Home Blog Page 588

आई माता मंदीर जवळ दि बिलीयन्स हॉटेल नामक अवैध हुक्का पार्लरवर छापा

पुणे- मार्केट यार्ड ते बिबवेवाडी रस्त्यावरील आई माता मंदीर जवळ असलेल्या दि बिलीयन्स हॉटेल नामक अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा मारला .
दि.०७/०४/२०२५ रोजी रात्रीच्या दरम्यान वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, अति कार्यभार गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर हे त्यांचे ताबे पोलीस अंमलदार यांचेसह आई माता मंदीर जवळ दि बिलीयन्स हॉटेल नामक अवैध हुक्का पार्लरवर छापापोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरु असलेले हुक्का पार्लर चेकींग करीत असताना दि बिलीयन्स हॉटेल आई माता मंदीर जवळ, मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी अवैधरित्या हुक्का पुरवला जातो अशी बातमी मिळाली.
त्यावेळी लागलीच पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्यांचा ताबे पोलीस स्टाफ असे बातमीबाबत वरिष्ठांना माहिती देवून हॉटेल दि बिलीयन्स या ठिकाणी छापा टाकुन कारवाई करुन हॉटेलमध्ये मिळुन आलेले हुक्का पिण्याचे साहित्य त्यामध्ये हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर, इतर साहित्य व रोख रक्कम असा एकुण ३२,०००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करुन हॉटेल चालक नामे आरीफ शब्बीर शेख वय २४ वर्षे रा. साईबाबा नगर कोढवा खुर्द पुणे तसेच हॉटेल मधील ०३ वेटर कामगार यांचेविरुध्द सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) सन २०१८ कलम ४ अव २१ अ अन्वये कारवाई करुन मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन त्यांना पुढील कार्यवाही कामी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण अति. कार्यभार युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर, सपोनि. मदन कांबळे, पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, प्रमोद टिळेकर, कानिफनाथ कारखिले, उमाकांत स्वामी व शेखर काटे यांचे पथकाने केली आहे.

पुण्यात भूतानच्या महिलेवर सामूहिक बलात्कार,1 राष्ट्रवादीचा पदाधिकारी ,१ वकील,एक डीजे अशा ९ आरोपींना अटक;३ दिवसांची पोलीस कोठडी …

पुणे – पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये भूतानमधील २७ वर्षीय परदेशी महिलेनं सात जणांनी सामूहिक बलात्कार करून तिला जबरदस्तीने वेश्याव्यसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला लोनावळा, रायगड आणि पानशेत येथील विविध ठिकाणी, आरोपींनी आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये लैंगिक अत्याचार करून वेश्याव्यसाय करून घेतला. अटकेतील आरोपींमध्ये विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती आहेत – एकजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकारी आहे, एक डीजे असून दुसरा वकील आहे.

प्रकरण असे कि, महिला २०२० पासून पुण्यात वास्तव्यास आहे. ती भारतात प्रथम २०२० मध्ये आली आणि सुरुवातीला बोधगयामध्ये राहिली. नंतर शिक्षण आणि नोकरीच्या हेतूनं ती पुण्यात आली, जिथे तिची ओळख आरोपी ऋषिकेश नवले याच्याशी झाली. त्याने तिची ओळख शंतनू कुकडे याच्याशी करून दिली. कुकडे याने तिला निवासाची आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीच्या नावाखाली तिच्या असहायतेचा गैरफायदा आरोपीने घेतला.

मात्र, आरोप आहे की, शंतनू कुकडे याने या संधीचा गैरफायदा घेत महिलेस लैंगिक शोषणासाठी वापरले. कालांतराने त्याने तिची ओळख आपल्या इतर मित्रांशी करून दिली आणि ‘मित्रत्वाच्या’ नावाखाली तिला विविध पार्ट्यांमध्ये सहभागी करून घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली.

विविध ठिकाणी अत्याचार महिलेने सांगितले की, लोणावळा, रायगड व पानशेत येथील विविध ठिकाणी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

शंतनू कुकडे – राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी (त्याच्यावर याआधी दोन महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे), ऋषिकेश नवले, जलिंदर बड्डे, उमेश शाहणे, प्रतीक शिंदे, वकील विपिन बिडकर, सागर रसगे या व्यतिरिक्त तक्रारीमध्ये अविनाश सूर्यवंशी आणि मुदस्सीर मेमन(व्यवसायीक) या दोघांची नावेही नमूद आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे.

आरोपींना वानखेडे मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले. पोलीस पथकाने ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आरोपींच्या वतीने अॅड. तोसिफ शेख, अॅड. क्रांती साहाने, अॅड. स्वप्नील गिर्मे, अॅड. सूरज जाधव, अॅड. नेपा पिसे आणि अॅड. आदिल दतरंगे यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात सांगितले की, सदर गुन्हा २०२० मध्ये घडलेला असून तक्रार दाखल करण्यास अत्यंत उशीर झालेला आहे. एवढा विलंब झाल्यामुळे फिर्यादीचा कथनावर संशय निर्माण होतो, त्यामुळे आरोपींना मॅजिस्ट्रेट कोठडी (MCR) द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने सर्व आरोपींना १२ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत (PCR) ठेवण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्राची निवडणूक हाच मोठा फ्रॉड- मल्लिकार्जुन खरगे

अहमदाबाद – भाजपने फ्रॉड करूनच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आल्या. पण त्यानंतर भाजपने मतदार यादीत फेरफार करून तब्बल 50 लाख मतदार वाढवले. त्यानंतर भाजपच्या विधानसभा निवडणुकीत 150 पैकी 138 जागा निवडून आल्या. आता तुम्हीच सांगा ही कशी लोकशाही? हा कसा निवडणूक आयोग? ही कोणती मतदार यादी या लोकांनी तयार केली? सर्वकाही बोगस तयार करून हे जिंकले, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

गुजरातच्या अहमदाबाद येथे काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू झाले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी या अधिवेशनाला उपस्थित नेत्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपरोक्त आरोप केला. ते म्हणाले, केंद्र सरकार स्वतःला फायदा व विरोधी पक्षांना नुकसान व्हावे या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान तयार करत आहे. पण आज नाही तर उद्या या देशातील तरुण जागे होऊन तुमचा हात पकडून आम्हाला ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर मतदान हवे असल्याचे ठणकावून सांगतील.

महाराष्ट्रात काय झाले? राहुल गांधी यांनी हा मुद्दा यापूर्वी संसद व माध्यमांपुढे उपस्थित केला. आम्ही सर्वजण बोललो. पण त्याचा सरकारवर कोणताही परिणाम झाला नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 50 लाख मतदान वाढले. आत्ता तुम्हीच सांगा, ही कशी लोकशाही? हा कसा निवडणूक आयोग? ही कोणती मतदार यादी या लोकांनी तयार केली? सर्वकाही बोगस तयार करून हे जिंकले.

मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक एक फ्रॉड असून, लोकशाहीला बसलेला मार आहे. हीच गोष्ट हरियाणातही झाली आहे. तिथे थोड्याफार प्रमाणात घोळ झाला, पण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात झाला. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. पण त्यानंतर तेथील मतदार यादीत खूप मोठा फेरफार करण्यात आला. त्याचा त्यांना विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. मी केव्हाच असे ऐकले नाही किंवा पाहिलेही नाही.

भाजपने महाराष्ट्रात 150 जागा लढल्या आणि 138 जागा जिंकल्या. 90 टक्के रिझल्ट आला. देशात असे कधीच झाले नाही. आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या. मी स्वतः 12-13 वेळा निवडणूक लढली. पण असे केव्हाच झाले नाही. जो फ्रॉड महाराष्ट्रात झाला, तो केवळ लोकशाहीला उद्ध्वस्त व तंग करण्यासाठी तथा विरोधकांना हरवण्यासाठी करण्यात आला. आपल्याला याविरोधातही लढायचे आहे.

मतदार यादीत होणारा फेरफार रोखण्यासाठी आमच्या नेत्यांनी व वकिलांनी मोठ्या प्रमाणात काम केले. पण त्यानंतरही आम्ही या प्रकरणी खूप मागे आहोत. आपण हे शोधून काढू. चोरी करणारा चोर आज नाही तर उद्या जरूर पकडला जातो. त्यामुळे आम्ही या प्रकरणी प्रयत्न करत आहोत.

मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी मध्यरात्री उशिरा वक्फ दुरुस्ती विधेयक तथा मणिपूर विधेयकासारखे महत्त्वाचे विधेयक पारित करण्याच्या मुद्यावरूनही नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, आज जे होत आहे तसे पूर्वी केव्हाच झाले नाही. जनतेशी निगडित महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्याऐवजी सरकारने जातीय ध्रुवीकरण करण्यासाठी मध्यरात्री 3-4 वाजेपर्यंत संसदेत चर्चा घडवून आली. मणिपूर सारख्या महत्त्वाच्या मुद्यावर मध्यरात्री उशिरा 4.30 वा. चर्चा सुरू झाली. मी अमित शहांना उद्या चर्चा करण्याची विनंती केली. या मुद्यांवर आम्हाला प्रकाश टाकायचा आहे. लोकांना मणिपूरमधील वस्तुस्थिती समजावून सांगायची आहे. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. याचा अर्थ सरकार जनतेपासून काही तरी लपवून ठेवत आहे.

सरकार आपले अपयश जनतेपासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामु्ळे ते मध्यरात्री संसदेत अशा मुद्यांवर चर्चा करत आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत संसद चालली. यावरून सरकार संसदेला किती गांभीर्याने घेते हे स्पष्ट होते. हे विधेयक पारित झाले तेव्हा संसदेत उपस्थित कुणी झोपत होते, कुणी बसलेले होते, तर कुणी इकडे-तिकडे पाहत होते. या स्थितीत मोदी सरकारने आपले विधेयक आणते. या माध्यमातून सरकार लोकशाही हळूहळू संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे खरगे म्हणाले.

