पुणे, दि. 10 : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या चित्र प्रदर्शनातून मतदान करण्याचे आवाहन करण्याचा अनोखा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिराशेजारील संभाजी बागेसमोर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाला साद देत मतदान करण्याचा संकल्प करून नागरिकांनी प्रतिसाद दिला.
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या मतदार जनजागृती चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, यामधील काही निवडक चित्रांचे प्रदर्शन जंगली महाराज रोड येथील संभाजी बागेसमोरील फुटपाथवर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकामार्फत आयोजित केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी चित्र प्रदर्शनाची संकल्पना राबविण्यात आली.
‘तुमचे मत तुमचा अधिकार, गरज आहे काळाची ओळखा ताकद मतदानाची’, असा संदेश देणारी चित्रे विद्यार्थ्यांनी रंगवली होती. रविवार सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून गर्दीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करून मतदार जनजागृती करण्यात आली.