पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी गुरुवारी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी त्यांनी सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगून, स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग शीघ्रगतीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.
हिरा हे निवडणूक चिन्ह असलेल्या आबा बागुल यांनी आज नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी वर भर दिला. यावेळी त्यांनी पर्वती मतदार संघ टँकर मुक्त करून सर्वांना वेळेवर पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विजयी झाल्यावर हा परिसर टँकर माफियामुक्त होईल असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
नेहमी नागरिकांच्या संपर्कात असलेल्या आबा बागुल यांची आज संदेश नगर येथील विद्यासागर सोसायटीच्या रहिवाश्यांनी भेट घेऊन येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली. यावेळी आबा यांनी हा प्रश्न तातडीने सोडविला जाईल असे सांगितले. दरम्यान पर्वती मतदार संघातील कोणतेही प्रश्न असतील ते मला सांगा, तसेच आपल्या भागातील विकासाबाबत काही कल्पना असतील, अडचणी असतील त्या वाळवेकर लॉन्स येथील जनसंपर्क कार्यालयात आणून द्यव्यात, त्याचे निराकरण निवडून आल्यावर केले जाईल असे आवाहन आबा बागुल यांनी नागरिकांना केले.
पर्वती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल हे गेली ३२ वर्षे महापालिकेत अपराजित नगरसेवक आहेत. आपल्या प्रभागातील मूलभूत समस्यांचे निवारण त्यांनी केले आहे. याचबरोबर संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला हेवा वाटेल असे राजीव गांधी ई-लर्निंग स्कुल, भारतरत्न भिमसेन जोशी कलादालन, १९७१ च्या युद्धावर आधारित म्युझिकल कारंजे व लेझर शो प्रकल्प यशस्वीरित्या राबविले आहेत.
सातारा रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी कटिबद्ध,पर्वती मतदार संघ टँकर मफियांच्याकडून मुक्त करणार-आबा बागुलांची ग्वाही
शर्वरी डिग्रजकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध !!!
२६ वा स्वर सागर सांस्कृतिक महोत्सव
पिंपरी, पुणे (दि. ७ नोव्हेंबर २०२४) स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसर्या दिवसाची शर्वरी डिग्रजकर – पोफळे यांनी आपल्या शास्त्रीय गायनाची सुरुवात राग पुरिया कल्याणने केली. त्यानंतर मत्स्यगंधा नाटकातील नाट्यपद सादर केले. “आम्हा न कळे ज्ञान” या अभंगांने सांगता केली. त्यांच्या गायनाने उपस्थित रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. त्यांना तबल्यावर रोहित कुलकर्णी आणि हार्मोनियम साथ राजीव तांबे यांनी केली.
प्रारंभी स्नेहल सोमण यांच्या नृत्यरंग सादरीकरणाने झाली. सोमण यांची नृत्य शारदा कथक कला मंदिर ही संस्था आहे. स्नेहलजी आणि त्यांच्या शिष्यांनी प्रथम गणेश वंदनेने सादरीकरणाची सुरुवात केली. त्यानंतर शिखर अनवट ताल, ठुमरी, पंच महाभूत प्रस्तुती, सरस्वती वंदना, अष्टपदी आणि शेवट फ्यूजन प्रकाराने सादरीकरणाचा शेवट केला.
कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात “स्वरस्वप्न” व्हायोलिन समुहाने आपले सादरीकरण केले. गुरू स्वप्ना दातार यांच्या सुश्राव्य निवेदनाखाली संपूर्ण शिष्यवर्गाने हा कार्यक्रम सादर केला. व्हायोलिनच्या समूह सादरीकरणाची सुरुवात “पंचतुंड नररुंड” या नांदीने झाली. त्यानंतर शिष्य समूहाने रागमाला, भूप, सूलताल, भीमपलास, किरवाणी, तुर्कीश मार्च सादरीकरण केले. यानंतर भक्तीसंगीत अभंगाच, देशभक्तिपर गीते, फोक संगीत प्रकार आणि शेवटी सूरत पिया या प्रसिद्ध गाण्याने सांगता केली. प्रेक्षक व्हायोलिनच्या संगीतात रममाण झाले होते.
व्हायोलिन समूह वादनात श्रेयस, मानस, आरोही, सानविका, अर्जुन, कार्तिकेय, वेधा, मनस्वी, मंजिरी, अनुराग, आर्या, रिओना, सिद्धी, मल्हार, ईशा, रिया, पार्थ, आशिष, दिवीज, तनिष्का यांचा सहभाग होता. तबला साथ मनोज देशमुख, रोशन चांदगुडे, पखवाज भागवत चव्हाण, ताल वाद्य शुभम शहा, ड्रम्स तुषार देशपांडे, कीबोर्ड तुषार दीक्षित आणि ध्वनी नियंत्रण नामदेव पानगरकर यांनी केले.
