Home Blog Page 592

सह्याद्रि हॉस्पिटलने  कर्करोग रुग्णांसाठी उभारणी मदत गट:’ व्हेनेरियन ट्रूबीम ‘ सह अत्याधुनिक किरणोत्सर्ग उपचार सुरू 

कर्करोगामधून बरे झालेल्या रुग्णांनी नव्या कर्क-रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी घेतली प्रतिज्ञा;
कर्करोगावर सर्वांगीण उपचार देण्याच्या कटिबद्धतेचा सह्याद्रि हॉस्पिटलचा पुनरुच्चार

पुणे, ५ एप्रिल २०२५ – गेल्या दशकात कर्करोगावरील उपचारांमध्ये मोठी क्रांती झाली आहे. हे उपचार आता
अधिक अचूक, रुग्ण-केंद्रित व प्रगत तंत्रज्ञान आधारित झाले आहेत. स्तनाचा, फुप्फुसाचा आणि मोठ्या
आतड्यांचा कर्करोग आजही मोठ्या प्रमाणात आढळतोच आहे, पण याचबरोबर पचनसंस्थेतील म्हणजेच
स्वादुपिंडाचा (पॅन्क्रिया) आणि यकृताचा (लिव्हर) कर्करोग यांसारख्या निदानास कठीण असलेल्या कर्करोग
प्रकारांतही वाढ दिसून आली आहे. भारतात देखील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, २०१२
ते २०२२ या कालावधीत कर्करोगाची नोंदणीकृत प्रकरणे ३६ टक्क्यांनी वाढली. २०१२ मध्ये हा आकडा १०.१
लाख इतका होता, तर २०२२ मध्ये तो १३.८ लाखांपर्यंत पोहोचला. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही
३०.३ टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक स्तरावर कर्करोगाच्या रुग्णांची संख्या विचारात घेतली असता, त्यात
भारताचा क्रमांक तिसरा (१३.८ लाख रुग्ण) लागतो, तर कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दुसरा क्रमांक (८.९
लाख मृत्यू) लागतो. सध्या प्रत्येकी १ लाख लोकसंख्येमागे १२१ रुग्ण असे कर्करोगाचे भारतातील प्रमाण
आहे.
तसेच, तरुणांपेक्षा वृद्ध व्यक्तींमध्ये कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे.
आजच्या काळातील कर्करोग उपचारांमध्ये इम्यूनोथेरपी (प्रतिकारशक्ती आधारित उपचार), टार्गेटेड थेरपीज
(लक्ष केंद्रीत औषधोपचार) आणि एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)-आधारित निदान उपकरणे यांचा समावेश आहे.
त्यामुळे प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार आराखडे तयार करणे शक्य झाले आहे. तरीदेखील, उपचारांना
होणारा प्रतिकार (ट्रीटमेंट रेसिस्टन्स) आणि सतत आवश्यक असलेली सहाय्यता व आधार सेवा ही आव्हाने
अजूनही रुग्ण व ऑन्कोलॉजिस्ट यांच्यासमोर कायम आहेत.
आरोग्यसेवा क्षेत्रातील या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सह्याद्रि हॉस्पिटलने ‘बीमिंग होप’ या नावाने
महाराष्ट्रभर सर्वांगीण कर्करोग उपचारांना बळकटी देणाऱ्या एक आगळ्या कर्करोग रुग्ण सहाय्यता गटाची
(सपोर्ट ग्रुप) घोषणा केली आहे. या उपक्रमाद्वारे सह्याद्रि केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर सहवेदना,
नवकल्पना आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे रुग्णांवरील उपचारांच्या संपूर्ण प्रवासात सुधारणा घडवून आणण्याची
आपली बांधिलकी जपत आहे. ‘बीमिंग होप’च्या घोषणेमुळे सह्याद्रि रुग्णालयांच्या “रुग्ण-केंद्रित” उपचार
तत्त्वज्ञानाला आणखी बळ मिळाले आहे. या माध्यमातून उपचार केवळ औषधोपचारांपुरते मर्यादित न राहता
रुग्णाच्या मानसिक, भावनिक आणि व्यवहारिक गरजांनाही समजून घेतात. रुग्णांना त्यांच्या उपचार प्रवासात
एकमेकांशी जोडणे, समान अनुभवातून गेलेल्या इतरांसोबत संवाद साधण्याची त्यांना संधी देणे आणि
समुदायाची भावना व मानसिक आधार उपलब्ध करून देणे, हे या गटाचे उद्दिष्ट आहे.
सह्याद्रि हॉस्पिटल समुहाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर व वैद्यकीय संचालक डॉ. सुनील राव म्हणाले, “आज
कर्करोग उपचार हे केवळ रुग्णाचा जीव वाचवण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्याच्या संपूर्ण व
उपयुक्त जीवनशैलीला प्राधान्य देणे हेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. ‘बीमिंग होप’च्या माध्यमातून आम्ही

