पुणे:खडकवासला विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात असून, 507 मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संपन्न झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.
खडकवासला मतदारसंघातील सिंहगड कॉलेज येथे द्वितीय सरमिसळ प्रक्रियेवेळी निवडणूक पर्यवेक्षक संजीव कुमार, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक
निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे, नायब तहसीलदार आणि व्हीव्हीपॅट व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी सचिन आखाडे यांच्यासह संबंधित कक्षाचे समन्वय अधिकारी गजानन किरवले, नारायण पवार आणि उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. यशवंत माने यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील
निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली. तनंतर सरमिसळ प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक पर्यवेक्षक संजीव कुमार यांनीदेखील उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.
खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी 608 बॅलेट युनिट,608 कंट्रोल युनिट आणि 659 व्हीव्हीपॅट मशिन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहेत. त्यांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 507 मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात 14 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 507 मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी 1 बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून 101बॅलेट युनिट, 101कंट्रोल युनिट आणि 152 व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.