पुणे, दि. १०: येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत असून मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी आजच आपल्या मतदान केंद्राचे ठिकाण शोधण्यासाठी मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात एकूण ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार असून त्यात ३ लाख ४८ हजार ४५० पुरुष मतदार तर ३ लाख १५ हजार ११५ महिला मतदार आणि ५७ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीवेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात एकूण ६ लाख १८ हजार २४५ मतदार होते. त्यात २ लाख ९० हजार २३९ महिला मतदार तर ३ लाख २७ हजार ९६१ पुरुष मतदार आणि ४५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ४५ हजार ३७७ नवीन मतदारांचा नव्याने समावेश झाला आहे, असे श्री. पवार यांनी कळविले आहे.
000