Home Blog Page 589

मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य

पुणे, दि. १२: मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी २१ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करावे.

छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे.

मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यावा.

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी
मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करुन गोपनीयता भंग करणे हा निवडणूकविषयक गुन्हा आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.
0000

विकास आणि सामाजिक ऐक्यासाठी बागवे यांना विजयी करा :माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे आवाहन

पुणे:गरीब कुटुंबातून पुढे आलेले माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे हे कधी आपली जन्मभूमी, वस्ती आणि झोपडपट्टी भागाला विसरले नाहीत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बागवे यांनी झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काचे घर मिळवून दिले. झोपडीतून हक्काच्या घरात नेले. गरिबांना हक्काचा निवारा दिला, अशा शब्दांत माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी रमेश बागवे यांच्या कामाबद्दल मंगळवारी गौरवोद्वगार काढले.

रमेश बागवे यांना प्रशासकीय आणि विधानसभेच्या कामाचा अनुभव, तसेच विकासाची दूरदृष्टी आहे. त्यांना कँटोन्मेंटच्या प्रश्नांची जाण आहे. कँटोन्मेंट बोर्डाची निवडणूक झाली नसल्याने येथील विकास खुंटला आहे. बागवे विजयी झाल्यास ते कँटोन्मेंटचे महापालिकेत त्वरित विलीनीकरण करून घेतील. आजची राजकीय , धार्मिक परिस्थिती पाहता, सामाजिक ऐक्य आणि विकासासाठी मतदारांनी रमेश बागवे यांनाच निवडून द्यावे, अशी कळकळीची विनंती मी करतो. कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, तसेच या भागातील धार्मिक व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी बागवे यांना विजयी करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांची पदयात्रा मंगळवारी उत्साहात पार पडली. यानिमित्त शिवरकर यांनी मतदारांना बागवे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले. रमेश बागवे गरीब कुटुंबातून पुढे आलेले सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आहेत. महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी ठसा निर्माण केला. सामान्य माणूस आणि झोपडवासीयांच्या पाणी, वीज, रस्ते, स्वच्छतागृहे, शाळा, आरोग्य या गरजा पूर्ण करून त्यांनी विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या. कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात विकासकामे केली. कँटोन्मेंटआधी पर्वती मतदारसंघातून निवडून आले, तेव्हा त्या भागाचाही मोठा विकास त्यांनी घडवला, अशी प्रशंसा शिवरकर यांनी केली.
कँटोन्मेंटमध्ये सर्व समाजाचे लोक राहतात. बागवे यांनी सर्वधर्मसमभाव, सामाजिक ऐक्य आणि सामाजिक न्याय हा काँग्रेसचा विचार येथे रुजवून सामाजिक सलोखा वाढवला, असे सांगून शिवरकर यांनी बागवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
दादापीर दर्गा येथे चादर चढवून, तसेच भवानीमाता मंदिर आणि बालाजी मंदिर येथे दर्शन व आशीर्वाद घेऊन बागवे यांची पदयात्रा मंगळवारी निघाली. बनकर तालीम, सरस्वती सोसायटी, दुल्हा-दुल्हन कब्रस्तान, जिज्ञासा एसआरए वसाहत, पत्र्याची चाळ, राजेवाडी झोपडपट्टी, पवार वाडा, इस्लामपुरा आणि नाना पेठ या भागांत कार्यकर्त्यांच्या गर्दीत पदयात्रा पार पडली. पेढे वाटून आणि फटाके फोडून स्थानिक कार्यकर्त्यांनी बागवे यांचे स्वागत केले. ‘कँटोन्मेंटचा विकास म्हणजे रमेशदादा’ अशा घोषणेने परिसर दणाणून गेला. महिलांनी रमेशदादा यांचे औक्षण करून त्यांना विजयाचा विश्वास दिला. बागवे यांनी फळविक्रेते, रिक्षाचालक, दुकानदार, व्यापारी, स्थानिक मंडळांचे कार्यकर्ते, स्वच्छता कर्मचारी, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांशी, तसेच मुस्लिम समाजाशी संवाद साधून कँटोन्मेंटच्या विकासाचे वचन दिले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. अमोल देवळेकर, तसेच माजी नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, उस्मान तांबोळी, चेतन अग्रवाल, बाशूभाई शेख, सुनील घाडगे, बुधाजी मोरे, संजय सोनवणे, गौतम कांबळे, अक्षय अवचिते, विठ्ठल थोरात, अमजद शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

