. या निकालामुळे परब यांच्यासह तत्कालीन महसूल अधिकारी आणि मुरुडच्या सरपंचांनाही मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास ईडीने केला होता आणि राजकीय वर्तुळात यावर मोठी टीका झाली होती.मात्र, न्यायालयाच्या या निकालामुळे आता कायदेशीर लढाईत परब यांचे पारडे जड झाले आहे.

किरीट सोमय्यांनी बाळगले मौन…

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आमदार अनिल परब यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. रायगडमधील कर्जत विधानसभा क्षेत्रातील खोपोली येथे आयोजित भाजपच्या ‘SIR मार्गदर्शन शिबिरा’स प्रमुख वक्ते म्हणून सोमय्या उपस्थित असताना, पत्रकारांनी त्यांना परब यांच्या निकालाबाबत छेडले. मात्र यावेळी त्यांनी कोणताही संवाद न साधता मौन बाळगणे पसंत केले.

ईडीच्या आरोपपत्रात अनिल परब यांचे नावच नाही

विशेष म्हणजे, अंमलबजावणी संचालनालयाने जेव्हा साई रिसॉर्ट प्रकरणी आरोपपत्र सादर केले, तेव्हा त्यात अनिल परब यांचा उल्लेखही नव्हता, ज्यामुळे तपासातील त्यांच्या सहभागावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. बेकायदेशीर बांधकामाचे आरोप असूनही त्यांच्याविरोधात ठोस पुरावे न सापडल्याने तपास यंत्रणांच्या दाव्यांवर शंका व्यक्त केली जात होती; त्यातच आता न्यायालयानेही त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने, या संपूर्ण प्रकरणातून ते कायदेशीररीत्या पूर्णपणे बाहेर पडले असून विरोधकांचे आरोप पुराव्याअभावी फोल ठरल्याचे दिसून येत आहे.

शहराच्या विविध भागांतून सहा अल्पवयीन मुली बेपत्ता

पुणे-शहराच्या विविध भागांमधून १५ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांत सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.बेपत्ता मुलींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पुणे पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

शहरात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना दररोज समोर येत आहेत. प्राप्त माहितीनुसार, शहरातील नऱ्हे, वानवडी, फुरसुंगी, हडपसर, काळेपडळ आणि वाघोली या उपनगरांमधून अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. नऱ्हे परिसरातून १५ आणि १७ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञातांनी आमिष दाखवून पळवून नेले आहे. याप्रकरणी मंगळवारी (ता. ५) नऱ्हे पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी परिसरातून चार मे रोजी साडेसतरा वर्षांच्या एका मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला. याच दिवशी फुरसुंगी भागातूनही १६ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. फुरसुंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. हडपसर परिसरातून १७ वर्षे वयाच्या मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याची घटना चार मे रोजी घडली. हडपसर पोलिसांत याची नोंद करण्यात आली आहे.

याशिवाय, काळेपडळ परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तर, वाघोली परिसरातून १७ वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना चार मे रोजी उघडकीस आली असून, वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागांतून एकापाठोपाठ एक मुली बेपत्ता होण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सर्व प्रकरणांत पोलिसांकडून तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पत्नीचे कापलेले शिर घेऊन कात्रजच्या रस्त्यावरून फिरणाऱ्या आरोपीला 10 वर्षानंतर जन्मठेप