भूतानच्या तरुणीसोबत पुण्यातील नामांकित वकिलाचा अतिप्रसंग:विपीन बीडकर यांना अटक, पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शंतनु कुकडे याच्या विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात पोलिस तपास करत असताना, भूतान येथील एका तरुणीने देखील सात ते आठ जणांविरोधात तक्रार दिल्याने आणखी नवीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील नामांकित वकील विपिन बीडकर यांना देखील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल म्हणाले, शंतनु कुकडे प्रकरणाचा पोलिस तपास करत असताना, कुकडे याच्या फाउंडेशन मार्फत भूतानची एक तरुणी मागील अनेक वर्षापासून त्याच्या सोबत राहत होती. सदर तरुणीची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती कुकडे याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून राहत असताना, कुकडे याच्या ओळखीतील अनेक जणांची ये-जा वेगवेगळ्या कारणाने, पार्टीकरिता सुरु असायची. यादरम्यान, एक वर्षापूर्वी विपिन बीडकर देखील सदर ठिकाणी येऊन त्यांनी तरुणीसोबत अतिप्रसंग केल्याची तक्रार तरुणीची आहे. त्यानुसार अॅड. बीडकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात आणखी सात ते आठ जणांवर ही विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास समर्थ पोलिस करत आहे.

सरकारकडून नागरिकांचा छळ,अवघ्या दीड किमीचा रस्त्यासाठी सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे-भोर तालुक्यातील रस्त्यासंदर्भात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे, तो लवकरात लवकर करावा ह्या मागणीसह सरकारी अनास्थेचा निषेध करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अजून झालेले नाही हे खूप दुर्दैवी आहे. ज्या शहरामध्ये करोडो रुपयांची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात होत आहे. नितीन गडकरी यांच्याकडे कधीही कामासंदर्भात गेलो तर नाही म्हणत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वटीमच्या पाठपुराव्यामुळे सर्वच रस्ते झाले आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर हे अस्थेचे ठिकाण आहे. दीड किमीचा हा रस्ता होत नाही, हे दुर्दैव आहे. गेले 6 महिने आम्ही यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, किमान दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे, पण सरकारकडून मोठा प्रोजेक्ट आहे असे सांगितले जाते पण हा प्लॅन आमच्या पदरात कधी पडणार असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे बनेश्वरला शाळांचा सहली जात असतात, लाखो भाविक जात असतात. पण आम्ही सर्व जणांनी ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा केला असला तरी हा रस्ता होत नाही. मागच्या वेळी हा रस्ता करुण देणार असा शब्द प्रशासनाने दिला होता. दीड किमीच्या रस्त्यासाठी हे सरकार नागरिकांना छळत आहे. आपण काही नवीन रस्ता मागत नाहीये, त्यामुळे परवानगीचा काही संबंध येत नाही. किमान रस्त्यावरील खड्डेतरी बुजवले पाहिजे एवढीच आमची मागणी आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर ही आमच्या सर्वांच्या निष्ठेची जागा आहे. या विषयामध्ये आम्हाला रातकारण आणायचे नाही. तिथे अनेक जण कायम जात असतात, महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या श्रद्धचे स्थान आहे. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मदत केली आहे तर केलीच म्हणावे लागेल. पालखी मार्गाने आपण सर्व जण जातो आहोत, गडकरी यांच्याकडे कोणताही खासदार गेला तर त्याच्या मतदारसंघातील रस्त्याची कामे होतातच.

बनेश्वर देवस्थानचे विश्वस्त म्हणाले की, आमची केवळ एकच मागणी आहे. आमचा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे. आम्ही निवेदन देऊनही रस्ता झालेला नाही. तरी तो रस्ता जितक्या लवकर करता येईल तो करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्ताने भाजपचे २ मंत्री विरुद्ध खासदार असा सामना रंगणार ?

पुणे- दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चे उपचार चांगले , डॉक्टर उत्तम पण प्रशासनाच्या उद्दाम पणामुळे सारे काही बिघडले भाजपच्या महिला अध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी दिनानाठ्चे डॉक्टर घैसास यांच्या विरोधात केलील आंदोलन आणि त्यांच्या क्लिनिक ची केलेली मोडतोड यावर राज्यसभा सदस्य असलेल्या भाजपच्या कोथरूड च्या महिला नेत्या मेधा कुलकर्णी या संतप्त झालेल्या असल्याचे एकीकडे वृत्त झळकलेले असताना राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खुद्द मेधा कुलकर्णी यांच्या समोरच हर्षदा फरांदे यांनी केलेल्या आंदोलनाचे कौतुक केल्याने काल एका बैठकीतून मेधा कुलकर्णी यांनी तातडीने काढता पाय घेतला . यामुळे कोथरूड मधील या ३ नेत्यांमध्ये आता २ मंत्री विरुद्ध एक राज्यसभा सदस्य असा राजकीय सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

