मुंबई ६ मे २०२६: महालक्ष्मी सरस २०२६ उमेद अभियान २ मे रोजी सुरू झालं असून १४ मेपर्यंत सुरू असणार आहे. महालक्ष्मी सरस हा मेळावा स्थानिक स्वयंरोजगार आणि महिला बचतगटांसाठी मोठी संधी आहे. राज्यातील महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ खुली करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला महालक्ष्मी सरस मेळावा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
या मेळाव्यात विविध जिल्ह्यांतील महिला बचतगटांनी तयार केलेली हस्तकला, खाद्यपदार्थ, पारंपरिक दागिने, वस्त्र, घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची मोठी संधी मिळत आहे. मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे “स्थानिक ते जागतिक” या संकल्पनेला चालना देणं, तसंच महिला उद्योजकतेला बळकटी देणं हे आहे. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून रोजगारनिर्मितीस हातभार लागत आहे. या मेळाव्यात महिलांना केवळ रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जात नाही तर त्यांना व्यवसाय वाढीसाठी प्रशिक्षणही दिलं जात आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे.
आज मेळाव्याच्या चौथ्या दिवशी येथे आलेल्या महिला उद्योजकांना खास प्रशिक्षण देण्यात आलं. यात महिला करत असलेल्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करायचं, त्यांचा सेल कसा वाढेल याबाबत बिजनेस सेशन घेण्यात आलं. या सेशनमध्ये ३०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या सेशनमध्ये त्यांना प्रोडक्ट डिझाइन, मायक्रो ब्रँड बिल्डिंग, ब्रँड पॅकेजिंग, वस्तूची गुणवत्ता कशी जपायची यासह अनेक गोष्टींचं प्रशिक्षण देण्यात आलं. हे प्रशिक्षण प्रोग्राम डायरेक्टर इंडिया एक्सपोझिशन मार्ट लिमिटेडचे प्रमुख हरबिंदर सिंह यांनी दिलं.
उद्या, ६ मे रोजी महालक्ष्मी सरसमधील महिला उद्योजिकांना आणखी एका विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योग वाढीसाठी AI आणि सोशल मीडिया तंत्रज्ञानाचा वापर , प्रोडक्ट कॅटलॉग, एआयचा वापर कसा करावा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम, फेसबुक यावर जाहिराती, व्हॉट्सअप बिजनेस अशा विविध गोष्टींवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचं प्रशिक्षणाचं लाइव्ह सेशन तज्ज्ञाद्वारे देण्यात येणार आहे.
महालक्ष्मी सरस हा केवळ एक व्यवसायिकांना विक्री किंवा खरेदीदरांसाठी खरेदीची संधी नसून महिला सक्षमीकरणाचाही एक प्रभावी उपक्रम ठरतो आहे. अधिकाधिक नागरिकांनी महालक्ष्मी सरस या मेळाव्याला भेट देऊन स्थानिक उत्पादनांना, त्यांच्या व्यवसायाला, ग्रामीण भागातील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन आयोजकांकडून केलं जात आहे.