पूरस्थिती रोखण्यासाठी २०० कोटींचा निधी आणला – माधुरी मिसाळ

पुणे : आंबील ओढा परिसरासह, पर्वती विधानसभा मतदारसंघातील नाल्यांच्या बाजूला असलेल्या रहिवासी वस्तीतील पूरस्थिती रोखण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून २०० कोटींचा निधी आणला आहे. तसेच, केंद्रशासनाने शहरात पावसाळयात उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन शहरीपूर व्यवस्थापनासाठी महापालिकेस ३५० कोटींचा निधी दिला जाणार असून या निधीतूनही मतदारसंघात विकासकामे केली जाणार असल्याची माहिती आमदार माधूरी मिसाळ यांनी दिली. मिसाळ यांच्या प्रचारार्थ बिववेवाडी परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी या भागातील नागरिकांशी संवाद साधला. वर्षा साठे, रूपाली धाडवे, भीमराव साठे, पिंटू धाडवे, मीनानाथ पराडकर, महेश कुंभार, राखी शिंदे , महेश कुंभार, संतोष नांगरे, अविनाश खेडेकर, विनीत पिंगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

मिसाळ म्हणाल्या की, पाच वर्षांपूर्वी कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाल्याने आंबील ओढ्याला पूर आला होता. या परिस्थितीमुळे आंबील ओढा सहकार नगर अरण्येश्वर कात्रज धनकवडी दांडेकर पुलासहित अन्य भागातील जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाईन खराब झाल्या.सोसायटीलगतच्या सीमा भिंती या पडल्या. या ठिकाणी तात्पुरती कामे करण्यात आली होती. मात्र, आंबील ओढयाला सिमाभिंत बांधणे गरजेचे होते, तर, खासगी सोसायटयांमध्ये शासनाच्या निधीतून कामे होत नसल्याने अडचण होती. या भिंती बांधून देण्याची मागणी नागरिक करीत होते. बांधकाम आराखड्यानुसार सोसाय त्यांनी सीमा भिंती बांधल्या होत्या मात्र आपत्ती त्या पडल्याने बांधून देण्याची जबाबदारी महापालिका आणि सरकारची असल्याची भूमिका मांडली होती मात्र तशी तरतूद नसली तरी विशेष बाब म्हणून सोसायटी आणि भोवतीच्या भिंती बांधण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने २०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

कमी काळात अधिक पाऊस झाल्याने आंबील ओढा परिसरात झालेली मनुष्यहानी व वित्त हानी आपण अनुभवली. महायुती सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी दिल्याने सीमाभिंतींचे काम करता येईल. या कामामुळे कमी वेळेत अधिक पाऊस झाल्यास वित्त आणि जिवितहानी टाळण्यास मदत होणार आहे.- माधुरी मिसाळ ( महायुती उमेदवार )

या ठिकाणी होणार कामे
– निर्मल पार्क ते बागूल उद्यान सीमाभिंत पाच कोटी

  • पश्चिमनगर ते सेंट झेविअर्स शाळा सीमाभिंत तीन कोटी
  • खोराडा वस्ती सिंहगड रस्ता सीमाभिंत तीन कोटी
  • गजानन महाराज मठामागील बाजूस सीमाभिंत तीन कोटी
  • विठ्ठलनगर सिंहगड रस्ता परिसरात सीमाभिंत पाच कोटी
  • मंदार सोसायटी ते चंद्रशेखर मार्ग सीमाभिंत तीन कोटी
  • सावित्रीबाई नगर सिंहगडरस्ता सिमाभिंत दोन कोटी
  • ईएसआयसी हॉस्पिटल ते तिरंगा हॉटेल सीमाभिंत दोन कोटी
  • कटारिया हायस्कूल ते कॅनॉल सीमाभिंत पाच कोटी
  • मार्केट यार्ड, मुकुंदनगर, महर्षीनगर सीमाभिंत दोन कोटी
  • हिंगणे परिसर ओढ्यालगत सीमाभिंत दोन कोटी
  • गुरुराज सोसायटी सीमाभिंत पाच कोटी
  • के.के. मार्केट ते गुरुराज सोसायटी बिबवेवाडी उर्वरित भागात सीमाभिंत पाच कोटी

बापूसाहेब पठारे यांची विमान नगर मध्ये पदयात्रा; मेट्रो मार्गाच्या विस्तारा चे आश्वासन

पुणे: विमाननगर आज प्रबळ विकासाचा नारा घेऊन बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या पठारे यांनी मतदारांना रोजगाराच्या संधी, मूलभूत सोयीसुविधा, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात प्रगतीचे आश्वासन दिले.