पुणे – चारित्राच्या संशयातून पत्नीचे दोन्ही हात-पाय आणि शिर कुऱ्हाडीने धडावेगळे करून ते हातात घेऊन फिरणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमीत जोशी यांनी हा निकाल दिला.रामचंद्र शेहू चव्हाण (वय-६३, रा. सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. उरनूर, गुलबर्गा, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी सोनाबाई चव्हाण (वय ५५) हिचा ९ ऑक्टोबर २०१५ ला सकाळी अकरा ते सव्वाअकरा दरम्यान निर्घृण खून केला होता. या प्रकरणी आरोपीची सून सुनीता रमेश चव्हाण हिने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. चव्हाण हा सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा.
पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून दोघांमध्ये भांडणे व्हायची. त्या रागातून त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह लाकडी ओंडक्यावर ठेवून त्याने कुऱ्हाडीने पत्नीचे दोन्ही हातपाय आणि शिर तोडले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रक्तरंजित शिर आणि कुऱ्हाड हातात घेऊन तो पायी चालत कात्रज तलावाच्या दिशेने निघाला होता. त्या वेळी गस्तीवरील पोलिस अंमलबजाराने आरोपीला अडवून त्याच्या हातातील शिर आणि कुऱ्हाड ताब्यात घेत अटक केली.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनी काम पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी सरकार पक्षातर्फे २४ साक्षीदार तपासले. घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली आरोपीची सून, शेजारी राहणारे कुटुंबीय, शाळकरी मुलगी आणि चहाविक्रेत्या महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीच्या सुनेने सासऱ्याला सासूच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालताना पाहिले. सासूला वाचविण्याचा प्रयत्न करताना तिचे रक्त सुनेच्या कपड्यावर उडाले होते.
जपानमधून येऊन न्यायालयासमोर साक्ष नोंदविली –
शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबाने घराच्या बाल्कनीतून ही घटना पाहिली होती. त्यापैकी एका साक्षीदाराने आरोपीला मृत महिलेचे शिर आणि रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन जाताना मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. नोकरीनिमित्त जपानमध्ये स्थलांतरित झालेल्या या साक्षीदाराने जपानमधून येऊन न्यायालयासमोर साक्ष नोंदविली; तर आरोपीच्या घरासमोर मोकळ्या जागेत शाळेत जाण्यासाठी थांबलेल्या एका नऊ वर्षांच्या चिमुकलीने आरोपीला न्यायालयासमोर ओळखले.
आरोपीचा कबुलीजबाब न्यायालयात सिद्ध –
घटनेनंतर आरोपी एका हातात शिर व दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेऊन चालला होता. त्यावेळी एका चहाविक्रेत्या महिलेने पाहिले. तिने त्याला ‘अण्णा, कुठे बकरू कापले’ अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने ‘बायकोला मारले’ असे सांगितल्यावर त्या घाबरल्या. आरोपीने दिलेला हा न्यायबाह्य कबुलीजबाब सरकार पक्षाने न्यायालयात सिद्ध केला.

सदर गुन्ह्याची विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांचे न्यायालयात सुणावणी सुरु असताना सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना न्याय मिळावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरीता पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर मिलिंद मोहिते, यांनी वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे सदरचा गुन्हा दत्तक घेवुन वेळोवेळी पाठपुरावा केला होता. नमुद गुन्ह्यात सरकारी वकील म्हणुन अग्रवाल यांनी कामकाज पाहीले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मिलींद मोहीते, सहा. पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोउपनि रमेश चौधरी, पोलीस अंमलदार जितेंद्र सोणवणे, विशाल मदने, मपोहवा रेखा मोटे यांनी केलेली आहे

बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींच्या पीएची हत्या: बशीरहाटमध्ये भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार,केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोलकाताला जाणार

0

कोलकाता
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथे भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री 10.30 वाजता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेच्या वेळी रथ स्कॉर्पिओ गाडीने आपल्या घरी जात होते. गाडी ड्रायव्हर चालवत होता. गाडीत आणखी एक व्यक्ती उपस्थित होता.

अहवालानुसार, हल्ल्यात ऑस्ट्रेलियन ग्लॉक पिस्तूलचा वापर करण्यात आला आहे. एकूण 10 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. रथ यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या, ज्या हृदयाच्या आरपार गेल्या, एक गोळी पोटात लागली. हल्ल्यात रथ यांच्या चालकाला आणि आणखी एका व्यक्तीलाही उजव्या हाताला, पोटात आणि छातीत गोळ्या लागल्या आहेत. भाजपने टीएमसीवर रथ यांच्या हत्येचा आरोप केला आहे.

