पुणे-सदाभाऊ खोत शरद पवार यांच्यावर टीका करत असताना देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरचे हास्य हे अधिक विकृत मानसिकतेचे होते, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, लोकसभेमध्ये आपण रात्री रात्री बँकांच्या शाखा उघड्या ठेवून काय झाले ते पाहिले. आता मला नवीनच माहिती मिळाली की भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या ‘डिजिटल इंडिया’चा चांगलाच प्रचार सुरू आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा झाल्यानंतर आता भाजपकडून या मतदारसंघात ‘डिजिटल लक्ष्मी दर्शन’ सुरू असून याच्या विरोधात आता आपला आवाज एकजुटीने वाढवला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये राज्यातील जनतेला विविध योजनांचे आश्वास देण्यात आले आहे. मात्र, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे. आता फक्त चंद्र आणून देतो, एवढेच आश्वासन जाहीरनाम्यात द्यायचे राहिले आहे. प्रिंट मिस्टेकमुळे अजित दादांकडून तेवढा वादा राहिल्याची मिष्किली टिप्पणी अमोल कोल्हे यांनी केली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 50 मतदारसंघासाठी 50 स्वतंत्र जाहीरनामे जाहीर केले आहेत. त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनासह लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, राज्यावर साडे आठ लाख कोटींचे कर्ज असतानाही जाहीरनाम्यातून इतके सारे करण्याचे आश्वासन दिले जाते आहे, असे म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या जाहीरनाम्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले.