मुंबई, दि. ७ नोव्हेंबर २०२४
मराठवाड्यात गायरान जमिनीचा प्रश्न गंभीर असून अशोक चव्हाण दोनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तरिही त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देत या भागात शेतात जाण्यासाठी आजही पाणंद रस्ते आहेत, सरकार आल्यानंतर हे पाणंद रस्तेही मजबुत केले जातील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीतील काँग्रेस मविआचे अधिकृत उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण आणि भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार तिरुपती (पप्पू) कदम कोंढेकर यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची मुदखेड मध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पटोले पुढे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस असे चित्र कुठेच दिसत नसून येथील हुकूमशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहे, या हुकूमशाहीला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून दोनदा मुख्यमंत्रीपद, अनेक वर्षे मंत्रीपद भोगले पण काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ते काँग्रेसला सोडून भाजपात गेले. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना मोठे केले त्यालाच आज ते शिव्या देत आहेत. अशोक चव्हाण भाजपामध्ये असते तर त्यांचा राजकीय उदय झाला नसता. दोनदा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःचे घर भरण्याचेच काम केले. सत्तेचा वापर करून दहा पिढ्यांचा उद्धार केला आणि जेलमध्ये जावे लागेल या भितीने अशोक चव्हाण भाजपात गेले. भाजपात जाताच देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याला १५० कोटी रुपये दिले. आता अशोक चव्हाण यांचा सातबारा खोडायची वेळ आली आहे, असे नाना पटोले म्हणाले.
राज्यात आज महिला सुरक्षित नाहीत, शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत, ६७ हजार महिला राज्यातून बेपत्ता झाल्या आहे पण सरकारकडे त्याचे उत्तर नाही. मविआ सत्तेत आल्यानंतर महिलांचा मान मन्मान राखला जाईल, महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील, राज्यभर एसटी बस प्रवास मोफत असेल. शिंदे भाजपा सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये लाखो रुपये वसुल केले आहेत, युती सरकारचे यासाठी रेडकार्ड ठरलेले आहे. मविआ सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.