रुग्णाच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक पैलूंवर भर देत आहोत. मजबूत आधार यंत्रणा उपलब्ध करून
देऊन, रुग्ण केवळ वाचतीलच नव्हे तर या प्रवासात नव्या जोमाने जीवन जगू लागतील अशी आमची अपेक्षा
आहे. उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाला मानसिक व सामाजिक आधार मिळवून देण्याचा आमचा
सर्वांगीण दृष्टिकोन आहे.”
नवे रुग्ण, कर्करोगामधून बरे झालेले रुग्ण, रुग्णांची काळजी घेणारे नातेवाईक आणि वैद्यकीय तज्ञ यांच्यात
हा सहाय्यता गट परस्पर संवाद घडवून आणेल. या संवादातून त्यांना एकमेकांचे अनुभव समजून घेता
येतील, तसेच कर्करोग उपचारांमधील शारीरिक व भावनिक अडचणी कशा हाताळायच्या याबाबत उपयुक्त
मार्गदर्शन मिळेल.
पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे असलेल्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट
डॉ. विनोद गोरे म्हणाले, “कर्करोगावरील उपचारांचा प्रवास हा अनेक भावनिक व मानसिक आव्हानांनी
भरलेला असतो. ‘बीमिंग होप’ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे रुग्ण आपले भीतीचे क्षण आणि यशोगाथा
या दोन्ही गोष्टी मोकळेपणाने शेअर करू शकतील आणि दररोज नव्या आत्मविश्वासाने जगण्यासाठी बळ
मिळवतील. या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या काळजीवाहूंना उपचार प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण
मानसिक आधार मिळेल. हा उपक्रम केवळ आजारावरील उपचारांशी संबंधित नाही, तर कोणीही एकटे पडू
नये, यासाठी भावनात्मक सुरक्षितता देणारे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे.”
रुग्णांचा उपचारांचा अनुभव अधिक सकारात्मक व परिणामकारक व्हावा यासाठी, सह्याद्रि हॉस्पिटल्सने
‘व्हेरियन ट्रूबीम’ प्रणालीचीही सुरुवात केली आहे. हे एक अत्याधुनिक किरणोत्सर्ग (रेडिओथेरपी) तंत्रज्ञान
आहे. कर्करागावरील उपचारांची अचूकता आणि गती ते लक्षणीयरीत्या वाढवते. या संदर्भात डेक्कन जिमखाना
येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील म्हणाले, “व्हेरियन
ट्रूबीम प्रणालीमुळे कर्करोगवरील किरणोत्सर्ग उपचार देण्याच्या पद्धतीत मोठी प्रगती घडून आली आहे.
फुप्फुस किंवा पोटातील ट्युमरसारख्या गाठी श्वासोच्छ्वासादरम्यान हलत असतानाही ट्रूबीम प्रणाली
अचूकपणे लक्ष्य साधते. यामुळे उपचाराचा कालावधी कमी होतो आणि रुग्णाला होणारा त्रासही लक्षणीयरीत्या
घटतो.”
डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जगदीश
शेजुळ म्हणाले, “‘बीमिंग होप’ सहाय्यता गट आणि अत्याधुनिक ‘व्हेरियन ट्रूबीम’ प्रणाली यांचा एकत्रित
उपयोग करून आम्ही आतापर्यंत २५ पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. ट्रूबीम तंत्रज्ञानामुळे
आम्ही ट्युमरवर एक मिलीमीटरच्या अचूकतेने उपचार करू शकतो. संवेदनशील भागांजवळ असलेल्या
ट्युमरच्या बाबतीत हे फार महत्त्वाचे ठरते. अशाच एका विशेष प्रकरणात, ७५ वर्षांच्या वृद्ध रुग्णाच्या
मेंदूमध्ये असलेल्या गाठीवर आम्ही या प्रणालीतून उपचार केले. हे उपचार अचूक आणि विशिष्ट पद्धतीने
झाले नसते, तर त्या रुग्णाला पक्षाघात होण्याचा मोठा धोका होता. ट्रूबीमच्या अचूकतेमुळे आणि जलद
उपचार प्रक्रियेमुळे आरोग्यदायी ऊतींवर होणारा परिणाम अत्यल्प ठेवता येतो. त्यामुळे अधिक प्रभावी आणि
सुरक्षित उपचार शक्य होतात. याशिवाय, ट्रूबीम तंत्रज्ञान हे रुग्णांना इंजेक्शनविना आणि शरीरावर कोणतेही
व्रण न ठेवता उपचार देण्यास सक्षम आहे. साहजिकच उपचाराच्या प्रक्रियेत रुग्णाला अधिक आराम,
सुरक्षितता आणि समाधान मिळते.”
‘बीमिंग होप’ सहाय्यता गट आणि ‘व्हेरियन ट्रूबीम’ प्रणाली यांच्या माध्यमातून सह्याद्रि हॉस्पिटलने पुन्हा
एकदा कर्करोगच्या सर्वांगीण व रुग्ण-केंद्रित उपचारांमधील आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हे दोन्ही उपक्रम

केवळ वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीपुरते मर्यादित नसून, कर्करोगाच्या रुग्णांना त्यांच्या उपचार प्रवासात
शारीरिक आणि मानसिक पातळीवरही संपूर्ण आधार मिळावा, यासाठी सह्याद्रिची कटिबद्धता दर्शवतात.

अखेर महापालिकेच्या आरोग्य खात्याला जाग आली…

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला बजावली नोटीस

हिंदी चित्रपटात शेवटाला पोलीस येतात तशी यांची कारवाई ..

कोणते रुग्णालय किती बिल आकारते ? आगाऊ रक्कम किती मागते ?रुग्णांना आणि नातलगांना कशी वागणूक देते ? रुग्णसेवा हा सेवा धर्म म्हणून पाळते कि धंदा म्हणून करते यावर महापालिकेचा का उरला नाही अंकुश ?

पैशाची चिंता न करता रुग्णाला दाखल करून उपचार सुरु करायला हवे होते हे मुख्यमंत्र्यांना सांगण्याची वेळ आली तत्पूर्वीच महापालिकेच्या आरोग्याप्रमुखांनी याची नोटीस रुग्णालयांना का नाही दिली ?

वैद्यकीय सेवा ही मुलभूत मानवी हक्कांपैकी एक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत पैशांअभावी आपत्कालीन उपचार नाकारता येऊ शकत नाहीत. हे महापालिकेच्या आरोग्य खात्याला माहिती का नाही ?

पुणे- दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर , आवारात काल दिवसभरात चक्क १२ आंदोलने झाली आणि ३/४ स्तरावरून चौकशी समित्यांनी आपापले अहवाल नोंदविले त्यानंतर महापालिकेचे झोपी गेलेले आरोग्य खाते जागे झाले आणि ते होताच तथाकथित रुग्ण हक्काचे नारे देऊन स्वतःला महासंस्था म्हणविणारे देखील जागे झाले.’माय मराठी’ ने महापालिकेचे आरोग्य खाते झोपले आहे काय ? असा प्रश्न करताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे,याप्रकरणी सर्व माहिती सादर करावी, असा आदेश देण्यात आला. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
आरोग्य विभागाने पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीने शुक्रवारपासून चौकशी सुरू केली. समितीच्या सदस्यांनी दीनानाथ रुग्णालय, वाकड येथील सूर्या रुग्णालय व बाणेर येथील मणिपाल रुग्णालयाला भेटी देऊन माहिती घेतली. डॉ. पवार यांच्यासह सहाय्यक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कल्पना कांबळे या सदस्यांनी ही चौकशी केली.

खुद्द दिनानाथ रुग्णालयाने चौकशी समिती नेमून कालच अहवाल सादर केला , पोलिसांनी कालच आपल्या चौकशीची माहिती गृहविभागाला कळविली.आणि कालच खुद्द मुख्यमंत्री यांनी हि चौकशी समिती नेमून या समितीने तातडीने कामकाजाला प्रारंभ देखील केला .महिला आयोगाने देखील महापालिकेला पत्र देऊन एकीकडे कान उघडणी केली तर दुसरीकडे तातडीने चौकशी समिती नियुक्त केली . महापालिकेच्या आरोग्य खात्याने महापालिकेच्या हद्दीतील शासकीय आणि खाजगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्या ऐवजी आपापले हितसंबध जोपासण्यातच धन्यता मानली असल्याचा आरोप होतो आहे. रुग्णांच्या हक्काच्या नावाने ओरड करणाऱ्या संस्था आरोग्य खात्यातील अशा अधिकाऱ्यांच्या समर्थनाच्या टोळ्या बनल्या आहेत. औषधे खरेदीत घोटाळ्या पासून बोगस डॉक्टरांना पाठीशी घालण्याचे काम असा प्रामुख्याने कारभार असलेल्यांनी रुग्ण हक्काचे मुखवटे घातले आहेत. जे दिनानाथ प्रकरणी काल गळून पडलेत .ते पुन्हा चढविण्यासाठी आता ते बैल गेला आणि झोप केला प्रमाणे आंदोलन करणार असल्याचे वृत्त आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना काही पहिलीच नाही. राज्यात आणि देशभरात अशा घटना अनेकदा ऐकायला येत असतात. त्यामुळेच मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेचा धागा पकडून व्यापकपणे या प्रश्नाकडे पहायला हवं.महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम 2021 साली आले असले तरी त्याची अंमलबाजवणी व्यवस्थित झालेली नाही असे सांगितले जाते. अजूनही 80 ते 90 टक्के खासगी रुग्णालयं हे नियम पाळत नाहीत. प्रत्येक रुग्णालयाने तिथे मिळणाऱ्या 15 महत्त्वाच्या गोष्टींचे दर त्यांच्या आवारात दिसतील अशा ठिकाणी लावायला हवेत. मात्र बहुतांश ठिकाणी ते दिसत नाही.शिवाय, प्रत्येक रुग्णालयाने रुग्ण हक्कांची सनद लावायला हवी.या सनदीप्रमाणे रुग्णाला आजाराबाबतची सगळी माहिती, स्वरूप, गुंतागुंतीची शक्यता हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे. तसंच, दुसरे मत (second opinion) घेण्याचा, तपासण्यांचे अहवाल, वैद्यकीय निष्कर्ष जाणून घ्यायचा हक्कं आहे.हे सगळे अधिकार रुग्णाला माहीत असायला हवेत. मात्र, रुग्णालयात ते लावलेले नसतात.तिसरं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात एक रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष आणि त्याचा टोल फ्री नंबर असायला हवा. रुग्णांना काही तक्रार असेल तर ते तिथे फोन करून मदत किंवा सल्ला घेऊ शकतात

धर्मदाय रुग्णालयात 10 टक्के मोफत खाटांची तरतूद आहे. पण त्यासाठीची व्यवस्था अजूनही पूर्णपणे नीट चालत नाही.

कोणत्या रुग्णालयात सद्यपरिस्थितीत किती खाटा उपलब्ध आहेत त्याबद्दलची माहिती मोजकीच रुग्णालयं देतात

अनेक योजनांतून रुग्णालयांना आर्थिक व भूखंड,TDR बाबतचे सहाय्य करणाऱ्या महापालिकेला खासगी रुग्णालयाच्या सेवांच्या दरांचं नियंत्रण करण्याची गरज वाटत नाही काय ?

केंद्र सरकारच्या वैद्यकीय स्थापना अधिनियम या 2010 च्या कायद्याप्रमाणे खासगी रुग्णालयांनी सरकारने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त किंमत आकारणं बेकायदेशीर आहे.

या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल याची काळजी महापालिकेच्या आरोग्य खात्याने घेतली तर अशा घटना कमी घडतील असे वाटत नाही काय ?
भारताच्या संविधानात कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकाला “जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क” आहे. या हक्काचा विस्तार इतका व्यापक आहे की, आपत्कालीन वैद्यकीय उपचार मिळवण्याचा हक्क देखील त्यामध्ये समाविष्ट आहे.याचा स्पष्ट अर्थ असा की, कोणत्याही व्यक्तीला फक्त आर्थिक कारणांमुळे किंवा उपचाराचा खर्च देऊ शकत नसल्यामुळे आपत्कालीन उपचार नाकारता येणार नाहीत.

भारताच्या सर्वोच्च्य न्यायालयानेही काही महत्वाच्या निकालांमध्ये हेच अधोरेखित केलं आहे. परमानंद काटारा विरुद्ध भारत सरकार हा 1989 चा खटला याचं महत्त्वाचं उदाहरण आहे.एका दुचाकीस्वाराचा अपघातात झाल्यानंतर उपचाराअभावी मृत्यू झाला होता. तेव्हा एका मानवाधिकार कार्यकर्त्याने त्याबद्दलची जनहित याचिका सर्वोच्च्य न्यायालयात दाखल केली होती.एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्या दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं.पण त्याठिकाणच्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. हे वैद्यकीय-वैधानिक (medico-legal) प्रकरण असल्याने रुग्णास 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या अधिकृत रुग्णालयात नेण्यास सांगितलं. मात्र, त्या रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला.सरकारी असो वा खाजगी, कोणताही डॉक्टर आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार करण्यास बांधील आहे, असं सर्वोच्च्य न्यायालयाने या प्रकरणात अधोरेकीत केलं होतं.

त्याचप्रमाणे, पश्चिम बंगाल खेत मजदूर समिती विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य (1996) या प्रकरणात न्यायालयाने वेळेत वैद्यकीय सेवा न मिळणं हे संविधानातल्या कलम 21 चं उल्लंघन मानलं जाईल, असं स्पष्ट केलं होतं.

सर्व निर्णयांमधून हे स्पष्ट होतं की, वैद्यकीय सेवा ही मुलभूत मानवी हक्कांपैकी एक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत पैशांअभावी आपत्कालीन उपचार नाकारता येऊ शकत नाहीत.

चीनने लादला अमेरिकेवर 34 टक्के कर; ट्रम्प यांचा इशारा:महागात पडेल

वाशिंग्टन- जागतिक व्यापार युद्ध आणखी वाढले. चीनने अमेरिकन आयातीवर ३४ टक्के कराची घोषणा केली. चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, नवीन आयात कर १० एप्रिलपासून लागू होईल. चीनची ही प्रत्युत्तरादाखलची कारवाई अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीनवर लावलेल्या ३४ टक्के आयात करावरील प्रतिक्रिया आहे. चीन म्हणाले, कराच्या नावाखाली अमेरिका दादागिरी करत आहे. ते सहन केले जाणार नाही.ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ सोशल वर पोस्ट केले की, चीनने अमेरिकेच्या करानंतर घबराटीतून हा कर जाहीर केला. चीनने कर लावून मोठी चूक केली आहे. अशा प्रकारचा आयात कर चीनला महागात पडेल. एका अन्य पोस्टमध्ये ते म्हणाले, करावरून धोरणात काहीही बदल केला जाणार नाही. अमेरिका आणखी श्रीमंत होणार आहे. त्यातच चीनने अमेरिकेच्या १६ कंपन्यांना सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी ट्रान्सफरवरदेखील स्थगिती दिली आहे.

चीनकडून या कंपन्यांना सेमीकंडक्टर चिप, दुर्मिळ खनिज उदाहरणार्थ- लँथेनम, सेरियमची निर्यात होते. त्याचा वापर इलेक्ट्रिक कारपासून स्मार्ट बाॅम्ब बनवण्यापर्यंत होतो. अमेरिकेच्या या १६ कंपन्या खासगी व सरकारी क्षेत्रातील आहेत. त्या नागरी व लष्करी उपकरणे तयार करतात.चीनने अमेरिकन आयात कराच्या विरुद्ध जागतिक व्यापार संघटनेतही तीन नव्या याचिका दाखल केल्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर महिनाभरात १० टक्के-१० टक्के कर लावला.चीनवर एकूण ५४ टक्के कर लावला.

अमेरिका-चीन मध्ये व्यापार

एकूण व्यापार ५८१ अब्ज डॉलर
चीन आयात ४३८ अब्ज डॉलर
चीनला निर्यात १४३ अब्ज डॉलर
अमेरिकेला तोटा २९५ अब्ज डॉलर
दैनिक भास्करशीे विशेष करारांतर्गत

पुढे काय : प्रत्युत्तर कराच्या तयारीत ईयू, कॅनडा-मेक्सिकोही सोबत

चीनच्या प्रत्युत्तरानंतर आता ईयू (युरोपीय संघ) देखील अमेरिकेवर कर लावण्याच्या तयारीत आहे. ईयूवर ट्रम्प यांनी २० टक्के कर लावला. तेवढाच कर ईयूदेखील अमेरिकेस लावू शकते. कॅनडा-मेक्सिकोही कर वाढवू शकते.