ही पदयात्रा गणपती चौक, यमुना नगर, दत्त मंदिर चौक, म्हाडा कॉलनी, गंगा पुरम सोसायटी, संजय पार्क सोसायटी, विमान दर्शन अशा विविध मार्गांवरून निघाली, आणि या मार्गावर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी बापूसाहेब पठारे यांचे नागरिकांनी हार-फुलांनी स्वागत केले.

बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेचा उद्देश म्हणजे विमाननगर भागात विकासाचे एक नवे पर्व सुरू करणे आहे. प्रत्येक नागरिकाला प्रगतीचा भागीदार बनवण्याचे आश्वासन पठारे यांनी दिले. ते म्हणाले, “माझा एकच संकल्प आहे – सर्वांगीण विकास. मेट्रोचा विस्तार जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत करण्याचा माझा संकल्प आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. मी तुम्हाला दिलेल्या आश्वासनांचा मान राखीन.”

पदयात्रेच्या दरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी नागरिकांचे थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. त्यांनी गावात स्वच्छता, पाण्याचा योग्य पुरवठा, चांगले रस्ते, महिलांसाठी सुरक्षा, तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यांचे प्रमुख उद्दीष्ट आहे विकासाला गती देणे आणि स्थानिकांना एक उत्कृष्ट जीवनमान उपलब्ध करणे.


प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचारात मागे सोडत प्रशांत जगताप यांनी घेतली मोठी आघाडी

पुणे: विधानसभा निवडुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात येत आहे. हडपसरमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचारात मागे सोडत प्रशांत जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील घरोघरी जात मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात जगताप यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच हडपसरमध्ये ‘लहान-थोरांचा एकच निर्धार, यंदा प्रशांत जगताप हेच आमदार’ असे चित्र पाहायला मिळत आहे. असा दावा जगताप समर्थक करत आहेत.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी मंगळवारी मॉर्निंग वॉक करीत प्रचाराची सुरुवात केली. कात्रज उद्यान व तलावाजवळ नागरिकांसोबत संवाद साधला. नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. विद्यमान आमदार नागरिकांना मुबलक पाणी, चांगले रस्ते, ड्रेनेज, प्रदूषणमुक्त वातावरण, ट्रॅफिकमुक्त वाहतूक देण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत, अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली. हीच परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी परिवर्तन घडवून प्रशांत जगताप यांना विजयी करायचे आहे, असे शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितले.

कात्रज, कोंढवा, हांडेवाडी, सय्यदनगर परिसरात नागरिकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला. कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते मोहसीनभाई शेख यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. समाजातील युवकांची ताकद जगताप यांना देण्याचा निर्धार त्यांनी केला.

प्रशांत जगताप म्हणाले, “महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा अपमान केला जातो. जनतेच्या समस्या सोडवण्यापेक्षा घोषणांचा पाऊस पडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम हे लोक करताहेत. महाराष्ट्राशी गद्दारी करून शिवसेना व राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसलेल्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. हडपसरच्या विकासाची दिशा घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे. शरद पवार यांच्यासारखा जाणता राजा आपल्यासोबत आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून मला निवडून द्यावे.”

खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान जागृतीसाठी महसूल सेवकांचा पुढाकार


पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या वतीने मतदान जागृती अभियान राबवले जात असून, तहसील कार्यालयातील सर्व महसूल सेवक या अभियानात सक्रिय सहभाग घेत आहेत. या उपक्रमाद्वारे मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देणे, मतदान प्रक्रियेबाबत माहिती देणे आणि मतदानाचा टक्केवारी वाढवणे हे उद्दिष्ट ठेवले आहे. या अभियानाच्या माध्यमातून मतदारांना जागृत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कसब्यातील फेरीवाले, पथारीवाले धंगेकर यांच्या पाठीशी