टीएमसीने आरोपांचे खंडन करत या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या घटनेच्या सुमारे 1 तासानंतर रात्री सुमारे 12.30 वाजता बशीरहाट जिल्ह्यात रोहित रॉय नावाच्या भाजप कार्यकर्त्यालाही गोळ्या घालण्यात आल्या. त्याची प्रकृती गंभीर आहे. राज्यात गेल्या 2 दिवसांत पीए रथ यांच्या व्यतिरिक्त भाजपच्या 2 आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे.
स्कॉर्पिओ गाडीत बसलेले चंद्रनाथ रथ उत्तर 24 परगणामधील मध्यमग्रामच्या डोलतला परिसरातून रात्री सुमारे 10.30 वाजता घरी जात होते.
मोटारसायकल आणि कारमधील हल्लेखोर मागून आले आणि त्यांनी रथ यांची गाडी जबरदस्तीने थांबवली आणि पुढच्या प्रवासी सीटवर बसलेल्या रथ यांच्यावर पॉइंट ब्लँक रेंजमधून अंदाधुंद गोळीबार केला.
गाडीच्या दरवाजाच्या काचेतून गोळ्या रथ आणि त्याच्या चालकाला लागल्या. हल्लेखोरांनी घटना घडवून आणली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
रथाला डोक्यात, छातीत आणि पोटात गोळ्या लागल्या. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात (विवासिटी) नेण्यात आले. डॉक्टरांनी रथ यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी NH 12 वर रास्ता रोको केला. हल्लेखोरांच्या एन्काउंटरची मागणी करण्यात आली.
भाजपचे अनेक नेते विवासिटी रुग्णालयात पोहोचले, ज्यात सुवेंदू अधिकारी, सुकांत मजुमदार यांचाही समावेश आहे.

शाह आज कोलकात्याला पोहोचतील
बंगाल भाजपचे अध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री अमित शाह गुरुवारी कोलकाता येथे भेट देणार आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, सरकार स्थापनेबाबतही चर्चा होईल. बंगाल विधानसभेचे विशेष अधिवेशन २५ मे रोजी बोलावण्यात आले आहे.

शहरातील 54 किमी च्या भुयारी मार्गांचा प्राथमिक आराखडा 8 दिवसात … नवल किशोर राम.

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भुयारी वर्तुळाकार मार्ग बनवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अशा ५४ किलोमीटर लांबीचा भुयारी वर्तुळाकार मार्ग (पाताल लोक)चा प्राथमिक आराखडा पुढील सात ते आठ दिवसात राज्य शासनास सादर केला जाणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

याबाबतची प्राथमिक बैठक नुकतीच पार पडली असून त्यात या मार्गातील प्रस्तावित पाच रस्त्यांवर चर्चा करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांशी बोलतना स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए)ची स्वतंत्र एसपीव्ही स्थापन करून त्यामाध्यमातून प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. राज्य शासनाने नुकतेच या प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा तयार करणे, त्यासाठी सल्लागार नेमणे, प्रकल्प अहवालास राज्य शासनाची मान्यता घेणे, तसेच प्रकल्पाच्या खर्चासाठी आवश्‍यक तो निधी उभा करणे, त्यासाठी कर्ज काढणे आदी सर्व जबाबदारी आता महापालिकेवर आली. पीएमआरडीए केवळ या प्रकल्पासाठी सहाय्यक म्हणून काम पाहणार आहे.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएने कात्रज ते येरवडा असा बोगद्याचा प्रस्ताव सादर करावा. हा ‘ट्विन टनेल’ असावा. अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिल्या होत्या. त्यानुसार पीएमआरडीएने नेमलेल्या सल्लागार कंपनीने सर्व्हेक्षण पूर्ण करून दुमजली वर्तुळाकार भुयारी मार्गाचा आराखडा सादर केला होता. त्यामध्ये पुणे शहरात येणाऱ्या सर्व महामार्गांना जोडणारा आणि सहा ते सात ठिकाणावरून ये-जा करणे शक्य हाईल, असा सुमारे ५४ किलोमीटर लांबीचा भूमिगत रस्ता दर्शविला आहे. तर् या भुयारी मार्गांच्या सोबतच पाषाण रस्ता ते कोथरूड आणि सिंहगड रस्ता ते तळजाई अशा महापालिकेच्या विकास आराखड्यातील बोगद्यांचे कामही केले जाणार आहे.

