पुणे : पुण्यातील नसरापूर आणि पर्वतीमधील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असताना आता मुळशी तालुक्यातून एक नवी धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील एका गावात दुचाकीवरून आईस्क्रीम विकणाऱ्या इसमाने १४ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दुपारी २ च्या सुमारास पीडित मुलगी आपल्या लहान चुलत बहिणीसोबत आईस्क्रीम घेण्यासाठी आरोपी पिंटू शिवकुमार याच्याकडे गेली होती. आरोपीने (रा. सूस, ता. मुळशी, मूळ उत्तर प्रदेश) मुलीला जवळ घेऊन तिचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी दुचाकी घेऊन पळून गेला.
पीडित मुलीने घरी आल्यावर पालकांना सर्व प्रकार सांगितला. पालक आणि ग्रामस्थांनी तात्काळ आरोपीचा शोध घेत त्याला पकडले आणि पौड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. ही घटना समोर आल्याने परप्रांतीय फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील बालिका सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