जाणीव संघटना प्रणीत हातगाडी, फेरीपथारी, स्टॉलधारक संघटनेने दिला जाहीर पाठिंबा

पुणे दि. 12 – जाणीव संघटना प्रणीत हातगाडी, फेरीपथारी, स्टॉलधारक संघटनेने कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट आणि मित्रपक्षांचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला.
या संघटनेने गेल्या निवडणुकीतही धंगेकर यांना पाठिंबा दिला होता. याही वेळी फेरीवाले, पथारीवाले आणि स्टॉलधारक यांनी धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घोषित केला आहे. धंगेकर यांनी पथविक्रेता योजना-२०२४ अमलात आणावी, पथविक्रेता, धोरण, पथविक्रेता कायदा आणि पथविक्रेता योजना निश्चित करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या संघटनेने केली असून, हे काम धंगेकर निश्चितपणे करतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे. संघटनेतर्फे अध्यक्ष श्वेता ओतारी, उपाध्यक्ष कैलास बोरणे, विभागीय अध्यक्ष विनायक दहीभाते, विभागप्रमुख अभिजित हत्ते, विभागप्रमुख संदीप यादव, विभागप्रमुख परवेज अन्सारी यांच्या स्वाक्षरीने हे पाठिंब्याचे पत्रक धंगेकर यांना देण्यात आले.


पुण्यातील पथारीवाले, हातगाडीवाले आणि स्टॉलधारक यांच्या समस्यांची आपल्याला जाणीव असून, त्यासंदर्भात आपण निश्चितपणे महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठवू आणि त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करू, तसेच त्यांच्यासंदर्भातील धोरण अंमलबजावणीचेही प्रयत्न निश्चितपणे करू, अशी ग्वाही धंगेकर यांनी यावेळी दिली. आज धंगेकर यांनी लक्ष्मी रस्ता व परिसरातील हातगाडी, फेरीपथारी, स्ट़ॉलधारक यांची भेट घेतली. तसेच संपूर्ण मार्गावरील विविध व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी हातगाडी, फेरीपथारी व स्टॉलधारक, तसेच व्यापारी यांनी गेल्या दीड वर्षात धंगेकर यांनी त्यांचे अनेक प्रश्न सोडविल्याबद्दल धन्यवाद दिले व पुढील पाच वर्षे आमचे सर्व प्रश्न शंभर टक्के सुटतील, असा धंगेवकरांवर विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, काल धंगेकर यांनी खडक माळ आळी, सिंहगड गॅरेज, कैकाड आळी,मीरा मार्केट, घोरपडे पेठ, पीएमसी कॉलनी, मोमीनपुरा, देवळाची तालीम, मासे आळी, गंजपेठ, समता भूमी, टिंबर मार्केट, जानाई मळा, आदि भागातून पदयात्रा काढली. या पदयात्रेला महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट आणि मित्रपक्षांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे, हेमंत येवलेकर, रमेश साठे, निलेश बोराटे, पंकज बरीदे इत्यादी सहभागी झाले होते.

मतदानाच्या आणि आधीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या मुद्रित माध्यमातील जाहिराती प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक

पुणे, दि. १२: मतदानाच्या आणि एक दिवस आधीच्या दिवशी मुद्रित माध्यमात (प्रिंट मीडिया) प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक आहे. पूर्व- प्रमाणीत करुन घेतल्याशिवाय जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून त्यांचे तंतोतंत पालन व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी म्हणजेच दि. २० नोव्हेंबर २०२४ आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. १९ नोव्हेंबर) मुद्रित माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसू शकेल अशा जाहिराती प्रसिद्ध होऊ नयेत याबाबत दक्षता घेण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी या तारखेला प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती प्रमाणीत करुन घ्याव्यात. प्रमाणीकरणाचे अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या किमान २ दिवस अगोदर एमसीएमसी समितीकडे सादर करावेत, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. दिवसे यांनी कळविले आहे.

ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मतदानातून अद्दल घडवा.

अकोट मतदारसंघातील काँग्रेस मविआचे उमेदवार महेश गणगणेंच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची जाहीर सभा.

अकोला/मुंबई, दि. १२ नोव्हेंबर
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भाजपा हा शेतकरीविरोधी पक्ष असून शेतकऱ्यांना मते मागण्याचा भाजपाला काही एक अधिकार नाही. काँग्रेस मविआची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकरीहिताचे निर्णय घेऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोट विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस व मविआचे उमेदवार महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, डॉ. अभय पाटील, हिदायत पटेल, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश लोणकर, हरिभाऊ भदे, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमनकर आणि मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपाचे सरकार आले तर नदीजोड प्रकल्प करण्याची देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती पण २०१४ ते १९ भाजपाचे सरकार होते त्यानंतर अडीच वर्षांचे सरकार होते पण फडणविसांनी ते काम केले नाही. काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांची ही संकल्पना असून मविआची सत्ता आल्यानंतर हा नदीजोड प्रकल्प पुर्ण करु. २०१९ साली काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळून मविआची सत्ता स्थापन केली आणि पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली. आता काँग्रेस मविआचे सरकार आले की जुनी पेन्शन लागू करू, २५ लाखांचा आरोग्य विमा, महिलांना ३ हजार रुपये, शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी व शेतमालाला भाव देऊ असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे.

