औसा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभरातील नेत्यांच्या बॅगांची आणि गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाल्यानंतर राज्यभरात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ काढत याबाबत निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा औसा येथे सभेसाठी जाताना उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. आजही उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ शूट करत निवडणूक आयोगावर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला.
ज्या प्रकारे आमच्या बॅगा तपासल्या जात आहेत, त्याप्रमाणेच मोदी, फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या देखील बॅगांची तपासणी करा, अशी तंबी यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. तसेच त्यांच्या बॅगांची तपासणी करतानाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला. यावेळी ते प्रत्येक अधिकाऱ्याला त्याचे नाव आणि तो कोणत्या जिल्ह्यातील राहणार असल्याचा प्रश्न विचारताना दिसून आले तसेच यापुढे जो कोणी नेता तुमच्या मतदारसंघात येईल, त्या सर्वांच्या बॅगांची तपासणी करा, अशी तंबी देखील त्यांनी या अधिकाऱ्यांना दिली.
वणी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार मिलिंद नार्वेकर हे सोमवारी वणी येथे आले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले होते. मात्र तिथे निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या पथकाकडून ठाकरे व नार्वेकर दोघांच्याही हेलिकॉप्टरमधील बॅगची तपासणी करण्यात आली होती. या वेळी उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित केला.