दिवाळी फराळ, सोसायटी भेटीगाठी, सामाजिक मेळाव्यांद्वारे प्रचाराचा धडाका
पुणे, दि. १२ नोव्हेंबर, २०२४ : गोखलेनगर परिसरात म्हाडाच्या इमारतींवर मिळकत करावर लावलेला तीनपट दंड रद्द करण्याची मागणी विधानसभेत केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी नवे धोरण लागू होई पर्यंत दिलेली दंड स्थगिती, छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील प्रत्येक भागात केलेली महत्त्वाची विकासकामे, सातत्याने असलेला जनसंपर्क, विधानसभेत वेळोवेळी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांची केलेली सोडवणूक आणि प्रचाराच्या प्रत्येक ठिकाणी जनतेचा मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद याच्या जोरावर निवडून येणारच असा विश्वास महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.
दिवाळी फराळ, सोसायटींमधील रहिवासी यांच्याशी प्रत्यक्ष भेटीगाठी, युवा, महिला, सामाजिक मेळावे, मतदार संघ पिंजून काढणाऱ्या पदयात्रा, जागोजागी नागरिकांकडून होणारे स्वागत अशा भारावलेल्या वातावरण सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार सध्या सुरु आहे.
गेल्या काही दिवसात दयानंद इरकल, प्रबोधन मंच, सतीश बहिरट पाटील मिञ परिवार आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रम, व्हिजन सोशल फाऊंडेशन आयोजित व्यापारी व मारवाडी समाज मेळावा येथेही नागरीकांनी शिरोळे यांना पाठींबा दिला. यावेळी समाजातील प्रतिष्ठीत नागरीकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. याबरोबरच दीप बंगला चौक, मित्र नगर कॉलनी येथील रहिवाशांची भेटही शिरोळे यांनी घेतली.
यावेळी बोलताना शिरोळे म्हणाले, “गोखलेनगर- वडारवाडी भागातील प्रश्नांची सोडवणूक करणे याला मी कायमच महत्त्व दिले आहे. मागील ५ वर्षांत या भागात तब्बल १७ कोटी २९ लाख रुपये निधी आणण्यात यश आले असून या अंतर्गत विविध विकासकामे सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने नवीन ड्रेनेज लाईन टाकणे व जुन्या ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे, रस्ता कॉन्क्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉक टाकणे, जलवाहिनी, बोरवेलचे काम, सामाजिक सभागृह उभारणी, पायाभूत विकासकामे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे यांचा समावेश आहे. या सर्वांमुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत आहे याचा आनंद आहे.”
नजीकच्या भविष्यात या भागातील म्हाडाच्या इमारतींवर मिळकत करावर लागलेला तीनपट दंड कायमस्वरुपी रद्द व्हावा, गोखलेनगर वडारवाडी भागातील म्हाडाच्या पूरग्रस्त वसाहतींना गावठाण घोषित करण्यासाठी प्रयत्न करणे जेणेकरून नागरिकांना वाढीव एफएसआय व बँक लोन मिळण्यास मदत होईल, स्वच्छतागृहांची उपलब्धता वाढवून देणे, पाणीपुरवठा प्रणाली आणखी सक्षम करणे, पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळा मार्फत वडार समाजाला कार्यक्षम करणे, मेट्रो स्थानका पर्यंत जाण्यायेण्यासाठी फिडर बस व रिक्षा सेवा उपलब्ध करून देणे आणि जनवाडी गोलशेड, जनवाडी ओटा घर, पांडवनगर शेजघर या भागातील एफएसआयचा प्रश्न मार्गी लावणे यांना प्राधान्य देत ही कामे पूर्णत्वास नेणे यावर माझा भर असेल असेही शिरोळे म्हणाले.