पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’ या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150व्या वर्षात पदार्पण झाल्याचे निमित्त साधून आज (दि. 11) सुमारे दोन हजार पुणेकरांनी वॉकेथॉनमध्ये सहभागी होत संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिकरित्या गायन करून ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला.
शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या सहकार्याने आज सकाळी 7 वाजता ‘एक पाऊल देशासाठी-वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अनुराधा येडके आणि सचिव राज तांबोळी व संस्थेच्या संपूर्ण टीमने याचे संयोजन केले. वॉकेथॉनच्या आयोजनाबाबत डॉ. येडके यांनी प्रास्ताविकात निरोगी व सदृढ देशाच्या उन्नतीसाठी व्यायामाचे महत्त्व सांगितले व वंदे मातरम्च्या गीतातून प्रेरणा घेऊन शारीरिकदृष्ट्या देश सक्षम करण्याचे आवाहन केले.
म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे सुमारे दोन हजार पुणेकर एकत्र आले. यात शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. येथे ‘वंदे मारतम्’चे सामूहिकरित्या गायन झाले. ‘वंदे मातरम्’चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आनंद हर्डिकर, संगीतकार अजय पराड, युवा गायक देवव्रत भातखंडे, वंदेमातरम् सार्ध शती समारोह समितीचे कार्यवाह संजय भंडारे उपस्थित होते. ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनापूर्वी विजय केळकर यांनी शंखनाद केला.
‘वंदे मातरम्’ या साहित्यकृतीच्या निर्मितीचा थोडक्यात आढावा सादर करून प्रमुख अतिथी मिलिंद सबनीस म्हणाले, ‘वंदे मातरम्’विषयी हृदयात असलेले अतोनात प्रेम नागरिक विविध उपक्रमांद्वारे व्यक्त करीत आहे. येत्या वर्षभरात ‘वंदे मातरम्’चा देशपातळीवर जागर होणार आहे.
‘वंदे मारतम्’च्या निर्मितीचे 150वे वर्ष सुरू झाल्याच्या निमित्ताने भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून वंदे मातरम् सार्ध शती जयंती समारोह समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या सहकार्याने वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. शुभारंभ लॉन्स ते राजाराम पूल आणि परत शुभारंभ लॉन्स असा वॉकेथॉनचा मार्ग होता. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जोशपूर्ण घोषणा देत नागरिकांनी मार्गक्रमण केले. लिना पुरोहित यांनी सूत्रसंचालन केले तर राज तांबोळी यांनी आभार मानले.