पुणे-ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या पर्वतीचे जतन आणि संवर्धन करून आपला वैभवशाली वारसा आणि संस्कृती जपता आली. त्यासाठी राज्य शासनाचा विशेष निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती महायुतीच्या पर्वती मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ लक्ष्मीनगर, म्हाडा कॉलनी, पर्वती गाव, निलय सोसायटी, अरुणोदय सोसायटी, गजानन महाराज चौक परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, विनोद वस्ते, शिवाजी गदादे पाटील, संजय शिंदे, मयुरेश चंद्रचूड, शैलेश लडकत, शिरीष देशपांडे, तेजस गाडे, राज ढवळकर, अजय जगताप, राजाभाऊ शेंडगे, लहू जागडे, राजेश तावडे यांचा प्रमुख सहभाग होता.
मिसाळ म्हणाल्या, श्री क्षेत्र देवदेवेश्वर संस्थान येथे विविध प्रकारची विकासकामे करुन घेतली. पेशवेकालीन वस्तुसंग्रहालयाचे नूतनीकरण, मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे भित्तिचित्रांद्वारे प्रदर्शन, पेशवे-ब्रिटिश अधिकारी यांची भेट झालेल्या कॅफेचे नूतनीकरण, शूर मराठा सरदारांच्या स्मारकाचे सुशोभीकरण आदी विकासकामांचा समावेश आहे.
मिसाळ म्हणाल्या, कार्तिकेय स्वामी मंदिर परिसरात रस्ता, सीमाभिंत, पायऱ्या, रेलिंग आदी विकासकामे पूर्ण केली. विविध प्रकारच्या कला-सांस्कृतिक कामांसाठी ॲम्फिथिएटर आणि 25 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी असलेले चाफ्याचे झाड दृकश्राव्य माध्यमातून 250 वर्षांचा इतिहास सांगत असल्याचा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्माण केला जाणार आहे.
मिसाळ पुढे म्हणाल्या, पुणे शहराला मोठे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. नवीन पीढीला जुन्या शहराची, ऐतिहासिक वारसास्थळांची, जुन्या परंपरांची ओळख करुन देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हेरिटेज वॉक सारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच हेरिटेज टुरिझम मास्टर प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करणार आहे.