बाजार संकोच : सेन्सेक्समध्ये ९३१ अंक घसरण, वॉल स्ट्रीटला धक्का

कर युद्धादरम्यान शुक्रवारी सेन्सेक्समध्ये ९३१ अंक तर निफ्टीमध्ये ३४६ अंकांची घसरण झाली. अमेरिकन वॉल स्ट्रीटमध्येही धक्के बसले. एसअँडपी व डाऊ जोनमध्ये घसरण झाली. जपानी निक्केईमध्येही घसरण नोंदली गेली.

व्यापार युद्ध जगाला आर्थिक मंदीत लोटू शकते, यात चीनचे पारडे जड राहणे शक्य

पहिल्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती अमेरिका व दुसऱ्या क्रमांकाची महाशक्ती चीन यांच्यातील व्यापार युद्ध जगाला आर्थिक मंदीत ढकलू शकते. चीन-अमेरिकेसह भारतावरही त्याचा परिणाम दिसू शकतो. परंतु ट्रम्प सतत कराचा मारा करत आहेत. ते पाहता चीनचे पारडे जड राहू शकते.आयात कच्चा माल, तयार उत्पादनांवरील वाढता खर्चातून महागाई वाढेल. फेडरल रिझर्व्हला व्याजदरात बदल करावा लागू शकतो. कृषी उत्पादने उदाहरणार्थ-सोयाबीन, मका, मांस इत्यादी अमेरिकेतून चीनला प्रमुख निर्यात होते. ऊर्जा क्षेत्रात तेल, नैसर्गिक गॅसवरील कर वाढेल. अमेरिकन विमान उपकरण व ऑटोमोबाइलचे सुटेभाग चिनी बाजारात महागडे होतील.

निर्यातीत घट होऊ शकते कारण चीन अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. ३४ टक्के करातून त्याच्या निर्यातीत (विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रे, ग्राहकोपयोगी साहित्य) मोठी घट होऊ शकते. यातून चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढेल. चीनला नवीन बाजारपेठ शोधावी लागेल. चीनच्या देशी उद्योगांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. कारण अमेरिकन सामान महागडे झाल्याने स्थानिक उत्पादनांची मागणी वाढू शकते.

अमेरिकन करामुळे चीनने आपले स्वस्त सामान भारतात डंप केल्याने भारतीय उत्पादकांचे नुकसान होऊ शकते. अशा डंपिंगपासून भारताने दक्षता बाळगावी. ही भारतासाठी आत्मनिर्भरता वाढवण्याची संधी आहे. व्यापार युद्धात भारत व चीन व्यापार वाढू शकतो. तसेही उभय देश व्यापारवाढीच्या प्रयत्नात दिसून येतात.

वडगाव,धायरी, सिंहगड रस्ता परिसरात तासभर वीज खंडित

महापारेषणच्या वीजवाहिनीमध्ये बिघाड;

पुणे, दि. ०४ एप्रिल २०२५: महापारेषणच्या २२० केव्ही फुरसुंगी-पर्वती अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी ५.४५ च्या सुमारास सुमारास बिघाड झाला. त्यामुळे शहरातील सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी, किरकीटवाडी, नांदेड सिटी या परिसरातील पावणदोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर तर नवी पेठ, जुनी पर्वती परिसरातील १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अर्धा तास खंडित होता.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या २२० केव्ही फुरसुंगी-पर्वती अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीमध्ये आज सायंकाळी ५.४५ वाजता बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या १३ उपकेंद्रांसह ६६ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामुळे वडगाव, धायरी, किरकटवाडी, नांदेड सिटी, नांदेड गाव, सिंहगड रस्ता आदी परिसरातील पावणदोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी ६.५० वाजेपर्यंत तासभर बंद होता. तर नवी पेठ, जुनी पर्वती परिसरातील १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ६.१८ वाजेपर्यंत अर्धा तास बंद होता. महापारेषणकडून इतर अतिउच्चदाब उपकेंद्रांतून महावितरणच्या १३ उपकेंद्रांना व ६६ वीजवाहिन्यांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात आल्यानंतर सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. दरम्यान, बिघाड झालेल्या वीजवाहिनीचे काम महापारेषणकडून तातडीने सुरु करण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये तातडीच्या रुग्णांना उपचारासाठी ॲडव्हान्सची सक्ती करता येणार नाही अशी कायदेशीर तरतूद करा.

खासगी रुग्णालयात दर पारदर्शकता, उपचार प्रमाणीकरण यासाठी कायदा करा.

: डॉ अभिजीत मोरे (आम आदमी पार्टी- महाराष्ट्र राज्य सचिव ) यांची मागणी

पुणे- शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गुंतागुंतीची प्रसूती असणाऱ्या गरोदर महिलेला (तनिषा भिसे) ॲडव्हान्स रक्कम न भरल्यामुळे उपचार नाकारण्याची आणि त्यानंतर त्या रुग्णाचा इतरत्र मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सध्या राज्यभर गाजते आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये (यामध्ये तथाकथित धर्मदाय पण कॉर्पोरेट स्टाईलने चालणारी मोठी रुग्णालये सुद्धा आली) भरपूर ॲडव्हान्स रक्कम भरल्याशिवाय तातडीच्या प्रसंगी सुद्धा उपचार मिळत नाही ही वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने खुलासा केलेला असला तरी तब्बल 10 लाख रुपये डिपॉझिट लेखी मागितल्याची बाब त्यांनी नाकारलेली नाही, हे महत्वाचे आहे. मयत रुग्ण महिलेच्या नणंदेने इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीनुसार रुग्णाचा ब्लड प्रेशर वाढलेला होता तसेच योनिमार्गाद्वारे रक्तस्त्राव होत होता. अशावेळी सदर रुग्णाला भरती करून उपचार मिळणे आवश्यक होते. धर्मदाय रुग्णालयांना तातडीच्या रुग्णांसाठी ॲडव्हान्स मागता येत नाही असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

ही केवळ एक घटना नसून अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडत असतात. अनेकदा तातडीच्या वेळी व्यक्तीला उपचार मिळणे हे आवश्यक असताना खासगी रुग्णालय प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या ॲडव्हान्सची मागणी होते. ती पूर्ण करणे कित्येक रुग्णांना त्या क्षणी शक्य होत नाही. परिणामी अनेक रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना राजरोसपणे राज्यात घडत आहेत.

राज्यात खासगी हॉस्पिटलने किती ॲडव्हान्स मागावा याचा ठोस नियम नाही. याबाबत संदिग्धता असल्याने हॉस्पिटल कडून अनेकदा रुग्णांकडून भरमसाठ ॲडव्हान्स रक्कम मागितली जाते. परिणामी अनेक गंभीर रुग्णांना उपचार नाकारला जातो. ॲडव्हान्स मागणे गैर नाही पण ॲडव्हान्स दिल्याशिवाय तातडीचे उपचार सुरु करणार नाही असा अनेक खासगी रुग्णालयांचा आग्रह योग्य नाही.