स्वर सागर महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी थिगळे, हंबीर आवटे, श्रेयश आवटे, मृगेश नटराजन, गजानन शंकर चिंचवडे, पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, सुरेखा कुलकर्णी, अस्मिता सावंत, अनिल दराडे, सोनाली थोरवे, सुनील पोटे, शिरीष कुंभार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले
सूत्रसंचालन अभिजीत कोळपे यांनी केले.
१० वर्षे कँटोन्मेंटचा विकास खुंटला: परिवर्तन आवश्यक- रमेश बागवे
पुणे-कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना रोज वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. १० वर्षांत वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. घोरपडी भागात रेल्वे फाटकामुळे अनेक नागरिकांना रोज अर्धा-अर्धा तास ताटकळत राहावे लागत आहे. येथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. मात्र केंद्रात व राज्यात १० वर्षे भाजप सत्तेवर असूनही घोरपडीतील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा रेल्वे उड्डाणपूल पूर्ण होऊ शकला नाही. कँटोन्मेंटचा विकास खुंटला आहे. कँटोन्मेंटमधील हे प्रश्न सोडविण्यासाठी यंदा परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन रमेश बागवे यांनी केले.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या पदयात्रेला घोरपडी भागात गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी घोरपडी आणि बी. टी. कवडे रस्ता, तसेच सायंकाळी दारूवाला पूल आणि सोमवार पेठ परिसरात निघालेल्या पदयात्रेचे नागरिकांनी जोरदार स्वागत करून विजय निश्चित असल्याचा विश्वास दिला. रमेश बागवे यांच्या पदयात्रेला प्रभाग क्रमांक २१ मधील घोरपडी बाजार राम मंदिर येथून सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. फैलवाली चाळ, आगवाली चाळ, पंचशीलनगर, घोरपडी गाव, विकासनगर, श्रावस्तीनगर, बालाजीनगर, श्रीनाथनगर, गुलमोहर पार्क, निगडेनगर, बी. टी. कवडे रस्ता, डोबरवाडी यामार्गे निघालेल्या पदयात्रेचा समारोप दुपारी कवळेमाळा येथे झाला. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत पदयात्रा पार पडली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आप, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते झेंडे घेऊन सहभागी झाले होते. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या पदयात्रेचे ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. महिलांनी रमेशदादा यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘कँटोन्मेंटचा विकास म्हणजे रमेशदादा’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पदयात्रेने संपूर्ण परिसर महाविकास आघाडीमय झाला होता. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, पुणे लोकसभेचे प्रभारी जगदीश ठाकूर, सुजाता शेट्टी, ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख,सुधाकर पनीकर, संजय कवडे,प्रदीप परदेशी, अभिजित गायकवाड, नितीन निगडे, अक्रम शेख, युसुफ शेख, रॉबर्ट रोबारियो, महेश मिश्रा, अनिरुद्ध मिश्रा, प्रेम परदेशी, मनोज बाट्टम, तेजस गरसूल, अमोल परदेशी, संजय वाघमारे, रवी वाजपेयी, राजू नायडू, कुमार राठोड, प्रकाश बर्गे, मदीस रॉवडन, विल्सन रेड्डा, विल्सन डॅनियल, डेरियास स्वामी, रिहाना खान, अँटोनी, अंजली पिल्ले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. सायंकाळच्या पदयात्रेला रवींद्र नाईक चौक ते दारूवाला पूल येथून सुरुवात झाली. सूर्योदय मंडळ, नागेश पेठ, खडीचे मैदान, नागेश्वर मंदिर, ब्राह्मण गल्ली, अमरज्योत मित्रमंडळ चौक, विजय बेकरी, बालाजी मंदिर, १५ ऑगस्ट चौक, महाराजा लॉज चौक, धनगर गल्ली, त्रिशुंड गणपती गल्ली, कमला नेहरू ते सत्यज्योत मंडळ, पद्मकृष्णा चौक, पारगे चौक, मंगल चौक, संग्राम चौक, भीमनगर, सदाआनंदनगर, श्रमिकनगर, मरिअम्मानगर, गाडीतळ परिसर, जुना बाजार, शिवाजी आखाडा यामार्गे निघालेल्या पदयात्रेचा समारोप शिवराय चौक येथे झाला.
अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर फक्त स्वतःची घरे भरली, पक्ष संकटात असताना मात्र भाजपात गेले..नाना पटोलेंची टिका
मुंबई, दि. ७ नोव्हेंबर २०२४
मराठवाड्यात गायरान जमिनीचा प्रश्न गंभीर असून अशोक चव्हाण दोनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तरिही त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देत या भागात शेतात जाण्यासाठी आजही पाणंद रस्ते आहेत, सरकार आल्यानंतर हे पाणंद रस्तेही मजबुत केले जातील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीतील काँग्रेस मविआचे अधिकृत उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण आणि भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार तिरुपती (पप्पू) कदम कोंढेकर यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची मुदखेड मध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पटोले पुढे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस असे चित्र कुठेच दिसत नसून येथील हुकूमशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहे, या हुकूमशाहीला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून दोनदा मुख्यमंत्रीपद, अनेक वर्षे मंत्रीपद भोगले पण काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ते काँग्रेसला सोडून भाजपात गेले. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना मोठे केले त्यालाच आज ते शिव्या देत आहेत. अशोक चव्हाण भाजपामध्ये असते तर त्यांचा राजकीय उदय झाला नसता. दोनदा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःचे घर भरण्याचेच काम केले. सत्तेचा वापर करून दहा पिढ्यांचा उद्धार केला आणि जेलमध्ये जावे लागेल या भितीने अशोक चव्हाण भाजपात गेले. भाजपात जाताच देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याला १५० कोटी रुपये दिले. आता अशोक चव्हाण यांचा सातबारा खोडायची वेळ आली आहे, असे नाना पटोले म्हणाले.
राज्यात आज महिला सुरक्षित नाहीत, शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत, ६७ हजार महिला राज्यातून बेपत्ता झाल्या आहे पण सरकारकडे त्याचे उत्तर नाही. मविआ सत्तेत आल्यानंतर महिलांचा मान मन्मान राखला जाईल, महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील, राज्यभर एसटी बस प्रवास मोफत असेल. शिंदे भाजपा सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये लाखो रुपये वसुल केले आहेत, युती सरकारचे यासाठी रेडकार्ड ठरलेले आहे. मविआ सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे: अविनाश धर्माधिकारी
‘संविधान आणि राजकीय हिंदुत्व’ कार्यक्रमात शंभर टक्के मतदान करण्याचे आव्हान
पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. .पूर्व पुण्यातील मंगळवार पेठेत ६ नोव्हेंबर रोजी प्रबोधन मंच, श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट, सजग रहो अभियान द्वारे आयोजित ‘संविधान आणि राजकीय हिंदुत्व’ या मतदार जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
धर्माधिकारी म्हणाले, “शेख हसिना यांना बांग्लादेशातुन पळुन यावे लागले आहे. हा भारतासाठी एक धडा आहे. पाकिस्तान व बांग्लादेश दोन्ही देशाची राज्यघटना इस्लामिक आहे. तेथील अनेक कायदे मानवता विरोधी आहेत. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात 10 टक्के हिंदू होते.आता तिथे हिंदू जवळपास संपले आहे. फाळणीच्या वेळी बांग्लादेशात 30 टक्के हिंदू होते. आज 8 टक्के राहिले आहेत. भारतात मात्र फाळणीवेळी मुस्लिम 9 टक्के होते ते आता 14 टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. काही राजकीय पक्ष मुस्लिमांना राखीव जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी करत आहेत. हे संविधान विरोधी आहे. त्यामुळे हिंदूंनी गाफील राहू नये. मुस्लिमांनी मुस्लिम म्हणून एकगठ्ठा मतदान केले तर संवैधानिक अधिकार आणि हिंदुनी हिंदु म्हणुन मतदान केले तर त्याला बहुसंख्याकवाद म्हणायचे हा ढोंगीपणा आहे.”
” समान नागरी कायदा तातडीने लागू करण्याची गरज आहे. समान नागरी कायदा डॉ. बाबासाहेबा आंबेडकरांना हवा होता. घटना तयार करताना डॉ.आंबेडकरांचे जिथे जिथे ऐकले तिथे तिथे भारताला फायदा झाला आहे. कलम 370 ला डॉ. आंबेडकरांचा तीव्र विरोध होता. कलम 370 रद्द करणारे सरकार खरे संविधानवादी आहे. देशात १९७५ साली आणीबाणी लागु केली तेव्हा संविधान धोक्यात आले होते,” असे धर्माधिकारी म्हणाले.
माजी खासदार प्रदीप रावत यावेळी बोलताना म्हणाले, “अरबांनी भारतावर अनेक आक्रमणे केली आणि आपली हजारो वर्षाची समृध्द संस्कृती नष्ट केली. आपली संस्कृती वाचवण्यासाठी हिंदूंच्या पूर्वजांनी संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हा हजारो वर्षांचा संघर्ष वाया गेला असता. शिवरायांनी त्यांचे शस्त्र वापरले. आज संविधानाने आपल्याला एक शस्त्र दिले आहे ते म्हणजे आपले मत. राजकीय हिंदुत्वासाठी आपण शंभर टक्के मतदान केले पाहिजे.”