काल रात्री भारतीय जनता पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये भाजपा महिला आघाडीच्या हर्षदा फरांदे यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटणार याची कल्पना सुरुवातीपासूनच होती आणि झालेही तसेच. चंद्रकांत पाटील यांनी महिला आघाडीच्या आंदोलनाची उघड पाठराखण करत, ‘महिला आघाडीने केलेले आंदोलन त्यांच्या घरासाठी नव्हे तर संघटनेसाठी होते. आंदोलन करताना ते चुकीच्या पद्धतीने झाले देखील असेल, पण यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होता कामा नये’ असं म्हटलं आहे.तर दुसरीकडे फक्त चंद्रकांत पाटीलच नव्हे तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा महिला आघाडीच्या आंदोलनाची पाठराखण केली. ‘१९ वर्षांपूर्वी आंदोलन करताना माझ्याकडून तोडफोड झाली होती. ती चुकीचीच होती, पण कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला. तुम्ही जशास तसे उत्तर द्यायला शिका. एखादा पक्षाचा नेता चुकीचं सांगत असेल तर तुम्ही चुकीचं बोलताय असं म्हणायला शिका’. असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी आंदोलनाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये आता दोन मंत्री विरुद्ध खासदार असा संघर्ष उभा राहतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.भारतीय जनता पक्षाची ही बैठक सायंकाळी साडेचार वाजता सुरू होणार होती. या बैठकीसाठी खासदार मेधा कुलकर्णी या चार वाजताच बैठक स्थळी उपस्थित राहिल्या. मात्र बैठक सुरू होण्यासाठी तब्बल साडेपाच ते पावणे सहा वाजले. या बैठकीनंतर मेधा कुलकर्णी यांचे काही नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमाचे कारण देत बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच मेधा कुलकर्णी बैठकीच्या बाहेर पडल्या. मात्र कुलकर्णी बैठकीतून बाहेर पडत असताना मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांचे भाषण बाकी होते.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात भारतीय जनता पक्षाची महिला आघाडीने फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरच आंदोलन केलं नाही, तर या सगळ्या प्रकरणात ज्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता त्यांच्या कुटुंबीयांचं क्लिनिक देखील फोडलं होतं. या आंदोलनावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहिलं आणि आंदोलकांना समज द्यावी असं म्हटलं होतं. या पत्रानंतर भाजपमध्ये उघड दोन गट पडल्याचे पाहायला मिळालं. आता याचेच पडसाद काल रात्री झालेल्या भाजपच्या अंतर्गत बैठकीत देखील उमटल्याचे चित्र होते.

पुणे विमानतळधावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक’वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय मंत्री मोहोळ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

पुणे –

पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढावी आणि मोठ्या आकाराच्या विमानांना ये-जा करता यावी, यासाठी आवश्यक असणाऱ्या धावपट्टी विस्तारीकरणाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही वेग येणार आहे. कारण सदरील काम ‘फास्टट्रॅक’वर करण्याचे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. तसेच यात लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून पुणे महापालिका हवाई दलाशी समन्वय साधून हा रस्ता करणार आहे.

काहीच दिवसांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळाली होती. त्यानंतर विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारे भूसंपादन, लोहगावचा पर्यायी रस्ता करणे आणि इतर तांत्रिक बाबी याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक बोलावून विविध निर्देश दिले. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विमानतळाचे संचालक संतोष ढोके, हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत धावपट्टी विस्तारीकरण ‘फास्टट्रॅक’वर करण्याचे निर्देश देऊन इतर बाबींचाही केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी आढावा घेतला.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार असून यासाठी सैन्य दलाची आणि खासगी जागा प्रत्यक्षात किती लागणार आहे? याबाबत सविस्तर चर्चा केली. शिवाय हवाई दलाची विमानतळासाठी आवश्यक असणारी जागा ही विमानतळ प्राधिकरणाला मिळावी, या संदर्भातही चर्चा होत सदरील मागणीचा प्रस्ताव सैन्य दलाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. हवाई दलाच्या या जागेत विमानतळाच्या व्यवस्थापनासंदर्भात यंत्रणा उभी करणे शक्य होणार आहे. तसेच या बदल्यात विमानतळ प्राधिकरणाकडून हवाई दलाला पर्यायी जागा देण्यात येणार असून याबाबतच्या आस्थापनेचा खर्च विमानतळ प्राधिकरणाकडून केला जाणार आहे.

‘महत्वाची बाब म्हणजे धावपट्टी विस्तारणीकरणामुळे विश्रांतवाडी ते लोहगाव हा विमानतळालगत असणारा रस्ता बाधित होणार असल्याने त्याला तातडीने पर्यायी मार्ग तयार करावा लागणार आहे. हा नियोजित पर्यायी रस्ता हवाई दलाच्या जागेतून जाणार आहे. या रस्त्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि या पर्यायी रस्त्याचा खर्च पुणे महापालिका करणार आहे. महापालिका आणि हवाई दल याबाबत समन्वय ठेवणार असून वेगाने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.

धावपट्टी विस्तारीकरण ‘फास्टट्रॅक’वर…

पुणे विमानतळाची तातडीची गरज लक्षात घेता विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार वेगाने होणे आवश्यक आहे. म्हणूनच बैठक घेऊन ही प्रक्रिया ‘फास्टट्रॅक’ने करण्याचे निर्देश दिले आहेत. पुरंदर विमानतळाची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पुणे शहर आणि परिसराची तातडीची गरज लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच ही सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विस्तारासाठीचे भूसंपादन राज्य सरकारकडून वेगाने केले जाणार आहे, मात्र त्यासाठीची पूर्व पूर्तताही वेळेत होणे गरजेचे आहे. म्हणूनच या बैठकीत सविस्तर आढावा घेत वेगवेगळे निर्देश दिले आहेत.

  • मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

पालिकेच्या वारजे हॉस्पिटलला रक्षा मंत्रालयाचा हिरवा कंदील:आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अथक पाठपुराव्याला यश

इसीए बेस फायनान्सिंगच्या भारतातल्या पहिल्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा –
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मोलाचे सहकार्य,
पुणे -संवेदनशील रेड झोन असताना तो ज्ञात करून न घेता वारजे हॉस्पिटल चे तत्कालीन काळात भूमिपूजन तर झाले पण पुढे सुरु झाला खरा खडतर प्रवास आणि तो नजरेच्या टप्प्यात आणून सरते कठीण आणि जाचक प्रवास पूर्ण करत महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पालिकेच्या वारजे हॉस्पिटलला रक्षा मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविले आहे आता या रुग्णालयाच्या बांधकामाला महापालिका कधीही प्रारंभ करू शकणार आहे. राजेंद्र भोसले यांच्या पुण्यातील महापालिकेच्या कारकिर्दीतील हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे
.

महापालिकेचे वारजे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तावीत आहे, या प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला होता, प्रत्यक्षात काम चालू करण्याच्या आधी या हॉस्पिटलच्या बांधकामाचा झोन हा रक्षा मंत्रालयाच्या अति संवेदनशील फनेल रेड क्षेत्रामध्ये येत होता, पालिकेला याबद्दलची कल्पना डॉ राजेंद्र भोसले रुजू झाल्यावर समजले आणि त्यामुळे काम चालू करायच्या आधी रक्षा मंत्रालयाची परवानगी मिळणे गरजेचे झाले होते, संवेदनशील रेड झोन पाहता त्याबद्दलची एनओसी रक्षा मंत्रालय कडून मिळणे फार किचकट व पाठपुराव्याचे काम होते, यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, लोहगाव एअरपोर्ट बेस पुणे, त्यानंतर गांधीनगर रक्षा मंत्रालय बेस गुजरात, आणि त्यानंतर सरते शेवटी दिल्ली रक्षा मंत्रालय असा कठीण आणि जाचक प्रवास होता, पण आता ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे, बांधकामाचा पुढील मार्ग मोकळा झालेला आहे,
पुणे महानगरपालिकेच्या, वारजे येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, एक वर्षापासूनच्या मेहनतीच्या पाठपुराव्याला अखेरीस यश आलेले आहे, नुकतीच या प्रकल्पाला रक्षा मंत्रालयाची एनओसी मिळाली, आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी स्वतः ही एनओसी लवकर कशी मिळवता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले होते, यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे योगदान मोलाचे ठरले व तसेचउपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस,उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजितदादा पवार,केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या पुढील टप्पा हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या विहित बांधकामाच्या परवानग्या आल्यावर या प्रकल्पाचे काम चालू होणार आहे, हा प्रकल्प साधारणपणे २०२७ ला पुणेकरांच्या सेवेत रुजू करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट असून, यामध्ये लागणारी संपूर्ण गुंतवणूक ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट धोरणाच्या अंतर्गत नेदरलँड येथील निम शासकीय संस्था करणार आहे, या संपूर्ण प्रकल्पाला नेदरलैंड येथील शासकीय संस्थेचा इन्शुरन्स मिळालेला आहे, या संपूर्ण प्रकल्पाचा ड्राफ्ट डीपीआर रक्षा मंत्रालयात देण्यात आला.
या हॉस्पिटलमध्ये विशेष भर हा कॅन्सर आणि मदर अँड चाइल्ड केअर यावर देण्यात असून, महाराष्ट्रातील मदर अँड चाइल्ड केअर चे हे सर्वात मोठे हॉस्पिटल राहणार आहे, या प्रकल्पामध्ये जवळपास दहा ते वीस टक्के बेड हे गरजूंना रिझर्व राहणार आहे, राज्य शासनाच्या सर्व आरोग्य योजना, या प्रकल्पामध्ये राबवण्यात येणार आहेत, प्रकल्प चालू झाल्यावर दरवर्षी पालिकेला यामधून ठराविक उत्पन्न मिळणार आहे, संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत मिळाल्यानंतर आता सदर हॉस्पिटल ची जागा या प्रकल्पासाठी उपयोगात येणार आहे, आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी हा प्रकल्प करत असलेल्या रुलर एनान्सर्स या संस्थेने संरक्षण मंत्रालयाची आणि इतर परवानग्या येईपर्यंत सदर जागेतील डायलिसिस सेंटर रुग्णांना गैरसोय होऊ नये म्हणून कार्यान्वित ठेवले होते.
प्रकल्प चालू झाल्यापासून कार्यान्वयीत होईपर्यंत परदेशी गुंतवणूक करणाऱ्या एफडीआय संस्था पालिकेला जवळपास साडे सतरा कोटी रुपयांची बँक गॅरंटी देणार आहे, तसेच हा प्रकल्प चालू झाल्यावर या संस्थेमार्फत पालिकेच्या माध्यमातून सुकाणू समिती या प्रकल्पावर देखरेख करेल, हा प्रकल्प आरोग्य व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रातील मानांकित हॉस्पिटल म्हणून लोकांमध्ये ओळखल्या जाईल.या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा हॉस्पिटल प्रकल्प भारतातील पहिला इसीए फायनान्सिंग संकल्पनेवर आधारित असून, यानंतर महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्थेचे जाळे निर्माण करण्यास फार मोठी मदत या माध्यमातून होणार आहे.

घोड्यांच्या रेसवर ऑनलाईन जुगार,फातिमानगरमध्ये छापा

पुणे- घोड्यांच्या रेसवर ऑनलाईन जुगार घेणाऱ्या फातिमानगर येथील अड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा मारला . या स्नाद्र्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०६/०४/२०२५ रोजी श्रीराम नवमी बंदोबस्ताच्या अनुषंगाने व वरिष्ठांचे आदेशाने वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करणे व अवैध धंद्यांना प्रतिबंध करणेकामी वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे व स्टाफ असे पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकांना बातमी मिळालेल्या बातमीवरुन स.नं. १७, बालाजी दर्शन, चौथा मजला, प्लॅट नं.४०४, फातिमानगर, वानवडी, पुणे येथुन एक इसम हा त्यांचे ओळखीचे ग्राहकांकडुन रेसकोर्सच्या घोड्यांवर जुगार घेऊन त्याचे काम पाहणारे कामगारांकडुन यांचे करवी भारतात ऑनलाईन रिंगवर जुगार लावुन ते हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी भारतात चालणारे घोड्यांच्या रेसवर ऑनलाईन जुगार, व पैशाची देवाणा-घेवाण करताना मिळुन आल्याने व ते जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे ताब्यातुन एकुण ५५,०००/-रु.कि.चे जुगाराकरीता वापरलेले मोबाईल व इतर मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द वानवडी पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. १५६/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नमुद आरोपीना भा.न्या.सं. कलम २९ प्रमाणे नोटीस देण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक धनाजी टोण हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परि-०५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, वानवडी पो.स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, धनाजी टोणे, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे, विष्णु सुतार, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण व बालाजी वाघमारे या पथकाने केली आहे.

देशाला आकार देण्यात अभियंता-वास्तूविशारद यांची भूमिका महत्वपूर्ण: आर्कि. अभय पुरोहित

आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण

पुणे: “बांधकाम क्षेत्रात नवीन पद्धतीचे प्रकल्प स्पर्धात्मक भावनेने उभे रहात आहे. देशाच्या प्रत्येक शहरात पायाभूत सुविधा निर्माण होत असून, त्यामध्ये आर्क्टिकेट बहुमूल्य योगदान देत आहेत. इंजिनिअर आणि आर्क्टिकेट यांची देशाला नवीन आकार देण्यात महत्वपूर्ण भूमिका आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्कि. अभय पुरोहित यांनी केले.

आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे (एईएसए-एसा) आयोजित ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात पुरोहित बोलत होते. एनडीए रस्त्यावरील रॉयल कोर्ट बँक्वेट्स येथे झालेल्या या सोहळ्यावेळी आर्कि. संजय तासगावकर, ‘एईएसए’चे चेअरमन आर्कि. महेश बांगड, अध्यक्ष आर्कि. राजीव राजे, संयोजक इंजि. पराग लकडे, आर्कि. विश्वास कुलकर्णी, इंजि. जयंत इनामदार आदी उपस्थित होते. प्रसंगी पुरोहित यांच्यासह विनायक पै व अशोक बेहेरे यांना ‘एईएसए’चे मानद सदस्यत्व सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

आर्कि. अभय पुरोहित म्हणाले, “एखाद्या शहराची, भागाची, देशाची ओळख ही तेथील पायाभूत सुविधा, विकास यावरून होत असते. देश विकासाच्या वाटेवर असताना त्यापद्धतीने पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाही, तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संबंधित घटकांनी यापुढेही भरीव योगदान देत राहावे. ‘एईएसए’ ही संस्था ५० वर्ष जुनी असून, यामध्ये वेगवेगळे इंजिनिअर्स, आर्किटेक्ट जोडले गेले आहेत. व्यावसायिकांनी एकत्रितपणे चांगले काम केल्यास कोणतेही काम मोठे किंवा छोटे असा भेदभाव राहत नाही. पुढील चार दशकात देश मोठ्या प्रमाणात विकास साधणार आहे. त्याचे साक्षीदार व साथीदार होण्याची संधी आपल्याला आहे.

आर्कि. अंकुर कोठारी यांना ‘रोहन यंग अचिवर्स अवॉर्ड’, फिनिक्स अकीला टॉवरला पुणे शहराबाहेरील ‘नॉन रेसिडेन्शियल प्रकल्प बांधणी पुरस्कार’, आर्कि. राहुल गोरे (हाउस ऑफ अँम्बी व्हॅली) यांना ‘सिंगल रेसिडेशनशियल प्रकल्प बांधणी पुरस्कार’, आर्कि. ओंकार काळे यांना पुण्यात ‘नॉन रेसिडेन्शियल हॉस्पिटॅलिटी प्रकल्प बांधणी पुरस्कार’, आर्कि. रवी कान्हेरे यांना ‘नॉन रेसिडेन्शियल पब्लिक अँड कल्चर पुरस्कार’, आर्क्टि. हेमंत महाजन यांना ‘नॉन रेसिडेन्शियल अडॅप्टिव रियूज प्रकल्प पुरस्कार’ व ‘रेसिडेन्शियल सिंगल फॅमिली होम पुरस्कार’, पुण्यातील ‘सिंगल रेसिडेन्शियल प्रकल्प पुरस्कार’ आर्कि. दर्शन मेढी, आर्कि. विनोद दुसिया यांना ‘पुणे रेसिडेन्शियल स्टँड अलोन मल्टी टेनिमेंट बिल्डिंग पुरस्कार’, तर आर्कि. सितेश अग्रवाल यांना ‘रेसिडेन्शियल ग्रुप हौसिंग पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

अशोक बेहेरे, विनायक पै यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आर्कि. पराग लकडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. आर्कि. आलोका काळे व आर्कि. मनाली महाजन यांनी सूत्रसंचालन केले. आर्कि. महेश बांगड यांनी आभार मानले.

लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ या पहिल्या मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.मुंबईत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर, कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, अभिजीत खांडकेकर, लेखिका नेहा शितोळे तसेच निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. हा क्षण लव फिल्म्सच्या मराठी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. दमदार अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून ‘देवमाणूस’ मराठी प्रेक्षकांमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप सोडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस माझ्यासाठी अत्यंत जवळचा चित्रपट आहे. भावना, नाट्य आणि थरार यांचा सुरेख संगम या चित्रपटात आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. प्रेक्षक या कथेशी आणि पात्रांशी कसा संवाद साधतात हे पाहाण्याची उत्सुकता लागली आहे.”

निर्माते लव रंजन म्हणाले, “देवमाणूस हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला मनापासून दिलेला आदर आहे. त्यातील कला, संगीत आणि कथा सांगण्याची शैली यांचा सन्मान आहे. मराठी चित्रपटसृष्टीत उंबरठा ओलांडताना, हा केवळ आरंभ नसून दर्जेदार कथा सादर करण्याचा आमचा नवा संकल्प आहे.”

निर्माते अंकुर गर्ग म्हणाले, “देवमाणूस हा लव फिल्म्सच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेजस देऊस्कर यांचे प्रभावी दिग्दर्शन, तसेच महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि संपूर्ण टीमच्या दमदार कामगिरीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकणार आहे. आम्ही या चित्रपटाचा भाग होण्याचा अभिमान बाळगतो आणि २५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहोत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी अधिक अर्थपूर्ण आणि आकर्षक चित्रपट देण्याचा आमचा निर्धार ‘देवमाणूस’मधून अधोरेखित होतो.”

लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’, लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सहाय्यक तंत्रज्ञानासाठी अनुकूल परिसंस्था विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या वतीने पुण्यात कार्यशाळेचे आयोजन

पुणे-

नीती आयोग, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने 9 एप्रिल 2025 रोजी पुण्यात यशदा येथे “भारतामध्ये सहाय्यक तंत्रज्ञानासाठी अनुकूल परिसंस्था विकसित करणे” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करत आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे या कार्यशाळेचे उद्घाटन करणार असून यावेळी महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल उपस्थितीत राहणार आहेत.

दिव्यांग, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेता, भारतात सहाय्यक उपकरणे आणि उत्पादनांची आवश्यकता वाढत चालली आहे. ही सहाय्यक उपकरणे आणि उत्पादने या व्यक्तींच्या जीवनाची गुणवत्ता वाढवतात तसेच अधिक समतापूर्ण आणि समावेशक समाजाच्या विकासाला हातभार लावतात. देशातील तंत्रज्ञान विषयक विकास आणि उत्साही स्टार्ट-अप परिसंस्थेत झालेल्या प्रगतीमुळे भारताला केवळ देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर इतर देशांच्या गरजा भागविण्यासाठी देखील सहाय्यक तंत्रज्ञान (AT) उत्पादन केंद्र बनण्याची प्रचंड क्षमता आहे.

या कार्यशाळेत सुमारे 200 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही कार्यशाळा केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधन संस्था आणि सहाय्यक तंत्रज्ञान (AT) उद्योग/स्टार्टअप्स यासारख्या विविध भागधारकांना भारतातील सहाय्यक तंत्रज्ञानाची वर्तमान आणि भविष्यातील परिस्थिती यावर चर्चा करण्यासाठी तसेच देशात सहाय्यक तंत्रज्ञानाला (AT) प्रोत्साहन देण्यासाठी एक परिसंस्था विकसित करण्यासाठी मिळालेल्या सूचनांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. भारतातील सहाय्यक तंत्रज्ञानाची उपलब्धता सुधारणे, सहाय्यक तंत्रज्ञानातील राज्य उपक्रम, सहाय्यक तंत्रज्ञान उत्पादने आणि जागतिक सहकार्य या विषयांवर या कार्यशाळेत चर्चा होईल.

कार्यशाळेत होणाऱ्या चर्चा आणि मिळणाऱ्या सूचना भारतात सहाय्यक तंत्रज्ञानासाठी परिसंस्था विकसित करण्यासाठी तसेच ‘विकासात कोणीही मागे राहणार नाही’ या तत्वाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात योगदान देईल. 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह ! उद्घाटन संपन्न .

पुणे (दि.०८/०४/२०२५)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक 8 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
सामाजिक समता सप्ताह उपक्रमाचे उद्घाटन येथील सामाजिक न्याय भवनात आज दि.८.०४.२०२५ रोजी श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री.प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्यासह समाज कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दरवर्षी दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत अनुसुचित जाती, जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय्य साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम राबविला जातो.
पुणे विभागातील सर्व जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण, तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, व जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयामार्फत या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. समता सप्ताह दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे त्यामध्ये मंगळवार, दि.०८ एप्रिल, २०२५ ते सोमवार, दि.१४ एप्रिल, २०२५ भारतीय संविधानाची उद्देशिका / प्रस्ताविका यांचे वाचन करून भारतीय जनतेत संविधाना विषयी जनजागृती निर्माण करणे. बुधवार,दि.०९ एप्रिल, २०२५ सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करणे, जिल्हा व विभागीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करणे, गुरूवार, दि.१० एप्रिल, २०२५ विभागामध्ये समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका या द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करणे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे मार्फत प्रत्येक जिल्ह्यात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा आयोजित करणे, तसेच सदर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे, शुक्रवार, दि.११ एप्रिल, २०२५ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे तसेच महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी वक्ता बोलावून, कार्यक्रमांचे आयोजन करणे, शनिवार, दि.१२ एप्रिल, २०२५ संविधान जागर- भारतीय संविधाना विषयी सर्वसाधारण माहिती देणे जसे की, संविधानाची निर्मिती, संविधान निमिर्ती समिती, अनुच्छेद, विशेषतः मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करणे (किमान ६० ते ९० मि.) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयात महिला मेळावा आयोजित करून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे, रविवार , दि.१३ एप्रिल, २०२५, प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करणे, तसेच प्रत्येक जिल्हयात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करणे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने जिल्हयातील सर्व महत्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविणे, सोमवार, दि.१४ एप्रिल, २०२५ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे, जिल्हास्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करणे. तसेच सदर दिवशी विभागातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात Online-Validity प्रमाणपत्र प्रदान करणे हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, पुणे विभाग यांनी दिली असून, सदर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माहिती केले आहे.

एमआयडीसीने घेतला अटी शर्तींचा भंग केलेल्या कंपनीकडून भूखंडाचा ताबा

बारामती, दि.८: भाडेपट्टा करारनाम्याने वाटप केलेल्या भूखंडाच्या अनुषंगाने अटी व शर्तींचा भंग केल्याने मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्याकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूखंड परत ताब्यात घेतला आहे.

मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांना महामंडळाने ५ नोव्हेंबर २००९ रोजी भाडेपट्टा करारनाम्याद्वारे भूखंड वाटप केला होता. महामंडळाच्या भाडेपट्टा करारनामा मधील अटी व शर्ती भंग केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडाचा करारनामा रद्द करण्याबाबत टर्मिनेशन नोटीस महामंडळाकडून १६ जानेवारी २०२५ अन्वये बजावण्यात आलेली होती. त्यानुसार आज (८ एप्रिल) या भूखंडाचा पंचनामा करून महामंडळाने सदर भूखंडाचा रितसर ताबा परत घेतलेला आहे, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

पुणे, दि. ८: पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून लेखी समस्या मांडता यावी याकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबईमार्फत १५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरासाठी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला येथे सकाळी १० वाजता पुणे शहरासाठी १५ एप्रिल रोजी तर पुणे ग्रामीणसाठी १६ एप्रिल रोजी जनसुनावणी घेण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृह, पिंपरी येथे १७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वा. जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

या सुनावणीकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष उपस्थित राहणार असून पीडित महिला, तक्रारदार महिलांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी केले आहे.
0000