मुर्दाड कॉर्पोरेट आरोग्य व्यवस्थेविरोधात नागरिकांच्या मनामनामध्ये असलेला असंतोष दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात उत्स्फुर्तपणे उघड होत आहे. याची गंभीर दखल राज्य शासनाने घेणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ अभिजीत मोरे यांच्याकडून खालील मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे जाहीररित्या करण्यात येत आहे.

1) जवळच्या सरकारी, खासगी अशा कोणत्याही रुग्णालयात गंभीर, किचकट प्रसूतीच्या महिला भगिनींना उत्पन्नाची अट न घालता राज्य सरकार द्वारे फ्री युनिव्हर्सल इमरजन्सी मॅटरर्निटी केअर द्या.
2) खासगी रुग्णालय नफेखोरी प्रतिबंध कायदा बनवण्यात यावा. खासगी रुग्णालयांमध्ये तातडीच्या रुग्णांना उपचारासाठी ॲडव्हान्सची सक्ती करता येणार नाही अशी कायदेशीर तरतूद करा. खासगी रुग्णालयात दर पारदर्शकता, उपचार प्रमाणीकरण यासाठी कायदेशीर तरतूद करा. या कायद्याद्वारे राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये दरांमधील पारदर्शकता बंधनकारक करण्यात यावी. सर्व रुग्णांना उपचारापूर्वी संबंधित रुग्णालयाचे दरपत्रक देण्यात यावे. सर्व रुग्णांना उपचाराच्या खर्चाचे अंदाजे बिल उपचार सुरू करण्यापूर्वी देण्यात यावे. तसेच रुग्णांना त्यांची उपचाराची कागदपत्रे न देणे हा दखलपात्र गुन्हा समजला जावा.

मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला कार्यकर्त्या आक्रमक:डॉ. घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची केली तोडफोड

पुणे-डॉ. घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. डॉ. सुश्रुत घैसास हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कार्यरत आहेत. तसेच त्यांचे स्वतःचे देखील खासगी रुग्णालय आहे. याच रुग्णालयाची भाजपच्या संतप्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. गर्भवती महिलेच्या उपचाराअभावी निधन झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सकाळपासूनच दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसेनेसह सर्वच पक्षांनी आंदोलन केले आहे.

डॉ. सुश्रुत घैसास हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कार्यरत आहेत. डॉ. घैसास यांनी भिसे कुटुंबीयांकडून 10 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र 10 लाख उपलब्ध न झाल्याने उपचार देण्यात आले नाहीत. त्यामुळे रुग्णाला भिसे कुटुंबीयांना नाईलाजाने दुसऱ्या रुग्णालयात न्यावे लागले होते. त्यानंतर सूर्या रुग्णालयात गर्भवती महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला व त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, डॉ. घैसास यांच्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.

आंदोलकांनी असेही सांगितले कि,’ दीनानाथ रुग्णालायचा अहवाल देखील आला असून यात सर्व कर्मचारी व डॉक्टरांना क्लिनचीट देण्यात आली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याचाच परिणाम म्हणून भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. घैसास यांचे खासगी रुग्णालय गाठून या रुग्णालयात तोडफोड केली आहे. यावेळी आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्या म्हणाल्या की, त्यांनी जीव घेतला आहे आणि त्याच पैशांनी एवढे मोठे हॉस्पिटल बांधले आहे. त्यांना माणुसकी नाहीये. त्यांच्यामुळे दोन बाळं निराधार झाली आहेत. त्या बाळांचे संगोपन त्यांनी करायचे आहे, अशी मागणी देखील महिला कार्यकर्त्यांनी केली आहे.

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत असताना त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, त्यावेळी अडीच लाख रुपये सध्या आहेत उर्वरित रक्कम देतो असे सांगूनही प्रशासनाने उपचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर भिसे कुटुंबाने गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिहोरीनद्वारे प्रसुती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यास सांगितले. त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांनी आपला जीव गमावला.

लंडनहून मुंबईला निघालेले विमान उतरले तुर्कीत !

३० तास अडकलेल्या प्रवाशांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दिलासा

लंडनवरुन मुंबईत येणाऱ्या विमानाचे तुर्कीत लष्करी विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग

केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या संवेदनशीलतेने प्रवाशांना दिलासा

पुणे-
लंडनवरुन मुंबईला प्रवासी विमान घेऊन जाणारे व्हर्जिन अटलांटिक विमान (व्हीएस३५८) मध्ये एका प्रवाशाच्या वैद्यकीय आणीबाणीमुळे अचानक तुर्कीतील दियाबाकीर विमानतळावर इमर्जन्सी अवघडरित्या लँडिग करावी लागली. मात्र, दियाबाकीर विमानतळ हे लष्करी विमानतळ आकाराने छोटे असल्याने हार्ड लँडिंग होउन गियरमध्ये समस्या निर्माण झाली. तसेच या विमानतळावर सुविधांची कमतरता व संर्पक साधनांच्या मर्यादा होत्या. त्याचप्रमाणे संबंधित विमानतळ हे इतर देशांतर्गत/ आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या तुलनेत लहान असल्याने त्याठिकाणी लहान व्यवसायिक विमानांचे आणि लष्करी विमानांचेच उड्डाण होते. त्यामुळे संबंधित ठिकाणी भारतीय प्रवासी ३० तास अडकून पडले होते. त्यातील काही प्रवाशांच्या ओळखीच्या लोकांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संर्पक साधून मदतीची मागणी केली. मोहोळ यांनी संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळत अडकलेल्या प्रवाशांशी, संबंधित अधिकाऱ्यांशी हवाई खात्या मार्फत बाेलणे करत व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स यांच्याशी देखील चर्चा केली.

त्यानंतर वेगवान हालचाली करत विविध यंत्रणाशी संर्पक करत प्रवाशांना दिलासा देत त्यांना मुंबईला परतण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून विमान उपलब्ध झाल्याने प्रवाशांना तातडीने मायदेशी येण्यासाठी दिलासा मिळाला आहे.

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी दियाबाकीर विमानतळावर अडकलेले प्रवासी, व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी हवाई मंत्रालय मधील एक विशेष पथक नियुक्त केले. तसेच चांगल्या समन्वयासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तसेच तुर्की मधील भारतीय राजदूताची देखील मदत घेतली. त्यामुळे एकत्रित प्रयत्नातून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी महारष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय यांनी देखील माेहाेळ यांच्याशी चर्चा केली.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या विनंतीनुसार, प्रवाशांना सँडविच, फळे व अल्पाेपहार देण्यात आले, र्गभवती महिलांची विशेष काळजी घेतली, लहान मुलांना आवश्यक साधने उपल्बध केली, वैद्यकीय सेवा उपलब्ध केली. व्हर्जिन अटलांटिकने लँडिग गियरची समस्या साेडविण्याचा प्रयत्न केला परंतु साेडवण्यात अपयश आले. कारण, संबंधित एअरलाइन्सने लंडनहून तुर्कीच्या दिशेने नवीन प्रवासी वाहतूक विमान पाठवले परंतु तुर्की सरकार व लष्कराने सदर विमानास लॅँडिग परवानगी नाकारली. त्यामुळे सदर विमानाला पुन्हा मार्गस्थ व्हावे लागले. सध्या र्व्हिजन अटलांटिक संबंधित विमानातील लँडिंग गियरची समस्या साेडविण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय हवाई खात्याचे पाठपुराव्याने तुर्की सरकारच्या नियमांनुसार प्रवाशांना हाॅटेल मध्ये रहाण्याची साेय व नियमित प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा ट्रान्झिट व्हिसा देण्यात आला. तसेच प्रवाशांना दुसऱ्या विमानतळावर नेऊन पर्यायी विमानाने घेऊन जाण्याकरिता प्रयत्न करण्याचा मार्ग देखील सूचित करण्यात आला. दरम्यान, माेहाेळ यांनी परिस्थितीवर देखरेख ठेवत अधिकारी व एअरलाइन्स यांच्या संर्पकात राहून नियमित घडामोडींची माहिती घेत राहिले आणि तांत्रिक मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले. सदर प्रवाशांचे तुर्कीवरुन मुंबईच्या दिशेने व्हर्जिन अटलांटिकच्या विशेष विमानाने उड्डाण झाले असून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ते मुंबई विमानतळावर सुखरुप उतरणार आहे.