“भारतात जे प्रबोधन युग घडले त्यामुळे हिंदू समाजाने स्वतःच्या आत बघायला सुरुवात केली. हिंदु समाजाचे दोष लक्षात आले. प्रबोधन युगात झालेल्या महापुरुषांचे एक म्हणणे होते कि ह्या हिंदु समाजाची गावकी एक आहे, पण भावकी एक झाली पाहिजे. डॉ. आंबेडकर म्हणायचे हिंदु समाज एक बहुमजली इमारत आहे, पण या इमारतीत खाली व वर जाण्यासाठी जिनाच नाही. हा जिना प्रबोधन युगात मिळाला. त्याच प्रबोधन युगाचे अपत्य म्हणजे भारतीय संविधान होय. संविधान भारतात टिकले कारण इथे बहुसंख्य हिंदु समाज आहे. म्हणून आज अस्तित्वात असलेला हिंदुस्थान राखायचा असेल, सहिष्णु संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर राजकीय हिंदुत्व प्रबळ राहिले पाहिजे. राजकीय हिंदुत्व दुबळे झाले की सांस्कृतिक हिंदुत्वाचा संकोच होतो,” असे रावत म्हणाले.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या ऍड वैशाली चांदणे मंचावर उपस्थित होते. सायली काणे यांच्या कलाश्री नृत्यशाळेच्या कलाकारांनी मतदार जागृती नृत्य सादर केले. सूत्रसंचालन रोहित धायरकर यांनी केले. सुमित डोळे यांनी प्रास्ताविक केले. विजय दरेकर यांनी संविधान सरनाम्याचे वाचन केले. श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टचे बाळासाहेब पटोळे यांनी आभार मानले. प्रबोधन मंचाचे स्वप्नील कत्तूर यांनी संयोजन केले.
टॅंकरमाफिया आणि गुन्हेगारांपासून संरक्षण, झोपडपट्टीवासियांना ५०० चौ. फु. चे पक्के घर -बसपच्या चलवादींचे आश्वासन
पुणे, ७ नोव्हेंबर २०२४
वडगाव शेरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिसराचा सुरक्षित, स्वच्छ आणि समृद्ध विकास हे ध्येय समोर ठेवत बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी मतदारांना सर्वकर्षी विकासाची ‘गॅरंटी’ देत आहेत. डॉ.चलवादींच्या हमींची त्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली असून घरोघरी, गल्लीबोळासह चौकाचौकात ‘भैय्यांच्या गॅरंटी’चे आश्वासक वारे वाहत असल्याचे दिसून येत आहे. मतदार संघातील प्रत्येक नागरिकानीं सुखी जीवन जगावे, त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे, त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘लाडका भैय्या’ या नात्याने मतदार बंधू-भगिनींसमक्ष एक निश्चित विकासाचा कृती आराखडा डॉ.चलवादी यांनी ठेवला आहे.
गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित वडगाव शेरी ही पहिली हमी चलवादी यांनी दिली आहे.पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन,टॅंकरमुक्त आणि टॅंकरमाफियामुक्त परिसर आणि नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची दुसरी हमी डॉ.चलवादी मतदारांना देत आहेत.अंमली पदार्थाच्या विळख्यातून वडगाव शेरीची मुक्तता करणे आणि व्यसनाधीन तरुणांना पुनर्वसनाच्या मदतीने योग्य मार्गावर आणणे, मतदारसंघात उत्तम दर्जाचे शैक्षणिक उपक्रम आणणे, तरुणांना रोजगार मिळावून देण्यासाठी केंद्र, राज्य, आणि महानगरपालिकेच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची हमी सुद्धा डॉ.चलवादींकडून दिली जात आहे.
झोपडपट्टीवासींचे त्यांच्या मूळ जागेवर पुनर्वसन, एसआरए कायद्यात आवश्यक त्या सुधारणा आणि प्रत्येक गरजू कुटुंबाला किमान ५०० चौरस फुटाचे घर उपलब्ध करून देण्याची योजना आहे. शिवाय वाहतूक व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडीमुक्त मतदारसंघासाठी योग्य वाहतुकीचे नियोजन करून शिस्तबद्ध व्यवस्था उभारली जाईल. नैसर्गिक नाल्यांच्या काठांचे सौंदर्यीकरण करीत जॉंगिंग ट्रॅक उभारण्याची योजना,सातत्याने उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची योजना तसेच महिला आत्मनिर्भर करणे,वयोवृद्ध आणि महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ‘हमी’ डॉ.चलवादींकडून दिली जात आहे.
