पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघातील २०२४ निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या RO (रिटर्निंग ऑफिसर) हँडबुकमध्ये नमूद असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे आणि नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गटांसाठी विशेष मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती मनुष्यबळ कक्षाचे नोडल अधिकारी सहा. आयुक्त विजय नायकल , सहा. महसूल अधिकारी प्रमोद भांड, साहीर सय्यद, धम्मदीप सातकर, भूमेश मसराम यांनी दिली. पुढे बोलतांना साहीर सय्यद म्हणाले की, या केंद्रांचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक गटातील मतदारांसाठी सुलभ, सुरक्षित, आणि समावेशक वातावरणात मतदानाची सोय करणे. RO हँडबुकनुसार, या विशेष मतदान केंद्रांचे प्रकार आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या केंद्रांवर मतदार संख्या ठरवून ठेवण्यात आली असून, मतदारांना सुविधा मिळवून देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
विशेष मतदान केंद्रांचे प्रकार, मतदार संख्या, आणि त्यांची उद्दिष्टे पुढील प्रमाणे :
- महिला (Pink) मतदान केंद्र: महिलांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात मतदानाची सुविधा मिळावी यासाठी हे केंद्र फक्त महिलांसाठी बनवले गेले आहे. येथे महिला निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले आहेत, ज्यामुळे महिला मतदारांचा सहभाग वाढेल.
पत्ता: शिवसागर सोसायटी क्लब हाऊस हॉल क्र.१, वडगाव बु
मतदार संख्या: ११०२ - PWD मतदान केंद्र: दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा असलेल्या या केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, आणि मदतनीसांची सोय केली जाते. दिव्यांग मतदारांना सहजतेने मतदान करता यावे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. येथे दिव्यांग कर्मचारी देखील असतात.
पत्ता: नांदेड सोटी पब्लिक स्कूल, नांदेड सीटी
मतदार संख्या: ७१८ - युवा (Youth) मतदान केंद्र: युवा मतदारांचा अधिकाधिक सहभाग मिळवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यांना मतदान प्रक्रियेबद्दल जाणीव वाढवण्यास मदत करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पत्ता: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बहुली
मतदार संख्या: ७३३ - Unique मतदान केंद्र: RO हँडबुकनुसार, विशिष्ट स्थानिक वैशिष्ट्ये जपण्यासाठी unique मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे मतदारांना त्यांच्या स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता येतो.
पत्ता: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोणजे
मतदार संख्या: १४८६ - Pardanashin मतदान केंद्र: पारंपारिक संस्कृती पाळणाऱ्या महिलांसाठी हे विशेष केंद्र त्यांना गोपनीय आणि सुरक्षित वातावरणात मतदान करण्याची सुविधा देते.
पत्ता: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढवे धावडे
मतदार संख्या: १४१४ - आदर्श (Model) मतदान केंद्र: RO हँडबुकनुसार, आदर्श मतदान केंद्र म्हणजे सुशोभित व सुव्यवस्थित केंद्र, ज्यामुळे मतदारांना सकारात्मक अनुभव मिळतो. हे केंद्र प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञान आणि पूर्ण सुविधांनी सुसज्ज असते.
पत्ता: सनसिटी पुणे सन.१०, वडगाव बु कम्युनिटी हॉल
मतदार संख्या: १२८० - निगेटिव्ह मतदान केंद्र: संवेदनशील भागांमध्ये असलेल्या केंद्रांसाठी निगेटिव्ह मतदान केंद्रांची संकल्पना आहे. या केंद्रांवर विशेष सुरक्षा आणि अतिरिक्त सुविधा पुरवून मतदारांचा सहभाग सुरक्षित पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
पत्ता/मतदार संख्या: निरंक म्हणजे खडकवासला मतदार संघात एकही संवेदनशील मतदार केंद्र नाही.
RO हँडबुकनुसार घेतलेले विशेष निर्णय
RO हँडबुकनुसार, या विशेष मतदान केंद्रांच्या स्थापनेने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास अधिकाधिक मतदारांना प्रोत्साहन मिळते असे डॉ. माने म्हणाले . विविध प्रकारच्या मतदारांना त्यांच्या गरजेनुसार मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याने या विशेष केंद्रांची स्थापना महत्त्वपूर्ण ठरते.