Home Blog Page 593

लोकसभेचा सर्वाधिक मताधिक्याचा पॅटर्न विधानसभेतही रहावा!- खासदार मेधा कुलकर्णी

बाणेर मधील चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

पुणे : लोकसभे निवडणुकीला मुरलीधर मोहोळ यांना बाणेर बालेवाडीतून २२ हजारांचे मताधिक्य मिळाले. हाच पॅटर्न कायम ठेवत विधानसभा निवडणुकीत प्रभाग ९ मधून सर्वाधिक मताधिक्य मिळाले पाहिजे, असा विश्वास खा. प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केला. तसेच, भविष्याच्या दृष्टीने ही विधानसभा निवडणूक आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाणेर बालेवाडी तील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी, चंद्रकांतदादा पाटील, माधवजी भंडारी यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे,रिपाइंचे ॲड मंदार जोशी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा कोथरूड उत्तर मंडलचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रकाशतात्या बालवडकर, लहू बालवडकर, सनी निम्हण, राहुल कोकाटे, सागर बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम विधाते, संतोष पाषाणकर उपस्थित होते.

प्रा डॉ मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या की, बाणेर बालेवाडी या भागाने भाजपा-महायुतीवर भरभरुन प्रेम केले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनात प्रचंड धाकधुक होती. कारण, त्यापूर्वी महापालिकेच्या माध्यमातून एका ठराविक भागातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पण २०१४ पासून या भागातून जे प्रेम आणि विश्वास मिळाला, तो अवर्णनीय आहे.‌ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही या प्रभागातून मुरलीधर मोहोळ यांना २२ हजारांचे मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत हाच पॅटर्न कायम ठेवला पाहिजे.

त्या पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या १० वर्षांत ज्या पद्धतीने विकासकामे संपूर्ण देशात राबविली आहेत, त्यामुळे आज संपूर्ण जगात देशाची प्रतिमा उंचावली आहे. याचा अनुभव आपल्याला परदेशात गेल्यावर आपल्याला सहज जाणवतो. त्यामुळे मोदीजींच्या विकास यात्रेत महाराष्ट्र ही असला पाहिजे. त्यासाठी विधानसभेत महायुतीचा प्रत्येक उमेदवार महत्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीला अनेक ठिकाणी आपण गाफील होतो. त्यामुळे त्याचा फटका आपल्याला बसला आहे. वक्फ सारखा कायद्यात बदल करणं ही आवश्यकता आहे. त्यामुळे कोथरूड मधून चंद्रकांतदादा पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात केवळ विधानसभेची निवडणूक नसून, लोकसभेत जी आपली पिछेहाट झाली, त्यामुळे विरोधक एकप्रकारचा खोटा नॅरेटिव्ह सेट करु पाहत आहेत. तो खोडून काढण्यात हरियाणा, जम्मू काश्मीर यश मिळाले. महाराष्ट्रात हा खोटा नॉरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सात हप्ते मिळाले. खरंतर ही योजना गेमचेंजर ठरणार आहे. या योजनेमुळे दोन कोटी २० लाख महिला आनंदात आहेत. असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, १९८२ पासून मी पुणे जवळून पाहत आहे. १९८२ च्या तुलनेत आज पुण्याची लोकसंख्या ७२ लाखांवर पोहोचली आहे. सध्या पुण्याच्या रस्त्यांवरुन ५३ लाख वाहने धावत आहेत.‌ यंदा दिवाळी पाडव्याला २१ हजार वाहने खरेदी झाली. त्यामुळे हा आकडा पाहता पायाभूत सुविधा वाढविण्यावर आमचा सातत्याने भर आहे. मेट्रो सारख्या प्रकल्पामुळे आज हजारो पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळले आहेत. चांदणी चौक सारख्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटण्यास मदत झाली आहे. २४×७ अंतर्गत समान पाणीपुरवठ्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून बाणेर मधील पहिली टाकी कार्यान्वित झाली आहे. विकासकामांची ही गती कायम राखण्यासाठी २२ तारखेला जास्तीत जास्त मतदान व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी भाजप नेते माधवराव भंडारी, अमोल बालवडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल उत्तम कळमकर यांचे भाजपा कोथरूड मंडलाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी सचिन दळवी, उमाताई गाडगीळ, मोरेश्वर बालवडकर, विवेक मेथा, रोहन कोकाटे, अस्मिता करंदीकर, सुभाष भोळ, प्रमोद कांबळे, शिवम सुतार, रिपाइंचे संतोष गायकवाड, भाजपा नेत्या वंदना सिंह, कल्याणी टोकेकर, जागृती विचारे, सुरेखा वाबळे, प्रमोद कांबळे, उत्तम जाधव, अनिकेत चांदेरे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

मतदान केंद्र शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्या- अनिल पवार

पुणे, दि. १०: येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत असून मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी आजच आपल्या मतदान केंद्राचे ठिकाण शोधण्यासाठी मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात एकूण ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार असून त्यात ३ लाख ४८ हजार ४५० पुरुष मतदार तर ३ लाख १५ हजार ११५ महिला मतदार आणि ५७ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीवेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात एकूण ६ लाख १८ हजार २४५ मतदार होते. त्यात २ लाख ९० हजार २३९ महिला मतदार तर ३ लाख २७ हजार ९६१ पुरुष मतदार आणि ४५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ४५ हजार ३७७ नवीन मतदारांचा नव्याने समावेश झाला आहे, असे श्री. पवार यांनी कळविले आहे.

000

खडकवासल्याच्या जनतेशी माझी असलेली नाळ हीच माझ्या विजयाची ताकद-आमदार भीमराव तापकीर

वडगाव बुद्रुक, सन सिटी, आणि सिंहगड रोड परिसरात प्रचार दौरा संपन्न

पुणे-महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वडगाव बुद्रुक, सन सिटी, आणि सिंहगड रोड परिसरात भव्य प्रचार दौरा केला. या दौऱ्यात नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद आणि अण्णांच्या नेतृत्वावरचा ठाम विश्वास स्पष्ट दिसून आला.

“गेल्या तीन टर्ममध्ये खडकवासला मतदारसंघात आम्ही केलेल्या विकासकामांवर नागरिकांचा विश्वास आहे. मतदार हा सुज्ञ आहे, तो भुलथापांना किंवा कोणत्याही गैरमार्गाने आकर्षित करण्याच्या प्रयत्नांना बळी पडणार नाही. खडकवासल्याच्या जनतेशी माझी असलेली नाळ हीच माझ्या विजयाची ताकद आहे,” असे आमदार तापकीर यांनी सांगितले.

प्रमुख उपस्थिती:या प्रचार दौऱ्यात माजी नगरसेवक हरिदास चरवड, हेमंत दांगट, अनंत दांगट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या महिला अध्यक्षा डांगी ताई, स्वीकृत सदस्य गंगाधर भडावळे, शहाजी वांजळे आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सन सिटी परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद:

सन सिटी परिसरातील नागरिकांनी आमदार तापकीर यांच्या नेतृत्वाचे खुलेपणाने कौतुक केले. “अण्णांनी नेहमीच प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यामुळे विकासकामांवर आधारित मत देणे, हा आमचा ठाम निर्णय आहे,” असे नागरिकांनी नमूद केले.

विकासाच्या वचनावर विजयाची हमी: भिमराव तापकीर

खडकवासल्यातील रस्ते सुधारणा, मेट्रो, पुल, पर्यटन विकास, पाणीपुरवठा, कर आकारणी, समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास, विद्युत विषयक कामे, या प्रकल्पांमुळे मतदारसंघाची ओळख बदलली आहे. विरोधकांचा गैरमार्गाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. खडकवासल्यातील सुज्ञ मतदार अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत, असे नागरिकांनी ठामपणे सांगितले.

पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांच्या सशर्त नियुक्तीबाबत त्वरित हस्तक्षेप करा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र.

मुंबई, दि. १० नोव्हेंबर
महाराष्ट्र सरकारने संजय कुमार वर्मा यांची पोलीस महासंचालक (DGP) म्हणून सशर्त नियुक्ती करण्याची कृती ही घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि स्थापित प्रशासकीय तत्त्वे यांचे उघड उघड उल्लंघन करणारी आहे. यामुळे पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ व निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागले म्हणून निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांचा वापर करून संजय वर्मा यांच्या तात्पुरत्या नियुक्तीच्या आदेशावर त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात नाना पटोले म्हणाता की, निवडणूक आयोगाने 5 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यघटनेच्या कलम 324 अंतर्गत घटनात्मक अधिकाराचा वापर करत संजय कुमार वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी कोणत्याही अटींशिवाय नियुक्तीचे स्पष्ट आदेश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलिस दलाची निष्पक्ष व तटस्थ भूमिका असावी यासाठी ही नियुक्ती केली होती. परंतु निवडणूक आयोगाच्या या निर्देशाचे उल्लंघन करत महाराष्ट्र सरकारने संजय वर्मा यांची नियुक्ती आचार संहितेपर्यंतच करणारा आदेश काढला. असा एकतर्फी फेरफार हा निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकाशसिंह आणि इतर विरुद्ध भारत आणि इतर संघ प्रकरणी ऐतिहासिक निकाल देताना डीजीपींच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्वे, योग्यता आणि राजकीय प्रभावापासून संरक्षण यासंबंधाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, त्याचेही महाराष्ट्र सरकारने उल्लंघन केलेले आहे.

संजय वर्मा यांच्या सशर्त नियुक्तीमुळे पोलिस दलाचे नेतृत्व व प्रशासकीय सातत्य धोक्यात येते. रश्मी शुक्ला यांना निवडणुकीनंतर पुन्हा डीजीपीपदी नियुक्त करण्याचा राज्य सरकारचा काही इरादा असेल तर तो कायदेशीर व प्रशासकीय गुंता निर्माण करणारा ठरू शकतो. सशर्त अटीमुळे पोलीस महासंचालकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करणारा ठरतो. निवडणुक काळापुरता पोलीस महासंचालक व निवडणुकीनंतरचा पोलीस महासंचालक अशा नियुक्तीमुळे प्रशासकीय संबंधित मूलभूत घटनात्मक तत्त्वे, पदानुक्रम आणि अधिकाराचे पृथक्करण यावर परिणाम होतो. राज्य सरकारच्या या कृतीमुळे घटनात्मक संतुलनाला बाधा पोहचून कायदेशीर अनिश्चितता उद्धवू शकते. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करावा असे नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

मविआच्या जाहिरनाम्यात महिलांना वर्षाला ५०० रुपयात ६ सिलेंडर, २.५ लाख सरकारी रिक्त पदांची भरती, कंत्राटी भरती बंद, १०० युनिट मोफत वीज.

शेतकरी, महिला सुरक्षा व सक्षमीकरण, नवीन उद्योग धोरण, रस्ते, दिवसा वीज, तंटामुक्त गाव, नोकर भरती, शिष्यवृत्तीत वाढ, युवा आयोग बनवणार.

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी मविआच्या ‘महाराष्ट्रनामा’चे भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन.

महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, खोके सरकार सत्तेतून खाली खेचून मविआचे सरकार आणा: मल्लिकार्जून खर्गे

मुंबई, दि. १० नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले जातील, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणला जाईल. ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज, नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर असेल. सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरल्या जातील. एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल. सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेतल्या जातील. महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रनामा प्रकाशित करत आहोत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवला जाईल. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे सरकार स्थापन करु तसेच २०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प या जाहिरनाम्यातून केला आहे.
यावेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक मुंबईकडे आर्थिकदृष्या, रोजगारासाठी, उत्पादन, गुंतवणुकीच्या दृष्टीने अपेक्षेने पहातात. देशभरातून लोक मुंबईत स्वप्न घेऊन येतात व मुंबई त्यांना सामावून घेते, त्यांच्या स्वप्नांचा बळ देते. सामाजिक बदलातही महाराष्ट्र आघाडीवर असतो. महाराष्ट्राची निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे. भाजपा युतीचे खोके सरकार सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचे आणा असे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस सरकार महिलांना महालक्ष्मी योजनेतून २ हजारे रुपये देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची खिल्ली उडवली आणि आता त्यांचेच सरकार महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेतून १५०० रुपये देत आहेत. काँग्रेसच्या योजनेची नक्कल भाजपाने केली आहे. राहुल गांधी यांनी संविधानाचे लाल रंगाचे पुस्तक दाखवले तर त्याला शहरी नक्षलवाद म्हणून टीका करत आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे संविधान दिल्याचा फोटो दाखवून खर्गे यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्या टीकेतील हवा काढून घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, भाजपा युती सरकारला दीड वर्षात शेतकऱ्यांची आठवण आली नाही पण आता त्यांना शेतकऱ्यांची आठवण आली असून कर्जमाफी करण्याच्या वल्गणा करु लागले आहेत. महागाई, बेरोजगारी, महिला, शेतकरी दिसले नाहीत आता त्यांना पराभव दिसत असल्याने त्यांना यांची आठवण झाली आहे. आता भाजपा युती सरकार खाली खेचण्याची वेळ आली असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने परिवर्तन करण्याचा मानस बनवला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र कधी कोणाचा गुलाम बनला नाही व बनणार नाही हा जाहिरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ म्हणणारे नरेंद्र मोदी जोपर्यत महाराष्ट्रात येत राहतील तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ, राहिल असे संजय राऊत म्हणाले.
जाहिरनामा समितीच्या सदस्य खा. वंदना चव्हाण यांनी मविआच्या जाहिरनाम्याबद्दलची सविस्तर माहिती दिली. तर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आभार व्यक्त केले.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा नरिमन पाईंट येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रमुख उपस्थिती मविआतील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, खासदार अभिषेक मनु सिंघवी, AICC च्या मीडिया विभागाचे चेअरमन प्रविण खेरा, सचिव बी. एम. संदीप, वॉर रुम प्रभारी वामशी रेड्डी, काँग्रेस वर्किंग कमीटीचे सदस्य खा. डॉ. नासीर हुसेन, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

लोहगावात ५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होणार-सहाशे कोटींची ‘ईसीए’ आधारित परकीय गुंतवणुक

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांतून ‘एमपीएमसी’चा गृहप्रकल्प होणार कार्यान्वित- ६०० कोटींची टर्मशीट ‘एमपीएमसी’कडे हस्तांतरित; अंबर आयदे यांची माहिती- राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख कौस्तुभ धवसे यांच्या प्रयत्नांना यश
पुणे: जवळपास १२ वर्षांपासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा (एमपीएमसी) गृहनिर्माण प्रकल्प आता  लवकरच कार्यान्वित होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील वर्षभराच्या पाठपुराव्यामुळे नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची टर्मशीट आज ‘एमपीएमसी’कडे हस्तांतरित करण्यात आली. यामुळे लवकरच ५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल, अशी माहिती रुरल एन्हान्सर्स संस्थेचे प्रमुख व विदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली.
रूरल एन्हान्सर्सच्या पुढाकारातून शनिवारी विमाननगर येथील हॉटेल हयातमध्ये ‘एमपीएमसी’च्या पदाधिकाऱ्यांना या गुंतवणुकीची टर्मशीट अटल  कन्सल्टिंगचे भारतातील प्रकल्प व्यवस्थापक अनिल कुमार कुप्पा यांनी हस्तांतरित केली. यावेळी अटल कन्सल्टिंग नेदरलँड यांचे व्यवस्थापकीय संचालक श्रीहान बाटले हे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित होते, सोबत रूरल एन्हान्सर्सचे प्रमुख अंबर आयदे, ‘एमपीएमसी’चे अध्यक्ष भरतकुमार राणे उपस्थित होते.
अंबर आयदे म्हणाले, “महाराष्ट्रातील पोलीस बांधवांच्या ५२४८ घरांचा आणि १६० दुकानांचा ११७ एकरांवरील हा प्रकल्प २०१२ पासून रखडलेल्या अवस्थेत होता. पोलीस बांधवांच्या घरांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून, राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख आणि जॉईंट सेक्रेटरी  श्री कौस्तुभ धावसे यांनी एम पी एम सी या  प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून गुंतवणूक आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती.
त्या अनुषंगाने ८ सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबईतील शासकीय निवासस्थानी नेदरलँडस्थित संस्थांचा आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचा गुंतवणूक सोहळा झाला होता. मा.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून  ही गुंतवणूक आल्यास , याचा सरळ फायदा या प्रकल्पातील पोलीस  बांधवांना स्वतःचे रखडलेले हक्काचे घर मिळण्यास होणार आहे, याचा खरंच आनंद वाटतो “
काय आहे पोलिसांचा मेगा सिटी प्रकल्प?महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी अर्थात ‘एमपीएमसी’ अंतर्गत पुण्यातील लोहगाव येथे पोलिसांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा निर्णय २०१० मध्ये झाला. प्रकल्पाच्या विकासासाठी तत्कालीन, राज्य शासनाद्वारे बीईबिलो मोरया कंपनीची नियुक्ती झाली होती. बांधकाम व्यवस्थापनाच्या सुनिश्चितीसाठी बीईबिलो मोरया आणि ‘एमपीएमसी’ यांनी ‘बेबेन को डेव्हलपर्स’ (बीडीएल) नावाने ‘एसपीव्ही’ स्थापन केली. त्याअंतर्गत २७० कोटी रुपयांचा भरणा केला. लोहगाव येथे ११७ एकर जमीन विकत घेऊन हा प्रकल्प विकसित करण्याचे ठरले. प्रकल्पाच्या डिझाईनची जबाबदारी ‘बीडीएल’ने ‘व्हीके आर्किटेक्ट्स’कडे सोपवली होती.
प्रकल्प रखडल्याने पोलीस अडकलेबीईबिलो मोरया कंपनीने बांधकाम गुणवत्तेसाठी फिनलँड देशातील प्रीकास्ट काँक्रीट तंत्रज्ञान व एलिमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण प्रोजेक्ट प्री-कास्टच्या माध्यमातून पूर्ण करण्याची हमी ‘एमपीएमसी’ यांच्यासोबत झालेल्या करारनाम्यामध्ये दिली होती. त्यानुसार लोहगाव येथे प्रीकास्टिंग फॅक्टरी उभारण्यात आली होती. ‘एमपीएमसी’ प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांमध्ये जवळपास ५२४८ सदनिका व जवळपास १६० दुकाने हस्तांतरण करणे या प्रकल्पाचे विकासक मोरिया यांना बंधनकारक होते. काही कारणांनी हा प्रकल्प २०१६ मध्ये अर्धवट अवस्थेत रखडला. पैसे भरलेले पोलीस बांधव अडकून पडले आणि दुर्भाग्यवश कोरोना काळामध्ये यामधील बऱ्याच सदनिका धारकांचा मृत्यू पण झाला.
देवेंद्र फडणवीस यांची तत्परतापोलीस बांधवानी २७० कोटी रुपये भरलेले असूनही त्यांना हक्काचे घर कधी मिळणार ही स्पष्टता नव्हती. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौस्तुभ धावसे यांना, या प्रकल्पामध्ये लक्ष घालण्यास सांगितले आणि याची जबाबदारी श्री अंबर आयदे  यांना देण्यात आली. या प्रकल्पाच्या पाहणीअंती सदनिका व दुकानांचे हस्तांतरण, तसेच करारनाम्यातील अमेनिटीज विकसित करण्याकरिता जवळपास बाराशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज असल्याचे लक्षात आले. रखडलेला हा प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांनी ‘एक्झिम फायनान्स’ कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प वेळेत पूर्णत्वास नेण्याबाबतचे निर्देश दिले. त्यानुसार अंबर आयदे यांनी रूरल एन्हान्सर्सच्या वतीने ही विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
गुंतवणुकीतील महत्वाचे वैशिष्ट्ये- एक्झिम फायनान्स यांच्यात २०० मिलियन युरोचा गुंतवणुक करारनामा राज्य शासनासोबत झाला.- नेदरलँड, जर्मनीस्थित शंभर टक्के शासनाच्या मालकी असणाऱ्या ‘इन्वेस्ट इंटरनॅशनल’ व इतर बँकांमार्फत ६०० ते ८०० कोटी रुपयांची ‘ईसीए’ आधारित गुंतवणूक राज्यात येणार- संपूर्ण प्रकल्पावर, कोणत्याही प्रकारचे तारण, मॉर्गेज, सिक्युरिटीज किंवा बॉण्ड्स नसतील- डेव्हलपमेंट क्रेडिट हाऊसिंग ईसीएच्या माध्यमातून ही गुंतवणूक होणार- वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थेला प्रकल्पाचा शंभर टक्के विमा नेदरलँड शासित विमा कंपनी करणार- प्रकल्पासाठी लागणारा पैसा, त्यासाठीचा विमा नेदरलँड शासनामार्फत होणार- प्रकल्पावर कोणतेही आर्थिक तोषिक लागणार नाही, आर्थिक वा राजकीय जोखीम नसल्याने प्रकल्प थांबणार नाही-

नेदरलॅंडस्थित अटल  कन्सल्टिंग व  इंजीनियरिंग अँड कन्सल्टन्सीची एसटीपी, वॉटर ट्रीटमेंट, प्रिकास्टिंग टेक्नॉलॉजीसाठी मदत- तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन सहा ते सात महिन्यांमध्ये गुंतवणूक उपलब्ध होईल.पोलीस बांधवांच्या या घरांचा प्रकल्प रखडणे योग्य नव्हता, पैशांची अडचण असेल, तर अनेक परकीय गुंतणूकदार शासकीय व निमशासकीय संस्था, आश्वासक वातावरण दिल्यास  अशा प्रकल्पांच्या पाठीशी उभे राहतात, असा माझा अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस मेगासिटी प्रकल्पासाठी अंबर आयदे व त्यांच्या रूरल एन्हान्सर्स संस्थेच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याचा आनंद आहे. या परकीय गुंतवणुकीमुळे माझ्या ५५०० पोलीस बांधवाना स्वतःची घरे लवकरच मिळतील, याचा खूप आनंद वाटतो.

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

रुरल एन्हान्सर्स संस्थेच्या माध्यमातून, नेदरलॅंड येथील निमशासकीय संस्थेमार्फत ‘एमपीएमसी’ प्रकल्पाला टर्मशीट देण्यात आली, याचा आनंद वाटतो. या पुढील तांत्रिक व कायदेशीर बाबींची सुद्धा पूर्तता यशस्वी होईल, याचा विश्वास आहे.

– कौस्तुभ धावसे, सहसचिव आणि राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख

या रखडलेल्या प्रकल्पाला, देवेंद्रजींच्या माध्यमातून मागील वर्षभरापासून दिशा देण्याचे काम चालू आहे याचे समाधान आहे व सर्व सदनिका धारकांना त्यांच्या मूळ किमतीमध्ये कशा देता येतील याच्यावर अभ्यास चालू आहे.

– भरतकुमार राणे, अध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटी, लोहगाव पुणे

खडकवासलामधील मतदान यंत्रणांची द्वितीय सरमिसळ

पुणे:खडकवासला विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात असून, 507 मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संपन्न झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.
खडकवासला मतदारसंघातील सिंहगड कॉलेज येथे द्वितीय सरमिसळ प्रक्रियेवेळी निवडणूक पर्यवेक्षक संजीव कुमार, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक
निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे, नायब तहसीलदार आणि व्हीव्हीपॅट व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी सचिन आखाडे यांच्यासह संबंधित कक्षाचे समन्वय अधिकारी गजानन किरवले, नारायण पवार आणि उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. यशवंत माने यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील
निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली. तनंतर सरमिसळ प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक पर्यवेक्षक संजीव कुमार यांनीदेखील उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.
खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी 608 बॅलेट युनिट,608 कंट्रोल युनिट आणि 659 व्हीव्हीपॅट मशिन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहेत. त्यांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 507 मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात 14 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 507 मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी 1 बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून 101बॅलेट युनिट, 101कंट्रोल युनिट आणि 152 व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.

सेक्टर अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत व यशस्वीपणे पार पाडावी- निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू

पुणे,दि.१०:- चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या सेक्टर अधिकारी यांनी योग्य समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत व यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी दिले.

पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा स्मृती कामगार भवन येथे पार पडले त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, सेक्टर अधिकारी समन्वयक अजिंक्य येळे यांच्यासह सेक्टर अधिकारी तसेच संबंधित कक्षाचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक श्री.सिद्धू म्हणाले, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावे, पार्किगच्या सुविधेचा आढावा घ्यावा आणि योग्य व्यवस्था करावी, मतदान केंद्राच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी तसेच मतदारांसाठी त्या ठिकाणी असणाऱ्या मुलभूत सुविधा आदीबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक उपाययोजना करावी.

प्रशिक्षणास उपस्थित सेक्टर अधिकाऱ्यांना श्री.सिद्धू यांनी मार्गदर्शन केले तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांत वातावरणात पाडण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत योग्य समन्वय ठेवावा अशी सूचना केली.

स्विप पथकाकडून मतदान जनजागृती

चिंचवड येथील पवना नदीघाट, थेरगाव येथील केजुबाई उद्यान, वाल्हेकरवाडी नदी घाट आणि डांगे चौक याठिकाणी छटपूजेसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप टीमच्या वतीने मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी ‘आम्ही मतदान करणार….’ अशी शपथ देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी आस्था फाऊंडेशनचे अमित यादव, विजय गुप्ता, आकाश मिश्रा, शरद मिश्रा, संजू गुप्ता यांच्यासह स्वीप टीमचे प्रिन्स सिंह, दीपक एन्नावार, मनोज माचरे, गणेश लिंगडे, संजू भाट, अंकुश गायकवाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हडपसर मतदारसंघात गृह मतदानासाठी तीन पथकांची नियुक्ती

पुणे,दि.१०:- हडपसर विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ५३ ज्येष्ठ नागरिक व ९ दिव्यांग, अशा एकूण ६२ मतदारांच्या गृह मतदानासाठी ३ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकात एक मतदान अधिकारी, एक इतर अधिकारी, पोलिस कर्मचारी, शिपाई, व्हिडीओग्राफर व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे अशी माहिती अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्री.स्वप्नील मोरे यांनी दिली.

१० ते १२ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. आज २४ ज्येष्ठ नागरिक व ४ दिव्यांग आशा एकूण २८ मतदारांचे गृह मतदान झाले असून उर्वरित कालावधीत १०० टक्के गृह मतदान करण्यात येणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या चित्र प्रदर्शनातून मतदान जनजागृती

पुणे, दि. 10 : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या चित्र प्रदर्शनातून मतदान करण्याचे आवाहन करण्याचा अनोखा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिराशेजारील संभाजी बागेसमोर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाला साद देत मतदान करण्याचा संकल्प करून नागरिकांनी प्रतिसाद दिला.

माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या मतदार जनजागृती चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, यामधील काही निवडक चित्रांचे प्रदर्शन जंगली महाराज रोड येथील संभाजी बागेसमोरील फुटपाथवर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकामार्फत आयोजित केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी चित्र प्रदर्शनाची संकल्पना राबविण्यात आली.

‘तुमचे मत तुमचा अधिकार, गरज आहे काळाची ओळखा ताकद मतदानाची’, असा संदेश देणारी चित्रे विद्यार्थ्यांनी रंगवली होती. रविवार सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून गर्दीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करून मतदार जनजागृती करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घेतला इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचा आढावा

पुणे, दि. १०: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) इंदापूर विधानसभा मतदारसंघातील नारायण रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि इंदापूर आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेज येथील मतदान केंद्रांना भेट देऊन सुविधेबाबत आढावा घेतला.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे, सुशील पवार, निवडणूक नायब तहसीलदार विजय घुगे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सूचना दिल्या, सर्व मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअर, बसण्यासाठी बाकडे, खुर्चा, आवश्यक तेथे सावलीसाठी मंडपव्यवस्था करण्यात यावी. मागणी केलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना घरापासून मतदान केंद्रावर आणण्यासाठी आणि मतदानानंतर घरी सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

त्यांनी तहसील कार्यालय येथील टपाली मतदान कक्ष, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इटीपीबीएस मतदार कक्ष, शासकीय धान्य गोदाम कालठण रोड इंदापूर येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रुमला भेट देऊन पाहणी केली व मतदान केंद्रावरील सुविधांबाबत सूचना दिल्या.

पर्वतीच्या जतन आणि संवर्धनातून जपला वैभवशाली वारसा-पर्वतीच्या जतन आणि संवर्धनातून जपला वैभवशाली वारसा

पुणे-ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या पर्वतीचे जतन आणि संवर्धन करून आपला वैभवशाली वारसा आणि संस्कृती जपता आली. त्यासाठी राज्य शासनाचा विशेष निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती महायुतीच्या पर्वती मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ लक्ष्मीनगर, म्हाडा कॉलनी, पर्वती गाव, निलय सोसायटी, अरुणोदय सोसायटी, गजानन महाराज चौक परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, विनोद वस्ते, शिवाजी गदादे पाटील, संजय शिंदे, मयुरेश चंद्रचूड, शैलेश लडकत, शिरीष देशपांडे, तेजस गाडे, राज ढवळकर, अजय जगताप, राजाभाऊ शेंडगे, लहू जागडे, राजेश तावडे यांचा प्रमुख सहभाग होता.
मिसाळ म्हणाल्या, श्री क्षेत्र देवदेवेश्वर संस्थान येथे विविध प्रकारची विकासकामे करुन घेतली. पेशवेकालीन वस्तुसंग्रहालयाचे नूतनीकरण, मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे भित्तिचित्रांद्वारे प्रदर्शन, पेशवे-ब्रिटिश अधिकारी यांची भेट झालेल्या कॅफेचे नूतनीकरण, शूर मराठा सरदारांच्या स्मारकाचे सुशोभीकरण आदी विकासकामांचा समावेश आहे.
मिसाळ म्हणाल्या, कार्तिकेय स्वामी मंदिर परिसरात रस्ता, सीमाभिंत, पायऱ्या, रेलिंग आदी विकासकामे पूर्ण केली. विविध प्रकारच्या कला-सांस्कृतिक कामांसाठी ॲम्फिथिएटर आणि 25 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी असलेले चाफ्याचे झाड दृकश्राव्य माध्यमातून 250 वर्षांचा इतिहास सांगत असल्याचा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्माण केला जाणार आहे.
मिसाळ पुढे म्हणाल्या, पुणे शहराला मोठे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. नवीन पीढीला जुन्या शहराची, ऐतिहासिक वारसास्थळांची, जुन्या परंपरांची ओळख करुन देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हेरिटेज वॉक सारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच हेरिटेज टुरिझम मास्टर प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करणार आहे.

‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’

पुणे -नागरिकांच्या समस्यांचे निवारण, तत्काळ उपाययोजना, लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविणे, विविध शासकीय दाखले व प्रमाणपत्रे, आपत्कालिन परिस्थितीत मदत यासाठी हेमंत रासने यांचे जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्यांचा आधार ठरत असून, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह योजना यशस्वी ठरत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

सदाशिव पेठेतील कुमठेकर रोड, गायआळी चौक, गाडगीळ स्ट्रीट, भिकारदास मारुती, खजिना विहीर, नातू बाग परिसरात रासने यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या रुपालीताई ठोफ्लबरे पाटील, राघवेंद्र मानकर, अशोक येनपुरे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, दिलीप काळोखे, प्रमोद कोफ्लढरे, प्रणव गंजीवाले, अमित कंक, सुनील रसाळ, नीलेश कदम, श्रेयस लेले, बिपीन बोरावके, परेश मेहेंदळे यांचा प्रमुख सहभाग होता.

रासने म्हणाले, गेली आठ दिवस मी प्रचाराच्या निमित्ताने विविध भागांतील नागरिकांना भेटत आहे. दीड वर्षे भाजपच्या माध्यमातून आम्ही करीत असलेल्या कामाबद्दल नागरिक कौतुक करीत असून, समाधानाची भावना व्यक्त करीत आहेत. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रोज प्रत्येक प्रभागात सकाळी 8 ते 10 या वेळेत नागरी समस्या समजावून घेतो. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहाणी करतो. त्याप्रमाणे संबंधित खात्याशी संपर्क करून आवश्यक उपाययोजना केल्या जातात. मी स्वतः समस्येचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा करतो. त्यामुळे आमचे जनसंपर्क कार्यालय नागरिकांना आधार वाटते.

रासने पुढे म्हणाले, संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही वीस हजार हून अधिक नागरिकांना मदत केली आहे. त्यामध्ये विविध शासकीय योजनांचा समावेश आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 12000 महिलांना लाभ मिळवून दिला. शासकीय दाखले प्रमाणपत्र आर टी ई प्रवेश, निराधारांच्या योजना याची संख्याही पाच हजाराहून अधिक आहे. एक कॉल प्रॉब्लेम सोल या योजनेअंतर्गत सात हजार हून अधिक नागरिकांची विकास कामे मार्गी लावली. त्यामध्ये ड्रेनेज लाईन, शौचालय निर्मिती, रस्ता डांबरीकरण, जलवाहिनी दुरुस्ती, कीटकनाशक फवारणी, पथदिवे दुरुस्ती, सोसायटी आणि वाड्यातील विकास कामांचा समावेश आहे.

सामूहिक गायनानंतर ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चा जयघोष‌‘एक पाऊल देशासाठी-वॉकेथॉन‌’मध्ये दोन हजार पुणेकरांचा सहभाग

पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‌‘वंदे मातरम्‌‍‌’ या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150व्या वर्षात पदार्पण झाल्याचे निमित्त साधून आज (दि. 11) सुमारे दोन हजार पुणेकरांनी वॉकेथॉनमध्ये सहभागी होत संपूर्ण ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चे सामूहिकरित्या गायन करून ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चा जयघोष केला.
शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या सहकार्याने आज सकाळी 7 वाजता ‌‘एक पाऊल देशासाठी-वॉकेथॉन‌’चे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अनुराधा येडके आणि सचिव राज तांबोळी व संस्थेच्या संपूर्ण टीमने याचे संयोजन केले. वॉकेथॉनच्या आयोजनाबाबत डॉ. येडके यांनी प्रास्ताविकात निरोगी व सदृढ देशाच्या उन्नतीसाठी व्यायामाचे महत्त्व सांगितले व वंदे मातरम्‌‍च्या गीतातून प्रेरणा घेऊन शारीरिकदृष्ट्या देश सक्षम करण्याचे आवाहन केले.
म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे सुमारे दोन हजार पुणेकर एकत्र आले. यात शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. येथे ‌‘वंदे मारतम्‌‍‌’चे सामूहिकरित्या गायन झाले. ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आनंद हर्डिकर, संगीतकार अजय पराड, युवा गायक देवव्रत भातखंडे, वंदेमातरम्‌‍ सार्ध शती समारोह समितीचे कार्यवाह संजय भंडारे उपस्थित होते. ‌‘वंदे मातरम्‌‍‌’च्या सामूहिक गायनापूर्वी विजय केळकर यांनी शंखनाद केला.
‌‘वंदे मातरम्‌‍‌’ या साहित्यकृतीच्या निर्मितीचा थोडक्यात आढावा सादर करून प्रमुख अतिथी मिलिंद सबनीस म्हणाले, ‌‘वंदे मातरम्‌‍‌’विषयी हृदयात असलेले अतोनात प्रेम नागरिक विविध उपक्रमांद्वारे व्यक्त करीत आहे. येत्या वर्षभरात ‌‘वंदे मातरम्‌‍‌’चा देशपातळीवर जागर होणार आहे.
‌‘वंदे मारतम्‌‍‌’च्या निर्मितीचे 150वे वर्ष सुरू झाल्याच्या निमित्ताने भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून वंदे मातरम्‌‍ सार्ध शती जयंती समारोह समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या सहकार्याने वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. शुभारंभ लॉन्स ते राजाराम पूल आणि परत शुभारंभ लॉन्स असा वॉकेथॉनचा मार्ग होता. ‌‘वंदे मातरम्‌‍‌’, ‌‘भारत माता की जय‌’, ‌‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‌’ अशा जोशपूर्ण घोषणा देत नागरिकांनी मार्गक्रमण केले. लिना पुरोहित यांनी सूत्रसंचालन केले तर राज तांबोळी यांनी आभार मानले.

‘व्होट हिंदुत्व’ पुढे नेण्यासाठी महेश लांडगे यांचा विजय गरजेचा : मिलिंद एकबोटे

  • ‘व्होट जिहाद’ नावाची सुप्त चळवळ समाजासाठी घातक
  • चऱ्होलीतील सभेत विजयाच्या हॅट्रिकसाठी महायुची वज्रमूठ

पिंपरी । प्रतिनिधी
लोकसभेमध्ये ‘व्होट जिहाद’ नावाची सुप्त चळवळ चालवली गेली. ज्यामध्ये क्रूरकर्मा अजमल कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोचवलेल्या सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांच्यासारख्या व्यक्तीलाही पराभूत केले. म्हणूनच विधानसभेला सतर्क होऊन आपल्याला ‘व्होट हिंदुत्व’ पुढे न्यायचे आहे. पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून सांगतोय गोवंश जतन, हिंदू राष्ट्राभिमान आणि हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करणाऱ्याला विजयी करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वाधिक मताधिक्य मिळालेला उमेदवार म्हणून महेश लांडगे यांचे नाव पुढे आले पाहिजे, असे आवाहन समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले.

भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चऱ्होली येथील वाघेश्वर मंदिराच्या पायथ्याशी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिलिंद एकबोटे बोलत होते. निर्धार मेळाव्या दरम्यान परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या आठ ते दहा वर्षातील झालेला बदल नागरिकांनी यावेळी आवर्जून नमूद केला. गेल्या दहा वर्षात या परिसरात झालेल्या सुविधांमुळे हा परिसर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडला गेला आहे, असेही आवर्जून नमूद केले.

मिलिंद एकबोटे पुढे म्हणाले की, ही निवडणूक नेहमीसारखी नाही. हे महायुद्ध आहे. शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे आपली भूमिका घ्यावी लागेल. परिस्थिती तशीच आहे..लोकसभेत सरकारी वकील उज्वल निकम सारख्या व्यक्तीमत्वाला पराभव पत्करावा लागला. कारण ‘व्होट जिहाद’ नावाची सुप्त चळवळ चालवली गेली. आता आपल्याला एकजूट करून व्होट हिंदुत्व पुढे न्यायचे आहे. आम्ही जातीभेद मानणारे नाही. आम्हाला “सर्व हिंदू समभाव” हे एकच तत्व मान्य आहे. म्हणून ‘व्होट जिहाद’ नावाची सुक्त चळवळ लाथाडून ‘व्होट हिंदुत्व’ पुढे न्यायचे आहे. म्हणून आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की आमचे मत हे आमच्या भारत मातेसाठी असणार आहे.

महेश लांडगे यावेळी म्हणाले की, काही लोकांची राजकीय नाती असतात.राजकारणातल्या स्वार्थासाठी ही नाती तयार होतात. मी 2014 पासून या मतदारसंघांमध्ये माझी जिव्हाळ्याची नाती तयार केली. ही नाती तयार करताना एक एक माणूस जपताना मी काय कष्ट घेतले हे माझे मला माहिती आहे. ज्यांच्या घरात पिढीच्यात राजकारण आहे त्यांना याचे मोल वाटणार नाही. एका मर्यादेपर्यंत राजकारण ठीक आहे. राजकारणातील संस्कृती जपली पाहिजे मात्र काही लोक आपल्या अति महत्वकांक्षामुळे या संस्कृतीला विसरले आहेत.

निर्धाराची नव्हे, ही तर विजयाची सभा…
आमदार महेश लांडगे यांना तिसऱ्यांदा आमदार करताना महाराष्ट्रभर अशी बातमी फिरली पाहिजे की महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांपैकी सर्वाधिक लीड आपल्या प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महेश लांडगे यांनी मिळवले आहे. यासाठी हिंदू म्हणून तुमच्या मनगटातील रग मी बोलून दाखवतोय. तुमच्या भावना माझ्या तोंडातून व्यक्त होत आहेत. एक हिंदू म्हणून ही संधी तुम्हाला मिळत आहे ही संधी नक्की गमावू नका असे आवाहन मिलिंद एकबोटे यांनी यावेळी केले. चऱ्होलीतील आजच्या सभेची गर्दी पाहून एकबोटे यांनी ही निर्धाराची नाही तर विजयाची सभा आहे, असे देखील म्हटले.