मुरलीधर मोहोळ यांची कार्यतत्परता

याबाबत मुंबईतील उच्च न्यायालयात कामकाज करणारे ॲड .सत्यम सुराणा यांनी सांगितले की, लंडनवरून मुंबईला येणाऱ्या संबंधित विमानात माझा एक मित्र प्रवास करत होता. त्यांनी अचानक तुर्कीत अडकून पडल्याची मला माहिती दिल्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधत त्यांना माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मला तात्काळ निरोप आला, त्यांनी संपर्क साधत सविस्तर घटना जाणून घेतली .हवाई मंत्रालयातील दोन अधिकारी सातत्याने वेगवेगळे यंत्रणांशी संपर्क करण्यासाठी नेमण्यात आले. वेगवान हालचाली केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळू शकला आहे. या माध्यमातून केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची कार्यतत्परता दिसून आली आहे.

भक्तिगीतांतून शब्द आणि संगीताचा सुरेल मिलाफ

श्री रामजी संस्थान तुळशीबाग येथील श्रीरामनवमी उत्सवात ‘राम बरवा कृष्ण बरवा’ या वृषाली मावळंकर, केतन अत्रे व सहकारी कार्यक्रम ; उत्सवाचे २६४ वे वर्ष

पुणे : आरंभी वंदीन अयोध्येचा राजा… कानडा राजा पंढरीचा… अशाच एका सरस रचनासह नमो ज्ञान राजा… या संतांनी काही नवीन स्वरबद्ध अभंग पेशवेकालीन तुळशीबा श्रीराम मंदिरात सादर केले. भक्तिगीतांतून शब्द आणि संगीताचा सुरेल मिलाफ या कारणाने रसिकांनी अनुभवला.

श्रीरामजी संस्थान तुळशीबागवतीने श्रीराम मंदिर श्रीरामनवमी उत्सवाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘राम बरवा कृष्ण बरवा’ या वृषाली मावळंकर, केतन अत्रे व सहकारी यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते.

संस्थानचे कार्यप्रणाली विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले य तुळशीबागवाले परिवार उपस्थित होते. श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे.

काल मी रघुनंदन पाहिले… या ग.दी. माडगूळकर यांनी मांडल्या आणि सुधीर फडके उरफ बाबुजी यांनी संगीतबद्ध केलेले गीत सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा… दशरथा घे हे पायसदान… यांस उत्तम सुपरिचित भक्तीरचनांचा स्वराविष्कार देखील पुणेकरांना अनुभव आला. श्रीराम जय राम जयजयराम निनादात संपूर्ण मंदिराच्या भक्तीमय झाला होता. स्हल दामले यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

पुण्यात 6 एप्रिलला गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे होणार उद्घाटन

— पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट मध्ये देशभरातील नामांकित संघ व खेळाडू मोठ्या प्रमाणात होनार सहभागी—
पुणे –
येत्या 6 एप्रिल ला पुण्यात होणाऱ्या गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे उद्घाटन होणार आहे .ही गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा संकलित जाते .ही स्पर्धा 6 ते 13 एप्रिल दरम्यान पुण्यात पार पडणार आहे तर एकूण 16 संघ आणि 180 ते 250 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.या स्पर्धेचा पारितोषिक वितरन समारंभ 13 एप्रिल 2025 रोजी पुण्यातिल प्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट आणि क्लब येथे पार पडणार असल्याची माहिती गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले .
पुढे ते म्हणाले की ,अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रिमीअर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .आज देशभरातील विविध संघ सहभागी होत आहेत .पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे भव्य अशा ऑक्सफर्ड गोल्फ लीग 2025 ची घोषणा करण्यात आली .त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफोर्ड गोल्फ लीग मध्ये पुणेकराना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
आंतरराष्ट्रीय लीग च्या सामन्यासाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे .व सर्व यजमान संघाचा नुकताच स्वागत समारंभ पार पडला.
या प्रिमियर लीगचे उद्घाटन गोल्फ इंडस्ट्री आसोसिएशन चे अध्यक्ष व ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सचे संस्थापक अनिरुद्ध सेवलेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे .
या वेळी गोल्फ इंडस्ट्री असोसिएशन चे अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुप चे अनिरुद्ध सेवलेकर,ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट चे रोहन सेवलेकर,एस गोल्फिंग चे आदित्य मालपणी ,ऑक्सफर्ड रिसॉर्ट चे व्यवस्थापक कौशिल वोरा पत्रकार परिषदेस उपस्थित होते .
या लीगमध्ये तब्बल बारापेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत .आजपर्यत्न ईगल फोर्सेस ,बिनधास्त बॉईज ,सुलतान स्विंग्स ,ब्लिस्ट्रिंग बर्ड्स ,झिंगर्स,ग्रीन गॅडीटर्स,सुझलोन ग्रीन्स,रोरिंग टायगर्स,
पुना लायन्स,सुब्बन सनरायजर्स ,द लीगशी क्लब ,बर्डी स्कॉड यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले आहेत .त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीग च्या स्पर्धा अतिशय चुरशीच्या आणि रंगतदार होणार असल्याचे आयोजक रोहन सेवलेकर यांनी सांगितले आहे .