आपल्या प्रत्येकासाठी या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, हे आमचे ध्येय आहे. वडगाव शेरीचा संपूर्ण विकास होण्यासोबतच इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आनंदी जीवन मिळावे, हीच आमची इच्छा आहे. आपण आम्हाला साथ दिल्यास, एकत्र येऊन आपण वडगाव शेरीचे भविष्य उज्ज्वल करू शकतो. मतदारांचा विश्वासच आम्हची ताकद असल्याची भावना डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली. वडगाव शेरीचा समृद्ध आणि सुंदर विकास हीच आमची प्रेरणा आहे. आपल्या प्रत्येकाला सुरक्षित, स्वच्छ, आणि सुखी समाज मिळावा, यासाठी सदैव प्रयत्नरत आहे. जनतेच्या विश्वासाने आम्हाला ताकद मिळेल, वडगाव शेरीच्या उभारणीसाठी आवश्यक आधार मिळेल.हे फक्त एक वचन नाही, तर वडगाव शेरीच्या भावी पिढीसाठी आमचे स्वप्न असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘गोल्डमॅन’ ऋषिकेश जोशी
हरहुन्नरी ऋषिकेश जोशी, आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने कमालीचे लोकप्रिय आहेत. सोबत त्यांनी लेखक आणि दिगदर्शक म्हणूनही मनोरंजनसृष्टीवर स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सध्या मात्र एका वेगळ्याच कारणाने ते प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत. गोल्डमॅन म्हणून सध्या ते सगळीकडे वावरतायेत. त्यांच्या अंगावरील दागिन्यांमुळे त्यांना ही आवड कधी निर्माण झाली ? हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. आगामी ‘पाणीपुरी’ या चित्रपटातील ‘बबन’ ही व्यक्तिरेखा ऋषिकेश जोशी साकारत असून या बबनला अंगावर दागिने घालून मिरवण्याची हौस आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ऋषिकेश जोशी सांगतात, अंगावर किलोभर सोनं घालून फिरणारा ‘बबन’ हे एक मजेशीर पात्र आहे. बबनच्या गळयात सोन्याच्या चैनी असतात. हातात गोल्डचे कडे, ब्रेसलेट आणि घड्याळ असते. मला स्वतःला ही भूमिका करताना मजा आली. त्यामुळे प्रेक्षकही ही भूमिका एन्जॉय करतील असा विश्वास ते व्यक्त करतात. या चित्रपटात ऋषिकेश जोशी, यांच्यासोबत विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे,प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर,अभय गिते आदि कलाकार आहेत.
चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत.
मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरचे हास्य अधिक विकृत मानसिकतेचे: अमोल कोल्हे
पुणे-सदाभाऊ खोत शरद पवार यांच्यावर टीका करत असताना देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरचे हास्य हे अधिक विकृत मानसिकतेचे होते, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, लोकसभेमध्ये आपण रात्री रात्री बँकांच्या शाखा उघड्या ठेवून काय झाले ते पाहिले. आता मला नवीनच माहिती मिळाली की भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या ‘डिजिटल इंडिया’चा चांगलाच प्रचार सुरू आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा झाल्यानंतर आता भाजपकडून या मतदारसंघात ‘डिजिटल लक्ष्मी दर्शन’ सुरू असून याच्या विरोधात आता आपला आवाज एकजुटीने वाढवला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये राज्यातील जनतेला विविध योजनांचे आश्वास देण्यात आले आहे. मात्र, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे. आता फक्त चंद्र आणून देतो, एवढेच आश्वासन जाहीरनाम्यात द्यायचे राहिले आहे. प्रिंट मिस्टेकमुळे अजित दादांकडून तेवढा वादा राहिल्याची मिष्किली टिप्पणी अमोल कोल्हे यांनी केली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 50 मतदारसंघासाठी 50 स्वतंत्र जाहीरनामे जाहीर केले आहेत. त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनासह लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, राज्यावर साडे आठ लाख कोटींचे कर्ज असतानाही जाहीरनाम्यातून इतके सारे करण्याचे आश्वासन दिले जाते आहे, असे म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या जाहीरनाम्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले.
बंगलोर महामार्गावरील हॉटेल रिपल्स येथे खुलेआम हुक्का पार्लर
पुणे -बंगलोर महामार्गावरील हॉटेल रिपल्स (Hotel Ripples) येथे खुलेआम हुक्का पार्लर (Hookah Parlour) तसेच दारुची विक्री केली जात असल्याचे आढळून आले. खंडणी विरोधी पथकाने दोघांवर कारवाई करुन ४१ हजारांचा माल जप्त केला आहे.
निलेश उद्धव कांबळे (वय ३४, रा. पाण्याच्या टाकीजवळ,वडगाव ), प्रमोद शांताराम खुटवड (वय २९, रा. हटवे, खु़ हतवे बु़) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलीस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आंबेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, रिपल्स हॉटेल येथे बेकायदेशीर रित्या हुक्का तसेच दारु विक्री केली जात आहे, असे कळविले. त्या माहितीनुसार पोलीस पथक तातडीने हॉटेल रिपल्स येथे गेले. हॉटेलमध्ये काही ग्राहक हुक्का ओढत होते. त्यांच्या टेबलवरच बियरच्या बाटल्या ठेवल्या होत्या. तेथील १७ हुक्का पॉट, हुक्का फ्लेवरचे डबे, बियरच्या बाटल्या असा ४१ हजार १०२ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे अधिक तपास करीत आहेत.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला ठार मारण्याची धमकी: वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
धमकी देणाऱ्या ने नाव सांगितले हिंदुस्थानी
डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एका अज्ञात कॉलरचा कॉल आला होता, ज्यामध्ये कॉलरने धमकी दिली होती की, मी बॅण्ड स्टँडचा मालक शाहरुख खानला मारून टाकीन. 50 लाख रुपये न दिल्यास जीवे मारेन, असे फोन करणाऱ्याने सांगितले. फोन करणाऱ्याला त्याचे नाव विचारले असता त्याने उत्तर दिले की, मला काही फरक पडत नाही, माझे नाव हिंदुस्थानी आहे. धमकी मिळाल्यानंतर शाहरुख खानचे घर मन्नत बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.2023 मध्ये पठाण आणि जवान या चित्रपटांच्या यशानंतर शाहरुख खानला सतत धमक्या येत होत्या. तक्रार नोंदवल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. तेव्हापासून शाहरुख खान सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत वावरत आहे .
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही सलमान खानला लॉरेन्स गँगकडून अनेकदा धमक्या आल्या आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता शाहरुख खानला देखील धमक्या आल्या आहेत.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईक गँगकडून सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे आता शाहरुख खानलाही धमक्या आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा कॉल फैजान नावाच्या व्यक्तीने केला होता, जो रायपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. फैजान नावाच्या व्यक्तीने शाहरुख खानला धमकीचा कॉल केला होता, त्याचा कॉल ट्रेस केला असता तो रायपूरचा असल्याचे निष्पन्न झाले. आता पोलिसांचे पथक रायपूरला रवाना झाले आहे.
मोबाईलवर धमकी मिळाल्यानंतर शाहरुख खानच्या टीमने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळताच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ANI च्या वृत्तानुसार, भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 308 (4), 351 (3) (4) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या क्रमांकावरून धमकी देण्यात आली आहे, तो क्रमांक छत्तीसगडमधील फैजान नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. नंबर ट्रेस होताच मुंबई पोलिस रायपूरमध्ये पोहोचले
विधानसभेच्या प्रचारासाठी मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधींसह प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा: रमेश चेन्नीथला
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या प्रमुख उपस्थितीत १० नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार.
मुंबई, दि. ७ नोव्हेंबर २०२४
वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहिल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
आज टिळक भवन येथे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष खा. चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रचार समितीचे संयोजक प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह प्रचार समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून १३, १४, १६, १७ व १८ नोव्हेंबरला राज्यातील विविध भागात त्यांच्या सभा होतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १२, १४ व १६ नोव्हेंबर रोजी प्रचार सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या १३, १६ व १७ नोव्हेंबरला प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. तेलंगणा व कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. राज्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. वांद्रे कुर्ला संकुलात झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसुत्री जाहीर केलेली आहे, त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाईल. १० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयात मध्ये महाविकास आघाडीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित असतील.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या गॅरंटी सरकार येताच लागू केल्या जातील. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्या गॅरंटीविरोधात चुकीच्या व अफवा पसरवणाऱ्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्तमानपत्रात ही जाहिरात कोणी दिली त्याचे नाव नाही. याविरोधात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ज्या गॅरंटी दिल्या त्याची अंमलबजावणी सुरु आहे पण भाजपा जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहे. महालक्ष्मी योजनेसह सर्व गॅरंटी जाहिर करताना त्याचा अभ्यास केला असून आर्थिक तरतूद कशी केली जाईल यावर सखोल चर्चा करुनच त्या जाहीर केल्या आहेत, असेही रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला, प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, एसएसी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे आदी उपस्थित होते.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी विशेष मतदान केंद्रांची स्थापना
पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघातील २०२४ निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या RO (रिटर्निंग ऑफिसर) हँडबुकमध्ये नमूद असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे आणि नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गटांसाठी विशेष मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती मनुष्यबळ कक्षाचे नोडल अधिकारी सहा. आयुक्त विजय नायकल , सहा. महसूल अधिकारी प्रमोद भांड, साहीर सय्यद, धम्मदीप सातकर, भूमेश मसराम यांनी दिली. पुढे बोलतांना साहीर सय्यद म्हणाले की, या केंद्रांचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक गटातील मतदारांसाठी सुलभ, सुरक्षित, आणि समावेशक वातावरणात मतदानाची सोय करणे. RO हँडबुकनुसार, या विशेष मतदान केंद्रांचे प्रकार आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या केंद्रांवर मतदार संख्या ठरवून ठेवण्यात आली असून, मतदारांना सुविधा मिळवून देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
विशेष मतदान केंद्रांचे प्रकार, मतदार संख्या, आणि त्यांची उद्दिष्टे पुढील प्रमाणे :
- महिला (Pink) मतदान केंद्र: महिलांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात मतदानाची सुविधा मिळावी यासाठी हे केंद्र फक्त महिलांसाठी बनवले गेले आहे. येथे महिला निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले आहेत, ज्यामुळे महिला मतदारांचा सहभाग वाढेल.