निवडणुका आल्या की भाजपा हिंदू-मुस्लीम करून मते मागतो. जातीधर्मात फूट पाडून सत्ता मिळवण्याचा भाजपाचा हा डाव आहे परंतु देशाच्या एकात्मतेसाठी काँग्रेसच्या इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी बलिदान दिले आणि आजचे पंतप्रधान एक हैं तो सेफ हैं, म्हणत मते मागत आहेत. १० वर्षात नरेंद्र मोदी देशाला सेफ करू शकले नाहीत, मोदी हे देशातील आजपर्यंतचे सर्वात कमजोर पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रातील ६७ हजार महिला बेपत्ता आहेत, बदलापुरच्या शाळेत लहान मुलींवर अत्याचार केले, महिला मुली सुरक्षित नाहीत. भाजपाला सत्तेचा माज आला असून वणीमध्ये भाजपा नेत्यांने ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा दिली. ओबीसी समाजाला कुत्रा म्हणणाऱ्या भाजपाला आता मतदानातून अद्दल घडवा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.

राहुल गांधी यांची चिखली येथील सभा रद्द:विमानात झाला तांत्रिक बिघाड

0

मुंबई-लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची चिखली येथील सभा रद्द करण्यात आली आहे. त्या नंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक व्हिडिओ संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला आज चिखलीला यायचे होते. तेथे मला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटायचे होते आणि एका जाहीर सभेला संबोधित करायचे होते. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मी येऊ शकलो नाही. मला माहित आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी खूप अडचणींचा सामना करत आहेत. भाजप सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव देत नाही. पण मी तुम्हाला आश्वासित करतो की, आमचे सरकार आल्यानंतर सरकार तुमची काळजी घेईल आणि तुमच्या समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करेल.’राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ जारी करून ही माहिती दिली आणि सांगितले की, मला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती समजते आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत आणि त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली.

मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडून येणारच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विश्वास

दिवाळी फराळ, सोसायटी भेटीगाठी, सामाजिक मेळाव्यांद्वारे प्रचाराचा धडाका

पुणे, दि. १२ नोव्हेंबर, २०२४ : गोखलेनगर परिसरात म्हाडाच्या इमारतींवर मिळकत करावर लावलेला तीनपट दंड रद्द करण्याची मागणी विधानसभेत केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी नवे धोरण लागू होई पर्यंत दिलेली दंड स्थगिती, छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील प्रत्येक भागात केलेली महत्त्वाची विकासकामे, सातत्याने असलेला जनसंपर्क, विधानसभेत वेळोवेळी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांची केलेली सोडवणूक आणि प्रचाराच्या प्रत्येक ठिकाणी जनतेचा मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद याच्या जोरावर निवडून येणारच असा विश्वास महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

दिवाळी फराळ, सोसायटींमधील रहिवासी यांच्याशी प्रत्यक्ष भेटीगाठी, युवा, महिला, सामाजिक मेळावे, मतदार संघ पिंजून काढणाऱ्या पदयात्रा, जागोजागी नागरिकांकडून होणारे स्वागत अशा भारावलेल्या वातावरण सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार सध्या सुरु आहे.        

गेल्या काही दिवसात दयानंद इरकल, प्रबोधन मंच, सतीश बहिरट पाटील मिञ परिवार आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रम, व्हिजन सोशल फाऊंडेशन आयोजित व्यापारी व मारवाडी समाज मेळावा येथेही नागरीकांनी शिरोळे यांना पाठींबा दिला. यावेळी समाजातील प्रतिष्ठीत नागरीकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. याबरोबरच दीप बंगला चौक, मित्र नगर कॉलनी येथील रहिवाशांची भेटही शिरोळे यांनी घेतली.

यावेळी बोलताना शिरोळे म्हणाले, “गोखलेनगर- वडारवाडी भागातील प्रश्नांची सोडवणूक करणे याला मी कायमच महत्त्व दिले आहे. मागील ५ वर्षांत या भागात तब्बल १७ कोटी २९ लाख रुपये निधी आणण्यात यश आले असून या अंतर्गत विविध विकासकामे सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने नवीन ड्रेनेज लाईन टाकणे व जुन्या ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे, रस्ता कॉन्क्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉक टाकणे, जलवाहिनी, बोरवेलचे काम, सामाजिक सभागृह उभारणी, पायाभूत विकासकामे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे यांचा समावेश आहे. या सर्वांमुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत आहे याचा आनंद आहे.”

नजीकच्या भविष्यात या भागातील म्हाडाच्या इमारतींवर मिळकत करावर लागलेला तीनपट दंड कायमस्वरुपी रद्द व्हावा, गोखलेनगर वडारवाडी भागातील म्हाडाच्या पूरग्रस्त वसाहतींना गावठाण घोषित करण्यासाठी प्रयत्न करणे जेणेकरून नागरिकांना वाढीव एफएसआय व बँक लोन मिळण्यास मदत होईल, स्वच्छतागृहांची उपलब्धता वाढवून देणे, पाणीपुरवठा प्रणाली आणखी सक्षम करणे, पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळा मार्फत वडार समाजाला कार्यक्षम करणे, मेट्रो स्थानका पर्यंत जाण्यायेण्यासाठी फिडर बस व रिक्षा सेवा उपलब्ध करून देणे आणि जनवाडी गोलशेड, जनवाडी ओटा घर, पांडवनगर शेजघर या भागातील एफएसआयचा प्रश्न मार्गी लावणे यांना प्राधान्य देत ही कामे पूर्णत्वास नेणे यावर माझा भर असेल असेही शिरोळे म्हणाले.

उद्धव ठाकरेंना आताच CM चेहरा घोषित करा:आपच्या बड्या नेत्याची मागणी

भाजपचा पराभव हेच आम आदमी पार्टीचे एकमेव उद्दीष्ट

मुंबई- हरियाणा विधानसभा निवडणुकीतील निकालाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर महाविकास आघाडीने आत्ताच उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे बडे नेते संजय सिंह यांनी केली आहे. संजय सिंह यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मागणी केली आहे. त्यावर मविआतील इतर पक्ष काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आपसातील मतभेद विसरून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात रान पेटवत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय सिंह यांनी मंगळवारी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या मुद्याला हात घातला आहे.
संजय सिंह म्हणाले, महाविकास आघाडीने आत्ताच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचे नाव घोषित करावे. त्यांनी या प्रकरणी विलंब केला तर त्यांचेच नुकसान होईल. हरियाणात तेच झाले होते. तिथे काँग्रेसमधील गटांनी एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न केला त्यात काँग्रेसचे जबर नुकसान झाले. त्यामुळे मविआने कुणाचे आमदार जास्त येतील, या भानगडीत पडू नये. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जबरदस्त काम केले आहे. मराठी माणूस व मराठी स्वाभिमान या दोन्ही गोष्टी त्यांच्यासोबत जोडल्या जातात. त्यामुळे त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली तर महाविकास आघाडीचा मोठा फायदा होईल असे मला वाटते.
भाजपचा पराभव हेच आम आदमी पार्टीचे एकमेव उद्दीष्ट आहे. त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडीत जागा मिळूनही त्या घेतल्या नाही, असेही संजय सिंह यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीसोबत वाद सुरू आहे. कारण, त्यांनी त्यांच्या मुलाला हवी ती जागा सोडली नाही. त्यामुळे राज ठाकरे भाजपचे समर्थन करत असतील असे मला वाटत नाही. ते वेगवेगळी भूमिका घेत आहेत. मनसेमुळे मविआची काही मते कमी होतील, पण उद्धव ठाकरे यांच्या नावाची महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली तर मतांची हे विभाजन टाळता येईल, असे संजय सिंह म्हणाले.
भाजपने महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखा व्यवहार केल्याची टीकाही संजय सिंह यांनी यावेळी केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण सर्वांनी पाहिले. भाजपने महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखा व्यवहार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अनेक योजना व प्रकल्प गुजरातला नेल्या. एका राज्याच्या विकासासाठी दुसऱ्या राज्याचे नुकसान करणे योग्य नाही. आतापर्यंत आपण दुचाकीचोर व इतर चोर पाहिले. पण भाजपने अख्खे पक्षच चोरले.
एवढेच नाही तर त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीसोबत संबंध असलेल्यांना आपल्यासोबत घेतले. त्यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आपल्या गोटात वळवले हे ही सर्वश्रूत आहे.

संजय सिंह यांनी यावेळी भाजपच्या एक है तो सेफ हैच्या घोषणेचाही समाचार घेतला. पंतप्रधान 10 वर्षांनंतर एक है तो सेफ हैचा नारा देत आहेत. एकाअर्थाने ते हिंदू समाजाला घाबरवत आहेत. त्यांना अशी भाषा शोभा देते का? तुम्ही हिंदूंना सुरक्षित ठेवत नसाल तर तु्म्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या. बटेंगे तो कटेंगे हा काय नारा आहे का? एकजूट राहिलो नाही तर संविधान संकटात येईल, आरक्षण संपुष्टात येईल. त्यामुळे एकजूट राहा आणि भाजपचे काम तमाम करा, असे ते म्हणाले.

इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 चा विजेता ठरला स्टीव्ह जिरवा

इंडियाज बेस्ट डान्सर या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने स्वतः विकसित केलेल्या डान्स रियालिटी शोच्या चौथ्या सीझनमध्ये गेले काही महीने अटीतटीची स्पर्धा सुरू होती. या आणखी एका धमाकेदार सीझनवर आता पडदा पडला आहे आणि ग्रँड फिनालेमध्ये स्टीव्ह जिरवा या स्पर्धकाला विजयी घोषित करण्यात आले आहे. ग्रँड फिनाले ही जबरदस्त ऊर्जेने, अप्रतिम परफॉर्मन्सेसने भरलेली डान्स रजनी होती आणि या सीझनच्या संपूर्ण प्रवासाला साजेसा हा सोहळा होता, ज्याने भारताचा नवीन डान्स आयकॉन मिळवून दिला. होस्ट जय भानुशाली आणि अंकित चौहान तसेच परीक्षक करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांनी ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवले. अंतिम फेरीतील हे स्पर्धक होते- स्टीव्ह जिरवा, हर्ष केशरी, नेक्स्टियन, नेपो, आकांक्षा मिश्रा म्हणजे अकीना आणि आदित्य मालवीय.

या फिनालेची शोभा आणखी वाढवण्यासाठी ‘झलक दिखला जा सीझन 11’ ची विजेती मनीषा रानी तसेच अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि शैल ओसवाल देखील उपस्थित होते. ‘रब्बा करे’ या आपल्या आगामी गीताचे प्रमोशन करण्यासाठी ते आले होते. तसेच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच सुरू होत असलेल्या ‘IBD व्हर्सेस SD: चॅम्पियन्स का टशन’ या अनोख्या डान्स रियालिटी शो मधील डान्स के पितामह- रेमो डिसूझा आणि परीक्षक मलाइका अरोरा आणि गीता कपूर यांनीही या भागात उपस्थित राहून आपल्या विनोदी टिप्पण्यांनी कार्यक्रमाची रंजकता वाढवली आणि प्रेक्षकांसाठी ते क्षण संस्मरणीय केले. ‘IBD व्हर्सेस SD: चॅम्पियन्स का टशन’ हा शो 16 नोव्हेंबरपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 7.30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.

स्टीव्ह जिरवा हा स्पर्धक इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 चा विजेता ठरला आणि त्याने ही प्रतिष्ठित ट्रॉफी पटकावली तसेच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने 15 लाख रु. चे घसघशीत बक्षीस देऊन त्याचा गौरव केला, तर त्याचा कोरिओग्राफर रक्तिम ठाकुरिया याला 5 लाख रु. चा धनादेश देण्यात आला. स्टीव्हने एक नवी कोरी मारुती सुझुकी स्विफ्ट देखील जिंकली. मारुती सुझुकी इंडिया लि.चे सीनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. पार्थो बॅनर्जी यांच्या हस्ते त्याला हे बक्षीस देण्यात आले.

इंडियाज बेस्ट डान्सर मध्ये शिलॉँगहून आलेला स्टीव्ह जिरवा आणि कोरिओग्राफर रक्तिम ठाकुरिया या जोडीचा प्रवास जबरदस्त होता. एकामागून एक प्रत्येक आठवड्याला ते परीक्षकांना आपल्या चपळ आणि अचूक फुटवर्कने मंत्रमुग्ध करून पूर्ण गुण मिळवत होते. आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये स्टीव्हला एका संकटाने ग्रासले होते आणि त्यामुळे त्याच्या चालण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. पण, त्याच्या आजीच्या निरंतर साहाय्यामुळे त्याचे जीवन पालटले आणि तो एक विलक्षण डान्सर बनू शकला. त्याच्या प्रतिभेने रेमो डिसूझाचे लक्ष वेधून घेतले. आपल्या चित्रपटाच्या संदर्भात स्टीव्हला भेटण्याची इच्छा रेमोने व्यक्त केली.

‘बडे अच्छे लगते हैं’ ची जादू पुन्हा अनुभवा

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर…

13 वर्षे पूर्ण करत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन (SET) आपल्या ‘बडे अच्छे लगते हैं’ या प्रमुख आणि अत्यंत लोकप्रिय झालेल्या मालिकेचे पुनर्प्रसारण 11 नोव्हेंबरपासून सुरू करत आहे. दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रसारित करण्यात येईल. वास्तववादी कथानक आणि त्यातील चार-चौघांसारख्या व्यक्तिरेखा यांच्या बळावर भारतीय टेलिव्हिजनवर क्रांती घडवणारी ही मालिका आता पुन्हा प्रेक्षकांचे मन काबिज करण्यासाठी येत आहे.

2011 मध्ये ‘बडे अच्छे लगते हैं’ ही मालिका सुरू झाली होती. त्यावेळी त्यातील प्रेम, कुटुंब आणि नाती यांच्या बारकाईने केलेल्या चित्रणामुळे ती अत्यंत लोकप्रिय झाली होती. या मालिकेत प्रिया या नायिकेची भूमिका करणारी साक्षी तंवर मालिकेच्या पुनर्प्रसारणाबद्दल बोलताना म्हणाली, “बडे अच्छे लगते हैं एक खास अनुभव होता, जो आजही आपलासा वाटतो. या मालिकेच्या पुनरागमनामुळे नवीन प्रेक्षक देखील या प्रवासाचा अनुभव घेऊ शकतील याचा मला आनंद वाटत आहे. ही मालिका 13 वर्षांनंतर पुन्हा प्रसारित होत आहे हा त्या मालिकेच्या लोकप्रियतेचा आणि मालिकेने केलेल्या चिरकाल प्रभावाचा पुरावा आहे. मालिकेच्या पुनर्प्रसारणाविषयी समजल्यावर जुन्या आठवणी माझ्या मनात दाटून आल्या आहेत आणि मी भावुक झाले आहे. एकता आणि राम यांच्याबरोबर केलेले काम मला आठवले. आपल्या हृदयात ही कहाणी जिवंत ठेवणाऱ्या प्रेक्षकांची मी ऋणी आहे.”

या मालिकेचा प्रभाव अभूतपूर्व होता. मालिका घराघरात पोहोचली होती आणि भारतीय टेलिव्हिजनवर या मालिकेने एक मापदंड स्थापित केला होता. मालिकेच्या पुनरागमनाने राम आणि प्रियाच्या कालातीत प्रेम कहाणीची जादू पुन्हा पडद्यावर पासरणार आहे.

बघा, बडे अच्छे लगते हैं सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 11 नोव्हेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता पाहायला मिळणार आहे

उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी:औशात काढला दुसरा व्हिडिओ

औसा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभरातील नेत्यांच्या बॅगांची आणि गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाल्यानंतर राज्यभरात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ काढत याबाबत निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा औसा येथे सभेसाठी जाताना उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. आजही उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ शूट करत निवडणूक आयोगावर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला.

ज्या प्रकारे आमच्या बॅगा तपासल्या जात आहेत, त्याप्रमाणेच मोदी, फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या देखील बॅगांची तपासणी करा, अशी तंबी यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. तसेच त्यांच्या बॅगांची तपासणी करतानाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला. यावेळी ते प्रत्येक अधिकाऱ्याला त्याचे नाव आणि तो कोणत्या जिल्ह्यातील राहणार असल्याचा प्रश्न विचारताना दिसून आले तसेच यापुढे जो कोणी नेता तुमच्या मतदारसंघात येईल, त्या सर्वांच्या बॅगांची तपासणी करा, अशी तंबी देखील त्यांनी या अधिकाऱ्यांना दिली.

वणी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार मिलिंद नार्वेकर हे सोमवारी वणी येथे आले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले होते. मात्र तिथे निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या पथकाकडून ठाकरे व नार्वेकर दोघांच्याही हेलिकॉप्टरमधील बॅगची तपासणी करण्यात आली होती. या वेळी उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित केला.