चित्रप्रदर्शनातून उलगडणार वन्दे मातरम्‌‍चा इतिहास,भारतमातेच्या विविध रूपांचेही घडणार दर्शन

दिग्गज चित्रकारांची मूळ चित्रेही बघण्याची संधी

पुणे : वन्दे मातरम्‌‍ या राष्ट्रमंत्राच्या सार्ध शती (150) जयंती वर्षानिमित्त तसेच ऋषी बंकिमचंद्रांच्या 131व्या स्मृतीदिनानिमित्त ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात सुरवातीलाच वन्दे मातरम्‌‍चा इतिहास मांडणाऱ्या तसेच गेल्या सव्वाशे वर्षात नामवंत भारतीय चित्रकारांनी रेखाटलेल्या भारतमातेच्या चित्रांचे प्रदर्शन मंगळवार, दि. 8 ते शनिवार, दि. 12 एप्रिल या कालावधीत बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी 5 .30 वाजता खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ चित्रकार चंद्रशेखर जोशी, अनिल उपळेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे संयोजक मकरंद केळकर आणि वन्दे मारतम्‌‍चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रवींद्र सातपुते यावेळी उपस्थित होते. दि. 12 एप्रिल पर्यंत प्रदर्शनी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुली असणार आहे.
रावबहादूर धुरंधर, दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, अल्लाबक्ष, पंडित श्रीपाद दा. सातवळेकर, अवनीन्द्रनाथ ठाकूर, वासुदेव कामत, सुहास बहुळकर यांच्या मुद्रित चित्रांसह जि. भी. दीक्षित, अनिल उपळेकर, सचिन जोशी, गिरीश सहस्रबुद्धे, चंद्रशेखर जोशी यांची मूळ चित्रेही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. संगणकीय मांडणी अनंत कुलकर्णी यांची आहे.
वन्दे मातरम्‌‍च्या 150 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत भरविण्यात येत असलेल्या ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवा अंतर्गत चित्रप्रदर्शनाच्या आयोजनात वन्दे मातरम्‌‍ सार्ध शती जयंती समारोह समितीचे सहकार्य लाभले आहे. ऋषी बंकिमचंद्र यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या स्मृतीमहोत्सवाची सांगता शनिवार, दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‌‘आनंदमठ‌’ या संगीत नाटकाचा प्रयोगाने होणार आहे. मराठी रंगभूमीवर गेल्या 125 वर्षामध्ये आनंदमठ ही कादंबरी प्रथमच नाट्य स्वरूपात आणण्यात आली आहे. बंकिमचंद्रांच्या आनंदमठ कादंबरीवर आधारीत कोलाज क्रिएशन्स निर्मित व विनिता तेलंग लिखीत व रवीन्द्र सातपुते दिग्दर्शित या संगीत नाटकाला 2025 च्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांत व सर्वोच्च एकूण 8 पारितोषिके मिळाली आहेत. नाट्यप्रयोग सशुल्क असून चित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू;उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिले चौकशीचे आदेश

मुंबई, दि. 4: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

‘अभिषेकी’ सुरांनी बहरली संगीत मैफल 

पंडित शौनक अभिषेकी यांचे बहारदार गायन ; श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजन 

पुणे : अविट गोडीचे राग, त्याला सप्तसुरांची साथ, तबल्याच्या थापेने निर्माण होणारे ताल आणि त्याला गायकांची सुरेल गायन साथ… अशा राग आणि सुरांनी नटलेल्या ज्येष्ठ गायक पंडित शौनक अभिषेकी यांच्या संगीत मैफिलीने सद्गुरु श्री जंगली महाराज संगीत महोत्सव बहरला.

सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित उत्सवामध्ये पंडित शौनक अभिषेकी आणि सहकारी कलाकारांनी शास्त्रीय संगीताची सुमधुर मैफल सादर केली. 

पंडित शौनक अभिषेकी यांनी अबोर रागातील झपताल खयाल एक तालाने मैफिलीची सुरुवात केली . ‘नयना पार लग’ या गाण्याला तीन तालामध्ये सादर करून पंडित शौनक अभिषेकी यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. करण देवगावकर (गायन), प्रणव गुरव (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम) अतुल गरुड (तालवाद्य) यांनी पंडित अभिषेकी यांना सुरेल साथ संगत केली.

पंडित शौनक अभिषेकी यांचे विविध रागातील हरकतींचे सूर, त्याला तबला आणि संवादिनीची सुरेल साथ यामुळे जंगली महाराज मंदिराचा भक्तिमय परिसर मैफिली मुळे संगीतमय झाला होता. या संगीतमय वातावरणाचा आनंद घेत प्रेक्षकही  तल्लीन झाले होते. नभास या आले पर, फुलू  लागले सत्वर, पंढरीच्या वाटेवर डोह झाले, चंद्र तार्‍यांची  केली शेज परी नाही निज लोचनांना, पाऊले हे माझे नुरे, वरी चांदणे हे झुले, घेऊन ये तू सत्वरी भेटायला, वाळवंटी ध्यान लागे, काळजाला विठ्ठल जागे, अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर अशा भक्तिमय गीतांनीही शौनक अभिषेकी यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

पंडित शौनक अभिषेकी म्हणाले, सद्गुरु जंगली महाराज यांच्याशी माझे कलाकार म्हणून निश्चितच काहीतरी नाते आहे, त्यामुळेच मला वारंवार या ठिकाणी माझी कला सादर करण्याची संधी मिळत आहे. या संधीचे सोने करण्याचा मी कायम प्रयत्न करीत असतो या ठिकाणी कला सादर केल्यानंतर माझ्यातील कलाकाराला अतिशय आनंद आणि समाधान मिळते.

अनंतराव पवार अभियांत्रिकीत आय एमएल बुटकॅम्पचे प्रश्न…

पुणे–
संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अभ्यासक्रमासाठी एआय एमएल उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष सरावही लक्ष केंद्रीत  ३ दिवसांच्या आयएमएल बुटकॅम्पचे स्पष्टीकरण करण्यात आले. या बुटकॅम्पचा उद्देश सत्ताधारी अथक तंत्रज्ञान संकल्पनांची ओळख करून देणे आणि त्यांना या दोन्ही गोष्टी करणाऱ्यांचा समावेश आहे. शिबिरिंग पायरल प्रोग्राम एआय एमएलचा परिचय, न्यूथॉन आणि डीप लर्निंग, पॉवर बीआय, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) टॅचजीपीटी संकल्पना स्वीकारण्याची ओळख करून प्रात्यक्षिकांचा अनुभव. सुनील ठाकरे मार्गदर्शन मार्गदर्शन डॉ. रमा गायकवाड विभाग प्रमुख , संगणक अभियांत्रिकी यांनी केले.
या बुटकॅम्पसाठी प्रर्य डॉ.सुनील ठाकरे , कार्यशाळेचे समन्वयक डॉ.रमा गायकवाड , पालक आणि विद्यार्थी यांनी विधान नोंदविले. शब्दाने या नाविन्यपूर्ण विषयावर कार्यशाळेचे वर्णन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षणाच्या सरचिटणीस मा. सौ. प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

नव तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावामहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्याचा महसूल विभाग देशात आदर्श ठरेल असे नाविन्यपूर्ण कामे होणे अपेक्षित

पुणे दि. 4: महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजा सोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले महसूल क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार येथील हॉटेल ऑर्चिड येथे दोन दिवशीय महसूल क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री बावनकुळे पुढे म्हणाले, महसूल विभागाने लोकाभिमुख व पारदर्शक काम करताना अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, ए आय (कृत्रिम बुध्दीमत्ता) सारख्या या नवमाध्यमांचा वापर करुन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. या कामात आपला सहभाग अधिक असला पाहिजे, समाजाप्रती आपले काही देणे असून आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने काम करावे, इतर राज्यात झालेल्या नाविन्यपूर्ण कामाप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा नवीन संकल्पना राबवून कामे व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आय. ए. एस. अधिकाऱ्यांकडे खूप मोठा अनुभव असून त्या अनुभवाचा उपयोग विभागाला होण्याच्या दृष्टीने, त्यांनी सहभाग नोंदवावा, अधिकाऱ्यांच्या अभ्यासातून जर त्यांना काही नवीन बदल सुचवायचे असतील तर त्यावर शासन निश्चितच विचार करेल, तलाठी पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, सर्वांच्या सूचना ऐकून घेऊन विभागात गतिमान काम होण्याच्यादृष्टीने शासन निश्चितच प्रयत्‍न करेल.