पत्ता: शिवसागर सोसायटी क्लब हाऊस हॉल क्र.१, वडगाव बु
मतदार संख्या: ११०२ - PWD मतदान केंद्र: दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा असलेल्या या केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, आणि मदतनीसांची सोय केली जाते. दिव्यांग मतदारांना सहजतेने मतदान करता यावे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. येथे दिव्यांग कर्मचारी देखील असतात.
पत्ता: नांदेड सोटी पब्लिक स्कूल, नांदेड सीटी
मतदार संख्या: ७१८ - युवा (Youth) मतदान केंद्र: युवा मतदारांचा अधिकाधिक सहभाग मिळवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यांना मतदान प्रक्रियेबद्दल जाणीव वाढवण्यास मदत करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पत्ता: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बहुली
मतदार संख्या: ७३३ - Unique मतदान केंद्र: RO हँडबुकनुसार, विशिष्ट स्थानिक वैशिष्ट्ये जपण्यासाठी unique मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे मतदारांना त्यांच्या स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता येतो.
पत्ता: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोणजे
मतदार संख्या: १४८६ - Pardanashin मतदान केंद्र: पारंपारिक संस्कृती पाळणाऱ्या महिलांसाठी हे विशेष केंद्र त्यांना गोपनीय आणि सुरक्षित वातावरणात मतदान करण्याची सुविधा देते.
पत्ता: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढवे धावडे
मतदार संख्या: १४१४ - आदर्श (Model) मतदान केंद्र: RO हँडबुकनुसार, आदर्श मतदान केंद्र म्हणजे सुशोभित व सुव्यवस्थित केंद्र, ज्यामुळे मतदारांना सकारात्मक अनुभव मिळतो. हे केंद्र प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञान आणि पूर्ण सुविधांनी सुसज्ज असते.
पत्ता: सनसिटी पुणे सन.१०, वडगाव बु कम्युनिटी हॉल
मतदार संख्या: १२८० - निगेटिव्ह मतदान केंद्र: संवेदनशील भागांमध्ये असलेल्या केंद्रांसाठी निगेटिव्ह मतदान केंद्रांची संकल्पना आहे. या केंद्रांवर विशेष सुरक्षा आणि अतिरिक्त सुविधा पुरवून मतदारांचा सहभाग सुरक्षित पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
पत्ता/मतदार संख्या: निरंक म्हणजे खडकवासला मतदार संघात एकही संवेदनशील मतदार केंद्र नाही.
RO हँडबुकनुसार घेतलेले विशेष निर्णय
RO हँडबुकनुसार, या विशेष मतदान केंद्रांच्या स्थापनेने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास अधिकाधिक मतदारांना प्रोत्साहन मिळते असे डॉ. माने म्हणाले . विविध प्रकारच्या मतदारांना त्यांच्या गरजेनुसार मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याने या विशेष केंद्रांची स्थापना महत्त्वपूर्ण ठरते.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी SST, FST आणि VVT टीमच्या व्हिडिओग्राफर्सचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न
पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ शांतता, पारदर्शकता, आणि यशस्वितेसह पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघात विविध पातळ्यांवर तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून SST (स्टॅटिक सर्व्हेलेन्स टीम), FST (फ्लाइंग स्क्वॉड टीम), आणि VVT (व्हिडिओ व्हिजिलन्स टीम) यांच्या व्हिडिओग्राफर्ससाठी निवडणूक कार्यालयात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, किरण सुरवसे, आणि सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रशिक्षण सत्राचे व्यवस्थापन प्रा. तुषार राणे आणि प्रा. माधुरी माने यांनी केले, ज्यांनी टीमच्या सदस्यांना विविध तांत्रिक आणि प्रक्रियात्मक बाबींमध्ये कौशल्य मिळवून दिले. व्हिडिओग्राफर्सना निवडणूक प्रक्रियेत अधिक सजगता, सतर्कता, आणि अचूकता ठेवून काम करण्याचे महत्त्व समजावले गेले. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक टप्प्याचे योग्य व्हिडिओ दस्तऐवजीकरण राखण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच संभाव्य समस्यांचे निराकरण कसे करावे याचे विशेष मार्गदर्शन देण्यात आले.
प्रशिक्षणात शिकवलेल्या प्रमुख बाबी
प्रशिक्षणामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगचे नियम, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन, तसेच विविध उपकरणांचा योग्य वापर यांवर विशेष लक्ष देण्यात आले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदार केंद्रांवरील अनुशासन, तसेच मतदानाची पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या पद्धती याविषयी माहिती देण्यात आली. या प्रक्रियेत स्टॅटिक सर्व्हेलेन्स टीम (SST) स्थिर देखरेख करणार, फ्लाइंग स्क्वॉड टीम (FST) तातडीने प्रतिसाद देईल, तर व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (VVT) निवडणुकीच्या प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करेल.
निवडणुकीसाठी समर्पित आणि प्रशिक्षित टीम
या प्रशिक्षणामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीत एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. प्रशिक्षित व्हिडिओग्राफर्सनी निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असणारी सजगता आणि जबाबदारी समजून घेतली आहे. या टीमच्या कार्यक्षमतेमुळे खडकवासला मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक, आणि निर्भय वातावरणात पार पडणार आहे, असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सिद्धार्थ शिरोळे हा राजकारणातील संस्कारी चेहरा – पंकजा मुंडे
शिरोळे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्याला जोरदार प्रतिसाद
पुणे, दि. ७ नोव्हेंबर, २०२४ : राजकारणात संस्कारी असणाऱ्यांची, महिलांची प्रतिष्ठा राखणाऱ्यांची सर्वाधिक आवश्यकता आहे. सिद्धार्थ शिरोळे राजकारणातील संस्कारी चेहरा आहेत, असे कौतुकोद्गार भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काढले. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर गावठाण येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात मुंडे बोलत होत्या.
श्री रोकडोबा देवस्थान सभागृह परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी सुजाता सिद्धार्थ शिरोळे, पक्षाच्या प्रदेशसचिव अॅड. वर्षा डहाळे, महिला मोर्चा पुणे शहर अध्यक्षा हर्षदा फरांदे, निवेदिता एकबोटे, शिवाजीनगर महिला आघाडी अध्यक्ष अपर्णा कुऱ्हाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या लावण्या शिंदे, माजी नगरसेविका स्वाती लोखंडे, महिला आघाडी शहर सरचिटणीस भावना शेळके, अपर्णा कुऱ्हाडे, लता धायगुडे, शारदा पुनावळे, श्रद्धा शिंदे, अर्चना मुसळे उपस्थित होत्या
मला लाखोंच्या सभेपुढे बोलताना कायमच झाशीच्या राणीचे रूप घ्यावे लागते आज शिवाजीनगर येथे होत असलेल्या या मेळाव्यात मला बोलण्यातला गोडवा, सहजता आणि बहिणींशी गप्पा मारल्याचे सुख अनुभविता आले, याचा आनंद पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
आपले वडील गोपीनाथ मुंडे यांचा सिद्धार्थ शिरोळे यांचे वडील अनिल शिरोळे यांसोबत असलेला ऋणानुबंध आणि मैत्रीचे नाते याच्या अनेक आठवणी पंकजा यांनी जागविल्या. यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, “जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा घरोघरी शौचालय ही योजना जाहीर केली. भारतीय जनता पक्ष हा स्त्रियांचा सन्मान करणारा पक्ष असून याच पक्ष शिस्तीत सिद्धार्थ यांची जडणघडण झाली आहे. शिवाजीनगर मतदार संघात त्यांना दुसऱ्यांदा देण्यात आलेली संधी हे त्यातेच द्योतक असून त्यांच्या विजयासाठी महिलांनी पुढे सरसवा.”
आजवर स्त्रीने खूप चटके सहन केले असून एका स्त्रीसाठीच रामायण महाभारत घडले आहे. आजच्या कलयुगातही स्त्रीचा हा लढा संपला नसून आज तिची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. स्त्रीयांची ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने आणलेली ‘लाडकी बहिण’ योजना ही खऱ्या अर्थाने स्त्रियांचे सक्षमीकरण करणारी योजना आहे, असेही मुंडे यांनी नमूद केले.

या आधी सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ मतदार संघातील विविध भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोखलेनगर, कपिला सोसायटी, मंगलवाडी, रामोशी वाडी, चाफेकर पुतळा, वाकडेवाडी, शिवाजीनगर रेल्वे स्थानक, भैय्यावाडी या ठिकाणी सर्व स्तरातील, वयोगटातील नागरिकांच्या भेटी शिरोळे यांनी घेतल्या. या भेटीदरम्यान वयोवृद्ध नागरीकांनी शिरोळे यांना आशीर्वाद दिले तर लहानग्यांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. शिरोळे यांनीही या मुलांचा हट्ट पुरविला.
पोर्शे अपघात: रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर आरोपी शरण आला
पुणे- कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात कारमध्ये मागे बसलेल्या एका अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर आरोपी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात शरण आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
अरुणकुमार देवनाथ सिंग असे त्याचे नाव आहे. कारचालक मुलाच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी यांनी ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली. त्यानंतर एका आरोपीने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला, तर आशिष नावाच्या आरोपीने अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलाच्या जागी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंग याने येथील जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. सुरुवातीला त्याला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, आता न्यायालयाने त्याचा जामीन दि. 23 ऑक्टोबरला फेटाळून लावला होता. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सिंग याने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सिंग याला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता रक्त बदलण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग दिसत असल्याने जामीन फेटाळून लावला. त्यामुळे आपली अटक निश्चितच असल्याचे मानले जात असतान अरूणकुमारने अधिकच्या पळवाटा न काढता तो स्वतःहून न्यायालयात शरण आला.