असे आहेत पाच प्रमुख मार्ग
– सिंहगड रस्ता (पु. ल देशपांडे उद्यान ) ते जगताप डेअरी ( वाकड)
– सिंहगड रस्ता (पु. ल देशपांडे उद्यान ) ते सेव्हन लव्हज चौक
– येरवडा ( शास्त्रीनगर) ते कोंढवा ( खडी मशिन चौक)
– जगातप डेअरी ते हिंजवडी पुढे लाॅयला शाळा ( पाषाण रस्ता)
– खडकी ते शास्त्री नगर ( येरवडा)

डिजिटल युगात ‘सायबर प्रतिकारशक्ती’ काळाची गरज – राज्य महिला आयोगाच्या बैठकीत विचारमंथन

0

कोल्हापुरात राज्य महिला आयोगाची सायबर सुरक्षा, बीएनएस कायदे या विषयावर विशेष बैठक

कोल्हापूर, दि.05 : समाज माध्यमांच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण प्राथमिक बैठक संपन्न झाली. ज्याप्रमाणे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जंतूंशी लढते, त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपली ‘डिजिटल इम्युन सिस्टम’ सक्षम करणे ही काळाची गरज आहे, असे विचार या बैठकीतून समोर आले. महिला आयोगाच्या वतीने आता शाळा, महाविद्यालये आणि थेट गावागावांत जाऊन सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृतीची मोठी मोहीम राबवली जाणार आहे. सायबर सुरक्षा, बीएनएस व इंटरनेट कायदे, सामाजिक माध्यमांचा सुयोग्य वापर यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षित ठेवण्यासाठी एका विशिष्ट थीमवर आधारित सातत्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे. शालेय स्तरावरच संस्कार झाले तरच भविष्यातील धोके टाळता येतील. तसेच डॉ. जॅसमिन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणाऱ्या सायबर हल्ल्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला.

आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी पुढे स्पष्ट केले की, आयोग आता विशिष्ट वयोगटातील विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित करत असून, विशेषतः सोशल मीडियावरील फेक अकाऊंट्स आणि फेक प्रोफाइल्सपासून दूर राहण्याबाबत जागृती केली जाणार आहे. बाल स्नेही आणि महिला स्नेही उपक्रम राबवून सायबर सुरक्षिततेचा जागर केला जाईल. यावेळी ‘अहन फाउंडेशन’चे उन्मेश जोशी व सोनाली पाटणकर यांनी प्रभावी सादरीकरणाद्वारे सायबर कायदे, संकल्पना आणि प्रत्यक्ष उदाहरणे देऊन उपस्थितांना या विषयाचे गांभीर्य पटवून दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, पोलीस उप अधीक्षक तानाजी सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, जिल्हा संरक्षण अधिकारी अलोक अग्रहारी, आयोगाच्या कार्यकारी संपादक कपालिनी सिनकर, आणि समुपदेशक सुनिता गणगे उपस्थित होत्या. तसेच अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी समीर नेजकर, यशस्वी अकॅडमीच्या अमृता करमरकर, राधिका भुरांडे यांनीही या चर्चेत सहभाग नोंदवत सायबर जनजागृतीसाठी प्रशासनासोबत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दौंडमध्ये ९ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्याप्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीरपणे दखल

0

घटना ऐकून मन हेलावले

पुणे.दि.६: दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे अवघ्या ९ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेत, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले आहे.

या निवेदनाद्वारे डॉ. गोऱ्हे यांनी सखोल तपास, तांत्रिक व भौतिक पुरावे गोळा करण्यासह खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवण्याची मागणी केली आहे. पीडित कुटुंबातील इतर सदस्यांना, विशेषतः साक्षीदार असलेल्या लहान मुलाला योग्य संरक्षण देण्याची आणि पीडित कुटुंबियांना कुशल वकील उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

“ही अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावणारी घटना आहे. एक चिमुरडी मुलगी किरकोळ कारणावरून मारली जाणे हे अत्यंत गंभीर आहे. समाजात योग्य संदेश जाण्यासाठी आरोपीला कठोर शासन झाले पाहिजे. साक्षीदार असलेल्या लहान मुलाला सुरक्षित व मानसिक दिलासा देता येईल अशा ठिकाणी व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच त्याचे मानसिक समुपदेशन करणे गरजेचे आहे. यासारखीच घटना सांगलीतील आटपाडी मध्ये दि.२७ मार्च दोन मुलींना उलटे टांगुन ठेवल्याने एका मुलीचा मृत्यु झाल्याची घटना घडल्याचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद करून आई वडिलांना वा कुटुंबीय यांच्या नकारात्मक भुमिकेवर काम करायची गरज व्यक्त केली

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या चारने वाढवून 33 वरून 37 करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुर

0

नवी दिल्‍ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या चारने वाढवून 33 वरून 37 करण्यासाठी(सरन्यायाधीश वगळून), सर्वोच्च न्यायालय( न्यायाधीशांची संख्या) कायदा 1956 मध्ये सुधारणा करण्याकरिता संसदेत सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक 2026, सादर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

ठळक बाबी :

सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या चारने वाढवून 33 वरून 37 (सरन्यायाधीश वगळून) करण्याबाबतची तरतूद  आहे.

मुख्य परिणाम:

न्यायाधीशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला अधिक कार्यक्षमपणे आणि प्रभावीपणे काम करणे शक्य होऊन जलद न्याय मिळणे सुनिश्चित होईल.

खर्च:

न्यायाधीशांचे वेतन, सहाय्यक कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर सुविधांवरील खर्च भारताच्या एकत्रित निधीमधून केला जाईल.

पार्श्वभूमी:

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी,  1956 मध्ये सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) कायदा 1956,  करण्यात आला होता.  या कायद्याच्या कलम 2 मध्ये न्यायाधीशांची कमाल संख्या (सरन्यायाधीश वगळून) 10 असेल, अशी तरतूद करण्यात आली होती.

मूळ कायद्यात आणखी सुधारणा करून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत शेवटची वाढ, सर्वोच्च न्यायालय(न्यायाधीशांची संख्या)सुधारणा कायदा 2019 द्वारे 30 वरून 33 (सरन्यायाधीश वगळून) करण्यात आली होती.

तीन दिवसांत चार महाकाय होर्डिंग उखडले: खेड शिवापूर परिसरात कारवाईचे सत्र सुरू

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी (दि. ६ मे) हवेली तालुक्यातील खेड शिवापूर परिसरात पुन्हा दोन मोठे होर्डिंग हटवण्यात आले. गेल्या तीन दिवसांत प्रशासनाने एकूण चार महाकाय होर्डिंगवर कारवाई केली असून, या धडक मोहिमेमुळे अनधिकृत होर्डिंगधारकांचे धाबे दणाणले आहेत.

मंगळवारी झालेल्या कारवाईनंतर बुधवारी सकाळीच ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने खेड शिवापूर परिसरात आपला मोर्चा वळवला. यावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये गट क्रमांक १४७ येथील जागामालक संजय कोंडे यांच्या जागेवर ‘पिनाकल ॲड्स’ यांनी अनधिकृतपणे उभारलेले होर्डिंग हटवण्यात आले. तसेच गट क्रमांक २६३ येथील जागामालक गौरव मिठारे यांच्या जागेवर ‘जोशी वडेवाले’ यांनी विकसित केलेले होर्डिंग प्रशासनाने जमीनदोस्त केले.

होर्डिंग कोसळून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या कठोर आदेशांनंतर ही मोहीम राबवण्यात येत आहे. ‘पीएमआरडीए’ने सोमवारी भोर तालुक्यातील कामथडी येथील गट क्रमांक ७५१ मधील ‘बी. के. नाईक अँड सन्स’ यांच्या मालकीचे अजस्र होर्डिंग हटविले होते, तर मंगळवारी खेड शिवापूर (पश्चिम) येथील गट क्रमांक २७२ मध्ये ‘ईश्वरी ॲड्स’ या संस्थेने उभारलेले होर्डिंग काढण्यात आले. त्यानंतर आता बुधवारी खेड शिवापूरमधील आणखी दोन अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली.

“पीएमआरडीएची अधिकृत परवानगी न घेता आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या एकाही अनधिकृत होर्डिंगची गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढेही अशीच तीव्र गतीने सुरू राहील.”— हिंमत खराडे, सहआयुक्त (प्रभारी), अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, पीएमआरडीए

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रभारी सहआयुक्त हिंमत खराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार आशा होळकर, तहसीलदार रवींद्र रांजणे आणि सहनगर नियोजनकार श्री. सावकारे यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली. या कारवाईदरम्यान होर्डिंगचे लोखंडी सांगाडे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित जागामालक आणि विकासकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.

वाहतुकीला अडथळा ठरलेले औंध मधील हेरिटेज स्ट्रक्चर हलविणार-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे: वाहतूक सुरळीत करण्यासाठी औंध बॉडी गेट चौकी येथील रस्त्याच्या मधोमध असलेले हेरिटेज स्ट्रक्चर येत्या १५ दिवसांत हलविले जाईल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज बुधवारी दिली.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन वाहतुकीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक नगरसेवक, भवन, मालमत्ता, रस्ते विभागाचे अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेले हेरिटेज स्ट्रक्चर अनेक वर्षांपासून वाहतुकीस अडथळा ठरत होते. विशेषतः औंधकडून ब्रेमन चौकमार्गे राजीव गांधी पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता, कारण संबंधित स्ट्रक्चर हलविणे शक्य नव्हते. पोलीस व महानगरपालिका यांच्या समन्वयातून आवश्यक सर्व परवानग्या मिळवून हा अडथळा दूर करण्यात यश आले आहे. येत्या १५ दिवसांत हे स्ट्रक्चर हटविण्याचे काम पूर्ण होईल आणि पुढील महिन्याभरात रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

या कामामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पर्वती पायथा अत्याचाराचा प्रयत्न: संतप्त महिलांचे आंदोलन

पुणे- पर्वती पायथा परिसरात एका अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच नातलगाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ आज तीव्र आंदोलन करण्यात आले. या अमानुष आणि संतापजनक घटने विरोधात स्थानिक महिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीच्या प्रतीकात्मक तिरडी आंदोलन करत निषेध नोंदवला.

या आंदोलनादरम्यान आरोपीच्या प्रतीकात्मक तिरडीला चपला मारत परिसरात फिरवण्यात आले. “अशा नराधमांना समाजात जागा नाही”, “लहान मुलींवरील अत्याचार थांबवा”, “महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाई करा” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.यावेळी घटनेच्या परिसरातील अनेक स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंदोलनात माननीय रूपाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी, प्रिया सूर्यवंशी यांनी सहभाग घेत पीडितेला न्याय मिळवून देण्याची ठाम भूमिका मांडली.या संपूर्ण आंदोलनाचे नियोजन व आयोजन भारती लोंढे यांनी केले होते. उपस्थित महिलांनी प्रशासनाकडे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त केला.“आज जर अशा विकृत प्रवृत्तीविरोधात समाज रस्त्यावर उतरला नाही, तर उद्या प्रत्येक घरातील मुलगी असुरक्षित होईल. अशा नराधमांना तात्काळ कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कबड्डी,खो-खोमध्ये महावितरण, राजस्थानची आगेकूच

पुणेदि मे २०२४: एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बुधवारी (दि.६) झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यांमध्ये महावितरणच्या पुरुष व महिला संघाने प्रतिस्पर्धी संघावर सहज विजय मिळवला. तर खो-खोमध्ये महावितरणच्या पुरुष संघासह राजस्थानच्या महिला व पुरूष संघाने आगेकूच केली आहे.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज पहिल्या सत्रात कबड्डी, खो-खोचे साखळी सामने झाले. कबड्डीच्या सामन्यांमध्ये महापारेषण संघाने मध्यप्रदेशच्या एमपी पॉवर संघाचा ३ गुणांनी पराभव केला. तर महावितरणने एकतर्फी वर्चस्व गाजवत महानिर्मिती संघाचा २६ गुणांनी पराभव केला. पंजाब पॉवरने उत्तराखंडच्या पॉवर ट्रान्समिशन कंपनीचा १७ गुणांनी आणि हरियाणा संघाने गुजरात संघाचा ३० गुणांनी पराभव केला. कबड्डीच्या महिला गटात हिमाचल प्रदेशने महापारेषण संघाचा ३२ गुणांनी तर महावितरणने हरियाणा पॉवर संघाचा ४८ गुणांनी एकतर्फी पराभव केला.

खो खोच्या महिला गटात राजस्थान संघाने गुजरात ऊर्जा विकास निगम संघाचा पराभव केला. तर पुरुष गटात हरियाणा पॉवर संघाने मध्यप्रदेश पॉवर संघाचा, राजस्थान विद्युत निगम संघाने गुजरात ऊर्जा विकास निगमचा तर राष्ट्रीय खो खो संघाचा कर्णधार व महावितरणचा खेळाडू प्रतिक वाईकर याच्या नेतृत्वात महावितरणने हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळ संघाचा सहज पराभव केला.

प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची:महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पुण्यात थाटात उद्घाटन

पुणेदि६ मे २०२६: सर्व खेळाडूंना एकत्रितपणे, एकजुटीने व सहकार्याने खेळूनच विजयाला गवसणी घालावी लागते. त्यामुळे कोणत्याही संघात सर्वप्रथम संघभावना निर्माण झाली की प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रामुख्याने विद्युत कंपन्यांमधील खेळाडूंचा सहभाग व नावलौकीक वाढत आहे, ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. ६) केले.

बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या तीन दिवसीय क्रीडास्पर्धेला प्रारंभ झाला. महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. सुनील काकडे, आयोजन समितीचे उपाध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप (महापारेषण)व श्री. अशोक घाडगे, मुख्य अभियंता श्री. धनराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. भूषण कुलकर्णी , मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती), विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. जिग्नेश राय, सरचिटणीस श्री. नरेश कुमार, उपाध्यक्ष श्री. भरत पाटील, खजीनदार श्री. ललित गायकवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

विद्युत नियंत्रण मंडळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने देशातील सर्व विद्युत कंपन्यांच्या खेळाडूंचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. सर्व विद्युत कंपन्या आणि त्यांच्या उत्कृष्ट खेळाडूंना देशपातळीवर एकत्र आणण्यासाठी या मंडळाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे गौरवोद्गार संचालक श्री. पवार यांनी काढले. प्रादेशिक संचालक श्री. सुनील काकडे यांनी सांगितले, की विद्युत क्षेत्र धकाधकीचे आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धेतून कर्मचारी मानसिक व शारीरिकदृष्ट्या कणखर बनतात. यासह त्यांच्या मैदानातील शिस्तीने कार्यालयातील कार्यक्षमतेत देखील वाढ होते.  

अत्यंत नेत्रदीपक व उत्साहात झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे खजिनदार श्री. ललित  गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी,  रामगोपाल अहीर, भक्ती जोशी, सोनाली बाविस्कर, स्वागती सोळंकुरे यांनी केले तर श्री. अशोक घाडगे यांनी आभार मानले.

या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह गुजरातहरियाणातेलंगाणाराजस्थानउत्तराखंडपंजाबहिमाचल प्रदेशमध्यप्रदेशदिल्ली आदी राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे ४१ संघ आणि सुमारे ५३८ महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत.

रितू तावडेंना डोक्याचा भाग आहे का?:पदमुक्त झाल्यावर माझ्याच बाजूला बसतील, तेव्हा बघून घेईन; किशोरी पेडणेकरांचा इशारा

मुंबई-महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त करावा तितका कमी. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आहे कुठे? लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांवर सरकारच्या संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो, अशी टीका मुंबईच्या माजी महापौर व मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी महापौर रितू तावडे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर टीका करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आनंदोत्सव साजरे करण्यात महापौर व्यस्त आहेत. त्यांना डोक्याचा भाग आहे का? स्वतःच्या महापौर कार्यकाळात 138 पुरस्कार मला मिळाले. रितू तावडे अडीच वर्षानंतर जेव्हा पदमुक्त होतील तेव्हा माझ्याच बाजूला बसतील तेव्हा त्यांना मी बघेनच, असा थेट इशाराच पेडणेकर यांनी दिला आहे.

मीनाताई बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात डिलिव्हरीचे प्रमाण गेल्या काही वर्षात घटले आहे, यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, यामागे संशयास्पद घडामोडी असल्याचा संशय आहे. कोविडनंतरही सेवा सुधारली नाही. आवश्यक डॉक्टरांची कमतरता असल्याचा मुद्दा गंभीर आहे. रात्री डिलिव्हरीसाठी रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याची शंका आहे. मीनाताई ठाकरे या नावामुळे राजकीय हेतूने दुर्लक्ष होत आहे का? असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

कोळी समाजावर दबाव टाकल्यास आंदोलन करणार

तसेच पुढे बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, विरोधकांनी सभागृहाची कार्यपद्धती आणि शिस्त शिकावी. कोरम पूर्ण करावा. तसेच कोळी समाजावर दबाव टाकल्यास आंदोलन करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मुंबईतील मूळ रहिवासी म्हणून कोळी समाजाचा सन्मान राखावाच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ऑपरेशन टायगरवर बोलताना त्या म्हणाल्या, ऑपरेशन टायगर संदर्भात लोकप्रतिनिधींवर आर्थिक दबाव टाकला जात आहे. कोण कुठे जाईल, त्याला थांबवता येणार नाही. तसेच सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना काम करू दिले जात नसल्याची टीका पेडणेकर यांनी केली आहे.