विभागातील विविध कामे करताना नियमात काम असेल तरच कामे करावीत, जर काम नियमात नसेल तर संबंधितांना लेखी कळवावे.नियमबाह्य कामे होता कामा नये याची दक्षता घ्यावी. या कार्यशाळे निमित्त प्रत्येक जिल्ह्याने शून्य हेरिंग (सुनावणी) संकल्प राबवून. सुनावणीचे प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या येत असतील तर त्याचे तात्काळ खंडन करुन त्याबाबतची वस्तुस्थिती माध्यमांना कळवावी. आपण केलेल्या चांगल्या कामांची माहिती माध्यमांना द्यावी, मीडियाच्या माध्यमातून चांगली कामे जनतेपर्यंत पोहोचून शासनाची प्रतिमा अधिक उजळ होण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्याला तलाठी पासून ते उच्च अधिकारी पर्यंत एक परिवार म्हणून काम करायचे असून, लोकांच्या अडचणी समजून घेऊन अडचणींचे तात्काळ निराकरण केले जावे. चुकीची कामे करणाऱ्यांना अजिबात पाठीशी घातल जाणार नाही, सर्वांनी लोकहिताची चांगले कामे करावीत, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांच्या सत्कार करण्यात येईल.त्यासाठी मी महसूल विभागाचा प्रमुख म्हणून मी नेहमी आपल्या पाठीशी उभा आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार प्रास्ताविकात म्हणाले, महसूल विभागाच्या कृती कार्यक्रमांतर्गत विभागाने बरेच कामे पूर्ण केले असून, अपूर्ण कामे काही दिवसात पूर्ण होतील. महसूल विभाग हा महत्त्वाचा विभाग असून सर्व विभागांशी निगडित आहे हा विभाग ब्रिटिश कालीन विभाग असला तरी, आता या विभागाच्या नियमांमध्ये बऱ्याचशा सुधारणा होत आहेत.

दोन दिवसीय कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले, या कार्यशाळेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्य पध्दतीची व विचारांची एकमेकांना देवान घेवाण व्हावी, तसेच जे परिविक्षाधीन जिल्हाधिकारी, तरुण जिल्हाधिकारी आहेत त्यांना चांगल्या कामांची माहिती व्हावी, त्यांना काम करताना प्रोत्साहन व ऊर्जा मिळावी. शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्याच्या चांगल्या कामांची माहिती दुसऱ्या जिल्ह्यांना व्हावी, तसे काम त्यांच्या जिल्ह्यामध्ये व्हावे या उद्देशाने कार्यशाळचे आयोजन करण्यात आले आहे असेही श्री. कुमार म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूल मंत्र्यांचे हस्ते भूमि अभिलेख विभागाच्या बोधचिन्हाचे अनावरण, इस्पित, (इलेक्ट्रॉनिक्स प्रॉपर्टी सिस्टीम इंटिग्रेटेड टूल ) कार्यप्रणालीचे तसेच भू प्रमाण केंद्र, ई मोजणी व्हर्जन टू यंत्रणेचे अनावरण करण्यात आले. यावेळी जमाबंदी आयुक्त डॉ. दिवसे यांनी, भुमिअभिलेख विभागाच्या डिजिटल कार्य पद्धतीची माहिती विशद केली.
या कार्यशाळेला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सहायक‍ जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आभार व्यक्त केले.

दीनानाथ रुग्णालयाने महिलेला अॅडमिट करून घेणे गरजेचे होते- मुख्यमंत्री म्हणाले, उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी अन कारवाई

रुग्णालयातील प्रकाराबाबत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाने लक्ष घातले होते. परंतू, रुग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही

पुणे- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. दीनानाथ रुग्णालयाने महिलेला अॅडमिट करून घेणे गरजेचे होते. भविष्यात अशा घटना पुन्हा होवू नये यासाठी कडक कारवाई करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे. धर्मादाय रुग्णालयांकडून नैतिकतेचे पालन होते की नाही, यासंदर्भात आपण प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याने महिलेचा जीव गेल्याची घटना गुरुवारी घडली होती. या घटनेवर आता विविध राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत या घटनेतून असंवेदनशीलतेचा परिचय पाहायला मिळाल्याचे ते म्हणाले. तसेच भविष्यात अशा प्रकाराच्या घटना घडू नये यासाठी कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतून पाहायला मिळतो. दीनानाथ मंगेशकर हे अतिशय प्रतिष्ठित रुग्णालय आहे. लता दीदींनी स्वत: पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या पाठीमागे आपले संसाधने उभे करून हे रुग्णालय उभे केले. ज्याप्रकारे तिथल्या काही डॉक्टरांनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेने प्रसुतीला आलेल्या महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले. लोकांमध्ये या संपूर्ण प्रकरणाची अतिशय चीड आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विशेषत: धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे. अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे. त्यामुळे या संदर्भात एक उच्च स्तरीय समिती तयार केलेली आहे. ही समिती या घटनेचा तपास करेलच, त्यासोबत अशा घटना होवू नये म्हणून कडक कारवाई केली जाईल. पैशांची चिंता न करता महिलेला अॅडमिट करून घेणे गरजेचे होते. धर्मादाय रुग्णालयांकडून नैतिकतेचे पालन होते की नाही, यासंदर्भात आपण प्रयत्न करणार आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रुग्णालयातील प्रकाराबाबत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाने लक्ष घातले होते. परंतू, रुग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. भविष्यात अशा प्रकाराच्या घटना घडू नये यासाठी कडक कारवाई करण्याचा आमचा मानस असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उच्च न्यायालयाचा आदेश हा अतिरिक्त कायदा घेतला, त्यांनाच आहे. आम्हाला तो आदेश नाही, अशी भूमिका अनेक रुग्णालयांनी मांडली होती. त्यामुळे त्यासंदर्भात स्कीम तयार केली. आता कायद्याने हे अधिकार धर्मदाय संस्थेकडे घेतलेले आहे. धर्मदाय ही संस्था स्वतंत्रपणे चालते, पण त्याच्यामध्ये काही ना काही नियंत्रण हे राज्याच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाचे आहे. या विभागाच्या माध्यमातून अशा सगळ्या रुग्णालयांवर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी समितीत

1) उपसचिव श्रीमती यमुना जाधव,

2) सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी,

3) सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर

4) विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.

त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची सर्व धर्मादाय रुग्णालयांकडून प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांना खालील प्रमाणे सूचना केल्या आहेत.

धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची’ मान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत.

विधी व न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल व समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी.

शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर पदे तात्काळ भरण्यात यावीत.

निर्धन रुग्णनिधी (IPF) खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेवून ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी.

योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी.